অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वास्तुकला भाग ३

वास्तुकला भाग ३

विशेष शास्त्रीय संशोधनपर वास्तुप्रकार

हा प्रकार काहीसा दुर्मिळ असला, तरी खास विशेषज्ञ शास्त्रज्ञांसाठी या प्रकारातील वास्तुनिर्मिती केली जाते. उदा., ग्रहगोलांच्या निरीक्षणांसाठी वेधशाळा (ऑब्झर्व्हेटरी), अणुसंशोधन-प्रयोगशाळा, प्रक्षेपण केंद्र अशा अतिविशिष्ट कार्यासाठी अभियांत्रिकी शाखेच्या सहयोगाने वास्तुकला निर्माण केली जाते. गेल्या शंभर वर्षांत अशा वास्तू अतिशय कलात्मकतेने जगातील अनेक देशांत बांधल्या गेल्या आहेत. कार्यक्षेत्राच्या भिन्नतेनुसार वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे ह्या वास्तूदेखील आकारसौंदर्याची आगळी अनुभूती देतात.

वास्तुकलाविषयक पारिभाषिक संज्ञा

पाश्चात्य, पौर्वात्य व भारतीय वास्तुकलेसंबंधीच्या विवेचनात वारंवार येणाऱ्या काही प्रमुख संज्ञांविषयीचे संक्षिप्त, व्याख्यावजा स्पष्टीकरण पुढे दिले आहे. सर्वच संज्ञांचा अंतर्भाव करणे स्थलाभावी शक्य नसल्याने नित्य परिचयाच्या सुलभ संज्ञा वगळल्या आहेत. काही संज्ञांवर मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत :

अंतराळ : हिंदू वास्तुकलेतील मंदिरातील सभामंडप आणि गर्भगृह यांमधील पोकळी.

अबॅकस : स्तंभशीर्ष-फलक.

अमलक : भारतीय वास्तूकलेतील नागर शैलीतील मंदिरशिखरावरील फुगीर कंगोरे असलेला वर्तुळाकार भाग.

अ‍ॅटिक : कातरमाळा ; शेवटच्या माळ्यावरील खोली.

अ‍ॅट्रियम : रोमन व ख्रिश्चन कालीन घरातील ओसरी; किंवा तत्सम मोठ्या वाड्यातील खुला चौक.

अँम्फिथिएटर : सभोवती चढती प्रेक्षकासने असलेले गोलाकार किंवा दीर्घ-गोलाकार रंगमंडल

अ‍ॅम्ब्युलेटरी : चर्च किंवा मंदिरातील प्रदक्षिणापथ.

अ‍ॅव्हेन्यू : दुतर्फा झाडे असलेला रस्ता.

अ‍ॅशलर : माठीव, संगीन आणि आयताकृती दगडांचे चिरेबंदी बांधकाम.

आइल : (Aisle). चर्चच्या सभामंडपातील प्रवेशद्वारापासूनच्या लांबट मध्यभागाच्या दोन्ही बाजूंचे खण वा पाखा.

आयोनिक ऑर्डर : ग्रीकांनी निर्माण केलेली, काष्ठशिल्पावर आधारित दुसरी स्तंभरचना (ऑर्डर). नाजुक आणि सडपातळ सौंदर्य असलेली स्तंभशैली. स्तंभ हे तळाच्या व्यासाच्या नऊपट उंच असत. शीर्षावर पत्रलता (स्क्रॉल मोल्डिंग) असे.

आर्किट्रेव्ह : रोमन वा ग्रीक डोरिक शैलीतील खांबावरील चौकटीच्या खालचे पहिले दोन थर. या दोन थरांना ‘अपर फेसिया’ व ‘लोअर फेसिया’ म्हणतात. दरवाजाच्या वा खिडकीच्या सभोवती चौकट व भिंत यांचा सांधा केलेली उठावदार, नक्षीदार लाकडी चौकट; प्रस्तरपाद; शीर्षपाद.

आर्केड : स्तंभावरील कमानीचा रस्ता. एका रांगेतील कमानीचा मंडप.

आर्च : कमान, चाप, महिरप. ह्याचे सु. ५० प्रकार आहेत. कमानीच्या माथ्यावरील दगडास कीलक वा चावीचा दगड (की स्टोन) म्हणतात.

ऑबेस्लिक : प्राचीन ईजिप्शियन संस्कृतीतील एकसंध दगडाचा स्तंभमनोरा; शंकुस्तंभ, सूच्याकार स्तंभ. हा स्तंभ उंच, निमुळता, चौरसाकार असून त्याच्या शिरोभागी पिरॅमिडसदृश आकार असतो. ईजिप्तमधील काही पिरॅमिड अन्यत्र हलविले गेले. आजही आधुनिक तंत्रसाधनांद्वारे अनेक ठिकाणी असे मनोरे उभे केले गेले आहेत.

इचिनस : ग्रीकांच्या डोरिक स्तंभरचनेतील शीर्षफलकाखालील बर्हिगोल नक्षीचा भाग.

एन्टॅब्लेचर : अभिजात ग्रीक वास्तुरचनेतील स्तंभावरील प्रस्तरपाद (आर्किट्रेव्ह), कोरीव नक्षीपट्ट (फ्रीझ) व कंगणी (कॉर्निस) हे तीन घटक मिळून बनलेला स्तंभाचा शिरोभाग, स्तंभशीर्ष.

एन्टॅसिस : फुगोटा; निमुळत्या स्तंभाच्या मध्यभागास दृष्टिभ्रमामुळे अंतर्वक्र बाक आल्याचा भास होऊ नये, म्हणून मुद्दाम ठेवलेला किंचितसा फुगवटा. वजन उचलल्यावर हाताच्या स्नायूंना येतो तसा आभास निर्माण करणारा फुगवटा.

एलिव्हेशन : वास्तूचा दर्शनी उभा देखावा, दर्शनी भाग.

कँटिलिव्हर : एका बाजूच्या आधारावर प्रक्षेपित होणारा वास्तुघटक; एकबंध रचना; प्रवेशद्वारावरील छतरचनेत नेहमी वापरली जाणारी रचना.

काँक्रीट : बांधकामाचे एक साहित्य. सिमेंट, वाळू आणि खडी यांचे पाणी घालून केलेले मिश्रण म्हणजेच काँक्रीट होय. त्याच्यातील प्रत्येक घटकाचे प्रमाण कोणत्या बांधकामासाठी ते वापरले जाते यावर अवलंबून असते.

काँटूर प्लॅन : जमिनीची समपातळी दर्शविणारा नकाशा. अतिभव्य वास्तुप्रकल्पांत वास्तुविधान करण्यापूर्वी तो आवश्यक असतो.

काँपोझिट ऑर्डर : रोमन वास्तुतज्ञांनी ग्रीकांच्या आयोनिक आणि कॉरिंथियन या स्तंभरचनांचा मिलाफ करून निर्माण केलेली संमिश्र स्तंभरचना. स्तंभांची उंची तळाच्या व्यासाच्या दसपट असे.

कॉरिंथियन ऑर्डर : ग्रीकांनी निर्माण केलेली तिसरी व शेवटची स्तंभरचना. ह्या रचनेत सुबक नक्षीबद्ध स्तंभशीर्ष उलट्या घंटेच्या आकाराचे असते.

कॉर्निस : छताच्या सर्वोच्च भागातून प्रक्षेपित होणारा कंगोरा, कंगणी. त्यामुळे छतावरून पडणारे पाणी भिंतीपासून दूरवरून खाली जाते.

कॉर्बेल (कॉर्बेलिंग): झुकावाचे बांधकाम; स्तर-प्रस्तर बांधकाम; या बांधकामात वीट वा दगड एकमेकांवर रचताना एकावरील दुसरा असा प्रत्येक घटक पुढे सरकवून बसविला जातो व त्याद्वारे दोन्ही भुजांचा मिलाफ होऊन तुळईसारखा घटक टाळला जातो.

कॉलोनेड : स्तंभावली, प्रांगणाभोवतीची स्तंभपंक्ती.

क्रॉकेट :  गॉथिक शैलीच्या वास्तूमधील वेलबुट्टीदार दगडी मनोरा, त्यावरील पर्णाकृती नक्षीचा उपयोग पायऱ्यांसारखा वर चढून दुरुस्तीसाठीही केला जाई.

क्लिअरस्टोरी : ईजिप्शियन मंदिरे वा ख्रिस्ती चर्च यांच्या मध्यभागाची उंची वाढवून तेथे खिडक्या किंवा छिद्रे असलेली शिला बसविण्याचे तंत्र. त्याद्वारे मध्यभागात प्रकाश व वायुजीवन साधले जात असे. ऊर्ध्ववातायन; अधिवातायन.

गार्‌गॉयल : छताच्या पन्हाळ्यातील पाण्याचे निर्गमद्वार. गॉथिक शलीत विविध प्राण्यांच्या मुखांद्वारे पाण्याचा निचरा होत असे. भारतात गोमुख व इतर प्राण्यांची शिल्पे यासाठी कोरली जात.

ग्रॉइन व्हॉल्ट : रोमन गॉथिक शैलीतील कमानी छतरचना; परस्परांशी काटकोनात गुंतवलेल्या दोन अर्धगोल कमानींची छतरचना.

ग्रॉटेस्क : विलक्षण, ओबडधोबड, विरूपमुख रचना; वास्तु-अलंकरणासाठी शिल्पबद्ध केलेल्या प्राणी व मानव यांच्या संमिश्र विरूप मुखप्रतिमा. अशा प्रतिमा सर्वत्र पाहावयास मिळतात. उदा., नरसिंह, गणपती, तुंबरू इत्यादी.

जीओडेसिक : संपृष्ठिका; एकाच पृष्ठावरील दोन बिंदूंमधील कमीत कमी अंतर. या तत्त्वावर बक्‌मिन्स्टर फुलर या वास्तुशिल्पज्ञाने अल्पांतरी घुमटरचना केली आहे.

झिगुरात : मंदिर-मनोरा. मेसोपोटेमियन संस्कृतीतील मंदिराचा मनोरा; चौरस पिरॅमिडाकृती वीटकामाने बांधलेली वास्तू.

टस्कन ऑर्डर : रोमनांची पहिली स्तंभरचना; स्तंभाची उंची तळाच्या व्यासाच्या सातपट व अत्यंत माफक अलंकरण ही वैशिष्ट्ये.

टिम्पॅनम : अभिजात मंदिराच्या दर्शनी भागावरील त्रिकोणी भिंत; त्रिकोणिका पृष्ठ.

डॅडो : भिंतीचे तळखंड, भिंतीचा खिडकीच्या खालपासून तळपर्यंतचा गर्द रंग; किंवा फरशा बसविलेला भाग; जमिनीपासून १ मी. उंचीचा पट्टा.

डॉर्मर विंडो : उतरत्या छपरातील खिडकी, धोकाबारी.

डिझाइन : रूपायन; आकृतिबंध; संकल्पित वास्तूचा पूर्वनियोजित रूपबंधात्मक आराखडा.

डोम : घुमट, घुमटी; अर्धगोलाकार छतरचना.

डोरिक ऑर्डर : ग्रीकांनी निर्माण केलेली पहिली स्तंभरचना; ही काष्ठशिल्पावरून संगमरवरी दगडात रूपांतरित केली गेली. स्तंभपृष्ठावर उथळ अर्धवर्तुळाकार कंगोरे (फ्ल्यूट्स) आणि तळाच्या व्यासाच्या सहा ते आठपट उंची असल्यामुळे काहीशी बोजड वाटणारी स्तंभरचना.

ड्रम : पिंपाकृती घुमटाखालील भिंतीचा भाग. त्यावर स्तंभपंक्तीचे व खिडक्यांचे नियोजन करून अंतर्भागात प्रकाश खेळवला जात असे.

नाओस : ग्रीक मंदिरातील गर्भगृह, देवमूर्तीची प्रतिष्ठापना केलेली खोली.

नेव्ह : चर्चमधील मध्यवर्ती लांबट सभामंडप; मध्यदालन.

पर्स्पेक्टिव्ह ड्राँईंग : यथादर्शनात्मक रेखन; मूळ वा संकल्पित वास्तू एखाद्या कोनातून बघणाऱ्याला जशी दिसेल, तसे दाखविणारे यथार्थ चित्र.

पायलॉटिस : वरच्या इमल्यास आधार देणारा जमिनीवरील सलोह काँक्रीट स्तंभ, किंवा स्तंभपंक्ती. तळमजल्यावर फक्त स्तंभ असतात, बाकी भूभाग मोकळा असतो.

पायलॉन : ईजिप्शियन मंदिरवास्तुप्रकल्पातील भव्य प्रवेशद्वार; तिरकस (बॅटर्ड) बाह्य भिंती, शिल्पालंकृत दर्शनी भाग, विशाल प्रमाणबद्धता या वैशिष्ट्यांमुळे ही वास्तू दर्शकाला भारावून टाकते. दक्षिण भारतातील गोपुरे हा या कल्पनेचाच आविष्कार मानावा लागेल.

पिलॅस्टर : मित्तिस्तंभ, भिंतीत बसवलेला चौरस खांब.

पेडिमेंट : प्राचीन अभिजात वास्तूच्या शिरोभागी असलेला त्रिकोणी भाग; त्रिकोणपर्ण वा त्रिकोणिका. त्याचा बाह्याकार विविध उठावदार कंगोऱ्यांनी ठळक केला जाई. त्रिकोणी पृष्ठभागावर धार्मिक शिल्पे कोरली अथवा बसविली जात.

पेन्डेन्टिव्ह : त्रिकोणी पंखे वा त्रिकोणी बैठक; चौरस दालनावर उभारलेल्या गोलाकार घुमटास आधार देण्यासाठी बांधलेली त्रिकोणी बैठक वा वलयाकार भित्तिरचना. बायझंटिन शैलीत हे घुमटाचे बांधकामतंत्र विकसित झाले.

पोडीयम : वास्तूखालील विस्तारित व्यासपीठ; रोमन मंदिररचनेतील मोकळा चौथरा; आधुनिक वास्तुकलेतील तळमजल्यावरील विस्तारीत बांधीव उन्नत प्रांगण; स्तंभावरील बैठी भिंत, स्तंभाधार, उन्नत पीठ.

पोस्ट अँड लिंटेल : स्तंभ तुळई रचना.

प्री -स्ट्रेस्ड : पूर्व प्रतिबलित वा पूर्वतन्य वास्तुघटक.

प्लॅन : वास्तुकल्प, रचनाकल्प, वास्तुविधान, अधोदर्शन; वास्तूची अंतर्गत रचना दर्शविणारा आराखडा.

फसाड : वास्तूचा समोरचा दर्शनी भाग.

फॅन व्हॉल्ट : इंग्लिश गॉथिक शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण छतरचना. स्तंभशीर्षापासून वलयाकार फासळ्या प्रक्षेपित होत अर्धवर्तुळाकार पंख्यासारख्या वरील फासळीस मिळतात. रेखीव शिल्पबद्धतेमुळे निर्माण होणारी सौंदर्यपूर्ण छतरचना.

फ्रीझ : कोरीव नक्षीपट्ट; ग्रीक वास्तुकलेतील शीर्षपाद व कंगणी यांच्यामधील उठावदार, नक्षीबद्ध चित्रचौकटी.

फ्लाइंग बट्रिस : कमानधीरा, अधांतरी टेकू; गॉथिक वास्तुकलेतील छतभार संक्रमित करण्यासाठी बाह्य भिंतीलगतच्या पडभिंतीस आधार देणारी, अंतर ठेवून स्वतंत्रपणे बांधलेली पडभिंत. मधील जागा शिल्पांकित कमानींनी साधली जात असे.

बट्रिस : पुस्तीची भिंत, स्तंभासारखी बाहेर बांधलेली पडभिंत, धीरा.

बॅरल व्हॉल्ट : अर्धवर्तुळाकार चापकमानीचे छत; अर्धगोल कमानछत.

बॅसिलिका : रोमन काळातील न्यायमंदिर. नंतरच्या ख्रिस्ती संस्कृतीत त्याचे चर्चमध्ये रूपांतर झाले.

बालुस्टर : कठड्यास आधार देणारा लहान खांब; गराद; कठड्याचा गज.

बीम : आढे, तुळई, तुला, सरी.

बे विण्डो : सज्जाबारी; पुढे आलेल्या भिंतीतील तीन बाजूंची किंवा वर्तुळाकार खिडकी.

मस्ताबा : प्राचीन ईजिप्शियन थडगे; आयताकृती, बाह्यांग तिरके असलेली आणि खालील शवगृहात वस्तू प्रदान करण्यासाठी शिरोभागी झरोके असलेली वास्तू. या वास्तूचा पुढील काळात विस्तार होऊन पिरॅमिडची संकल्पना सुचली.

मेगा स्ट्रक्चर : अतिभव्य वास्तुप्रकल्प. अमेरिकेत अनेक मजली इमारतींत सर्व नागरी सोयी एकाच वास्तूमध्ये उपलब्ध करून देऊन अतिविशाल नगरासारख्या इमारती उभ्या केल्या जातात.

मोल्डिंग : मोलीमे, घाटदार कंगोरे; वास्तूला सौंदर्यपूर्ण करण्यासाठी विविध कोपरे, प्रस्तर यांच्याभोवती बसविण्यात येणारे उठावदार शिल्पपट्टे. चर्च, मंदिरे, मशिदी या वास्तुप्रकारांत यांचा विशेष वापर होतो.

रिब : फासळी, आधार,तीर; कमानी छतरचनेस आधार देणाऱ्या फासळ्या.

री-इन्फोर्स्ड सिमेंट-काँक्रीट : (आर्. सी. सी.). प्रबलित किंवा सलोह सिमेंट-काँक्रीट; पोलादी सळ्यांच्या जाळ्या बांधून अथवा ठेवून त्यावर काँक्रीट ओतून बांधकाम-साहित्य तयार करण्याचे तंत्र.

लॅटिस वर्क : जाळीकाम, जाळीची चौकट, गवाक्षजाल, जाळीची खिडकी. मोगल तसेच गॉथिक वास्तुशैलींत संगमरवरी जाळ्यांचे अनेक कलात्मक नमुने पहावयास मिळतात.

लूव्ह्‌र विण्डो : तिरप्या पट्ट्यांची खिडकी; त्यात भरपूर हवा आणि प्रकाश मिळण्यासाठी योग्य तो कोन साधण्याची सोय असते.

वॉटल अँड डॉब : शेणमातीने सारविलेले कूड; अतिप्राचीन काळापासून घरे बांधण्यासाठी मानवाने वापरलेले वास्तुसाहित्य.

व्ह्‌स्वार :(Voussoir). अचकोन; कमानरचनेतील पाचराकृती दगडी विटेचा घटक; पाचरीसारखा बसवलेला कमानीचा दगड; निमुळत्या आकारामुळे वलयाकार कमानीतून तो खाली न येता स्थिर राहतो.

व्हॉइड : रिक्तावकाश, पोकळी.

व्हेन्टिलेशन शाफ्ट : वास्तुरचनेत अंतर्गत प्रसाधनखोलीच्या वायुवीजनासाठी सोडलेला मोकळा अरुंद चौक.

शाफ्ट : स्तंभदंड; स्तंभाचा वाटोळा उभा भाग.

सॉफिट : वास्तुघटकाचा तळभाग.

सिनॅगॉन : ज्यू लोकांचे प्रार्थनास्थळ. उपासना मंदिर.

सेंटरिंग : तात्पुरता लाकडी वा धातूचा आधार, आधार-फळ्या; सलोह काँक्रीट स्लॅब व तत्सम बांधकामासाठी त्याआधी बनविलेला लाकडी वा पत्र्याचा फर्मा. काँक्रीट स्थिर झाल्यानंतर फर्मा काढून टाकला जातो.

सेक्शनल ड्रॉइंग : छेद-रेखन; वास्तूचा उभा छेद कल्पून आतील रचना दर्शविणारा आराखडा.

सेनोटाफ : अन्य स्थळी पुरलेल्या व्यक्तीची त्याच्या सन्मानार्थ उभारलेली छत्री; शवविरहित समाधी वा कबर; स्मारक.

स्क्विंच आर्च : कोनकमान, कोपरीकमान; चौरस दालनावर वरील घुमटाकार छताचा पाया अष्टकोनी करण्यासाठी चारही कोपऱ्यांतील बाजूंवर उभारलेल्या झुकत्या लहान कमानी.

स्टको प्लॅस्टर : चुन्याचा गिलावा.

स्पँड्रल : स्फीत, दोन कमानींमधील वक्राकार त्रिकोणी भाग.

हायपोस्टाइल हॉल : बहुस्तंभी मंडप, अनेक स्तंभपक्तींवर आधारलेल्या छताचा दिवाणखाना किंवा सभामंडप. ईजिप्शियन वास्तुशैलीतील मंदिरात असे सभामंडप आढळतात.

वास्तुतज्ञाचे प्रशिक्षण आणि व्यवसाय

वास्तुकलेच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यास बारावीनंतर प्रवेश मिळतो. इंग्रजी, गणित, भौतिकी, रसायनशास्त्र आदी विषयांतील विद्यार्थ्याचे प्रावीण्य प्रवेशासाठी आवश्यक असते. शिवाय चित्रकलेतील श्रेणीपरीक्षा दिल्या असल्यास विद्यार्थ्यास त्याचा फायदा होतो. सर्वत्र  प्रवेशपरीक्षा द्यावी लागते. हा अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो. पहिल्या वर्षी विद्यार्थ्यांना मूलभूत विषय शिकवून या क्षेत्राचा परिचय करून दिला जातो. मूलभूत रूपायन (बेसिक डिझाइन), आरेखन, बांधकाम तंत्र, बांधकाम-सामग्री इ. विषयांची ओळख करून दिली जाते आणि त्यानंतरच्या वर्षांत अभियांत्रिकी, वास्तुकलेचा इतिहास, प्रगत रूपायन, तांत्रिक विषय इत्यादींची भर पडत जाते. अभ्यास-सहली, चर्चासत्रे, प्रत्यक्ष बांधकामभेटी, छायाचित्रण, शिल्पाकृती, वास्तूंच्या प्रतिकृती इत्यादींच्या द्वारे विद्यार्थ्यांना वास्तुकलेविषयी संवेदनाक्षम बनवून या क्षेत्राविषयीचे सम्यक स्वरूप निदर्शनास आणून दिले जाते. यात अर्थातच संदर्भग्रंथ आणि दृक्‌श्राव्य माध्यमे (चित्रपट, चित्रफीत, चित्रपारदर्शिका) यांचे महत्त्व निर्विवाद आहे.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वास्तुतज्ञ व्यावसायिक अनुभवसाठी एखाद्या कार्यालयात प्रशिक्षण घेतो व काही कालावधीनंतर परिस्थितीनुसार त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो.

प्रत्यक्ष व्यवसाय सुरू झाल्यानंतर वास्तुतज्ञाच्या बुद्धिमत्तेचा आणि व्यक्तिमत्वाचा खरा कस लागतो. कारण शैक्षणिक काळातील कलाविषयक संस्कार आणि प्रत्यक्ष रूपायन करण्यासाठी मिळणारी कामे यांत योग्य समन्वय साधणे, हे फार कौशल्याचे काम असते. आपल्या कल्पना वास्तु-मालकास (क्लाइअंट) पटवून देणे, त्याच्या कल्पना प्रत्यक्षात उतरविणे यांतच वास्तुतज्ञाचे कौशल्य पणाला लागते. अर्थातच मालकाची आर्थिक क्षमता विचारात घेऊन सतत त्या गोष्टीचे भान ठेवावे लागते. सौंदर्य, उपयुक्तता आणि टिकाऊपणा यांची सांगड आर्थिक मितव्ययाशी घालावी लागते. प्रत्येक कामाद्वारे वास्तुतज्ञाची प्रतिमा समाजात उंचावत जाते आणि व्यावसायिक क्षेत्र व्यापक होत जाते.

वास्तु-मालक आपल्या प्रथम भेटीत वास्तुतज्ञास नियोजित वास्तुव्याप्तीचे विवरण देतो, आर्थिक मर्यादेची कल्पना देतो. त्या पार्श्वभूमीवर वास्तुतज्ञ प्रत्यक्ष जागेचा अभ्यास करून प्राथमिक रेखाटने सुरू करतो. ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ या संघटनेने वास्तुतज्ञाच्या कामाच्या मोबदल्याविषयी काही सूत्रे सांगितली आहेत; परंतु स्थानिक परिस्थिती, कामाचे व गावाचे स्वरूप, वास्तुतज्ञाचा अनुभव, मालकाशी असलेले संबंध इ. इतर गोष्टींवरही मोबदला ठरविला जातो. सर्वसाधारणपणे मध्यम बंगल्यासारख्या कामासाठी इमारत-खर्चाच्या चार ते सहा टक्के वास्तुतज्ञाचा मोबदला असतो व कामाच्या विविध टप्प्यांवर तो मालकाने त्याला द्यावयाचा असतो. वास्तुकला ही जीवनावश्यक कला असल्यामुळे या क्षेत्रात प्रत्येक तज्ञास वाव असतो. शिवाय स्वतंत्र व्यवसायाव्यतिरिक्त नोकरीची उपलब्धता देशात वा परदेशांत असतेच.

वास्तुतज्ञाचे कार्य

वास्तुतज्ञाने एखादे वास्तुनिर्मितीचे काम हाती घेतल्यानंतर, त्याची प्राथमिक रेखाटने आधी करावी लागतात. ही रेखाटने मालकाने मंजूर केल्यानंतर वास्तुतज्ञ स्थानिक नगरपालिका वा महापालिका यांच्या मंजुरीसाठी नकाशे तयार करतो. त्याआधी त्याच्या सर्जनशीलतेला आणि कलासंस्कारांना मुभा देईल, असे अंतिम स्वरूप आराखड्याला द्यावे लागते. शिवाय स्थानिक बांधकामाच्या नियमांत ते नकाशे बसवणे आवश्यक असते. मोठ्या स्वरूपाचे काम असल्यास मालकाला किंवा संस्थांना सादर करावयाचे नकाशे विशेष अभ्यासपूर्ण आणि आरेखनकौशल्याने सजविलेले असतात. त्याचप्रमाणे नियोजित वास्तुप्रकल्पाविषयीचे आलेख, आकृत्या इत्यादींद्वारे तो स्वतः विचारात घेतलेल्या तपशीलांचे चित्रण करतो. सोबत यथादर्शन आणि प्रतिकृती (मॉडेल) यांचाही आधार घेतो. रूपायन (डिझाइन) सर्व दृष्टींनी अंतिम झाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक असणारी प्रक्रिया सुरू होते. नकाशानुसार प्रत्येक वास्तुघटकाची तपशील-मोजणी (क्वांटिटी सर्व्हे), विनिर्देशन (स्पेसिफिकेशन) करून पूर्ण कामाची निविदा (टेंडर), प्रत्यक्ष कामास आवश्यक असणारे कार्यकारी आरेख (वर्किंग ड्रॉइंग), तपशीलवार आराखडे व आकृत्या (वर्किंग डीटेल्स), सलोह काँक्रीट रचनेचे नकाशे (आर्. सी. सी. ड्रॉइंग - जे अभियंत्याकडून करून घेतात) असा सर्वंकष संच कंत्राटदारासाठी केला जातो. ठेकेदाराची निवड झाल्यावर प्रत्यक्ष बांधकाम सुरू करण्यासाठी, अभियंत्याच्या नकाशानुसार वास्तुतज्ञ स्तंभांचे किंवा भिंतींचे मध्यरेषा-आखणी-चित्र (लाइन आउट ड्रॉइंग; सेंटर लाइन प्लॅन) तयार करतो. त्यानंतर पायाखोदाईस सुरुवात होऊन, कागदावरच्या संकल्पनेला प्रत्यक्ष मूर्त स्वरूप देण्याची प्रक्रिया सुरू होते.

बांधकाम सुरू झाल्यावर प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्याला वास्तुतज्ञाचे पर्यवेक्षण असते. जोते (प्लिंथ), छत-लादी (स्लॅब), वीटकाम, गिलावा इ. टप्प्यांवर प्रत्यक्ष मोजमाप करून, झालेल्या कामाचे मूल्यमापन प्रमाणपत्र वास्तुतज्ञ देतो व त्यानुसार कंत्राटदारास मालकाकडून पैसे अदा केले जातात. शेवटी स्थानिक नगरपालिकेकडून बांधकाम पूर्ण केल्याचा दाखला वास्तुतज्ञ मिळवतो व वास्तू राहण्यासाठी सज्ज होते. मोठ्या वास्तुप्रकल्पाच्या व्याप्तीनुसार या प्रक्रियेत विविध तपशीलांचा, सल्लागारांचा आणि व्यवहारपद्धतींचा अंतर्भाव करावा लागतो.

वास्तुकलेचे प्रशिक्षण देणारी मुंबई येथे तीन, कोल्हपूर व पुणे येथे दोन आणि नासिक व नागपूर येथे एक अशी वास्तुकला-महाविद्यालये सध्या महाराष्ट्रात आहेत. भारतात वास्तुक्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर कार्य करणारी ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट्स’ (स्थापना १९१७), वास्तुसाहित्यविषयक संशोधनकार्य करणारी  ‘नॅशनस बिंल्डीग ऑर्गनायझेशन’, शैक्षणिक दर्जाचे नियंत्रण करणारी  ‘ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन’, ‘बोर्ड ऑफ स्टडीज फॉर आर्किटेक्चर अँड अलाइड कोर्सेस’ वगैरे व्यावसायिक व प्रशिक्षणविषयक कार्य करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या संस्था आहेत. ‘महाराष्ट्र बोर्ड ऑफ टेक्निकल एक्झामिनेशन्स’ ही राज्य पातळीवरील संस्था पदविका अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेते. तसेच मुंबई, बडोदे, दिल्ली येथील विद्यापीठांमध्ये वास्तुकलाविषयक पदवी व पदविका असे दोन्ही अभ्यासक्रम शिकवले जातात. मुंबई येथील ‘आर्किटेक्चरल ट्रेनिंग सेंटर’ मध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सोय आहे. यांखेरीज भारतात व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वास्तुकलाविषयक तांत्रिक प्रशिक्षण देणाऱ्या व्यावसायिक संस्था आहेत.

ऐतिहासिक आढावा

अतिप्राचीन काळापासून ते विद्यमान कालखंडापर्यत वेगवेगळ्या देशांत भिन्न-भिन्न वास्तुशैली आणि तंत्रे उत्क्रांत होत गेली. देशपरत्वे त्यांत स्थानिक वैशिष्ट्ये आणि तंत्रवैविध्ये यांची भर पडत गेली. प्रत्येक देशातील धार्मिक, तांत्रिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि वैचारिक अशा विविध चैतन्यस्त्रोतांचे प्रतिबिंब त्या त्या शैलीद्वारे प्रकट होणे अपरिहार्य होते. त्याचप्रमाणे भौगोलिक, भूगर्भीय तसेच स्थानिक हवामानांचा प्रभाव हादेखील शैलीचा जडणघडण होताना महत्त्वाचा ठरला.

अतिप्राचीन ते प्राचीन या कालखंडात जगातील अनेक देशांत विस्कळीत स्वरूपाची व गरजेपुरतीच वास्तुनिर्मिती झालेली आढळते. त्यात तंत्रप्रगतीचा अखंड ओघ तर नव्हताच; परंतु वैचारिक सातत्य व सुसूत्रताही नव्हती. याचे कारण सहजीवनास आणि संस्कृतिविकासास पोषक असे वातावरण आणि विचारधारा यांचा उगम झालेला नव्हता. शेतीसारखी उदरनिर्वाहाची साधने, पाण्यासारखी जीवनावश्यक गोष्ट ज्या स्थळी उपलब्ध झाली, तेथे सुस्थिर सहजीवनास आरंभ झाला व तिथूनच पुढे त्या त्या ठिकाणी भिन्न-भिन्न संस्कृतीचा उदय झालेला आढळतो. या स्थायी संकल्पनेमुळे वास्तुकलेवर लक्ष केंद्रित केले जाऊ लागले आणि त्यातून जगाच्या इतिहासात महत्त्वाचे वास्तुशैली-कालखंड निर्माण झाले, प्रगत झाले आणि कालांतराने नामशेषही झाले. असे असले तरी, प्रत्येक संस्कृतीचे वास्तुशास्त्रीय कलासंचित शेजारच्या संस्कृतीने आत्मसात करून, त्यात आत्मसंचिताची भर घालून नवशैली निर्माण केल्या. हा प्रवाह आजतागायत अशाच पद्धतीने परिपक्व होतो आहे. स्थानिक बंधनाच्या चौकटीत राहून ज्या परकीय संकल्पना स्वीकार्य वाटल्या, त्या प्रत्येक संस्कृतीने आत्मसात केल्या. तरीदेखील अस्मितेचा ठसा प्रत्येक संस्कृतीने आपापल्या वास्तुनिर्मितीत उमटविलेला आढळतो.

प्रस्तुत आढावा हा प्रायः संक्षिप्त समीक्षणात्मक स्वरूपाचा आहे. कारण या व्याप्तिलेखातील अनेक विषयांवर स्वतंत्र नोंदी इतरत्र आहेत. त्यामुळे पुनरुक्ती टाळण्यासाठी येथे फक्त प्रत्येक संस्कृतीचे किंवा शैलीचे जागतिक वास्तुकलेला कोणते योगदान आहे आणि तंत्र, अलंकरण, रूपायन आदी क्षेत्रांमध्ये प्रत्येक संस्कृतीचे अलौकिक कार्य काय या मुद्यांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे ऐतिहासिक तपशीलांवर भर न देता सर्वंकष योगदानाचा गाभा, आशय प्रतिपादन करण्यावर येथे भर दिला आहे.

प्राचीन वास्तुकला

गरज आणि उपयुक्तता यांचे मूलभूत अर्थ प्राचीन वास्तुकारांनी मानवास शिकविले. गरजेपोटी निवाऱ्यासाठी बांधलेली घरे त्या उद्देशासाठी कशी उपयुक्त करावी, यासाठी प्राचीन लोकांनी पाच हजारांपेक्षा जास्त वर्षे खर्ची घातली. इ.स.पू. १००००ते इ.स.पू. ५००० हा साधारणपणे प्राचीन वास्तुकलेचा कालखंड मानला जातो. व्यक्ती ज्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने अक्षरओळख, शब्दओळख, वाचन आणि मग नवविचार सुचण्याची वैचारिक प्रगल्भता आत्मसात करते, त्याचप्रमाणे प्राचीन मानवाने वास्तुशास्त्रीय अक्षर, शब्द, वाचन येथपर्यंत प्रगती केली व पुढील संस्कृतींनी नवकल्पना उत्क्रांत करीत वास्तुशिल्पे उभारली. आदिवासी मानव गुहेतून म्हणजे नैसर्गिक आश्रयातून बाहेर पडल्यावर, स्वतंत्र बांधीव किंवा रचित आकार ‘घर’ म्हणून उभारण्याच्या मानवी आकांक्षेपोटी वास्तुकलेचा जन्म झाला. त्यासाठी सावली देणारे झाड, डोंगरातील गुहा अशा ढोबळ कल्पना त्याच्या डोळ्यांसमोर होत्या. मग दगड, लाकडी फांद्या हे साहित्य त्याने वास्तुप्रयोगासाठी वापरले. दगडाचे तुकडे एकावर एक रचून भिंत होते; किंवा बांबू, लाकडी फांद्या बांधून त्यावर पालापाचोळा ठेवला तर छत होते; हे वास्तुशासत्रातील पहिले अलौकिक प्रयोग आहेत. तुर्कस्तानातील काही प्राचीन घरांत रहिवाशी शिडीने चढत व शिडी ओढून आत घेत. संरक्षण ह्या प्राथमिक गरजपूर्तीसाठी यथावकाश मानवास नाना युक्त्या सुचल्या. भिंत बांधल्यावर ती स्थिर उभीच राहण्यासाठी तिची जाडी वाढविली की काम होते; किंवा घरात शिरण्यासाठी दार हवेच, मग त्यासाठी भिंतीला भोक पाडण्यापासून ते दाराच्या ठिकाणी लघुतुळई टाकण्यापर्यंत त्याची विचारशक्ती प्रगत झाली. दगडाचे वाहता येऊ शकतील असे तुकडे करून भिंत बांधायची, ती स्थिर राहण्यासाठी जाड करायची अशी अनेक तंत्रांमुळे प्रत्येक साधनाचे उपयुक्ततावादी दृष्टिकोनातून निरीक्षण करायला प्राचीन मानवाने शिकवले. कुडाच्या भिंती, शेणमातीचा गिलावा, फांद्यांचे उतरते छप्पर, सारवून सपाट केलेली जमीन, भिंतीची बांधणी अशी अनेक मूलभूत तंत्रे ही प्राचीन मानवाची पुढील संस्कृतींना दिलेली देणगी होय. आजही अनेक देशांतील आदिवासी या पद्धतीने घरे बांधतात. थोडक्यात, प्राचीन वास्तुकलेने मानवास उपलब्ध वास्तुसाहित्याचा समर्पक उपयोग करावयास शिकविले. त्याचे गुणधर्म अभ्यासून उपयुक्त साधनात रूपांतर करण्याची कृती दाखविली. निरीक्षणशक्तीचा उपयोग करण्याची दृष्टी दिली. यानंतर पाश्चिमात्य देशांत पहिली महत्त्वाची वास्तुशैली व संस्कृती उदयास आली.

ईजिप्शियन वास्तुकला

ऐहिक जीवनापेक्षा मरणोत्तर जीवनात अधिक स्वारस्य असलेल्या ईजिप्शियन लोकांनी स्वतःची घरे शीघ्रविनाशी साहित्यात बांधली; परंतु थडगी आणि मंदिरे मात्र हजारो वर्षे टिकतील, अशा पत्थरात बांधली. पर्जन्यहीन हवामानामुळे त्यांनी वास्तूंवर दगडी सपाट छपरे बांधली. परंतु अति-उष्म्यामुळे जाड भिंती, कमी आणि लहान आकारांच्या खिडक्या इ. गोष्टींमागे हवामान कारणीभूत होते. एक हजार मैलांच्या नाईल नदीच्या खोऱ्यात ईजिप्शियन वास्तुकला विखुरलेली आहे. मस्ताबा, पिरॅमिड आणि मंदिरे हे या शैलीतील मुख्य वास्तुप्रकार आहेत. मस्ताबा हे श्रीमंत लोकांचे थडगे असे. याच्या बाह्य भिंती तळाला जाड आणि वर निमुळत्या होत गेलेल्या रक्षकभिंतीप्रमाणे असत. त्याचा उद्देश भिंतींना सुस्थिरता देण्याचा असे. हे तंत्र (बॅटरिंग) ईजिप्शियन वास्तुकारांनी मस्ताबा आणि पिरॅमिड यांच्या रचनेत सातत्याने अनुसरले. याचा आतील भाग मात्र काटकोनात सरळ असे, कारण अंतर्गत वापरासाठी तो आवश्यक होता. मस्ताबा या आयताकृती ठोकळ्यासारख्या  इमारतीची संकल्पना विकसित होत पुढे पिरॅमिडच्या रूपाने पूर्णत्वास पोहोचली. राजाला देव मानणारी प्रजा होती, त्यामुळे त्याचे थडगे शक्य तितके भव्य व चिरकाल टिकणारे असावे, या विचारसरणीतून पिरॅमिडच्या रूपायनाचा उगम झाला. मग एका मस्ताब्यावर दुसरा मस्ताबा असे स्वरूप बदलत पायऱ्यांचा पिरॅमिड तयार झाला (स्टेप पिरॅमिड). नंतर तो सघन बांधीव आकार पायऱ्या भरून काढून दोन भिन्न कोनांच्या तिरप्या रेषांनी जोडला गेला (बेन्ट पिरॅमिड) आणि शेवटी जमिनीशी ५१० ५२’ चा कोन करीत चारही बाजू शिखराला तिरप्या मिळवल्या गेल्या व पूर्ण पिरॅमिड तयार झाला. वास्तुशास्त्रातील सर्वांत सुस्थिर आकार अतिभव्य प्रमाणात उभा राहिला. अंतर्भागात कार्यानुरूप शवगृहे, आत जाण्यासाठी भुयारे आणि प्रकाशतिरीप व हवा येण्यासाठी झरोके, ही या वास्तुरचनेची ठळक वैशिष्ट्ये होत. हजारो मजूर अनेक वर्षे अनेक टनी दगडी ठोकळे प्रचंड उंचीवर उतरणीवरून वाहून नेत होते. ही एक आश्चर्यजनक बाब मानली जाते. तत्कालीन सामाजिक चैतन्यवृत्तीचे ते प्रतीक ठरते. वास्तुशास्त्रीय दृष्टिकोनातून पिरॅमिड या आकाराला महत्त्व आहे. हा विशिष्ट कोन साधून दक्षिणोत्तर अक्षांवर बांधलेल्या पिरॅमिडमध्ये विद्युत्‌चुंबकीय लहरी तयार होतात व आतील शवाचे संरक्षण करतात, त्यास कुजू देत नाहीत, हे संशोधनान्ती सिद्ध झाले. ‘पिरॅ’ म्हणजे उष्णता, ‘अ‍ॅमिड’ म्हणजे आत. शव चिरकाल टिकावे हाच उद्देश असल्याने ही रचना कार्यानुरूप ठरते. यापेक्षा ईजिप्शियन वास्तुशैलीची अनेक गुणवैशिष्ट्ये त्यांच्या मंदिररचनेत आढळतात. स्तंभ आणि तुळई रचनातंत्राचा भव्य प्रमाणात परंतु क्लिष्ट अवकाश-आविष्कार या मंदिरात दिसतो. कारनॅक येथील ‘टेंपल ऑफ ॲमन’ ह्या बाबतीत अभ्यसनीय आहे. भव्यतेची ओढ पूर्ण करण्यासाठी अतिविशाल आणि अतिसमीप केलेल्या स्तंभपंक्तींमुळे आतील अवकाशरचना भयचकित करणारी झाली आहे. या मंदिरामध्ये फक्त महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश होता. असे असताना अफाट मानवी  श्रम केवळ भव्यतेच्या लालसेपोटी खर्ची पडले. तरीदेखील प्रकाशयोजनेसाठी मध्यभागाची उंची वाढवून, त्याला जाळ्या बसवून, हवादेखील खेळवली गेली. हे ऊर्ध्व खिडकी अथवा अधिवातायन (क्लिअरस्टोरी विंडो) तंत्र पुढे  अनेक शैलींत वापरले गेले. स्तंभरचनेची भव्यता पृष्ठभागावर हायरोग्लिफिक लिपीचा वापर करून (म्हणजे चित्राकृत्या कोरून व रंगवून-अलंकरण करून) कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. स्तंभशीर्ष पपायरस आणि कमळ यांच्या आकारसौंदर्यावर आधारलेले आहे. ईजिप्शियन शैलीत जी वास्तुनिर्मिती झाली, तिचे प्रमाण फारच भव्य होते. त्यात अवकाश-नियोजनाचे भान कमी असले, तरी प्रत्यक्ष रचनाबांधणी करण्याचे कसब थक्क करून टाकणारे आहे. अबू सिंबेल, स्फिंक्सच्या आकाराचे शिल्प असलेले पूजागृह इ. शैलमंदिर-प्रकारांतदेखील दगडी भव्यता हा प्राथमिक गुण आढळतो. पिरॅमिडप्रमाणेच अधिवातायन, शंकुस्तंभ, हायरोग्लिफिक चित्रलिपी, ईजिप्ती गोपुर वा उत्तुंगद्वार (पायलॉन) ह्या आजपर्यंत सतत स्फूर्तिदायक ठरलेल्या वास्तुसंकल्पना ही या शैलीने जगाला दिलेली देणगी मानावी लागेल. या तंत्रांबरोबरच राजा आणि प्रजा यांच्यातील चैतन्यवृत्ती नंतरच्या भव्य प्रकल्पनिर्मितीस स्फूर्तिदायक ठरली.

मेसोपोटेमियन वास्तुकला

इराकमधील टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या खोऱ्यांत ही शैली विकसित झाली. लढवय्ये साम्राज्यवादी असलेल्या बॅबिलोनियन, अ‍ॅसिरियन आणि सुमेरियन लोकांनी मंदिरे, थडगी न बांधता राजवाडे बांधण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. लाकूड व दगड यांचा अभाव असल्याने या लोकांनी मातीच्या विटा ह्या प्रमुख बांधकाम-साहित्य म्हणून वापरल्या. त्यामुळे विटांचे विविध प्रकार, कमानी व चापछतरचना यांचा शोध त्यांनी लावला. त्यांचे राजवाडे नदीच्या पाण्यापासून संरक्षणार्थ उंच चौथऱ्यावर बांधले जात. चौथऱ्यांच्या उंचीवर जाण्यासाठी उतरणींचा उपयोग केला जाई. झिगुरात म्हणून ओळखली जाणारी त्यांची मंदिरे कृत्रिम पिरॅमिडाकृती टेकडी करून त्याच्या शिखरावर बांधली जात. टेकडीच्या सभोवती उतरणी असत. विविधरंगी विटांच्या अलंकरणाने सपाट भिंतींचे पृष्ठभाग सजविले जात. चौथऱ्याला अनेक पायऱ्या असत. त्यावर बगीचे केले जात. त्यांना ‘तरंगते बगीचे’ (हँगिंग गार्डन) म्हणत. वीटनिर्मिती व बांधकामक्षेत्रातील प्रगती, कमान व चापछतरचना, सपाट भिंतींचे रंगीत अलंकरण आणि तरंगते बगीचे ही या वास्तुशैलीची वैशिष्ट्ये चिरकालीन प्रभाव टाकणारी ठरली. खोरसाबाद येथील ‘पॅलेस ऑफ सारगॉन’ हा राजवाडा या वैशिष्ट्यांनी सजलेला आहे. याच काळात इराणमध्ये पर्शियन (इराणी) संस्कृती विकसित झाली. त्यांनी मात्र दगड हेच प्रमुख वास्तुमाध्यम वापरले. पर्सेपलिस येथील राजवाड्यातील शैलीदार प्रमाणबद्ध स्तंभरचना, अवकाशयोजनेतील सोपेपणा आणि शिल्पकलेतील प्रावीण्य यांमुळे पर्शियन वास्तुकलेला पुढे वेगळे वळण लाभले. ईजिप्शियन आणि मेसोपोटेमियन या दोन वास्तुशली अतिशय भिन्न मार्गांनी विकसित झालेल्या दिसतात. अनुक्रमे दगड आणि विटा या माध्यमांतील असंख्य बांधकामप्रयोग या काळात झाले. त्यामुळे पुढील संस्कृतींना मोठ्या प्रमाणात प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

ग्रीक वास्तुकला

आजतागायत प्रभाव पाडणारी ही प्राचीन वास्तुशैली असून तिचा मूलस्त्रोत इजीअन (पूर्व ग्रीक) संस्कृतीत सापडतो. क्रीट बेटावरील राजाने बांधलेल्या ‘पॅलेस ऑफ किंग’ या मिनोजच्या राजप्रासादच्या निर्मितीत या शैलीची बीजे आढळतात. डोरियन, आयोनियन आणि कॉरिंथियन टोळ्यांनी अथेन्स शहरात वास्तुनिर्मिती करून त्या बीजाचे अभिजात वृक्षात रूपांतर केले. स्वच्छ सूर्यप्रकाश आणि नितळ संगमरवराची मुबलकता या दोन गोष्टींचा प्रभाव या शैलीवर प्रामुख्याने पडला. त्याची परिणती बाह्य सहजीवनास पोषक अशा विविध वास्तू निर्माण करण्यात तर झालीच; परंतु वास्तुनियोजनात देखील बंदिस्तपणा न येता, इष्ट असा मोकळेपणा आपोआप आला आणि आकारसौंदर्याच्या अतिसूक्ष्म संकल्पना ग्रीकांच्या वास्तुघटकांत व शिल्पांत अभिव्यक्त होत गेल्या. प्रमाणभूततेची सूत्रे सुवर्णछेदाच्या (गोल्डन सेक्शन) रूपाने मांडली गेली. दृष्टिभ्रम नाहीसे करण्यासाठी ग्रीकांनी अनेक क्लृप्त्या योजल्या, त्यांपैकी वास्तूवरील लेखनपद्धतीत उंचावरील अक्षरे आकाराने मोठी करणे, जोत्याला किंचित बहिर्वक्र करणे, स्तंभास मध्यभागी किंचितसा फुगवटा देणे इ. क्लृप्त्या महत्त्वाच्या ठरल्या. ग्रीकांनी निर्माण केलेल्या डोरिक, आयोनिक व कॉरिंथियन या तीन प्रमुख स्तंभरचना आणि मंदिरवास्तुकल्पातील आकार व अवकाश यांचा समन्वय, स्तंभावलीची दर्शनी भागांवरील रचनात्मकता, तसेच शिल्पालंकृत रेखीव लयबद्धता इ. गोष्टींच्या योगदानामुळे ही शैली अभिजात (क्लासिक) ठरली. याव्यतिरिक्त रंगमंडलाची (अ‍ॅम्फिथिएटर) संकल्पना त्यांनीच प्रथम अंमलात आणली. डोरिक, आयोनिक व कॉरिंथियन या तीनही स्तंभरचनांत प्रमाण, आकार, अलंकरण यांच्या समन्वयाचे बदलते आविष्कार पाहावयास मिळतात. अक्रॉपलिस या टेकडीवर ग्रीक कलेचा वैविध्यपूर्ण आविष्कार तेथील प्रवेशदालने, मंदिरे यांद्वारे अभिव्यक्त होतो. पार्थनॉन या डोरिक शैलीतील मंदिररचनेत ग्रीक वास्तुशैलीची अनेक वैशिष्ट्ये व तंत्रे यांची ओळख होते. ग्रीकांनी स्तंभ आणि तुळई या तंत्रानेच प्रामुख्याने वास्तुनिर्मिती केली; परंतु ईजिप्शियन मंदिरांतील स्तंभावलींचा बोजडपणा व अवकाशातील क्लिष्टता त्यांनी टाळली. आखीव व रेखीव शिस्तीने उभारलेल्या ह्या स्तंभरचना एकंदर वास्तुसौंदर्याला पोषक ठरतात. मंदिरवास्तूंप्रमाणेच ग्रीकांनी रंगमंडले, बाजारपेठा, प्रवेशदालने, सभागृहे इ. बांधली. निवासी वास्तुकलेकडे मात्र त्यांनी काहीसे दुर्लक्ष केले. एकूण वास्तुनिर्मितीत सर्व दर्शनी भागांवर स्तंभावलींची योजना हे या शैलीचे खास गुणवैशिष्ट्य मानले जाते.

रोमन वास्तुकला

ग्रीकांनी निर्माण केलेली अभिजात वास्तुकलेची परंपरा रोमनांनी समर्थपणे पुढे नेली. राजकीय स्थैर्य, आर्थिक सुबत्ता, सुसंस्कृत सामाजिक जीवन, वास्तुतज्ञांची अलौकिक प्रतिभा आणि काँक्रीट या नव्या वास्तुसाहित्याचा शोध आणि उपयोग इ. घटकांचा रोमन वास्तुकलेच्या वैविध्यपूर्ण जडणघडणीत निर्णायक वाटा होता. स्तंभरचनेत तस्कन आणि संमिश्र (काँपोझिट) अशा दोन नव्या प्रकारांची भर त्यांनी घातली. संपन्न सामाजिक जीवनामुळे मंदिरे, क्रीडागारे, सार्वजनिकरोमन स्नानगृहे (थर्मी), जलवाहिनी (अ‍ॅक्विडक्ट), विजयकमानी, रंगमंडले, घरे, न्यायगृहे (बॅसिलिका) अशा विविध प्रकारच्या वास्तुरचना त्यांनी केल्या. काँक्रीटच्या शोधामुळे अतिभव्य छतकमानी (व्हॉल्ट) बांधण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. त्याचबरोबर  भित्तिरचनेतही अनेक तपशीलवार प्रयोग त्यांनी यशस्वी केले. त्यांची शैली कमानीयुक्त, तसेच स्तंभ-तुळई या रचनातंत्राचा संमिश्र आविष्कार मानला जातो. निवासी वास्तुकलेत अनेक मजली वेश्मगृहे, सदनिका, राजप्रासाद असे विविध प्रकार त्यांनी समूहगृह प्रकल्पांत पाडले. पँथीऑन मंदिर, ‘फोरम ऑफ ट्रेजन’ हा सार्वजनिक सभाचौक, कॉलॉसिअम, कॅराकॅलाचे स्नानगृह (थर्मी) या वास्तुरचना रोमन तंत्रविष्कारांचे अद्‌भुत नमुने म्हणून अभ्यासल्या जातात. रोमन वास्तुकलेचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यानुरूप भव्य अवकाशनिर्मिती करताना तत्कालीन वास्तुकारांनी दाखविलेली रचनातंत्रातील सुबद्धता. ते केवळ वास्तुतज्ञ नव्हते, तर अभियांत्रिकी स्वरूपाची आव्हाने त्यांनी स्वीकारून पँथीऑन, कॉलॉसिअम, थर्मी यांसारख्या वास्तूंची भव्यता कार्यानुरूप नियोजन-तंत्राने अस्तित्वात आणली.

ख्रिस्ती वास्तुकला

रोमन साम्राज्याचा ऱ्हास झाल्यानंतर ख्रिस्ती धर्मसत्ता केंद्रस्थानी आली. इ. स. ३१३ मध्ये कॉन्स्टंटीन राजाने ख्रिस्ती ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर वास्तुनिर्मिति-क्षेत्राला चालना मिळाली आणि  चर्च या वास्तुप्रकाराचा उगम झाला. आर्थिक पाठबळ नसल्याने सुरुवातीला रोमन बॅसिलिकांचाच चर्च म्हणून उपयोग करण्यात आला. परंतु पुढे कार्यानुरूपतेनुसार स्वतंत्र चर्चवास्तुनिर्मितीचे प्रयत्न झाले. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोकळे प्रांगण, मुख्य प्रवेशदालन, सभामंडप व त्याच्या दुतर्फा पाखा (आइल) व सर्वांत शेवटी क्रूसाच्या आकाराची काटकोनात पुढे आलेली दालने (ट्रान्सेप्ट), त्यापलीकडे वर्तुळाकार वा बहुकोनी देवगृह (अ‍ॅप्स) असा चर्चचा वास्तुकल्प असे. छताधारासाठी लाकडी कैची उंचावून बाजूने अधिवातायनाची हवाप्रकाशासाठी योजना असे. भिंतीवर धार्मिक चित्रांचे अलंकरण असे. चर्चवास्तूचा मूलभूत रचनाकल्प आणि लाकडी कैच्यांचा उपयोग हीच या शैलीची तंत्रदृष्ट्या वैशिष्ट्ये होत. टिकाऊ वास्तुसाहित्याच्या अभावामुळे  या शैलीतील बऱ्याच वास्तू अल्पजीवी ठरल्या.

बायझंटिन वास्तुकला

(इ. स. सु. २३० ते १४३५). बायझंटिन कला कॉन्स्टँटिनोपल (सध्याचे इस्तंबूल) या नव्या राजधानीत बहरली. रोमन शैलीपासून स्फूर्ती घेऊन थोड्याच कालावधीत या शैलीने आपल्या वेगळेपणाचा ठसा वास्तुनिर्मितीवर उमटविला. या प्रक्रियेत पूर्वेकडील मुस्लिम शैलीचा प्रभावदेखील अंतर्भूत होता. चौरस दालनावर  घुमट बांधण्याचे तंत्र या वास्तुकारांनी त्रिकोणी अर्धघुमट (पेन्डेंटिव्ह) वापरून पूर्णत्वास नेले. यासाठी पडभिंतीही वापरल्या. ही तंत्रकिमया अलौकिक होती. ५३२ मध्ये अँथीमिअस आणि इझिडोरस या वास्तुकारांनी बांधलेली ‘सांता सोफिया’ (५३२ - ५३७) ही चर्चवास्तू बायझंटिन वास्तुतंत्राचा उत्कृष्ट आविष्कार मानली जाते. व्हेनिस येथील ‘सेंट मार्क चर्च’ ही याच काळातील कलाकृती होय. अतिभव्य अवकाशनिर्मिती केल्यावर अंतर्गत अलंकरण करणे क्रमप्राप्त होते. या वास्तुकारांनी चर्चच्या भिंतींवर, कमानींवर व घुमटाच्या अंतर्भागांत रंगीत संगमरवरांचे व काचेचे तुकडे जडवून  कुटि्‌टमचित्रण (मोझेइक) तंत्राद्वारे सजावट केली. वास्तूमध्ये भिन्न पातळ्यांवर विविध आकारांच्या खिडक्यांचे नियोजन केल्याने आतील भव्यता प्रकाशमान होत असे. दगड आणि विटा यांचा संमिश्र उपयोग बायझंटिन वास्तुकारांनी विविध वास्तुघटकांसाठी केला. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर आपली वेगळी शैली प्रस्थापित करण्याचे खडतर कार्य बायझंटिन वास्तुकारांनी समर्थपणे पार पाडले. त्यांचे वेगळी वाट निर्माण करण्याचे हे सृजनकार्य नव्या बांधणीतंत्रामुळे जास्त सुकर झाले.

रोमनेस्क वास्तुकला

(सु. अकरावे ते तेरावे शतक). सु. ५०० ते १००० हा काळ यूरोपमध्ये अंधारयुग (डार्क एज) म्हणून गणला जातो. राजकीय अस्थैर्यामुळे कोणत्याही क्षेत्रात भरीव कार्य या काळात झाले नाही. परंतु ख्रिस्ती धर्माच्या संकल्पना मूळ धरून होत्या. अकराव्या शतकापासून इटली, फ्रान्स, इंग्लंड, स्पेन, जर्मनी या देशांत पुन्हा नव्या जोमाने चर्चवास्तू निर्माण होऊ लागल्या. धर्मसत्ता प्रबळ होत गेली; त्यामुळे चर्च, कॅथीड्रल यांची निर्मिती हेच वास्तुनिर्मितीचे प्रमुख क्षेत्र बनले. धर्मसत्तेचे प्राबल्य व्यक्त करण्यासाठी चर्चवास्तूतील विविध घटक आकाशात उंच झेपावू लागले. रोमन वास्तुपरंपरेच्या प्रभावाखालील चर्च रचनाकल्पामध्ये क्रूसाचा पूर्ण आकार दिसू लागला. दर्शनी भागावर मनोऱ्याची जोडी अनिवार्य झाली. स्तंभ आणि कमान या आकारांची पुनरुक्ती करून बाह्यांग सजविले गेले. अंतर्भागात मध्य सभागृहावर प्रथमच छतरचनेसाठी चापकमानीचा तंत्र म्हणून वापर करण्यात आला. वास्तूंचे ऊर्ध्वगामीत्व अनिवार्य झाल्यामुळे मनोऱ्यांचे विविध प्रकार वास्तु-रूपायनात समाविष्ट करण्यात आले. इटलीतील पीसाचे कॅथीड्रल व त्याचा झुकता मनोरा हे या शैलीचे एक उत्कृष्ट उदाहरण मानण्यात येते.

गॉथिक वास्तुकला

(सु. ११५०-१४००). रोमनेस्क काळातील सर्व संकल्पनांना परिपूर्णता या काळात लाभली. फ्रान्समध्ये गॉथिक शैलीच्या वास्तू अधिक प्रकर्षाने निर्माण झाल्या. कॅथीड्रलच्या मध्य दालनाची उंची खूप वाढवल्यानंतर, छतभार पेलण्यासाठी कमानधीरा वापरण्याचे तंत्र याच काळात विकसित झाले. चापकमानीच्या छतरचनेचा विकास, फासळ्यांची लयबद्ध परंतु तंत्रशुद्ध गुंफण, दर्शनी भागावरील भव्य चक्राकार खिडकी (रोझ विंडो) इ. वैशिष्ट्ये निर्माण झाली. तसेच कमानधीऱ्यांमुळे दोघांमधली पूर्ण जागा खिडक्यांनी घेतली. मुख्य स्तंभपंक्तिंना ऊर्ध्वगामी पोषक असे पृष्ठउठाव देण्यात आले. त्यामुळे चर्चचा अंतर्भाग अतिभव्य आणि प्रकाशमान भासू लागला. फ्रान्सनंतर इंग्लंडमध्ये या शैलीचे नितांतसुंदर परिष्कृत आविष्कार निर्माण झाले. अंतर्बाह्य ऊर्ध्वगामीत्वाचा परिपोष करणारे वास्तुघटक, प्रमाणातील भव्यता, तंत्रातील परिपूर्णता या वैशिष्ट्यांमुळे गॉथिक कॅथीड्रल्स ही वास्तुकलेतील अद्‌‌‌भुत  निर्मिती मानण्यात येते. नोत्रदाम, पॅरिस; सॅलिस्बरी कॅथीड्रल, ग्लुसेस्टर कॅथीड्रल, इंग्लंड ही या शैलीची काही उत्कृष्ट उदाहरणे मानण्यात येतात.

प्रबोधनकालीन वास्तुकला

(चौदावे ते सोळावे शतक). गॉथिक शैली इटलीमध्ये रुजली नाही. मात्र पंधराव्या शतकातील प्रबोधनशैलीचा उगम इटलीतील फ्लॉरेन्स येथील कॅथीड्रलवरील घुमटरचनेपासून, ब्रूनेल्लेस्की (१३७७-१४४६) या वास्तुतज्ञाच्या कारकीर्दीपासून सुरू झाला, असे मानले जाते. कलाकार म्हणून एखाद्या व्यक्तिमत्वाला मान्यता मिळविण्याची ईर्षा निर्माण करणारी सामाजिक परिस्थिती या काळात निर्माण झाली. चित्र, शिल्प, वास्तू, साहित्य आदी क्षेत्रांत नवे वैचारिक मंथन घडत होते. रोमन वास्तुशैलीचा नव्याने अन्वयार्थ लावण्याच्या प्रयत्नात या शैलीचा उगम झाला. फ्लॉरेन्समध्ये ब्रूनेल्लेस्की, मायकेलोत्सो, आल्बेर्ती या वास्तुशिल्पज्ञांनी रोमन रचनातंत्राला, आकारांना नव्या प्रमाणसाच्यात बसवून नवे वास्तु-रूपायन रूढ करण्याचे प्रयत्न केले. या प्रक्रियेत अलंकरणाला गौण महत्व दिले जाऊन स्तंभ, कमान आणि भिंत यांची काहीशी सपाटपृष्ठी गुंफण साधली गेली. मायकेलोत्सोच्या ‘पालाइझो मेदीची रिकार्डी’ या प्रासादवास्तूमध्ये या अभिनव गुंफणीचा आणि नव्या प्रमाणभूततेचा आविष्कार पाहावयास मिळतो. रोममध्ये ब्रामांते, बेर्नीनी, मायकेलअँजेलो, आल्बेर्ती यांनी याच वैचारिक परिवर्तनाचा धागा पकडून वास्तुनिर्मिती केली. वास्तुनियोजनात समअक्षत्व, घटकांचा समतोल, सुसूत्रता, शिस्तबद्धता इ. औपचारिक आकार-संकल्पना रूढ होऊ लागल्या. भौमितिक आकारांचे प्राबल्य आणि आकृतिबंधातील सघन घटकांची रेखीव, समतोल गुंफण हे महत्त्वाचे नियम होऊ लागले. परंतु रोमन वास्तुतत्वांचा पाठपुरावा फक्त दर्शनी भागांवर अलंकरणासाठी केला गेला. व्हेनिसमधील ‘व्हिला रोतोंदा’ या आंद्रेआ पाललाद्योच्या वास्तुरचनेत चौरसाकृती अवकाशाला चारही बाजूंनी अभिजात शैलीतील दालनांची जोड देऊन नव्या शैलीचे आखीवरेखीव स्वरूप स्पष्ट केले. ब्रामांते आणि बेर्नीनी यांनी रोममधील सेंट पीटरच्या अतिविशाल वास्तुप्रकल्पात हेच अभिजात शैलीतील सांकेतिक भौमितिक रचनातत्त्व सिद्ध केले आहे. काही काळानंतर हे वैचारिक वादळ यूरोपभर पसरत गेले. सर किस्टोफर रेन (१६३२ - १७२३) याचे लंडनमधील ‘सेंट पॉल्स कॅथीड्रल’ तसेच  इनिगो जोन्सचा (१५७३-१६५२) ‘व्हाइट हॉल’ यांच्या रचना या नव्या दृष्टिकोनाशी सुसंगतच आढळतात. फ्रान्समध्ये मात्र गॉथिक शैलीचे विघटन होऊन प्रबोधनकालीन तत्त्वांचा स्वीकार होण्यास वेळ लागला. कारण गॉथिक शैलीची मुळे तिथे खोलवर रुजली होती. तरीपण गॉथिक आणि प्रबोधनकालीन शैलींचे संमिश्र आविष्कार तेथील ‘शातो’ च्या (फ्रेंच खेड्यांतील मोठ्या हवेल्या) बांधणीत दिसून येतात. प्रबोधनकालीन वास्तुतज्ञांनी प्राचीन रोमन कलेचा अभ्यास केला आणि त्याद्वारे नवीन आकारसंहिता तयार केली. बागा, चौक, नागरी गृहसमूह, क्रिडांगणे या नगरघटकांच्या रचनेत एकात्मता, सुसूत्रता आणण्याचे प्रयत्न झाले. शिखरावरील घुमटाची उंची पिंपाकृती स्तंभयुक्त वर्तुळाकार भिंत उभारून वाढविली जाई. घुमट त्रिपदरी करून त्याचे अंतर्बाह्य सौंदर्य वाढविले जाई. घुमटाखालील भिंतीत झरोके, खिडक्या, गवाक्ष काढून प्रकाशयोजना नेत्रदीपक केली जाई. टोकेरी कमानीऐवजी अर्धवर्तुळाकार कमानी, फासळ्यांच्या चापछताऐवजी अर्धवर्तुळाकार चापकमानींचा वापर, लाकडावर सोनेरी गिलावा किंवा मुलामा ही काही लक्षणीय वास्तुवैशिष्ट्ये होत. भिंती बांधताना मोठ्या आयताकृती दगडांचा वापर केला जाई. शिरावरील कंगणीचा आकार हेतुपूर्वक मोठा ठेवून आडव्या रेषात्मकतेचा आभास निर्माण केला जाई.

यानंतरच्या  बरोक कलेच्या (सतरावे शतक) व  रोकोको कलेच्या (अठरावे शतक) कालखंडांत अलंकरणाचा अतिरेक वास्तूच्या अंतर्बाह्य पृष्ठावर केला गेला. सर्वांगातून आकारांचे सळसळते चैतन्य निर्माण करण्याकडे वास्ततज्ञांचा भर होता. वर्तुळाकार शिखराण्डाभोवती मित्तिस्तंभ आणि पडभिंती यांचा नाजुक वापर केला जाई. प्रासादातील प्रांगणात भव्य जिने (ग्रँड स्टेअरकेस), उद्याने, लघुस्तंभपंक्ती आणि पुतळे यांचा वापर केला जात असे. आंद्रे ल नोत्र या स्थलशिल्पकाराने या काळात व्हर्याय, व्हॉक्स इ. ठिकाणी दुतर्फा वृक्षराजींचे राजपथ, हिरवळ, सरोवरे, कुंपणे, ताटवे, शिल्पे यांची गुंफण करून वास्तुसौंदर्याला उठाव दिला.

या काळातील वास्तुतज्ञ इतर संलग्न कलाक्षेत्रांतदेखील कार्यरत असल्याने ते नेत्रसुखद दृश्यपरिणाम कसा साधला जाईल, याकडे बारकाईने लक्ष देत असत. थोडक्यात, प्रबोधनकालीन, बरोक व रोकोको या शैलींना रोमन वास्तुकलेचा अन्वयार्थ वेगवेगळ्या प्रकारे लावला. रोमन वास्तुशैलीच्या घटकांचा वापर मर्यादित स्वरूपात करून नवशैली प्रस्थापित केली. ‘व्हीला रोतोंदा’, ‘व्हाइट हॉल पॅलेस’, ‘पालाझ्झो रिकार्डी’ या वास्तूंच्या निर्मितीतून भावी काळातील आधुनिक वास्तुकलेच्या संकल्पनांची दिशा सूचित होते.

आधुनिक वास्तुकला

आधुनिक वास्तुशैलीचा उगम औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक, तांत्रिक, वैज्ञानिक परिवर्तनातून झाला आहे. साधारणपणे १८५० नंतर हे परिवर्तन घडू लागले आणि विसाव्या शतकाच्या सुरुवातीस या शैलीला मूर्त स्वरूप येऊ लागले. नवीन बांधकाम-साहित्य, तंत्र आणि वास्तुप्रकार या तीन मूलभूत गोष्टी आधुनिक वास्तुशैलीच्या निर्मितीत निर्णायक ठरल्या. वास्तूच्या बांधकामात वेग, यांत्रिक कुशलता आणि कार्यानुरूपता आली. अवकाशीय गरजेच्या संकल्पना देखील आर्थिक आणि तांत्रिक परिमाणांनुसार संकुचित झाल्या. अलंकरणाला पूर्णपणे फाटा दिला गेला. भौमितिक आकारांची उपयुक्तता जोपासली गेली. अवकाशीय गरज पडताळून पाहण्यात आली. क्षितिजसमांतर, ऊर्ध्वगामी आकारघटक; पृष्ठभाग; भरीव, पोकळ सघनता; त्यांचे आकृतिबंधातील रूपायन, उपयुक्तता आदी घटक आधुनिक शैलीचे निकष बनले. अमेरिकेत  लूइस सलिव्हनच्या (१८५६-१९२४) बहुमजली गगनचुंबी इमारती, तसेच  फ्रँक लॉइड राइटची (१८६९-१९५९) निसर्गाशी नाते सांगणारी, अवकाशात आकारसौंदर्य निर्माण करणारी वास्तुशैली ही वैशिष्ट्ये स्थिरावली. यूरोपमध्ये आधुनिक कलाचळवळीने मूळ धरले व लवकरच ती सर्वत्र प्रस्थापितही झाली. आंतोन्यो गॉदी (१८५२-१९२६) या स्पॅनिश वास्तुशिल्पज्ञाने आधुनिक वास्तुतंत्र-साधनांचा वापर करून चमत्कृतिपूर्ण अभिनव वास्तु-आकारनिर्मिती केली. एरिक मेंडेलसनने ‘आइन्स्टाइन ऑब्झर्व्हेटरी’ सारख्या वास्तुप्रकल्पाद्वारे काँक्रीटमधील चैतन्याकारांचा शोध घेतला. मीएस व्हान डेर रोअने आधी जर्मनीत व मग अमेरिकेत पोलाद आणि काच या साहित्याचा उपयोग करून अतिशय तरल  अवकाशीय वास्तुरचना केल्या. वॉल्टर ग्रेपिअसने काँक्रीटच्या शक्तीचा पुरेपूर वापर वास्तुनिर्मितीत करून घेतला. ल कॉर्ब्यूझेने घनवादी चित्रसंकल्पना वास्तुकलेत आणल्या. ही पिढी आधुनिक वास्तुकलेची संस्थापक प्रवर्तक मानली जाते. १९५० पर्यंत आतील अनेकांनी क्रांतिकारक वास्तुशास्त्रीय तत्त्वज्ञान मांडले आणि त्यानुसार वास्तुनिर्मितीही केली. त्यापासून स्फूर्ती घेऊन १९५० ते ७० या काळात वास्तुकारांची आंतरराष्ट्रीय कीर्तीची दुसरी पिढी आधुनिक वास्तुशैली समृद्ध करीत होती. त्यांत ओस्कार नीमाइअर, फिलीप जॉन्सन, एरो सारिनेन, प्येर लूईजी नेर्वी, मिनोरू यामासाकी, लुईस कान, पॉल रूडॉल्फ,  आल्व्हार आल्‌तॉ, आय्. एम्. पेयी, केन्झो तँग, स्किडमोर-ओविंग मेरिल इ. वास्तुतज्ञांचा प्रामुख्याने समावेश होतो. या सर्वांच्या वास्तूंनी आधुनिक शैलीला स्थैर्य व प्रतिष्ठा दिली. १९६६ मध्ये रॉबर्ट व्हेंतुरी या वास्तुतज्ञाने आधुनिक वास्तुकलेला अलंकृत करणारी वैचारिक चळवळ सुरू केली. त्यांत चार्ल्स विलार्ड मूर, रिचर्ड मेयर, जेम्स स्टर्लिंग, जेम्स गोवन, ऑल्डो रोसी, मायकेल ग्रेव्ह्‌ज, इजेमन, रॉजर्स, फ्रेइ ऑटो, आराटो इझोझाकी असे प्रतिभावंत वास्तुतज्ञ सामील झाले आणि आधुनिकोत्तर वा आंतरराष्ट्रीय वास्तुशैलीचा (पोस्ट मॉडर्निझम) उगम झाला. केवळ भौमितिक रुक्ष वास्तुदर्शनापेक्षा त्यात रंग, चित्र, शिल्प या माध्यमांसमान दृश्यमानता आणण्याचे प्रयत्न या वास्तुतज्ञांनी केले. त्यातही अनेक मतप्रवाह, वाद निर्माण झाले. या शैलीचा सु. शंभर वर्षांचा प्रवास गेल्या दहा हजार वर्षांच्या वास्तुकलेच्या प्रवासापेक्षा वेगवान गतीने झाला, असे मानावे लागते. संगणकाच्या साहाय्याने आज प्रचंड माहिती साठविण्याचे साधन उपलब्ध झाले आहे, त्याचाही उपयोग या क्षेत्रात वाढत्या प्रमाणात होत आहे. विज्ञान आणि तंत्रविज्ञा क्षेत्रात आज नित्य नवे प्रयोग होत आहेत, त्याचेही पडसाद अत्याधुनिक वास्तूमध्ये उमटत आहेत.

पौर्वात्य वास्तुकला

अतिपूर्वेकडील वास्तुकला

ब्रह्मदेश, जावा, चीन आणि जपान या देशांतील वास्तुनिर्मितीचा यात समावेश होतो. बौद्ध धर्माच्या प्रसारामुळे ब्रह्मदेश आणि जावा येथे स्तूपासमान परंतु मंदिराच्या शिखराप्रमाणे  पॅगोडांची निर्मिती झाली. तांत्रिक यंत्रांवर आधारलेला रचनाकल्प काही मंदिरांच्या निर्मितीत आढळतो. मध्य जावा येथील बोरोबूदूर स्तूप ही आठव्या शतकातील उत्कृष्ट वास्तुनिर्मिती आहे. हा बौद्ध स्तूप भारतीय संस्कृतीचा मनोरम आविष्कार मानला जातो.

ओसाका किल्ला, जपान (१५८७)ओसाका किल्ला, जपान (१५८७)चीनची प्राचीन संस्कृती इ. स. पू. १००० वर्षांपासून तरी अस्तित्वात होते; परंतु सोळाव्या शतकाच्या पूर्वीच्या वास्तुकलेचे अवशेष दुर्मिळ आहेत. प्रसिद्ध चीनची भिंत इ. स. पू. २१४ मध्ये संरक्षणाच्या उद्देशाने बांधली गेली. हान वंशाच्या काळात (इ. स. पू. २०२ ते इ. स. २२०) चिनी वास्तुकला बहरास आली. या काळातील वास्तुनिर्मितीत भव्य प्रांगणाभोवती राजवाडे आणि देवळे यांची रचना असे. लाकूड आणि लाखेचे जडावकाम; वास्तु-सजावटीत लाल, काळा, सोनेरी रंगांचे मिलाफ; एकावर एक विसावलेल्या क्लिष्ट बांधणीच्या स्तंभनासिका, त्यांवरील बाजूला चढती टोके असलेली कौलारू छपरे आणि वर्तुळाकार भव्य लाकडी लाल रंगाचे स्तंभ असे या वास्तूंच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन करता येईल. चिनी देवळे ही बौद्ध स्तूप आणि कन्फ्यूशस मंदिरे अशा दोन प्रकारची असत. बीजिंगचे बुद्धमंदिर, राजवाडा, तसेच जपानमधील नारा येथील होर्यूजी मंदिर, तसेच सर्वांत मोठे तोडाइजी मंदिर; होर्यूजी मंदिर : यूमदोनो (स्वप्नदालन) ; नारा, जपान, आठवे शतक.होर्यूजी मंदिर : यूमदोनो (स्वप्नदालन) ; नारा, जपान, आठवे शतक.ओसाकाचा टेमोजी पॅगोडा, क्योटोचा भिकाडी राजप्रासाद ही सर्व पौर्वात्य शैलीची उल्लेखनीय वास्तुनिर्मिती होय. जपानमध्ये सहाव्या शतकात चीनमधून बौद्ध धर्माचे आगमन झाल्यावर चिनी अनुकरणाने भव्य अशी मंदिर-वास्तुकला विकसित झाली. जपानी वास्तुकला खऱ्या अर्थाने मोहरली ती गृहवास्तूंमध्ये. या निवासांत वापरल्या जाणाऱ्या सरकत्या जाळ्या हे खास वैशिष्ट्य म्हणता येईल. जपानमध्ये काष्ठ प्रवेशद्वार हे जास्त प्रमाणात रूढ आहे. त्याची रचना स्तूपाच्या तोरणावर आधारलेली आहे.

आधुनिक काळात मात्र जपानने खूप मोठी मजल मारली. केन्झो तँग (१९१३- ) या प्रतिभाशाली वास्तुशिल्पज्ञाने सलोह काँक्रीट या साधनाद्वारे दर्जेदार वास्तुनिर्मिती केली. साधेपणा, आकारातील सुस्पष्टता, निसर्गाशी तादात्म्य पावण्याची रचनात्मक धडपड आणि स्थलशिल्पाचा घनिष्ठ संबंध ही जपानी शैलीची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

भारतीय वास्तुकला

भारतीय वास्तुकलेला सु. ५,००० वर्षांची अतिशय प्रदीर्घ, संमिश्र परंपरा आहे. सिंधू संस्कृतीतील  मोहें-जो-दडो, हडप्पा, कालिबंगा, लोथल आदी ठिकाणांच्या उत्खननातून तत्कालीन सामाजिक जीवनाची कल्पना येते. नंतरच्या वैदिक संस्कृतीत काष्ठशिल्पावर भर दिसतो. कुडाच्या भिंती, काष्ठ कुंपणे, तोरण अशा काष्ठघटकांचा पुढे बौद्ध वास्तुकलेवर प्रभाव पडला व त्यांचे दगडामध्ये रूपांतर केले गेले. बौद्ध धर्माचा प्रसार झाला, तेव्हा भारतात अनेक ठिकाणी  स्तूप, विहार, चैत्यगृहे बांधली गेली. शैल वास्तुकलेचा विकास हिंदू धर्माच्या उदयानंतर थंडावला. चौथ्या शतकापासून हिंदू मंदिर-वास्तुकला निर्माण होऊ लागली. स्तंभ तुळई, झुकाव, भिंती अशा तंत्राने या कलाप्रकाराचा विकास झाला. सुरुवातीला फक्त गर्भगृहे असलेली मंदिरे कालौघात विस्तारली जाऊन अंतराळ, सभामंडप, अर्धमंडप, त्यावर शिखर असे मंदिर-घटक वाढत गेले. प्राचीन संस्कृत ग्रंथांतील वर्णनांनुसार ‘नागर’ (उत्तर भारतीय वा इंडो-आर्यन), ‘द्रविड’ (दक्षिण भारतीय) व ‘वेसर’ (मध्य भारतीय किंवा चालुक्य शैली) असे तीन मंदिर रचनेचे प्रकार निर्माण झाले. भुवनेश्वर, कोनारक आणि खजुराहो येथे नागर शैलीतील उत्कृष्ट निर्मितीचा आविष्कार झाला. दिलवाडा, रणकपूर येथे जैन मंदिर शैली प्रगत झाली. चालुक्य राजवटीत वेसर शैली प्रगत झाली. पट्‌टदकल, ऐहोळे, बादामी, बेलूर, हळेबीड येथे या शैलीतील मंदिरे विकसित झाली. तारांकित विधान असलेली मंदिरे शिल्पकलेने सजविलेली आहेत. द्रविड वास्तुशिल्पशैली महाबलीपुर येथील एकाश्मातून खोदलेल्या मंदिरांतून (रथ नावाने प्रसिद्ध) उत्क्रांत झाली. कांचीपुरम्, मदुराई, वेरूळ, श्रीरंगम् येथे दक्षिणी शैलीचा विकास झालेला दिसतो. गोपुर हा या शैलीचा महत्त्वाचा वास्तुघटक होता.

बाराव्या शतकापासून इस्लामी वास्तुकलेचा उगम भारतात झाला. मशिदी, राजवाडे,  मीनार असे प्रकार त्यांनी निर्माण केले. कमान आणि  घुमट हे इस्लामी घटक त्यांनी सातत्याने उपयोगात आणले. प्रथम दिल्ली व नंतर विजापूर, अहमदाबाद, मांडू, गुलबर्गा येथेही इस्लामी शैलीतील प्रादेशिक उपप्रवाह निर्माण झाले. हुमायूनच्या कारकीर्दीत हिंदु-मोगल शैली अस्तित्वात आली. अकबराने फत्तेपुर सीक्री ही नवी राजधानी वसविली. तेथील वास्तुकलेत हिंदू आणि मोगल कलाप्रतीकांचा व तंत्रांचा मिलाफ झालेला दिसतो. आग्रा येथील लाल किल्लादेखील अकबराने बांधला. शाहजहानने ताजमहाल ही अलौकिक वास्तू आणि दिल्लीला लाल किल्ला बांधला. मोगल वास्तुशैलीचा परमोच्च आविष्कार ताजमहालाच्या निर्मितीत आढळतो.

‘व्हिक्टोरिया टर्मिनस’,  मुंबई (१७८८) – एफ्. डब्ल्यू. स्टीव्हन्स – इटालियन गॉथिक वास्तुशैलीचा  नमुना.‘व्हिक्टोरिया टर्मिनस’, मुंबई (१७८८) – एफ्. डब्ल्यू. स्टीव्हन्स – इटालियन गॉथिक वास्तुशैलीचा नमुना.ब्रिटिशांनी १८०० ते १९४७ या काळात अभिजात पाश्चिमात्य वास्तुशैलीवर आधारलेल्या अनेक इमारती, कार्यालये, रेल्वेस्थानके, राजवाडे इ. बांधले. नवी दिल्ली या शहराची नगररचना केली. मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता आदी प्रमुख शहरांत या अभिजात शैलीतील वास्तू आजही पाहावयास मिळतात.

स्वतंत्र भारतात ल कॉर्ब्यूझ्येने  चंडीगढची निर्मिती करून आधुनिक वास्तुकलेची  ओळख भारताला करून दिली. स्टोन, कान आदी विख्यात वास्तुतज्ञांनीही भारतात वास्तू बांधल्या. या प्रभावाखाली चार्ल्स कोरिया, अच्युत कानविंदे, बाळकृष्ण दोशी, उत्तम जैन आदी प्रतिभावंत वास्तुकारांची पिढी निर्माण झाली. त्यांनी आधुनिक शैलीत भारतीय वास्तुपरंपरा जोपासली.

महाराष्ट्रातील वास्तुकला

कार्ले, भाजे, बेडसे, नासिक, कान्हेरी, अजिंठा, वेरूळ, पितळखोरा येथील बौद्ध लेणी; वेरूळ, घारापुरी येथील हिंदू लेणी व धाराशीव येथील जैन लेणी ही शैल वास्तुकलेची समर्थ परंपरा महाराष्ट्रात आहे. अकराव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंत चालुक्य व यादव यांच्या कारकीर्दीत विपुल मंदिरनिर्मिती झाली. प्रामुख्याने यादवकालीन हेमाडपंती शैली महाराष्ट्रात विकसित झाली. सिन्नर, नासिक, त्र्यंबकेश्वर, कोल्हापूर, वाई, मराठवाडा, विदर्भ या भागांत ही मंदिरे बांधली गेली. शिवकाळात  किल्ले आणि जलदुर्ग बांधले गेले. पेशवाईत विविध आकारांचे वाडे पुणे, नासिक, कोल्हापूर येथे व इतरत्र बांधले गेले. ब्रिटिश अमदानीत मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर आदी प्रमुख शहरांत विविध शासकीय, सार्वजनिक व निवासी वास्तू प्रबोधन आणि गॉथिक शैलीं बांधल्या गेल्या. स्वातंत्र्यानंतर मोठ्या शहरांत आधुनिक तंत्राने वास्तूनिर्मिती झाली. मुंबई हे आधुनिक वास्तुनिर्मितीचे प्रमुख केंद्र आजही गणले जाते. चार्ल्स कोरिया, जैन, काद्री, कुडीयनवाला, पटेल, प्रेमनाथ इ. विद्यमान अग्रेसर वास्तुतज्ञ आहेत. इतर शहरांतही कलात्मक वास्तुनिर्मिती होण्यास पोषक असे वातावरण निर्माण होत आहे.

लेखक : दीक्षित विजय

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/10/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate