অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वास्तुकला भाग २

वास्तुकला भाग २

संरचनात्मक घटक

इमारतीचा भार पायापर्यंत पोहोचविणारे घटक म्हणजे खांब, तुळई, भारवाही भिंती, सलोह काँक्रीटचे स्तंभ, तुळई इत्यादी. थोडक्यात, संरचनात्मक घटक हा इमारतीचा भारवाही सांगाडा असतो. इतर अंतर्गत घटकांचा भार घेताना संपूर्ण इमारतीला हा संरचनात्मक गाभा स्थिरता देतो.

भारवाहक सामग्री

भारवाहक (लोड बेअरिंग) संरचनात्मक गाभा अनेक वेळा सांगाड्यापेक्षा वेगळ्या घटकांचा असू शकतो. उदा., फक्त भिंतींनी बांधलेली वास्तू.

जुडाई साधने

दोन दगड वा दोन विटा जोडण्यासाठी त्यांच्यामध्ये सिमेंट, चुना इ. जुडाई घटकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे छोट्याछोट्या घटकांद्वारे एकसंध व भक्कम मोठा घटक तयार होतो. म्हणजे एकेक वीट जोडून भिंत तयार होते. याशिवाय आडभिंती, खोलीतील जमीन (फ्लोअर), छत, छप्पर, सजावट इ. भिन्न घटकांसाठी कार्यानुरूप उपयुक्त साधन-सामग्री उपलब्ध असते. पारंपरिक साधनांचा विचार करताना वास्तुकलेची ऐतिहासिक पार्श्वभूमीही विचारात घ्यावी लागते. म्हणजे अतिप्राचीन काळापासून मानवाने कोणकोणती साधने कशाकशा प्रकारे हाताळली व आजही त्यांचा उपयोग सर्वत्र कोणत्या स्वरूपात केला जातो, ह्यांचा विचार करावा लागतो.

दगड

आद्यारंभी मानवाने आपली निवाऱ्याची गरज दगडी गुहेचा आश्रय घेऊन, काही वास्तुशास्त्रीय प्रयत्न न करता भागविली. अर्थात नंतर डोंगर खोदून गुहा करण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले. परंतु यामुळे दगड वा वास्तुमाध्यमाशी त्याचा परिचय सखोलपणे झाला व कालौघात तो त्याद्वारे भिन्नभिन्न प्रयोग करू लागला. हत्यारे, उपयुक्त भांडी इत्यादींद्वारे दगडाच्या उपयोगाच्या नव्या शक्यतांचा, प्रकारांचा आणि गुणधर्मांचा त्याला परिचय झाला. निरनिराळी खनिजे एकमेकांत मिसळून रासायनिक संयोगाची प्रक्रिया अनेक वर्षे झाल्यानंतर दगड तयार होतो. भार पेलण्याची शक्ती त्यात निर्माण होते, तसेच ऊन, वारा, पाऊस आदींच्या परिणामामुळे दगडाची झिजण्याची वृत्ती फार कमी व अतिमंद असते. त्यामुळे वास्तुकलेत दगडाचा वापर अतिप्राचीन काळापासून प्रचलित आहे. वास्तुकलेत दगडाच्या विविध प्रकारांबरोबरच तंत्राचादेखील विकास पाहावयास सापडतो. दगडांमधील सांध्यांचे तंत्र, चकाकी आणण्याचे तंत्र, शिल्पालंकृत करण्याचे तंत्र आणि संरचनेतील विविधता यांमुळे अनेक ऐतिहासिक वास्तू आजही त्याच सौंदर्याने शतकानुशतके उभ्या राहिलेल्या दिसतात. एखाद्या ठिकाणी सापडणारा दगड कोणत्या प्रकारचा आहे, यावर तेथील वास्तुशैलीच्या संकल्पना व स्वरूप अवलंबून असते. उदा., दक्षिणेत मंदिरांत आढळणारी अतिसूक्ष्म शिल्पकला उत्तरेत किंवा मध्य भारतात अभावाने आढळते. कारण दक्षिणेत मिळणाऱ्या दगडावर शिल्पे कोरणे सोपे जाते व इतरत्र मिळणारा दगड त्यामानाने कठीण असल्याने शिल्पे कोरणे शक्य तितके कमी केलेले आढळते. अर्थात आधुनिक काळात वाहतूकसमस्या सोपी झाल्याने राजस्थानमधला संगमरवर मद्रासमध्ये वापरला जाऊ शकतो, पण वाहतूक खर्चाचा अधिभार त्या वापरावर पडतोच. महाराष्ट्रात संगमरवर वापरणे म्हणजे श्रीमंतीचे लक्षण मानले जाऊ शकते; परंतु जेथे संगमरवराच्या खाणी आहेत (उदा., मकराणा, कोटा वगैरे), तेथे सामान्य घरेसुद्धा संगमरवरी दगडाने, फरशांनी सजवलेली असतात. जेथे जे साहित्य मुबलक मिळते, तेथील स्थानिक वास्तुकला त्या साधनांच्या विविधांगी उपयुक्ततेचे प्रतीक असते.

माती व विटा

सर्वत्र मुबलक उपलब्ध असलेले साधन म्हणजे माती. लिंपणे, सारवणे, मुलामा देणे हे मातीचे प्राथमिक उपयोग समजल्यानंतर मातीचे गोळे करून ते भाजल्यास दगडासारखा घटक म्हणजे विटा तयार होतात, याचा शोध मानवास हजारो वर्षांपूर्वी लागला होता. जिथे दगड उपलब्ध नव्हता, तिथे माती-विटा या साधनांमधील संशोधन व निर्मिती झालेली आढळते. उदा., मध्यपूर्वेतील मेसोपोटेमियन संस्कृती. सूर्यप्रकाशात किंवा भट्टीत भाजलेल्या विटा बांधकामास उपयुक्त ठरल्यामुळे आणि आर्थिकदृष्ट्याही दगडापेक्षा किफायतशीर ठरल्याने भारवाही भिंती, जमिनी, छते यांसाठी विटांचा उपयोग केला जातो. विटांच्या सु. पाच हजार वर्षांच्या इतिहासात त्यांच्या निर्मितीत आमूलाग्र बदल झाला, तरी त्यांच्या मापात फारसा बदल झालेला नाही. ही गोष्ट विचारात घेण्यासारखी आहे. याचे कारण एका हाताने वाहता येण्याची क्षमता, मातीचे कच्चे गोळे करताना दोन्ही हातांत माल हाताळण्याची सोय आणि प्रत्यक्ष बांधकाम करताना विविध प्रकारे विटांची रचना करता येण्याचे स्वातंत्र्य इ. कारणांमुळे विटांच्या आकारातील सातत्य पाच हजार वर्षांपासून टिकून आहे. एकदा मातीचे भरीव आकार भट्टीत किंवा सूर्यप्रकाशात भाजल्यानंतर त्यातील खनिजांची नवी संयुगे तयार होऊन सुटे कण घट्ट बसतात, त्यामुळे ह्या जास्त भार पेलू शकतात आणि जलाभेद्य होतात. हा शोध लागल्यानंतर छपरांसाठी कौले तसेच खोल्यांमधील जमिनीसाठी मातीच्या फरशा करण्याचाही यशस्वी प्रयत्न झाला. भिंती बांधताना दोन विटांमध्ये माती व पाणी यांचे घट्ट मिश्रण (मॉर्टर) टाकल्यामुळे विटा जागेवर घट्ट बसून एकंदर भिंतीचे स्थैर्य वाढते. त्यामुळे मातीचा हा उपयोग अस्तित्वात होताच. शिवाय भिंतीला बाह्य मुलामा देण्यासाठीही मातीचा उपयोग केला गेला. त्यात टिकाऊपणा येण्यासाठी गवताच्या काड्यादेखील टाकल्या जात असत.

लाकूड

नैसर्गिक रीत्या उपलब्ध असलेले आणखी महत्वाचे साहित्य म्हणजे  लाकूड. इमारती लाकडाचे अनेक प्रकार असून त्यांच्या स्वरूपानुसार बांधकामात उपयोग केला जातो. भारवाही घटक म्हणून लाकडाची शक्ती कमी असते शिवाय पाण्याच्या संपर्कामुळे ते फुगते वा कुजते. त्यामुळे वास्तुकलेत लाकडाचा उपयोग अत्यावश्यक ठिकाणीच केलेला आढळतो. दारे, खिडक्या, वक्तपोशी, जिने, स्तंभ, तुळई इ. वास्तुघटकांत लाकूड वापरले जाते. अलंकरणासाठीही त्याचा उपयोग होतो. कारण लाकडात कोरीवकाम करणे सोपे जाते. त्यामुळे दारांचे पृष्ठभाग, छताच्या पर्णपट्ट्या (फॅशिआ), स्तंभनासिका, जिन्याभोवतीची संरक्षक पट्टी इ. भागांत लाकूड हे माध्यम योग्य ठरते. लाकडी इमारतीचे आयुष्य मात्र दगड-विटांच्या इमारती इतके नसते. आग, कुजणे, वाळवी लागणे इ. कारणांमुळे लाकडी वास्तू ही नाशवंत होत जाते.

खडी व वाळू

नदीत पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून दगडगोट्या पासून वाळू तयार होते. मूळ दगडाची जलाभेद्यता आणि भार पेलण्याची क्षमता आदी गुण वाळूत असतातच. परंतु सिमेंट-चुन्यात मिश्रण केल्यानंतर त्या मिश्रणास एकसंधपणा येतो. भेगा जाण्याचे प्रमाण कमी होते. दगड फोडून त्याचे बारीकबारीक (अर्धा/पाऊण इंची) तुकडेही काँक्रीटमध्ये हेच कार्य करतात. अंतिम पृष्ठभागासाठी खडीचा थर उपयुक्त ठरतो. त्यामुळे पृष्ठभाग खचून न जाता टिकून राहतो.

चुना

चुनखडी भाजून तयार होणाऱ्या  चुन्यात पाणी मिसळल्यावर त्या मिश्रणाचा हवेशी संयोग झाल्यावर दगडासारखा टणक पदार्थ तयार होतो. या गोष्टीचा शोध फार पूर्वी माणसाला लागला. दगड, विटा, खडी, वाळू यांच्या मिश्रणाने बांधकाम भक्कम होते. वाळल्यावर चुन्यास भेगा पडू नयेत, यासाठी वाळूचा उपयोग होतो. संयोगासाठी पुरेशी खेळती हवा रहावी, यासाठी चुना व वाळू यांचा गारा (मॉर्टर) तयार करतात. ज्या ठिकाणी  वाळू उपलब्ध नसेल, तिथे विटांचा भुगाही हे कार्य पार पाडू शकतो.

सिमेंट काँक्रीट

सिमेंट, पाणी, वाळू आणि खडी या प्रमाणबद्ध मिश्रणातून काँक्रीट हे अतिशय शक्तिशाली बांधकाम-साहित्य तयार केले जाते. जल आणि अग्नी यांना विरोधक असे हे साधन असून, त्याचे संकोची सामर्थ्य प्रचंड असते; परंतु त्याचे ताण प्रतिबल कमी असते. ज्या आकारात ते ओतले जाईल, तसा बांधीव सघन आकार घट्ट होतो. यासाठी तात्पुरते आकारबद्ध फर्मे तयार केले जातात (फॉर्मवर्क) व नंतर ते काढले जातात. हे वास्तुसाहित्य रोमन वास्तुतज्ञांनी मोठ्या प्रमाणावर विकसित करून उपयोगात आणले. मध्यंतरीच्या काळात त्याकडे दुर्लक्ष झाले. परंतु १८६० नंतर सलोह काँक्रीटच्या शोधामुळे त्याचे पुनरुज्जीवन झाले. वास्तुरचनेच्या प्रमाणानुसार विविध व्यासांच्या पोलादी सळ्यांच्या जाळ्या बांधून त्यात काँक्रीट ओतले जाते. यामुळे काँक्रीटची तन्यशक्ती खूपच वाढते. वास्तुकलेबरोबरच अभियांत्रिकी प्रकारातील अनेक वास्तू (पूल, धरणे इ.) या मूलभूत साहित्याने बांधल्या जातात. पूर्वरचित फर्म्याच्या आकारस्वातंत्र्यामुळे या माध्यमाद्वारे शिल्पात्मक रूपणक्षमता (प्लॅस्टिसिटी) संपादन करता येते, हे या साहित्याचे आणखी एक वैशिष्ट्य मानण्यात येते. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून आजतागायत या माध्यमाचा प्रभाव वास्तुकलेवर फार मोठ्या प्रमाणावर पडलेला आढळतो.

लोखंड आणि पोलाद

लोखंडाचा उपयोग वास्तुशास्त्रात ढापे, नळ, कड्या, कोयंडे यांसारख्या गोष्टींसाठी होतो. परंतु पोलाद निर्मितीमुळे विविध प्रकारचे वास्तुघटक निर्माण करता येऊ लागले. तन्य आणि संकोची भार पेलण्याची क्षमता आणि कुठल्याही आकारात बनविता येण्याच्या गुणधर्मांमुळे विसाव्या शतकातील वास्तुशैलीवर या माध्यमाचा मोठा प्रभाव आढळतो. अठराव्या शतकाआधी वास्तुकलेत या धातूचा सहभाग अतिशय मर्यादित स्वरूपाचा होता. दोन दगडांच्या सांधणीत बसवण्याच्या खुंट्या किंवा सुरसे (डॉवेल) तयार करण्यासाठी तसेच कैची, साखळ्या वगैरे करण्यासाठी या धातूचा उपयोग केला जाई. पोलादनिर्मितीच्या शोधानंतर स्तंभ, तुळई, कैची, कमान अशा व्यापक संरचनात्मक घटकांची निर्मिती पोलादात होऊ लागली.

काच

काचेच्या पारदर्शकतेचा उपयोग प्रकाशनियोजनासाठी वास्तुशास्त्रात प्रामुख्याने केला जातो. दारे, खिडक्या, तावदाने, छतामधली काचेची कौले किंवा पत्रे, कारखान्यातील उत्तर प्रकाशी कैच्या (नॉर्थ लाइट ट्रस), काच-पडदी इत्यादींसाठी मुख्यत्त्वेकरून काचेचा उपयोग वास्तूमध्ये केला जातो. याशिवाय वास्तूच्या अंतर्गत सजावटीत विभाजन-भिंती, फर्निचर, जिने इ. असंख्य तपशीलात्मक घटकांसाठी काचेचा उपयोग केला जातो. मोठ्या आकाराच्या काचेसाठी, तसेच आघात झाल्यावर काचेचे तुकडे होऊ नयेत, म्हणून बारीक पोलादी जाळी त्यात अंतर्भूत करतात. तांत्रिक प्रगतीमुळे अतिशय शक्तिशाली काचनिर्मिती करणे शक्य झाले आहे.

याशिवाय वास्तुशास्त्रात अन्य अनेक साधने वापरात आणली जातात. त्यांपैकी रबर, अ‍ॅस्बेस्टॉस, प्लॅस्टिक, अ‍ॅल्युमिनियम, काँक्रीट प्रकार व प्रबलित घटक वगैरे अनेक साधने त्यांवर विशिष्ट प्रक्रिया करून विविध प्रकारे वापरली जातातवास्तुप्रकार, तंत्रे यांमधील विविधता व प्रयोगशीलता यांना शास्त्रीय प्रगतीची व संशोधनाची जोड मिळाल्यामुळे प्रत्येक तपशीलवार सूक्ष्म कार्यासाठी नवीन साहित्य उपलब्ध होत आहे.

वास्तूच्या बांधकाम-पद्धती भिंत

भारवाही भिंती

भारवाही भिंतीवर त्यावरील भागाचा व छताच्या वजनाचा भार पडतो, त्यामुळे त्यानुसार भिंतीची जाडी ठरविली जाते. विशिष्ट अंतरावर अधोगामी भार पेलण्यासाठी पुस्तीच्या भिंती वा टेकू किंवा पडभिंती-धारिका बांधण्यात येतात. त्यामुळे भक्कमपणा वाढतो. अन्यथा काही काळानंतर भिंतीना भेगा पडतात. वास्तुरचनेत या प्रकारच्या भिंतीचा वापर करून वास्तुरचना केल्यास जोत्यावर सर्व बाजूंनी काँक्रीट-पट्टिका फिरवली जाते. त्यामुळे खचण्याचे प्रमाण कमी होते आणि जमिनीतील पाणी अंतर्गृहात शिरण्यास प्रतिबंध केला जातो. दोन मजली वास्तू असल्यास या पद्धतीत तळमजल्याच्या भिंतीवरच वरच्या मजल्याची भिंत बांधावी लागते. हे बंधनकारक असल्यामुळे वास्तुविधान-प्रक्रियेस मर्यादा पडतात. पाया काळ्या मातीत बांधावयाचा असल्यास या प्रकारच्या भिंती सुचविल्या जात नाहीत. या रचनेसाठी ६० ते १२० सेंमी. पक्का मुरूम आवश्यक असतो. इतिहासात सर्वत्र याच प्रकारच्या भिंती बांधल्या जात होत्या.

भारविहीन भिंती

वास्तूमध्ये ज्या भिंतीवर वरील मजल्याचा व छताचा भार येत नाही व तो तुळई-स्तंभाद्वारे पायावर संक्रमित केला जातो, त्या भिंतीना भारविहीन भिंती असे संबोधिले जाते. पोलादी किंवा सलोह काँक्रीटच्या स्तंभ-तुळई सांगाड्यामुळे त्या संरचनेतील भिंती केवळ ऊन, पाणी, वारा यांपासून संरक्षण व वास्तूचे बाह्यांग सुशोभित करण्याच्या माफक हेतूने बांधाव्या लागतात. त्यामुळे त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साधनांमध्ये विपुलता आढळते. विटा, काच, प्लॅस्टिक, लाकूड,धातू इ. अनेक साधने वापरून या भिंती बांधल्या जातात. आकारनिर्मितीचे तसेच रंग, पोत इत्यादींचे स्वातंत्र्या असल्यामुळे या भिंतींच्या रचनेत असंख्य कलात्मक अभिव्यक्तिंचे प्रयोग झालेले आढळतात. गगनचुंबी इमारतींमध्ये कित्येकदा वास्तूचा संपूर्ण बाह्य भाग विविध रंगांच्या व प्रकारांच्या काचांच्या भिंतींनी सजविला जातो. अनेकवेळा काचेचे दोन थर बसविले जातात. त्यामुळे वाऱ्याचा जोर थांबविणारी काच-पडदी (कर्टन वॉल) तयार होते. पूर्वरचित तंत्रातील प्रगतीमुळे काँक्रीट, प्लॅस्टिक, अ‍ॅस्बेस्टॉस, काच इ. माध्यमांतून भारविहीन भिंतींचे ठराविक आकार निर्माण केले जातात.

स्तंभ-तुळई रचना

भार आणि आधार या तत्त्वाची ही रचनापद्धती प्राचीन काळापासून या क्षेत्रात अस्तित्वात आहे. दोन उभे आधार-स्तंभ वा खांब आणि त्यावर शिरोभागी स्थिरावलेली आडवी लघुतुळई वा तुळई किंवा वासा असे या रचनेचे सर्वसाधारण स्वरूप असते. भिंतीमध्ये दारे-खिडक्या बसवायच्या म्हणजे चौकटीवरील भिंतीला आधार देण्यासाठी लघुतुळई बाजूच्या भिंतीवर आधारलेली निर्माण केली जाई. हे या रचनेचे प्राथमिक स्वरूप होते. परंतु रचनात्मक दृष्टीने त्यात कालौघात बरेच बदल होत गेले. प्राचीन कालीन दोन दगडांच्या उभ्या लाद्या व त्यांवर शिरोभागी विसावणारी आडवी लादी, अशा स्वरूपाची अनेक वास्तुशिल्पे आजही अस्तित्वात आहेत. यात तुळईचे प्रमुख कार्य म्हणजे त्यावरील मजले, भिंती, छत इत्यादींचा भार खालील स्तंभांवर न वाकता हस्तांतरित करणे. दोन स्तंभांमधील अंतर जास्त असल्यास किंवा तुळईचे साधन आवश्यक तितके कठीण नसल्यास वास्तू कोसळते. यासाठी पूर्वी एकसंध दगडाची तुळई वापरीत असत. त्यामुळे स्तंभांमधील अंतर नियंत्रित करावे लागते. कारण लादी जास्तीत जास्त जितक्या लांबीची करणे शक्य असे, तेवढेच अंतर स्तंभांमध्ये ठेवणे आवश्यक असे. वास्तुसाहित्याची संकोचन आणि ताण सहन करण्याची शक्ती, त्याचप्रमाणे स्तंभांमधील अंतर यांवर तुळईचा आकार व प्रमाण अवलंबून असते. सलोह काँक्रीट आणि पोलाद या साधनांनी या रचनातंत्रात आमूलाग्र क्रांती केली. हल्ली सर्वत्र दिसणारे स्तंभ-तुळई सांगाडे किंवा पोलादी स्तंभाकार हे या तंत्राचे प्रगत रूप म्हणता येईल. आधुनिक काळातील अभियंत्यांनी या रचनेतील आणखी एक प्रकार अस्तित्वात आणला, तो म्हणजे ‘छत्रस्तंभ’ (मश्‌रूम कॉलम) होय. ह्या प्रकारात स्तंभाच्या शिरोभागी छत्रासारखा आकार असतो व ते छत्रच वास्तुछत म्हणून कार्य करते. या संकल्पनेत तुळईचा घटक नसतो. छत्राकाराद्वारे वरील भार स्तंभावर टाकला जातो.

कमान

वक्राकार लघुतुळई (लिंटेल) म्हणजे कमान. पूर्वी जिथे एकजिनसी साधन दारे-खिडक्यांच्या चौकटीवर ठेवण्यासाठी उपलब्ध नसे, तिथे वास्तुतज्ञांनी वक्राकार भिंतीची रचना करून या तंत्राचा शोध लावला. तदनंतर दोन स्तंभांतील अंतर वाढवून त्यावर तुळई रचना  न करता कमानी बांधल्या. त्यामुळे वास्तुदर्शन आकर्षक तर झालेच; परंतु वास्तुशास्त्रीय दृष्टीनेदेखील स्थिर व भक्कम रचना निर्माण होऊ लागल्या. यामुळे दोन महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी साध्य झाल्या. एक म्हणजे, दोन स्तंभांतील किंवा भिंतींतील पोकळी छोट्याछोट्या विटांनी किंवा दगडाच्या तुकड्यांनी कमानीच्या साहाय्याने बांधता येणे शक्य झाले. साधन-वाहतूक आणि हाताळणी सुकर झाली. कमानीच्या बहिर्वक्र आकारामुळे पूर्वी तुळई वरील भारामुळे खालून वाकण्याची शक्यता या तंत्रामुळे नाहीशी झाली. प्रत्यक्ष बांधकाम करताना कमानीतील प्रत्येक विटेचा वा दगडाचा आकार व्याघ्रमुखी केला गेला, त्यामुळे वक्राका रचनेत प्रत्येक तुकडा शेजारच्या तुकड्याबरोबर घट्ट बसून खाली येण्याची शक्यता नाहीशी झाली. कमानीच्या शिरोभागी माथ्यावर असलेल्या व्याघ्रमुखी दगडास ‘कीलक’ वा ‘चावीचा दगड’ (की स्टोन) अशी संज्ञा होती. कमानीचा बाह्य आणि आतील परिघ वेगळा असल्यामुळे रचनात्मक स्थिरता आपोआप साधली गेली. या तंत्राची उत्क्रांती मात्र स्तरप्रस्तर (कॉर्बेलिंग) बांधकामामुळे झाली, असे मानण्यात येते. एकावर एक वीट, दगड ठेवताना वरील घटक थोडा पुढे सरकवायचा व दोन्ही बाजूंनी या तंत्राने भुजामिलन होईपर्यंत रचना करायची, त्यामुळे एकसंध तुळई न वापरता छोट्या घटकांद्वारेदेखील खालील पोकळी छतबद्ध करता येते. प्राथमिक कमान बांधणीतंत्र अवगत झाल्यानंतर विविध संस्कृतींमधून त्याचे प्रादेशिक शैलीयुक्त आविष्कार पाहावयास सापडतात. मेसोपोटेमियन संस्कृतीत विटांचे बांधकामतंत्र प्रगत झाले. त्यामुळे तेथे कमानीबांधकामाचे अतिप्राचीन अवशेष आढळतात. त्यानंतर रोमन संस्कृतीत या तंत्राची सर्वंकष प्रगती रचनाशास्त्राच्या दृष्टिकोनातून झालेली आढळते. अर्धवर्तुळाकार, टोकेरी, महिरपी, सपाट इ. कमानीबांधकामाचे प्रमुख प्रकार मानले जातात.

घुमटाकार छतरचना

कमान बांधणीचे तंत्र विकसित झाल्यावर त्याची वास्तुशास्त्रातील व्याप्ती केवळ दारे-खिडक्यांवरील लघुतुळईपुरतीच मर्यादित न राहता, एका कमानीस लागूनस दुसरी कमान बांधून छतरचना करण्यापर्यंत प्रगत होत गेली. सुरुवातीला अशी छतरचना, संक्रमित भार भिंतिंना पेलण्याच्या दृष्टीने, स्तंभयुक्त टेकू (बट्रिस) देऊन प्रबलित केली जात असे. परंतु त्यामुळे प्रकाशयोजनेस व अंतर्गत हालचालींना अडथळा येत असे. शिवाय भिंतीची जाडीदेखील अमर्याद करावी लागे. रोमन वास्तुकारांनी एकमेकांस छेदणाऱ्या अर्धगोलाकार छताची (ग्रॉइन व्हॉल्ट) रचना करून त्या समस्येला उत्तर शोधले.

परंतु त्यातही अडचणी होत्या. त्या म्हणजे खालील कक्षांची (स्पॅन) रुंदी समान ठेवावी लागे. पुढे गॉथिक शैलीत असमान रुंदीच्या कक्षांवर टोकदार कमानी करून त्याद्वारे अर्धवर्तुळाकार रचनेत येणारा उंचीतील फरक टाळला गेला. त्यांनी कमानीयुक्त छतामध्ये तुळईचे सांगाडे तयार करून त्यावर छतरचना केली (रिब व्हॉल्ट). त्यामुळे खालील कक्षा कमी अधिक रुंदीच्या असल्या, तरी टोकेरी कमानींमुळे छताचा सर्वोच्च भाग समपातळीवर येत असे आणि अर्धगोलाकार छतरचनेत निर्माण होणारा प्रश्न सोडविला जात असे. गॉथिक वास्तुतंत्र याही पुढे गेले. छताखाली भिंतीची जाडी कमी करण्यासाठी त्यांनी कमानधीरे (फ्लाइंग बट्रिस) उभारून दोन स्तंभिकांमधील भाग पूर्णपणे खिडकीसारखा केला. त्यामुळे अतिभव्य कॅथीड्रल वास्तूंमध्ये प्रकाश नियोजन व अंतर्गत अभिसरण सुरळीत झाले. आधुनिक काळात पोलाद व सलोह काँक्रीटमध्ये अशा छतरचनांचे अनेक प्रयोग झाले. शिंपलाकार वा कवची छप्परचना (शेल रूफ) हे अत्याधुनिक तंत्र या कल्पनेतूनच विकास पावले. त्यात अवकाशरचनेतील अमर्याद स्वातंत्र्य उपलब्ध होत असल्याने हा प्रकार लोकप्रिय होत गेला.

घुमट

ही वास्तुशास्त्रीय संकल्पना म्हणजे कमान या तंत्राचा उत्क्रांत आविष्कार मानला जातो. मानवाला वर दिसणाऱ्या आकाशाचे प्रतीक म्हणजे  घुमट असे मानण्यात येते. किंबहुना त्या संकल्पनेद्वारेच घुमटाची आकारनिर्मिती झाली असावी. प्रथम वर्तुळाकार भिंतीवर घुमट बांधण्यात आले. तशी भिंतबांधणी करणे खूप त्रासाचे असल्याने, नंतर चौरसाकृती खोलीवर घुमट बांधण्याचे तंत्र विकसित झाले. चौरस पायावर शिरोभागी  अष्टकोनी पाया करून त्यावर वर्तुळाकार घुमटपाया बांधण्यात येऊ लागला. नंतरच्या काळात चौरस खोलीऐवजी फक्त चार स्तंभांवर  अर्धवर्तुळाकार कमानी बांधून त्यावर घुमट बांधले गेले. बायझंटिन काळात चार कमानींच्या मध्ये त्रिकोणी बैठकीवर (पेन्डेंटिव्ह) भव्य घुमट उभारण्याचे तंत्र विकसित झाले. या तंत्रामुळे कमानी व त्रिकोणी अर्धघुमटावर पिंपासारखी भिंत बांधून अधिक उंचीवर घुमट बांधणे शक्य झाले. त्यामुळे वास्तु-अवकाशाला अंतर्बाह्य भव्यता प्राप्त झाली. प्रबोधनकालीन वास्तुशैलीत घुमटरचना अधिक विकसित झाली. इस्लामी वास्तुकलेत तर घुमटरचना हा अत्यावश्यक घटक ठरला. इस्लामी वास्तुकारांनी एकमेकांत गुंतलेल्या कमानींद्वारे अत्यंत नाजूक शैलीत भव्य घुमट बांधले. यूरोपातील अर्वाचीन घुमटरचना क्लिष्ट होती. दोन-तीन पदरी घुमट त्याकाळी बांधण्याचे प्रयोग झाले. आधुनिक काळात सलोह काँक्रीट माध्यमामुळे घुमाटाकार छप्पररचना आकर्षक रीत्या साधणे शक्य झाले. वक्‌मिन्स्टर फुलर यांनी पोलादी नळ्यांच्या त्रिकोणी वा पंचकोनी रचनांद्वारे अल्पांतरी (जीओडेसिक) घुमटरचना साकार केली.

कैची

लाकूड या माध्यमात त्रिकोणी आकाराच्या घटकांद्वारे छतरचना करण्याचे तंत्र मानवाने फार पूर्वी शोधले होते. कैचीच्या त्रिकोणी आकृतिबंधात तळाचा घटक सर्वांत शक्तिशाली असावा लागतो. त्याच्या लांबीच्या बाजूचे विभाजन करून आतमध्ये विविध ठिकाणी आधार देणारे लघुघटक अंतिम उतरत्या छप्परभाराला आधार देतात. आधुनिक काळात या तत्त्वाचा अत्यंत वैविध्यपूर्ण वापर केला जातो आणि त्यासाठी अनेक प्रकारची साधने उपयोगात आणली जातात. जपान व चीन येथील प्राचीन वास्तुकलेत कैच्यांचे विविध प्रकार काष्ठमाध्यमात आढळतात.

चौकटबद्ध रचना

स्तंभ-तुळई रचनातत्वाचा त्रिमितीय आविष्कार म्हणजे चौकटबद्ध रचना. लाकूड, पोलाद, काँक्रीट यांपैकी कोणत्याही माध्यमात वास्तुरचनेचा स्वयंपूर्ण सांगाडा निर्माण करून, मग त्यात अंतर्गत भिंतींनी अवकाश- विभाजन करण्यात येते. संपूर्ण वास्तूचा भार या सांगाड्याद्वारे पायामध्ये प्रवर्तित केला जातो. संकोचन आणि तणाव या दोन्ही गुणधर्मांत शक्तिशाली असलेले वास्तुसाहित्य वास्तुसाहित्य सांगाड्यासाठी वापरले जाते. या तंत्राने बांधल्या जाणाऱ्या वास्तुविधानात आणि दर्शनी भागात विभाजनाची एकसारखी प्रमाणबद्धता असते. त्यामुळे अंतर्बाह्य आकार-पुनरुक्ती होत असली, तरी ही शिस्त मोठ्या वास्तुप्रकल्पांत कार्यवाहीच्या दृष्टीने सोयीची असते. अर्वाचीन काळातील अनेकमजली घरे किंवा आधुनिक काळातील काँक्रीट-पोलादाच्या चौकटीबद्ध रचनेद्वारे उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती ही या तंत्राची उदाहरणे होत. वरील प्रत्येक रचनातंत्रात आज फार मोठी प्रगती झाली आहे.

वास्तुप्रकार

मानवाच्या प्रत्येक कार्यक्षेत्रासाठी उपयुक्त अशी वास्तुनिर्मिती प्राचीन काळापासून होत आलेली आहे. वास्तूचे प्रकार - वैविध्य सुरुवातीच्या काळात निरनिराळ्या मानवी गरजांशी संबद्ध होते, तसेच त्याच्या धर्म, तत्त्वज्ञानविषयक संकल्पना आणि सामाजिक कार्यासाठीची उपयुक्तता यांनीही नियंत्रित केले होते. कालौघात सांस्कृतिक जीवनाच्या कक्षा रुंदावत गेल्या आणि वास्तुप्रकार वाढत गेले. त्यांपैकी प्रमुख वास्तुप्रकार पुढीलप्रमाणे दर्शविता येतीलः

निवासी वास्तुकला

निवारा ही मानवाची मूलभूत गरज असल्याने या क्षेत्रातील वास्तुकला सर्वांत प्राचीन आहे. सर्व ज्ञात संस्कृतींच्या पूर्वी तिथे अस्तित्वात असलेल्या घरांच्या भिन्न-भिन्न वास्तु-संकल्पना आजही काही ठिकाणी अवशिष्ट रूपात पाहावयास मिळतात. निसर्गात उपलब्ध असलेले दगड, माती, फांद्या, पाला-पाचोळा इ. साधने वापरून छत-उभारणी करायची, बाजूला शिडाच्या भिंती किंवा डोंगराच्या पृष्ठभागाचा आधार घ्यायचा असे निवासाचे मूलभूत स्वरूप होते. यूरोप, आशिया, द. अमेरिका, इ. खंडांतील आदिवासी वास्तुकला आजही अभ्यसनीय आहे. कारण उपलब्ध बांधकामसामग्रीचे ज्ञान आणि निवासी गरजा यांचा कलात्मक मिलाफ त्यांच्या घरांत बघायला मिळतो. पुढील तांत्रिक प्रगतीतील अनेक तंत्रे या प्राचीन वास्तुकारांनी प्राथमिक अवस्थेत निर्माण करून ठेवली होती. त्यांद्वारे स्फूर्ती घेऊनच माणूस ते तंत्र अधिक परिपूर्ण करीत गेला.

प्रगत संस्कृतीमध्ये सामाजिक मानसशास्त्र वेगळ्या मार्गाने कार्यरत होते. स्वतःच्या घरापेक्षा देवाचे आणि राजाचे घर अधिक भक्कम आणि टिकाऊ असावे, अशा समजुती प्रचलित असल्याने मंदिर व प्रासाद यांच्या तुलनेत सामान्य प्राचीन घरांचे अवशेष आज फारच कमी प्रमाणात सापडतात. सामान्य घराच्या प्राथमिक गरजा म्हणजे बैठकीची खोली, शयनगृह, स्वयंपाकघर, न्हाणीघर व संडास हे घटक होत. गृहवास्तूचे हे मूलभूत स्वरूप संस्कृतीच्या  उगमापासून आजतागायत कायम राहिले आहे. त्यात बदल फक्त वास्तुविधान, साधने, सुशोभीकरण, तंत्र आणि प्रमाण या घटकांच्या संदर्भात होत गेलेले आहेत. त्यातही प्रकाशयोजना आणि वायुवीजन यांसंबंधीच्या संकल्पनांत कमी वेगाने बदल होत गेले. आधुनिक निवासी क्षेत्रात बंगला, जोडबंगला (ट्विन डुप्लेक्स), पंक्तिगृहे (रो हाउसेस), गृहसमूह (ग्रूप हाउसिंग) इ. प्रकारांचे स्वरूप हे प्रायः बसक्या - म्हणजे एक ते दोन माळ्यांच्या वास्तू-अशा प्रकारचे असते; तर चाळी, वेश्मगृहे, सदनिका (फ्लॅट्‌स) अशा गृहवास्तू ऊर्ध्वगामी वा गगनचुंबी प्रकारात मोडतात. मोठ्या शहरांत व्यापारीकरणामुळे किंवा उपलब्ध भूखंडाच्या मर्यादित आकारामुळे, तसेच ग्राहकाच्या आर्थिक क्षमतेमुळे वास्तुकाराच्या सर्जनशीलतेवर अनेक बंधने येतात. त्यामुळे प्रस्तावित नियमांनुसार खोल्यांचे आकार, खिडक्यांचे आकार इ. नियमांप्रमाणे सर्वसामान्यपणे वास्तुरचना केली जाते. याशिवाय उपलब्ध साहित्यसामग्री, स्थानिक हवामान इ. घटकांचा प्रभावही गृहनिर्मितीच्या प्रक्रियेवर पडतो. परंतु ‘घर’ या संकल्पनेला विशिष्ट भावनिक व मानसिक परिमाण असते, त्यामुळे या क्षेत्रातील वास्तुरचना हे एका दृष्टीने वास्तुकारापुढील आव्हानच असते. घर म्हणजे त्या वास्तूच्या मालकाच्या वैचारिक, सांस्कृतिक धारणांचे आणि आर्थिक क्षमतेचे, तसेच वास्तुकाराच्या कलाकौशल्यविषयक कर्तृत्वाचे प्रतिबिंब असते. त्यामुळेच इतिहासात  राजवाडा, सरदारवाडा, ब्राह्मणवाडा इ. अनेक प्रकारचे  वाडे आढळून येतात. प्रत्येकाचे आकार त्या वास्तूविषयीच्या आर्थिक आणि सामाजिक गरजा व क्षमता यांनुसार बदलत गेलेले  दिसतात.

धार्मिक वास्तुकला

देव ही संकल्पना मानवी श्रद्धेचा अविभाज्य भाग आहे. अतिप्राचीन काळातील आदिमानव नैसर्गिक घडामोडी, अरिष्टे यांमागे दैवी शक्ती असल्याचे मानीत होता. त्याला पुढे वैचारिक, धार्मिक अधिष्ठान प्राप्त होऊन वेगवेगळे धर्मप्रवाह निर्माण झाले व प्रत्येक धर्मातील कर्मकांडांनुसार अवकाशीय गरजा भागविण्यासाठी त्या क्षेत्रातील वास्तुनिर्मिती प्रगत होत गेली. चर्च, सिनॅगॉन, मशीद, देवालय हे प्रमुख धार्मिक वास्तुप्रकार होत. कालौघात त्यांच्या वास्तुविधानांमध्ये विकास-विस्तार घडून आला. परंतु सुरुवातीला देवाचे घर एवढीच बांधीव आकाराची मूलभूत गरज होती. प्रार्थनेसाठी देवापुढे जागा, अभिसरणासाठी मार्ग, मुख्य देवाचे अधिष्ठान असलेले अवकाश, भोवती त्या त्या धर्मानुसार प्रदक्षिणापथ आणि आश्रयासाठी वा विश्रांतीसाटी उपयुक्त अशी संलग्न अवकाशयोजना, असे वास्तुविधानाचे नियोजन धार्मिक वास्तूंत साधारणतः आढळते. हे वास्तुयोजन प्राथमिक स्वरूपाचे असले, तरी कालौघात त्यात शैलीनुरूप अनेक तपशील बदलत गेले. आणखी एक महत्त्वाची गोष्ट धार्मिक वास्तुप्रकारांत नेहमीच आढळते, ती म्हणजे त्या त्या वास्तूचे अस्तित्वदर्शक असे वास्तुघटक उंच बांधले जातात. त्यामुळे बऱ्याच अंतरावरून धार्मिक वास्तूचे स्थान ठळकपणे जाणवते. ह्याचा प्रतीकात्मक असा दुसरा अर्थ म्हणजे, ईश्वरनिवासाची खरी दिशा आकाशाकडे असल्याचे सूचित करणे. उदा., चर्च-कॅथीड्रल यांवरील मनोरे; मशीदींवरील घुमट व मीनार; देवालयांची शिखरे, कळस यांसारखे वास्तुघटक इत्यादी. धार्मिक कर्मकांडांनुसार इतर संलग्न कार्यासाठीदेखील अवकाश-नियोजन केले जाते. या वास्तुप्रकाराच्या निर्मितीच्या अनुषंगाने त्यास पूरक अशा अन्य सर्व प्रकारच्या कलाभिव्यक्तीला व्यासपीठ मिळाले. चित्र, शिल्प, वास्तू हे तर अविभाज्या घटक होतेच; परंतु संगीत, नृत्य, काव्य, नाट्य अशा प्रयोगीय कलाप्रकारांनाही धार्मिक वास्तुनिर्मितीच्या अनुषंगाने प्रोत्साहन मिळाले. थोडक्यात, निवासी वास्तुप्रकार हा मानवाची मूलभूत गरज भागविणारा; तर धार्मिक वास्तुप्रकार मानवाची आध्यात्मिक, श्रद्धायुक्त भावनिक भूक भागविणारा प्रकार मानला जातो. त्यामुळे आजही या प्रकारातील वास्तुनिर्मिती मोठ्या प्रमाणावर होत असलेली दिसते.

शासकीय वास्तुकला

प्रजेचे प्रशासन करणारी यंत्रणा फार पूर्वीपासूनच अस्तित्वात होती. अर्वाचीन काळापर्यंत राजा हा देशाचा प्रशासक होता. मंत्रिमंडळ, दरबार, कार्यालय इ. त्याच्या प्रशासकीय वास्तुविषयक गरजा होत्या. तसेच त्याचे स्वतःचे शाही प्रासाद, अतिथीसाठी महाल, नोकर-दासींसाठी खोल्या इ. वास्तुविषयक गरजा त्याच्या इभ्रतीला व पदाला शोभतील अशा असणे आवश्यक होते. याशिवाय संपूर्ण राजवाड्याचे संरक्षण, सुशोभन, अलंकरण यांमुळे नगारखाने, चौथरे, बुरूज, बागबगीचे, तळी, सरोवरे, भव्य दरवाजे इ. अनेक घटक पूर्वीच्या शासकीय वास्तूच्या अविभाज्य बाबी बनल्या होत्या. जगातील सर्व देशांत अशा प्रकारच्या शाही शासकीय वास्तू आजही आढळतात. पुढे राज्य करण्याची तंत्रे बदलली, त्यामुळे एकाच व्यक्तीच्या हाती सत्तासूत्रे राहिली नाहीत. राज्य करण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल झाले. पंतप्रधान व राष्ट्रपती यांचे निवास आणि कार्यालये, अशा शासकीय वास्तूंबरोबरच अन्य शासकीय कर्मचाऱ्यांची संख्या व व्याप्ती सत्तेच्या विकेंद्रित स्वरूपामुळे खूपच विस्तारल्यामुळे सरकारी कार्यालयांची वास्तुनिर्मिती मोठ्या प्रमाणावर करणे अनिवार्य ठरले. सरकारी इमारतींच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. केंद्र, राज्य व जिल्हा पातळीवरील प्रशासकीय कारभार विस्तारत गेल्याने तसेच असंख्य शासकीय खाती निर्माण झाल्याने शासकीय वास्तुप्रकारांत खूपच व्यापक प्रमाणात वाढ होत गेली. शासकीय वास्तुप्रकारांत फक्त सरकारी कार्यालयांचाच समावेश होत नाही, तर विद्यमान काळातील कचेऱ्या, प्रशासकीय कार्यालयीन वास्तू (ऑफिस बिल्डिंग) आदींचाही अंतर्भाव होतो. कार्यालयीन अवकाशरचनेच्या संकल्पना आज झपाट्याने बदलत आहेत. कृत्रिम मार्गांनी अभिसरण, प्रकाशनियोजन, वायुवीजन इ. सोयी करून कार्यालयात काम करणे शक्य तितके सुखद करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तुविधानात कार्यालयीन अवकाशाची सुस्पष्टता दर्शविल्यामुळे मूलभूत गरजा, वाहतूक आणि अंतर्गत सुसह्य वातावरण या परिमाणांद्वारे कलात्मक निर्मितीस व रचनात्मक विविधतेस खूप वाव असतो. निसर्ग, स्थलशिल्प इ. घटकांचा वाढता समावेश विद्यमान शासकीय वास्तुकल्पांत दिसून येतो.

रंजनगृह-वास्तुकला

फावल्या वेळेतील मनोरंजन ही व्यक्तीची एक महत्त्वाची मानसिक गरज आहे. वेगवेगळ्या रंजनपद्धतीच्या प्रसारामुळे या क्षेत्रातील खास वास्तुनिर्मिती आवश्यक ठरली. प्राचीन काळात ग्रीकांनी टेकडीच्या उतरणीचा प्रेक्षकांना बसण्यासाठी उपयोग करून खुली रंगमंदिरे बांधली.रोमनांनी त्यात बंदिस्त नाट्यगृहे, क्रीडागारे, सार्वजनिक स्नानगृहे बांधून मोलाची भर घातली. मनोरंजन क्षेत्रात आधुनिक काळात वैविध्यपूर्ण निर्मिती मोठ्या प्रमाणात अव्याहतपणे होत राहिली. रंजनाच्या विविध प्रकांरानुसार नाट्यगृहे, चित्रपटगृहे, संगीतिका-दालने (ऑपेरा हाउस), कलादालने, प्रदर्शनस्थळे (उदा., दिल्लीचे प्रगती मैदान), सभागृहे, संग्रहालय-वास्तू इ. भिन्न भिन्न प्रकारच्या रंजनगृह-वास्तू आज विपुल प्रमाणात बांधल्या जात आहेत. या वास्तूंच्या उभारणीत अनेक क्षेत्रांतील विशेषज्ञांचा सहभाग आवश्यक असतो. आसनव्यवस्था, प्रकाशयोजना, ध्वनिनियंत्रणशास्त्र इ. बाबी या वास्तुप्रकारात महत्त्वाच्या ठरतात.

शैक्षणिक वास्तुकला

शिक्षणाचा प्रसार वाढल्यानंतर शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, ग्रंथालये, संशोधनसंस्था अशा विविध प्रकारच्या शैक्षणिक वास्तू उभारणे अगत्याचे ठरले. बौद्ध विहार, आश्रम, मठ तसेच तक्षशिला व नालंदा ही विद्यापीठे ही प्राचीन शैक्षणिक वास्तूंची काही उदाहरणे होत.

शैक्षणिक वास्तुनिर्मितीत शिक्षकांसाठी बैठकखोल्या, निरनिराळ्या शैक्षणिक विभागांची दालने, ग्रंथालय आणि अभ्यासिका, विद्यार्थिसंख्येनुसार वर्गांची रचना, विद्यार्थ्यांच्या संचारसुलभतेच्या दृष्टीने छन्नमार्गांची आखणी, उत्साहवर्धक परिसरयोजना व वास्तु-शिल्पांतील परस्परपूरक सुसंगती दर्शविणारी मांडणी हे महत्त्वाचे वास्तुघटक विचारात घेतले जातात. पाश्चिमात्य देशांत शैक्षणिक वास्तुनिर्मीतीचा दर्जा अत्युच्च असावा, यांकडे विशेष लक्ष पुरविले जाते. भारतातही अनेक विद्यापीठांचे आणि शैक्षणिक वास्तुसमूहांचे वास्तु-नियोजन विश्वविख्यात वास्तुशिल्पज्ञांनी केले आहे. त्यांत अच्युत कानबिंदे, बाळकृष्ण दोशी इ. भारतीय वास्तुकारांप्रमाणेच लुइस कान या अनेरिकन वास्तुकाराच्या वास्तूंचा उल्लेख करावा लागतो.

स्मारक-वास्तू

एखाद्या व्यक्तीची, घटनेची किंवा युद्धातील विजयाची स्मृती वास्तुरूपाने जतन करून ठेवण्याची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्त्वात आहे. विजयकमानी  व कीर्तिस्तंभ, थडगी, प्रवेशद्वार, स्मारकशिल्प, मनोरा, मीनार अशा विविध वास्तुप्रकारांद्वारे स्मृती जतन करण्याची प्रथा मानवी इतिहासात पूर्वापार चालत आली आहे. नागासाकी व हीरोशीमा या शहरांवर झालेल्या अणुबाँबहल्ल्यांत ठार झालेल्या व्यक्तींना अभिवादन करण्यासाठी, तेथे भव्य स्मारके बांधली आहेत. इंदिरा गांधींच्या स्मरणार्थ दिल्ली येथे ‘शक्तिस्थल’ नावाचे अभिनव शिल्प उभारले आहे. ताजमहाल, पिरॅमिड यादेखील स्मारक-वास्तूच मानल्या जातात. चार्ल्स कोरिया यांनी अहमदाबाद येथे गांधी आश्रम बांधला, तोदेखील त्यातील वातावरणाद्वारे महात्मा गांधींचे तत्वज्ञान व्यक्त करणारे स्मारकच आहे. या प्रकारच्या वास्तुनिर्मितीत आकार, रचनाबंध, वातावरणनिर्मिती हे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांद्वारेच वास्तु-आशय सधन होण्यास मदत होते. स्मारक-वास्तूमध्ये ज्या भावना व्यक्त करण्यासाठी बांधीव अवकाशाची हाताळणी केली जाते, तो भावनिक आशय व्यक्त होणे अतिशय महत्त्वाचे असते.

दळणवळणक्षेत्रातील वास्तुकला

या प्रकारातील वास्तुनिर्मिती प्रामुख्याने एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकांत झालेली आहे. औद्योगिक क्रांतीमुळे नवीन वाहने, रेल्वे, विमाने इत्यादींचा वाहतुकीतील सहभाग वाढत गेला, त्यामुळे रेल्वेस्टेशने, बसस्थानके, विमानतळ, विमानस्थानके (हँगर) जगभर बांधली जाऊ लागली. स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब तसेच वाहतुकीचे प्रतीकात्मक आकार अभिव्यक्त करण्याचे प्रयत्न वास्तुरचनेत होऊ लागले. त्याहीपेक्षा सामूहिक अभिसरण, रचनात्मक भव्यता ह्या गोष्टी एकत्र आणून अशा वास्तुरचना करणे क्रमप्राप्त ठरले. वास्तुकलेतील अभियांत्रिकीचा सहभाग या प्रकारात जास्त पाहावयास मिळतो. तंत्र आणि कला यांचे संमिश्र आविष्कार जगभर निर्माण झाले आहेत. जगातील विख्यात विमानतळे, रेल्वेस्थानके अशा वास्तू ह्या प्रकारातील महत्त्वाची उदाहरणे मानली आहेत. अनेक क्षेत्रांतील विशेषज्ञांबरोबरच त्या त्या दळणवळणक्षेत्रातील तज्ञांचा सहभाग या प्रकारात प्रामुख्याने असतो.

औद्योगिक वास्तुकला

हा प्रकारही गेल्या दोन शतकांत झपाट्याने विकसित झालेला आढळतो. विविध प्रकारांचे आणि आकारांचे कारखाने या क्षेत्रात मोडतात. त्यात मानवी अभिसरणाबरोबरच ज्या वस्तु-उत्पादनाचा कारखाना आहे, त्याच्या प्रक्रियेस तितकेच महत्त्व असते. आज अक्षरशः शेकडो प्रकारांच्या उत्पादनांसाठी भिन्नभिन्न गरजांची पूर्ती करणाऱ्या व सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या वास्तू आवश्यक असतात. कार्यानुरूप अवकाशनियोजनाबरोबरच सुखद वातावरणनिर्मिती, परिसररचनेतील निसर्गाचा सहभाग, पूरक रंगसंगती, प्रकाशयोजना, पोत यांची निवड आणि अत्याधुनिक सुखसोयींचा अंतर्भाव या महत्त्वाच्या बाबींबरोबरच, माफक खर्च आणि कमीत कमी देखभालीचा उपद्व्याप ह्याही गोष्टींकडे औद्योगिक वास्तुरचनेत लक्ष पुरवावे लागते. आधुनिक वास्तुकलेच्या इतिहासात  अनेक थोर वास्तुतज्ञांनी कारखान्याच्या रचनेत कला, तंत्र आणि उपयुक्तता यांचा अनुरूप मेळ साधलेला आढळून येतो. आपल्या देशात या प्रकाराकडे आतापर्यंत रुक्ष कार्यक्षेत्र  म्हणून पाहिले जात होते; परंतु गेल्या दोन-तीन दशकांपासून या प्रकारात कलात्मक वास्तुनिर्मिती करणे शक्य आहे, अशी जाणीव मूळ धरत आहे. शिल्प, स्थलशिल्प अशा वास्तु-संलग्न कलांचा त्यात अंतर्भाव केला जातो.

व्यापारी क्षेत्रातील वास्तुकला

बाजारपेठा हा कोणत्याही लहानमोठ्या शहराचा अविभाज्य भाग असतो. नगरांच्या निर्मितीबरोबरच या प्रकाराचा विस्तार झाला. ग्रीक व रोमन संस्कृतीमध्यें या प्रकारातील वास्तुकला सुस्थिर झाली. शहरातील बाजारपेठांची क्षेत्रे ठरविली जाऊ लागली. गेल्या दोन शतकांत या प्रकारातील वास्तुनिर्मितीचे  स्वरूप आमूलाग्र बदलले. ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या खरेदीच्या सोयीसुविधा असलेली वस्तुविक्रयकेंद्रे (शॉपिंग सेंटर) तसेच ‘प्रेसिंग्ट’, ‘मॉल’ असे भिन्न भिन्न प्रकारचे अत्याधुनिक पाश्चात्त्य प्रकार निर्माण झाले. भूमिगत बाजारपेठकल्पना यशस्वीपणे राबविल्या गेल्या. गगनचुंबी महावास्तूंमध्ये अनेक मजल्यांवर दुकाने बांधली गेली. विभागीय वस्तु भांडार (डिपार्टमेंटल स्टोअर) ही नित्य गरजांच्या विविध वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची ही सुविधा असलेली वास्तुसंकल्पना जगभर अवलंबिली गेली. त्याला अनुरूप भव्य प्रमाणात वास्तुनिर्मिती झाली. शिवाय एखाद्या वस्तूच्या उत्पादन-विक्रीसाठी एकत्रित अनेकमजली वस्तुविक्रयकेंद्रे निर्माण होऊ लागली. उदा., डायमंड मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट इत्यादी. नवीन शहरांच्या नगररचना करताना या प्रकारातील वास्तूंसाठी-व्यापारी संकुलांसाठी-खास तरतूद केली जाऊ लागली. त्यांपैकी प्रेसिंग्ट हा प्रकार पाश्चिमात्य देशांत अतिशय लोकप्रिय आहे. या विभागात वाहनबंदी असते. सर्व परिसर स्थलशिल्प -रचनांनी युक्त व हिरवागार केलेला असतो. लहान मुलांसाठी खेळण्याची खास सोय असते. एकंदर खरेदीची क्रिया नैसर्गिक वातावरणात शांतपणे करता येते.

क्रीडाक्षेत्रातील वास्तुकला

विविध खेळांचे महत्व प्राचीन काळापासून निर्विवादपणे मान्य झाले आहे. ग्रीक व रोमन लोकांनी शर्यतींसाठी तसेच पशुझुंजी आदी क्रीडांसाठी सर्कस कॉलॉसिअम (रंगमंडले) बांधली. स्पॅनिश लोकांनी बैलझुंजीसाठी प्रेक्षागृहे बांधली. अशा वास्तुनिर्मितीचा वेग गेल्या दोनशे वर्षांत झपाट्याने वाढला. ज्या राष्ट्रात जो खेळ लोकप्रिय असेल त्यासाठी क्रीडागारे व प्रेक्षागृहे (स्टेडियम्स) बांधली जाऊ लागली. त्याचबरोबर जलतरणतलाव, सायकल-शर्यतींसाठी खास क्रीडागृहे, शारीरिक कसरतींसाठी व्यायामशाळा व प्रेक्षागृहे आणि महत्त्वाच्या खेळांसाठी ते एकत्रितपणे सामावणारी क्रीडासंकुले आता सर्व मध्यम शहरांतही बांधली जाऊ लागली आहेत. प्रत्येक क्रीडाप्रकाराच्या विशिष्ट अवकाशीय गरजा, प्रकाश व वायुवीजन, अंतर्गत जमीन हे या प्रकारच्या वास्तूमधील सर्वांत महत्त्वाचे घटक मानले जातात. शिवाय भव्यता, प्रेक्षकांची आसनव्यवस्था, त्यांचे अभिसरण इत्यादींमुळे वास्तुरचनेत तांत्रिक व शास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. प्रत्येक देशात ऑलिंपिक एशियाड यांसारख्या क्रीडामहोत्सवांसाठी आजही नव्याने वास्तुनिर्मिती केली जाते. या वास्तू म्हणजे आधुनिक तंत्र, साधनसामग्री व कला यांचा संगम असतो. यूरोप खंडात तसेच अमेरिका, जपान इ. देशांत क्रीडाप्रकारांतील अत्यंत सौंदर्यपूर्ण वास्तुनिर्मिती झालेली दिसते.

आरोग्यक्षेत्रातील वास्तुकला

या प्रकारास प्रामुख्याने इस्पितळे, आरोग्यकेंद्रे, संशोधन-प्रशाळा यांचा समावेश होतो. इस्पितळ-रचना हे आज अतिशय गुंतागुंतीचे वास्तुशास्त्र मानण्यात येते. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक उपकरणांमुळे या प्रकारात अवकाशरचनेत सतत बदल होत असतो. विस्तार लक्षात घेऊन प्राथमिक नियोजन करावे लागते. रोग्याची मनःस्थिती प्रसन्न ठेवणाऱ्या खोल्या, विविध रोग-उपचारांची दालने, अतिदक्षता-विभाग, शल्यचिकित्सा, शस्त्रक्रिया आदी विभाग व त्यांना संलग्न असलेले अनेक उपविभाग, औषधपुरवठा केंद्रे अशा अनेक विभागांचा सुयोग्य मेळ व अभिसरण साधणे ही या प्रकारात सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. निसर्ग, स्थलशिल्प यांचा वाढता सहभाग या वास्तुप्रकारात साधला जातो.

लेखक : दीक्षित विजय

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate