অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वस्त्रकला भाग १

वस्त्रप्रावरण

वस्त्रप्रावरण हे मानवाच्या आवश्यक गरजांचे अविभाज्य अंग आहे. तयार कपडे उद्योगाने तर आजच्या काळात भरीव प्रगती केलेली आहे. जाडेभरडे कपडे किंवा तलम कपडे वापरणे हा मानवाच्या नैसर्गिक आवडी-निवडीचा भाग बनला आहे. सांप्रत कापडाच्या लोकप्रिय प्रकारांपैकी बहुतांश कपडे एकरंगी, बहुरंगी, अलंकरणयुक्त असे विविध प्रकारचे असल्यामुळे माणसाला ते आकर्षून घेतात. रंगांच्या आकर्षणामुळे एकरंगी किंवा बहुरंगी कापडाची मानवाला अधिक भुरळ पडते. परिणामतः सुंदरता, आलंकारिक रचना आणि रंगसंगती या दृष्टींनी मानवाच्या वेशभूषेत विविधता आढळते.

कापडनिर्मिती आणि तिच्या इतिहासाशी मानवाचा घनिष्ठ संबंध प्रस्थापित झालेला दिसतो. त्याचे मूळ नवाश्मयुगापर्यंत पोहोचते. प्राचीन काळी मानव झाडांची वल्कले, प्राण्यांची कातडी इत्यादींचा ‘वस्त्र' म्हणून वापर करीत असल्याचा उल्लेख निरनिराळ्या ग्रंथांत आढळतो. कालांतराने मानवी संस्कृती, राजकारण, धर्म यांच्या स्थित्यंतरामुळे कापडाच्या उपयोगावर आणि प्रसारावरही परिणाम झालेला दिसतो. आधुनिक काळात सुती, रेशमी, टेरिकॉट, टेरिलीन इ. विविध प्रकारच्या कापडांनी वस्त्रप्रावरणात आमूलाग्र क्रांती घडून आलेली आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे कापडनिर्मितीत दिवसेंदिवस बदल होत असून तीमध्ये विविधता व अद्ययावतता दिसून येत आहे.

वस्त्र

विणलेले कापड म्हणजे वस्त्र, असे परंपरागत अर्थाने म्हटले जाते. टसर ह्या लॅटिन शब्दाचा ‘विणणे', असा अर्थ होतो. सूत विणून त्यापासून मागावर कापड तयार करतात. विविध कापडांचा वस्त्रात अंतर्भाव केला जातो. विणकाम केलेले कापड, फेल्ट, जाळीदार कापड, जाळ्या इ. प्रकार त्यांत मोडतात. तंतू व सूत यांचा कापड तयार करण्यासाठी होत असलेल्या प्रक्रियेस ‘कापड उद्योग' अशी संज्ञा दिली जाते.

कापडगिरण्यांतून निर्माण करण्यात येणाऱ्या विविध आकर्षक कापडात मुलायम सुती कापड, लोकरीचे कापड, नायलॉन, टेरिलीन, टेरिकॉट इत्यादींचा समावेश होतो. हे कापड-उत्पादन विविध रंगांत व मुबलक प्रमाणात केले जाते. कापड-उत्पादनाचा बहुतांश भाग तयार कपड्यांनी व्यापलेला आढळतो. उर्वरित भागाचे श्रेय वेशभूषा, ब्लँकेट, चादरी, टॉवेल इत्यादींच्या उत्पादनाकडे जाते.

कापडाचा विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी उपयोग होतो. यांत प्रामुख्याने विविध खेळांमध्ये वापरण्यात येणाऱ्या जाळ्या, जहाजांची शिडे, ग्रंथवेष्टने, पताका, रोधक पट्‌ट्या, टपालवाहतुकीच्या पिशव्या, पॅराशूट, टंकलेखन यंत्रांच्या फिती, छत्र्या इत्यादींचा समावेश होतो. स्वयंचलित यंत्रांचे कारखानदार गालिचे, खुर्च्या, गाद्या यांचे पडदे यांसाठी, तर दवाखान्यांत बॅंडेजपट्‌ट्या, शल्यचिकित्सेसाठी लागणारा दोरा व चिकटपट्‌ट्या यांसाठी कापडाचा उपयोग करतात. प्राचीन काळी रेशमी कापडाचा क्वचितच वापर केला जाई. रेशमी कापडाऐवजी सुती कापडच त्याच्या ऐतिहासिक पुराव्याची ग्वाही देते. याउलट काही देशांत लोकरीच्या कापडनिर्मितीचा, त्यांच्या अर्थव्यवस्थांत मोठ्या प्रमाणावर समावेश झालेला दिसतो. कापड नाशवंत असल्याने, किंबहुना किड्यांनी ते नाशवंत होत असल्याने त्यांचे प्राचीन पुरावेदेखील इतिहासजमा झालेले आढळतात.

अश्मयुगीन संस्कृती

अश्मयुगीन संस्कृतीमधील लोकांच्या राहणीमानाचा अभ्यास केल्यास वस्त्रकलेच्या विकासाची साक्ष पटते. ईजिप्त व पेरू यांच्यात अर्वाचीन संस्कृतींनी कापडतंतूंचा मोठ्या प्रमाणावर साठा करून ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. ६,००० ते ७,००० वर्षांपूर्वीचे लिनन कापड ईजिप्तमध्ये सापडले असून इ. स. पू. पंधराव्या शतकातील चित्रजवनिकेचे नमुने मिळतात. भारतात सु. इ. स. पू. २००० वर्षांपासून अतिशय तलम जवळजवळ पारदर्शक सुती कापड विणले जात असे व ग्रीस देशापर्यंत निर्यात होत असे. ग्रीक लोक त्यास ‘नेब्युला व्हँतो' म्हणजे ‘विणलेला वारा' असे संबोधित. चीनमध्ये सु. ५०० वर्षांपूर्वी रेशीमकापड तयार होत असल्याचा अंदाज आहे.

रोमन साम्राज्याच्या काळात व हान साम्राज्याच्या काळात (इ. स. पू. २०० ते इ. स. २००) वस्त्रकलेचे काही नमुने उपलब्ध असले, तरी त्यात दोन शतकांत झपाट्याने प्रसार झालेल्या रेशीमउत्पादनाची बरीच आकडेवारी आढळते. सिरियामधील पामीर येथून आशियापलीकडे निघालेला रेशीममार्ग सायबीरियातील नॉइन उलापर्यंत पोहोचलेला आढळतो. इ. स. पू. पहिल्या शतकात रेशमी उत्पादनासाठी मागाचा महत्तम उपयोग होत असल्याचे तो दर्शवितो. रेशमाला हिऱ्यांसारखा दर्जा लाभल्याने ते पौर्वात्य देशांतून रोमन साम्राज्याच्या काळापासून आयात करण्यात येई. झां बातीस्त कॉलबेअर याच्या रेशीमउत्पादनाच्या विचारधारेला फ्रेंच अर्थव्यवस्थेत मानाचे स्थान लाभले.

प्राचीन काळी जागतिक उत्पादनात ख्यातनाम झालेले कॉप्टिक कापड ईजिप्तमधील थडग्यांत आढळले आहे. ईजिप्तमधील ख्रिस्ती वस्त्रप्रकार ‘कॉप्टस' नावाने ओळखला जाई. या देशातील काही कापडांचे नमुने हातमागावर विणलेले असून त्यांचे विणकाम सिरियामध्ये झाल्याचे विश्वसनीय रीत्या विशद करण्यात येते. पहिल्या ते सातव्या शतकांतील वस्त्रप्रकारांचे पूर्ण व खंडप्राय नमुने जगातील विविध संग्रहालयांत जतन केलेले आढळतात. जपानमधील नारा येथील शोसोईन संग्रहालयातील कापड आजच्या दर्जेदार कापडाशी तुल्यबळ ठरते. ह्या संग्रहालयात थांग काळातील (इ. स. ६१८-७६)विविध प्रकारांचे चिनी रेशमी कापड अंतर्भूत आहे. त्यानंतरच्या कापड-उत्पादनावर बायझंटिनकालीन रेशमी कापड-उत्पादनाचे प्रतीक म्हणून संबोधिल्या जाणाऱ्या सॅसॅनिडी आकृतिबंधाचा प्रभाव आढळतो. आठव्या शतकातील बायझंटिन रेशमी कापडाचा दर्जा दहाव्या ते बाराव्या शतकांतील रेशमी कापडाच्या तुलनेत कमी प्रतीचा आढळतो. ह्याच काळात बगदाद तसेच सिरिया, इराण, ईजिप्त, स्पेन इ. देशांत ख्याती पावलेले इस्लामकालीन रेशमी कापडाचे उत्पादन झाले. अकराव्या शतकात सिसिली ताब्यात जाण्यापूर्वी ते इस्लाम काळातील रेशमी कापड-उत्पादनाचे प्रसिद्ध केंद्र होते. सु. २०० वर्षांपासून तेथे रेशीमकिड्यांची पैदास व त्यांपासून काढण्यात येणाऱ्या धाग्यापासून विणकाम होत असून त्या कापड  उत्पादनास मुसलमान व बायझंटिन साम्राज्यांचा काळ विशेष अनुकूल ठरला. बाराव्या शतकातील सिसिलीमध्ये भरतकाम केलेले रेशमी कापड आजही जतन करून ठेवलेले आढळते. तेराव्या शतकातील मोगल राजांनी सु. ६०० वर्षांपासून मुसलमानी राजांच्या काळात ऱ्हास पावलेले रेशीमकापड-उत्पादन पुन्हा सुरू केले. चिनी रेशमी कापडावर प्रारंभी सारखा आकार नसलेले रोमनेस्क कलेतील प्राण्यांचे भडक आकृतिबंध काढण्यात आले. नंतर गॉथिक शैलीचा त्यांवर प्रभाव पडून अप्सरांच्या कथांमधील चित्रांना तो बहुमान प्राप्त झाला. म्हणूनच यूरोपीय देशांतील बाजारपेठांत चिनी कापड आकृतिबंधातील महत्तम स्थित्यंतर, दर्जा व गुणवत्ता यांमुळे विख्यात ठरले.

यूरोपियन वस्त्रकला

यूरोपियन वस्त्रकलेतील रंगीत चित्रे, धर्मोपदेशकांचे पोषाख, बदलते दर्शनी भाग तसेच चर्च इ. ख्रिस्ती धर्माचा प्रभाव दर्शवितात. मध्ययुगीन काळात इटली व स्पेन ही रेशमी कापडनिर्मितीची प्रमुख केंद्रे होती. पंधराव्या शतकातील वस्त्रांवर आकृतिबंध प्रामुख्याने डाळिंबी आकाराचे असून ईजिप्तमधील कमळाच्या कलाकृतींची ती प्रतिकृती आढळते. ह्याचा उगम चिनी व इराणी वस्त्रकलांतूनच झालेला आहे. मखमलीसारखे रेशमी कापड यासाठी वापरण्यात येते. उत्तर यूरोपमधील वस्त्रकलेत लोकरीवर चित्रजवनिका माध्यमाचा वापर करण्यात आला. तत्कालीन लिनन कापडाचे तुकडे आजही उपलब्ध आहेत. निळ्या सुती कापडावर गॉथिक आकृतिबंधाचा वापर केलेले टॉवेलदेखील प्रख्यात आहेत.

चीन आणि भारत यांमधून अनुक्रमे रेशमी व सुती कापड यांच्या आयातीमुळे २०० वर्षे खंडित झालेले यूरोपमधील कापड-उत्पादन पुन्हा मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. १६ व १७ ही दोन शतके म्हणजे इराणी कापड-उत्पादनाचे सुवर्णयुग मानली जातात. निम्ननप्रतीच्या पॉलिक्रोम रेशमापासून व मखमलीपासून गाठीचे सुबक रंग तयार होऊ लागले. मनुष्यांच्या व प्राण्यांच्या प्रतिकृती त्यांमधील आकृतिबंधांत चितारण्यात आल्या. एके काळी बर्सा येथील मखमल इराणी मखमलीच्या तुलनेत कमी प्रतीची असतानाही तिच्या उत्पादनास दर्जा प्राप्त होऊन ऑटोमन साम्राज्याने मखमल-उत्पादनात प्रगतीचा उच्चांक गाठला. सतराव्या शतकात हा कापड-उत्पादनाचा दर्जा ढासळला. ह्याच शतकातील यूरोपीय कापड-उत्पादन श‌ृंगारवस्तूंच्या उत्पादनाप्रमाणे वृद्धिंगत होऊन त्यास गुणवत्ता व दर्जा प्राप्त झाला. सिसिली येथील मखमल-उत्पादनास सोळाव्या शतकात हा लाभ मिळून त्याने १०० वर्षांपूर्वीचा प्रगतीचा उच्चांक गाठला.

लेखक : म. व्यं. मिसार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate