অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

विजयकमानी व किर्तिस्तंभ

स्मारकवास्तु-प्रकार

विजयकमानी तद्वतच कीर्तिस्तंभ वा जयस्तंभ हे  रोम (३१२−१५)−कोरीवशिल्पांनी सजविलेली विजयकमान.राज्यारोहणादी खास समारंभप्रसंगी, तसेच युद्धात जय मिळवून सैन्यासह सेनानी परत येत असताना त्यांच्या स्वागतार्थ, राजे−महाराजे यांच्या सन्मानार्थ, अथवा एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर मिळविलेल्या विजयाच्या गौरवाप्रोत्यर्थ उभारण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. एखाद्या युद्धातील विजय स्मारकवास्तू बांधून साजरा करण्याची प्रथा अर्वाचीन काळातही आढळते. राजाचे नव्या भूमीवरील आगमन सूचित करणे, तसेच एखाद्या शहराची देशाच्या प्रगतीतील महत्त्वाची भूमिका व्यक्त करणे एखादे राष्ट्रीय प्रदर्शन साजरे करणे इ. नव्याने निर्माण झालेल्या विविध प्रेरणा-उद्दिष्टांनी स्मारकवास्तू बांधण्याचे रिवाज आधुनिक काळात रूढ झाले आहेत.

विजयकमानीचा उदय

पाश्चात्त्य देशांत इ. स. पू. २०० च्या सुमारास विजयकमानी प्रथमतः बांधण्यात आल्या. या कमानींवर युद्धातील विजयदृश्यांचे वा गौरवप्रसंगांचे उत्थित शिल्पांकन केले जाई. तसेच सुवर्णाचा मुलामा दिलेल्या ब्राँझच्या मूर्ती कमानीच्या छतावर उभारण्यात येते. या मूर्ती राजे, सेनापती किंवा देवदेवता यांच्या अश्वारूढ वा रथातील स्वारीच्या व प्रसंगोचित स्मरणार्थ अशा असत. वास्तुरचनेत साधारणतः मध्यभागी वाहनांसाठी एक मोठी व पादचाऱ्यांसाठी बाजूंना दोन लहान अशा एकूण तीन कमानींची योजना केली जाई. या कमानींमधील चौथऱ्यांवर संमिश्र (काँपोझिट) वा कॉरिथियन शैलीत स्तंभ उभारले जात. प्राचीन काळात रोमनांनी प्रथम विजयकमानी उभारण्यास सुरूवात केली. त्यांनी उभारलेल्या तीन कमानीविशेष प्रसिद्ध आहेत :‘आर्च ऑफ टायटस’ (इ. स. ८१)− जेरूसलेमवरील विजयाप्रीत्यर्थ ही कमान उभारली गेली. त्यांवर विजयदृश्याची उत्थित शिल्पे कोरली उभारली गेली. तसेच त्यात कॉरिथियन सतंभरचनेचा वापर केला होता. ‘आर्च ऑफ सेप्टिमिअस सिव्हीरस’ (२०३−२०५)-पार्थियनांवर मिळवलेल्या विजयाप्रीत्यर्थ ही भव्य व प्रक्षणीय रोमन कमान उभारण्यात आली. तिची उंची २०.८ मी. असून बांधकाम संगमरवरात केले होते व त्यावर सुबक पुतळे वसलेले होते. ‘आर्च ऑफ कॉन्स्टंटीन’ (३१२)−ही संमिश्र शैलीतील कमानरचना होती व तिच्या सजावटीत डमिशन, ट्रेजन व हेड्रिजन यांच्या काळतील बांधकाम−साहित्याचा पुनर्वापर केला होता.

रोमनांनी प्राचीन काळी जयस्तंभाचीही उभारणी केली. यशस्वी सेनानींच्या शौर्याचे वर्णन त्या स्तंभावर कोरले जाई. ‘ट्रेजन्स कॉलम’ (१०६−११३) हा ट्रेजनने उभारलेला प्रसिद्ध जयस्तंभ असून, त्याची एकूण उंची ३८ मी. होती. त्यावर युद्धाची दृश्ये उत्थित शिल्पांकनाने कोरली होती. या स्तंभावर गरूडाचे ब्राँ झशिल्प होते, तसेच वर जाण्यासाठी पायऱ्यांची योजना होती. अँटनायनस पायस व मार्कस ऑरिलियस या रोमन राजांनीही ट्रेजनच्या धर्तीवर जयस्तंभ उभारले. अशाच प्रकारचे स्तंभ नंतरच्या काळातही पाश्चात्य देशांत उभारण्यात आले. लंडनच्या ट्रॅफल्गर स्क्वेअरमधील नेल्सनचा स्तंभ (१८४०−४३) हा ५६ मी. उंच असून तो फ्रान्स व इंग्लंड यांमधील जलयुद्धाच्या स्मरणार्थ उभारण्यात आला.

पाश्चात्य देशांतील विजयकमानी

प्रबोधनकाळापासून पाश्चात्य देशांत ज्या विजयकमानी उभारण्यात आल्या, त्यांतील उल्लेखनीय कमानीपुढीलप्रमाणे होतः पहिल्या आल्फॉन्सोची नेपल्समधील विजयकमान (१४५३−७०). सतराव्या शतकातील पॅरिसमधील ‘पोर्ते सैं-दनी’ व ‘पोर्ते सँ-भारतँ’ या कमानी. याच काळात नेपोलियनने आपला विजय साजरा करण्यासाठी पॅरिसमध्ये ‘आर्च दी त्रिआँफ द लेत्वाल’(१८०६−३६) ही विजयकमान उभारली. ही जगातील सर्वांत भव्य कमान मानली जाते. तिची उंची ४५.७२ मी. असून ती नव-अभिजातवादी शैलीत बांधली आहे. तिची रचना जे. एफ्. शालग्रँ या फ्रेंच वास्तुकाराने केली. तिच्या अंतर्भागात निरीक्षणगृहे, संग्रहालय, अज्ञात सैनिकांची कबर इ. विभाग आहेत. कमानींचा दर्शनी भाग शिल्पाकृतींनी सजवलेला असून त्यात फ्रेंच इतिहासाची व नेपोलियनच्या विजयाची नोंद करून ठेवली आहे. यांखेरीज जॉन नॅशने लंडन येथे उभारलेली संगमरवरी कमान (१८२६) व ‘हाइड पार्क कॉर्नर आर्च’ (१८२६), तसेच स्टॅनफर्ड व्हाइटची न्यूयॉर्क शहरात उभारलेली‘वॉशिंग्टन आर्च’(१८९५) या विशेष उल्लेखनीय विजयकमानी होत. अमेरिकेतील सेंट लुई शहरात ‘जेफर्सन मेमोरियल एक्स्पान्शन’च्या प्रवेशद्वारावर, देशाच्या विकासासाठी त्या शहराने केलेल्या योगदानाप्रीत्यार्थ, एक अतिभव्य विजयकमान १९६५ मध्ये उभारण्यात आली. एरो सारीनेन या विख्यात वास्तुकाराने तिचा अभिकल्प केला. १९२ मी. उंचीची ही परिवलवाकृती कमान पूर्णतः अगंज पोलादात उभारली आहे. अंतर्भागात निरीक्षणगृहे, विजेचे पाळणे व शिखरावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साध्या आकारातून आधुनिक वास्तुसाहित्य व तंत्र यांद्वारे निर्माण केलेले एक कलात्मक वास्तुशिल्प या दृष्टीने या कमानीकडे पाहिले जाते. विद्यमान संस्कृतीत विजयकमानी व कीर्तीस्तंभ उभारण्यासाठी मानवाजवळ जास्त गौरवशाली प्रेरणा आहेत, हेच यावरून सिद्ध होते.

भारतात विजयकमानी व कीर्तीस्तंभ

भारतात विजयकमानी व कीर्तीस्तंभ उभारण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली दिसते. विजयकमानीची निदर्शक अशी ‘तोरण’ ही संज्ञा मानसार या ग्रंथात वापरली आहे, तसेच तोरणे बनवण्याचे तंत्र व त्यांची मापेही त्यात सविस्तर दिली आहेत. त्यात तोरणांचे पत्र-तोरण, पुष्प-तोरण, रत्न-तोरण व चित्र-तोरण असे चार प्रकार केले आहेत. तोरणांवरच्या पाने, फुले, रत्ने, देवदेवता, यक्ष−किन्नर. मकर, मासे, सर्प, सिंह इ. आकृत्यांवरून ही नावे पडली आहेत. तोरणांवरच्या नक्षीकामाप्रमाणेच, त्यांचे विविध आकार व बांधकामपद्धती यांवरूनही विविध प्रकार केले जातात. भारतात सातव्या ते दहाव्या शतकांपर्यंत दगडी कीर्तीस्तंभ उभारण्यात येत. प्रासंगिक विजयकमानी उभारून त्यांच्या दर्शनी भागांवर नक्षीकामाचा वापर केला जात असे. अशा तात्पुरत्या उभारलेल्या कमानींचे उल्लेख पुराणांत आढळतात, त्यांवर देवदेवता, यक्ष−किन्नर, वेगवेगळे प्राणी, फुले, वेली इ. आकृत्यांचे नक्षीकाम असे, तसेच रत्ने व मूल्यवान बहुरंगी खडे बसवण्यात येत. रामायणात जाळीदार नक्षी असलेल्या ‘जाल-तोरणा’चा निर्देश आहे. सण-उत्सव प्रसंगी गुढ्या-तोरणे उभारण्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. अल्पकाळासाठी तात्पुरत्या बांधलेल्या त्या विजयकमानी व कीर्तीस्तंभच होत.

वास्तुशिल्प कलेवरील प्रभुत्त्व

वेरूळ येथील कैलास लेण्यात १५.२५ मी. उंचीच्या निमुळत्या चौरस उंचीच्या निमुळत्या चौरस ध्वजस्तंभाची प्रवेशद्वाराशी निर्मीती केली आहे. त्याचा उद्देश विशिष्ट विजयी भावना व्यक्त करण्याचा नसला, तरी वास्तुशिल्पकलेवरील प्रभुत्त्व व समृद्धी दर्शवण्याचा विश्चितच असावा. विजयस्तंभाला ‘राजस्तंभ’ ही संज्ञा राजपूत राजांनी हे स्तंभ उभारल्यामुळे प्राप्त झाली. मंदसोर येथे युद्धस्मारक म्हणून उभारलेला राजस्तंभ चौरसाकार असून १२.२ मी. उंच आहे, त्याला सोळा कोन असून अनेक आडव्या कंगोऱ्यांचा वापर स्तंभ संतुलिक करण्यासाठी केला आहे. कुत्बुद्दीन ऐबकाने आपल्या पराक्रमाचा विजयस्तंभ म्हणून ११९९ मध्ये दिल्लीनजीक मेहरोली येथे कुतुबमीनाराची उभारणी केली. पृष्ठभागावरील समृद्ध अलंकरण, अलंकारातील रेखीवपणा व सुबकपणा इ. वैशिष्ट्यांमुळे हा मनोरा नेत्रदीपक ठरला आहे. चितोडगढ येथे सु. ११०० मध्ये उभारलेला, आदिनाथ ऋषभदेव यास समर्पित केलेला कीर्तिस्तंभ २४.४ मी. उंच, आठ मजली असून तो जैन वास्तुकलेचा उत्तम नमुना मानला जातो. त्याच्या चौथऱ्यावर विपुल व सूक्ष्म कोरीवकाम करून पाया तयार करण्यात आला. मनोरा मध्यभागी किंचित निमुळता असून, त्याच्या शिरोभागी सुंदर घुमटाकृती छत आहे. नासिकांवर आधारित असे सज्जे, त्यांवरील खांब यांच्या वापरामुळे वास्तुला नाजुकपणा प्राप्त झाला आहे. स्तंभाच्या पायाजवळच्या धिऱ्यांमुळे जोरकसपणाचा आभास निर्माण होतो. चित्तोडगढ येथेच राणा कुंभ याने माळवा व गुजरात येथील सुलतानांच्या सैन्यांवर एकाच वेळी मिळविलेल्या विजयाप्रित्यर्थ जयस्तंभ उभारला (१४४२−४९). तो ३६.५ मी. उंचीचा, नऊ मजली असून हिंदू देवदेवता व पुराणकथा यांच्या शिल्पांकनासाठी प्रसिद्ध आहे.

हिंदू-इस्लामी संमिश्र वास्तुशैली

अकबरने १५०० च्या सुमारास भारतात बांधलेल्या अनेकविजयकमानींपैकी सर्वांत महत्त्वाची वास्तू म्हणजे फतेपुर सीक्री येथील ‘बुलंद दरवाजा’ ही होय. अकबराने गुजरातवरील विजयाप्रीत्यर्थ ही अतिभव्य कमानी दरवाजाची वास्तू उभारली (१५७५). १३ मी. चौथऱ्यावर ४१ मी. उंचीची ही कमान (दरवाजाची एकूण उंची ५४ मी.) हिंदू-इस्लामी संमिश्र वास्तुशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. कमानीच्या भव्य आकाराला साजेसे समृद्ध नक्षीकाम संमिश्र शैलीत असून तटबंदी, खुली मंडपदालने इ. घटकांमुळे प्रमाबद्धतेतील भव्यता व त्याला पोषक अशा सूक्ष्म अलंकरणादी घटकांचा संयोग झाला आहे व परिणामी या कमानीत वास्तू व तत्संबद्ध कलाकुसर यांचा योग्य समतोल साधला गेला आहे. १९११ साली राजा पंचम जॉर्जच्या मुंबई येथील आगमनाप्रीत्यर्थ ‘गेटवे ऑफ इंडिया’ची निर्मिती करण्यात आली. जी. विटेल या वास्तुकाराने त्याचा अभिकल्प केला होता. त्याच्या मध्यभागी भव्य कमानयुक्त दालन आहे. सोळाव्या शतकातील गुजरातमधील वास्तुशैलीचा प्रभाव त्यात जाणवतो. पिवळ्या बेसाल्ट दगडाचा वापर बांधकामात केला आहे. नाजुक जाळीकाम ग्वाल्हेरकडील कारागिरांनी केले आहे. मध्यदालनाच्या दोन्ही बाजूंस एकेक छोटी दालने असून त्यांवर इस्लामी धर्तीची घुमटाकार छतरचना आहे. आकारातील भव्यतेबरोबरच इस्लामी वास्तुशैलीतील नाजुकपणा व भारतीय रेखीवपणा यामुळे ही वास्तू प्रेक्षणीय ठरली आहे. १९३० मध्ये दिल्ली येथे एडविन लटयेन्झ या ब्रिटिश वास्तुतज्ञाने पहिल्या महायुद्धातील अज्ञात भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ ‘इंडिया गेट’ या भव्य स्मारककमानीची निर्मिती केली.

लेखक : १)गो. कृ. कान्हेरे

२) विजय दीक्षित

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate