অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वास्तुदर्शनालेख

वास्तुदर्शनालेख

(आर्किटेक्चरल रेंडरिंग). संकल्पित वास्तूची रेखाटने, आराखडे काढून त्यांच्याद्वारे वास्तुशास्त्रीय संकल्पना अधिकाधिक नेत्रसुखद आणि सुस्पष्ट करण्याचे तंत्र. वास्तुनिर्मितीची प्रक्रिया रेखाटनाद्वारे सुरू होते आणि संबंधितांच्या सल्लामसलतीद्वारे वास्तुतज्ञ नियोजित वास्तूचा आराखडा यांतील एखाद्या रेखाटनाद्वारे नक्की करून मग प्रमाणबद्ध आराखडे करू लागतो. स्थानिक नगरपालिका, महापालिका  यांसारख्या संस्थांकडून त्या नकाशास मंजुरी  घ्यावी लागते. मंजूर नकाशे पुन्हा विस्तारित प्रमाणात काढले जातात. मंजुरीसाठीचे नकाशे १ : १०० या प्रमाणात असतात, तर प्रत्यक्ष कामकाजासाठीचे नकाशे १ : ५० / १ : २० या प्रमाणात असतात. जाहिरातीसाठी किंवा सर्व सामान्य जनांसाठी वास्तुदर्शनालेखित नकाशे काढले जातात. त्यांचे प्रमाण अभिन्यासासाठी (लेआउट) १ : ५००; वास्तुविधानासाठी (प्लॅन) १ : ५०; दर्शन-छेदासाठी १ : ५० असे सर्वसाधारण असते. परंतु यासाठी प्रस्थापित नियम नाही. वास्तूच्या व्याप्तीवर किंवा प्रकल्पाच्या विस्तारावर वास्तुतज्ञ हे प्रमाण ठरवितो. यथादर्शनासाठी प्रमाण नसते, तर वास्तुतज्ञ कोणत्या कोनातून वास्तुदर्शन सुखद दिसते, हे ठरवून संकल्पित यथादर्शनपर रेखाचित्र (पर्स्पेक्टिव्ह ड्रॉइंग) काढतो.  चंडिगढ (१९५१-५६) – वास्तुदर्शनालेख- ल कॉर्ब्यूझ्ये.वास्तुदर्शनलेखासाठी यथादर्शनपर रेखाटन हे साधारणपणे सर्वत्र निवडले जाते. थोडक्यात, वास्तुदर्शनालेख म्हणजे कोणत्याही वास्तुशास्त्रीय रेखाटनाची किंवा आराखड्याची करण्यात येणारी सजावट. सर्वसामान्य लोकांना आराखड्यातील गोष्टी जास्तीत जास्त स्पष्टपणे व सहजपणे समजण्यासाठी याचा उपयोग वास्तुतज्ञ करतो. त्यामुळे कच्च्या रेखाटनापासून जो जो नकाशा, संकल्पना- रेखाटन दुसऱ्याला दाखवावे लागते; त्या आराखड्यात वास्तुतज्ञ दर्शनालेखतंत्राचा अवलंब करतो. तांत्रिक नकाशात (वर्किंग ड्रॉइंग) मात्र या तंत्राचा अवलंब केला जात नाही. वास्तूच्या मालकासाठी किंवा जनसामान्यांसाठी करण्यात येणाऱ्या अशा सालंकृत आराखड्यास सादर-आराखडे (प्रेझेंटेशन ड्रॉइंग) असे संबोधले जाते. आराखड्यांबरोबर अनेक प्रकल्पांत नमुनाकृतींचा (मॉडेल) समावेश असतो.

वास्तुतज्ञ जेव्हा एखाद्या वास्तूचे रूपायन (डिझाइन) करू लागतो, तेव्हा त्याची कल्पनाशक्ती त्या रेखांटनाद्वारे संकल्पित त्रिमितीय अवकाशाचे चित्र अनुभवू शकते. परंतु वास्तूच्या मालकाला त्याची कल्पना यावी, यासाठी तो नकाशात परिचित अशा अनेक गोष्टींचा समावेश करतो. उदा., वृक्ष, फर्निचर, रस्ते, भूभाग इत्यादी. त्याचवेळी वास्तुशास्त्रीय घटक - उदा., भिंती, खिडक्या, अवकाश - यांना उठावदार पद्धतीने रेखित करतो. यासाठी विविध आरेखनसाहित्य तो उपयोगात आणतो. यथादर्शनात संकल्पित वास्तुचित्रामध्ये वास्तवाभास निर्माण करण्यासाठी आकाश, रस्ते, झाडे, गर्दी, वाहने असे घटक प्रत्यक्षात जसे दिसतात, तसे काढतो. त्यामुळे त्रिमितीय अवकाशाचा आभास निर्माण होऊन ती वास्तू प्रत्यक्षच पाहत आहोत असे दर्शकाला वाटते. ही चित्रात्मकता चित्रकलेच्या जवळ जाणारी असूनदेखील वास्तूभोवती केंद्रित झाल्यामुळे वास्तुशास्त्रीय वेगळेपणा टिकवून ठेवते.

वास्तुदर्शनालेखासाठी विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध असते व वास्तुतज्ञ ते त्याच्या कौशल्यानुसार निवड करून वापरतो. त्यांपैकी विविध प्रकारच्या पेन्सिली त्यांच्या ठिसूळपणाच्या वैशिष्ट्यांनुसांर रेखाटनांसाठी वापरल्या जातात. त्यांतही शिसे बदलता येऊ शकणाऱ्या पकड्या (क्लच) पेन्सिली वास्तुतज्ञ नेहमी वापरतो. आराखड्यांसाठी जलनिरोधक शाई असलेली विविध प्रकारची पेने वापरली जातात. रेषेच्या अपेक्षित जाडीनुसार त्या पेनांची वर्गवारी असते. ०.१ मिमी. पासून १.२ मिमी. पर्यंत जाड रेषा साधारणपणे या पेनांद्वारे काढता येते. भिंतींना जाड रेषा, खिडक्यांना बारीक रेषा, गिलाव्याच्या बारीक रेषा असे वेगळेपण या पेनांद्वारे वास्तुविधानाच्या आराखड्यात करता येते. त्यामुळे विविध घटकांना उठाव देता येतो. याशिवाय जाड रेषा काढणारे चिन्हक पेन (मार्कर) अनेक वेळा याच उद्देशाने वापरले जाते. आराखड्यातील पृष्ठभाग किंवा संकल्पचित्रातील सभोवतालचे अवकाश व वास्तुपृष्ठ यांना उठाव देण्यासाठी तसेच चमकदार आणि नेत्रसुखद करण्यासाठी जलरंगांचाही वापर केला जातो. त्याचप्रमाणे छायाचित्र-रंग (फोटोकलर), मित्तिपत्र-रंग (पोस्टर कलर) आदी रंगप्रकारही वापरले जातात. तैलखडूंचा वापर पृष्ठपोत उठावदार करण्यासाठी केला जातो. सादर-आराखड्यांची अमोनिया प्रत काढताना कागदाचे तुकडे वापरून पृष्ठे गडद, सधन केली जातात. कागदावरील सादर-नकाशात विविध रंगांचे कागद वापरून पृष्ठभागांना उठाव दिला जातो. वास्तुदर्शनालेख करण्याच्या नाना तऱ्हा वास्तुतज्ञ अवलंबतो. रेषाकलन, पृष्ठभेद-आकार, रेखाटन-तंत्र या गोष्टींवर त्याचे प्रभुत्व असावे लागते. काही वास्तुतज्ञ केवळ या तंत्रावर आपली उपजीविका चालवतात.

आधुनिक काळात संगणकाच्या साहाय्याने (ऑटोकॅड : कॉम्प्युटर एडेड डिझाइन) वास्तुदर्शनालेखाचे अनेकविध कार्यक्रम (प्रोग्रॅम) विकसित केलेले आहेत. त्यामुळे संकल्पित आराखडे तर सजविले जातातच; परंतु संकल्पित वास्तूच्या बाह्य दर्शनाबरोबरच आतील अवकाशातही संगणक-पडद्यावर फेरफटका मारता येतो. अशा अद्‌भूत यांत्रिकीकरणामुळे हस्तकौशल्याची जागा यंत्रकौशल्याने पुढील काळात घेतली जाईल, असे दिसते.

लेखक : विजय दीक्षित

माहिती विश्वकोश : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate