অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वालुकाचित्र

वालुकाचित्र

नॅव्हाहो जमातीतील एक वालुकाचित्र

(सँड पेंटिंग किंवा ड्राय पेंटिंग). अमेरिकन-इंडियन जमातींतील एक पारंपारिक कलाप्रकार. हा कलाप्रकार कॅलिफोर्नियाच्या पठारांवरील इंडियन जमातींत व अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागातील नॅव्हाहो व प्वेब्लो [ प्वेब्लो - १] या इंडियन जमातींत अस्तित्वात आहे. जगातील इतर सर्व आदिवासी जमातींप्रमाणे त्यांच्या या कलानिर्मितीचे मूळ त्यांना विश्वाबद्दल, नैसर्गिक शक्तींबद्दल वाटणाऱ्या कुतूहलात आहे. जगण्याची ईर्ष्या, त्यासाठी करावी लागणारी धडपड, निसर्गतत्वाचे गूढ उकलण्याचा प्रयत्न ह्यांतून त्यांच्या समजुती, विधी, जादूटोणा इ. निर्माण झाले. साहजिकच त्यांच्या या निर्मितीमागची प्रेरणा सौंदर्यपूर्ण आविष्कारापेक्षा धार्मिक स्वरूपाची किंवा रोगनिवारण विधीच्या स्वरूपाची आहे. याशिवाय वैश्विक शक्तींशी सुसंवाद साधणे, भयकारी शक्तीपासून स्वतःचे संरक्षण करणे हीदेखील ही चित्रे काढण्यामागची उद्दिष्टे असतात. विधींशी संबंधित प्रार्थना म्हणणारे जमातीतील तज्ज्ञ ही चित्रे काढतात.

अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिम भागातील वालुकाचित्रे आकृतिबंधाच्या दृष्टिकोणातून गुंतागुंतीची व प्रभावी असून, कॅलिफोर्नियाच्या इंडियन जमातीत व इतर जमातींत निर्माण होणारी वालुकाचित्रे साधी व  सोपी आहेत. ही चित्रे काढण्यासाठी मुख्यत्वे वाळू, राख, खनिजद्रव्ये व वनस्पतींपासून तयार होणारे रंग अशा कोरड्या वस्तूंचा वापर केला जातो. विविधरंगी वाळू, दगडाची पूड, कोळशाची पूड, राख, पुष्परेणू किंवा फुलझाडांचा मोहोर या द्रव्यांचा वापर करून पांढरा, पिवळा, निळा, काळा, तांबडा अशा रंगांनी ही चित्रे काढतात. चित्रे शैलीदार व प्रतीकात्मक असतात. चित्र काढण्यासाठी स्वच्छ, गुळगुळीत व सपाट केलेल्या वाळूच्या पृष्ठभागाचा वापर केला जातो. हातामध्ये रंगाची पूड घेऊन अंगठा व बाजूचे बोट यांच्या चिमटीतून ती रांगोळीप्रमाणे सोडली जाते. रंगाची पूड सोडण्याच्या पद्धतीतून रेषा व त्या बाजूचे रंग, आकार इ. तपशील तयार होतात. वालुकाचित्रांचे आकृतिबंध सर्वसाधारणपणे वर्तुळाकार किंवा आयताकृती असून, त्यांचे आकार ३ फुटांपासून (०.९१ मी.) ते २० फुटांपर्यंत (६.१० मी.) असतात. ही चित्रे काढणे हा प्रार्थनेबरोबर कारवयाचा पवित्र विधी असून प्रार्थना व विधीनंतर ती दैवी शक्तीने भारली जाऊन जागृत होतात, असा या जमातींचा नॅव्हाहो जमातीतील एक वालुकाचित्रनॅव्हाहो जमातीतील एक वालुकाचित्रविश्वास आहे. काही आकृतिबंधांमध्ये संरक्षण व बचाव यांबरोबरच आशीर्वाद वा अभय देण्याचे व रोगांवर उपचार करण्याचे सामर्थ्य असते, अशी समजूत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती व त्यांचे सहकारी ही चित्रे काढतात व त्यांचा मोबदला दिला जातो. अशा व्यक्तींना 'सिंगर्स' असे म्हणतात. कारण तेच या विधींशी संबंधित प्रार्थनाही म्हणतात. रोग बरा करण्याच्या विधीत विवक्षित वालुकाचित्राची निवड रोग झालेल्याने करायची असते. चित्र पूर्ण झाल्यावर रोगी व्यक्ती चित्राच्या मध्यभागी बसते व चित्रातील वाळूचे किंवा रंगाचे त्याच्या शरीराच्या भागांना लेपन करण्यात येते. ज्यावेळी हा विधी पूर्ण होतो, त्यावेळी संपूर्ण चित्र नष्ट केले जाते व पुन्हा ज्यावेळी विधी होणार असेल त्यावेळी ते स्मरणाने काढावे लागते. वालुकाचित्रांचे सु. १,००० आकृतिबंध उपलब्ध आहेत. १८८० मध्ये प्रथमतः वालुकाचित्रांच्या प्रतिकृती केल्या गेल्या, तेव्हापासून चित्रांच्या शैलीत काही वैशिष्ट्यपूर्ण फरक झाले नाहीत. वालुकाचित्रातील आकृतिबंध ठराविक स्वरूपाचे असल्यामुळे, वैयक्तिक निर्मितिवैविध्य फारसे आढळत नाही.

वालुकाचित्रांमध्ये वेगवेगळ्या देवतांच्या परंपरागत आकृत्या असतात, तसेच इंद्रधनुष्य, झुडपे, प्राणी, वीज, पाऊस, पौराणिकदृष्ट्या महत्त्वाचे ग्रह, तारे, नक्षत्रे आणि विधींबरोबर म्हणावयाच्या प्रार्थनांमधील अनेक प्रतीके या चित्रांतून काढलेली असतात. अनेकदा चित्राच्या तीन बाजूंना इंद्रधनुष्याचे प्रतीकात्मक मानवरूपी चित्रण केलेले आढळते. अमेरिकेतील इंडियन जमातींच्या मिथ्यकथांमधील सहा दिशांची संकल्पना ही त्यांच्या, विशेषतः प्वेब्लो इंडियन जमातीच्या कलेत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या कल्पननेनुसार सर्व वस्तुमात्र जगताचा या संकल्पनेशी संबंध आहे. प्राणी, झाडेझुडपे व नक्षत्रे ही दिशांची प्रतीके असून त्यांना विधीमध्ये महत्वाचे स्थान असते. दिशा या संकल्पनेशी प्रतीकरूपाने निगडित असणारे रंग हे आकाशातील रंगांवर व विधीच्या स्वरूपावर अवलंबून असतात. चित्रात वापरल्या जाणाऱ्या पांढरा, पिवळा, निळा, काळा, तांबडा अशा प्रत्येक रंगाला प्रतीकात्मक दृष्टिकोणातून महत्व असते. प्रत्येक जमातीनुसार चित्रात वापरल्या जाणाऱ्या रंगांमध्ये बदल होत जातो, प्वेब्लो इंडियन जमातीत सर्वसाधारणपणे पूर्वेसाठी पांढरा, दक्षिणेसाठी पिवळा, काळा किंवा निळा, पश्चिमेसाठी निळा किंवा पिवळा, खस्वस्तिकासाठी निळा किंवा अनेक रंग व अधःस्वस्तिकासाठी काळा किंवा पांढरा असे रंग वापरतात. नॅव्हाहो व प्वेब्लो यांच्या वालुकाचित्रांतून दक्षिण अमेरिकेतील उच्च दर्जाची पारंपारिक कलानिर्मिती पहावयास मिळते.

नॅव्हाहो जमातीचा १६८० नंतर प्वेब्लो जमातीमधील टोळ्यांशी संबंध येऊन त्यांच्या कलात्मक आविष्कारांवर व विधींवर त्यांचा प्रभाव पडला. प्वेब्लो वालुकाचित्रांचे अत्यंत कमी पुरावे उपलब्ध असून  त्यावरून हे लक्षात येते की, नॅव्हाहोंनी त्यांतील सामर्थ्य ओळखले व त्यांतून अधिक कल्पकतेने अनेकविध रूपे व आकृतिबंध निर्माण केले. यांतील काही चित्रे काळविटाची कातडी जमिनीवर पसरून त्यावर काढली जात, तर काही वाळूच्या सपाट व गुळगुळीत केलेल्या थरावर काढली जात. नॅव्हाहो वालुकाचित्रांचे आकृतिबंध साधारणतः वर्तुळाकार किंवा आयताकृती असतात. त्यांतील मुख्य कल्पना ही अमूर्त भौमितिक आकार, मानवरूपांचे वक्राकारांत वा भौमितिक आकारांत केलेले शैलीकरण, प्राण्यांचे व मक्याच्या रोपांचे तुलनात्मक दृष्ट्या नैसर्गिक आकार, नागमोडी रेषा, फुल्या, स्वस्तिक, नक्षत्रे, सूर्यमंडळाची वर्तुळाकृती प्रतीके इ. आकारांमधून व्यक्त केली जाते. हे आकृतिबंध सुरचित असून त्यांत शिस्त, स्पष्टता, लयपूर्ण पुनरावृत्ती तसेच तोल व वैविध्य अशा घटकांच्या कौशल्यपूर्ण वापरातून ताण व गती निर्माण केली जाते.

हे आकृतिबंध व त्यांचे रंग ह्यांना प्रतीकात्मक महत्त्व असून नॅव्हाहोंच्या श्रद्धेनुसार हे आकृतिबंध व ते काढण्याची पद्धती ही नॅव्हाहोंच्या पूर्वजांना पुण्यात्मांकडून, अलौकिक शक्तींना मानवरूपे दिलेल्या देवतांकडून मिळाली. वालुकाचित्रांतील आकार पुण्यात्मे, पौराणिक घटना व त्यांच्याशी संबंधित जादूटोणा करणाऱ्या अतिमानवी शक्ती यांना प्रतीकरूपाने व्यक्त करतात. एखाद्या दंतकथेच्या संदर्भात त्यातील घटना व कथाभागांशी संबंधित अशी चित्रमालिका असते.

वालुकाचित्रे काढण्याची संकल्पना, त्यातील श्रद्धा व समजुती ह्या पनामातील क्युना इंडियन, वेस्ट इंडीजमधील तैनो इंडियन व अपाची या जमातींनी स्वीकारल्या.

अनेक वर्षे ही चित्रे काढणाऱ्या जमातींनी चित्रांच्या कायम स्वरूपाच्या प्रतिकृती करण्यास परवानगी दिली नव्हती. ज्या वेळी गालिच्यावर वालुकाचित्रांची प्रतिकृती वापरली गेली, तेव्हा मूळ आकृतिबंध व रचनेचा प्रभावीपणा किंवा सामर्थ्य टिकावे, म्हणून त्यात हेतुतः बदल किंवा चूक करण्यात आली. १८८० मधील एका विणकामात वालुकाचित्राचा वापर केला असून, १८९० पासून त्याचा व्यापारासाठी वापर करण्यास सुरुवात झाली. एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत ब्लँकेट, रग इ. वस्तूंच्या आकृतिबंधांत वालुकाचित्रांतील आकार वापरलेले आढळतात. अशा प्रकारे वालुकाचित्रांचे क्षणभंगुरत्व घालवून त्यांचा अधिक टिकाऊ माध्यमात वापर करण्यास सुरुवात झाली असली, तरी विधींमध्ये या प्रकारास कोणतेही स्थान नाही.

प्राचीन आदिवासींच्या वालुकाचित्रांचे, विशेषतः त्यांतील आकार, कलाविष्कार व आकृतिबंध ह्यांचे आधुनिक पाश्चिमात्य चित्रकार पॉल क्ले आणि जोन मिरो ह्यांच्या चित्रांतील अभिव्यक्तीशी काही अंशी साधर्म्य दिसून येते.

लेखक : सुहास बहुळकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate