অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वेरूळ भाग 2

वेरूळ भाग 2

क्रमांक १२ : दो ताल लेण्याच्या शेजारी `तीन ताल' या नावाने ओळखले जाणारे हे तीन मजली लेणे आहे. साधे स्तंभ पण लेण्यात शिल्पाकृतींची रेलचेल हे या लेण्याचे वैशिष्ट्य. याची भव्यताही स्तिमित करते. महायान पंथीय बौद्धांची ही शेवटची निर्मिती समजली जाते.

लेण्याच्या समोर एक प्रशस्त अंगण आहे. तिन्ही मजल्यांत आठ-आठ उत्कीर्ण स्तंभांच्या रांगा असून बहुतांशी सर्व खांब चौकोनी ताशीव आहेत. साध्या घटकांतून भव्यतेची छाप पाडली जाते. तळमजला रुंद आहे. त्यातील दोन दर्शनी स्तंभ पूर्णघट-चिन्हयुक्त असून उर्वरित सर्व साधे व चौकोनी आहेत. या मजल्यावर भिक्षूंसाठी नऊ खोल्या आहेत. येथील अंतराल लक्षणीय आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या मागच्या भिंतीत नऊ मूर्तींचा शिल्पपट आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या मागच्या भिंतीत नऊ मूर्तींचा शिल्पपट आहे. मध्यभागी बुद्धप्रतिमा, उजव्या बाजूस पद्मपाणी अवलोकितेश्वर, डाव्या बाजूस वज्रपाणी, त्यांच्या वर तीन मूर्ती. डावीकडील मागच्या भिंतीवर अवलोकितेश्वर आणि मंजुश्रीसमवेत बुद्ध कोरलेला आहे. अंतराळाच्या मागे गर्भगृहात ध्यानस्थ बुद्धाची भव्य प्रतिमा असून भिंतीवर मैत्रेय, मंजुश्री, स्थिरचक्र आणि ज्ञानकेतू या चार बोधिसत्त्वांची शिल्पे आहेत. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस बुद्ध, ध्यानस्थ तारा, तर उजव्या बाजूस चुंडा या स्त्रीबोधिसत्त्व मूर्ती आहेत. वरच्या मजल्याच्या वाटेत भूमिस्पर्शमुद्रेत बुद्ध आहे. याशिवाय उजव्या भिंतीवर जंभाल (कुबेर), अवलोकितेश्वर आणि तारा यांच्या मूर्ती असून, डाव्या भिंतीवर नऊ मूर्तींचा मंडलपट आहे. सर्वांत वरच्या मजल्याचे वैशिष्ट्य म्हणजे शिल्पांची रेलचेल आणि स्थापत्यातील योजनाबद्ध रेखीवपणा. भिंतीवर बुद्धप्रतिमा कोरलेल्या असून काही ध्यानमुद्रेत, तर काही धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत दाखविल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूंस, प्रत्येकी सात यांप्रमाणे चौदा बुद्धमूर्तींची रांग कोरलेली आहे. या सात बुद्धमूर्ती ध्यानमुद्रेत असून, त्यांच्या मस्तकांच्या वर निरनिराळ्या वृक्षशाखा कोरलेल्या आहेत. मुख्य मंदिराच्या दाराच्या दोन्ही बाजूंस द्वारपाल आहेत. मंदिरात 3.35 मी. उंचीची भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती असून बुद्धाच्या मूर्तीभोवती प्रदक्षिणापथ आहे. मूर्तीवर चुन्याच्या गिलाव्याचे अवशेष आढळतात, त्यावरून ही मूर्ती रंगविली जात असावी. छतावरही रंगकामाचे अवशेष आहेत. या रंगकामाचा काळ नववे शतक असा मानला जातो.

परंपरागत गवाक्षापासून वेगळेपण, आखणीतील भव्य परिमाणे, अनेक मजल्यांची खशेदकामे आणि शिल्पांची रेलचेल ही वेरुळच्या बौद्ध लेण्यांची ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.

हिंदू धर्मीय लेणी : लेणी क्रमांक १३ ते २९ ही हिंदू धर्मीयांची आहेत. ही सर्वसाधारणपणे सहाव्या ते आठव्या शतकांतील निर्मिती आहे. यात शैव शिल्पांची आणि शिवाच्या जीवनातील प्रसंगांच्या शिल्पपटांची संख्या अधिक असून वैष्णव शिल्पे तुलनात्मक दृष्ट्या कमी आहेत. राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच्या अमदानीच्या आधीची आणि तिच्या समकालीन व नंतरची असे दोन विभाग कालदृष्ट्या आणि कलादृष्टीने करता येतात. यानुसार लेणी क्र. १४, १७, १८, १९, २०, २१, २२, २५, २७, २८ व २९ ही लेणी राष्ट्रकूटांच्या प्रभावाच्या आधीची असून, ही सहाव्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील असावीत. शैली व आखणी या दृष्टींनी लेणे क्रमांक २९ (सीता की नहाणी) घारापुरीच्या लेण्यांशी आश्चर्यकारक साम्य दर्शविते. लकुलीश-शिवाच्या प्रतिमांची शिल्पे (लेणी क्र. १८, २१, २९) ही वेरूळवरील लकुलीश-पाशुपत पंथाचा प्रभाव स्पष्ट करतात. आठव्या, दहाव्या व बाराव्या शतकांतील भित्तिचित्रांचे अवशेष हे कैलास लेणे, जैन गुंफा आणि डोंगरमाथ्यावरील गणेश लेण्यांत आढळतात.

क्रमांक १४: हे लेणे `रावण की खाई' या नावाने ओळखले जाते. त्यातील कैलास पर्वत हलविणाऱ्या रावणाच्या शिल्पपटामुळे त्याला हे नाव पडले असावे. क्रमांक २ च्या बौद्ध लेण्याचा आराखडा जवळजवळ असाच आहे. याच्या बाजूच्या भिंतीत अर्धस्तंभामुळे शिल्पपटांना जणू चौकट लाभली आहे. दर्शनी खांबाचे अर्धे भाग साधे चौकोनी असून वरच्या भागात पूर्णघटाचे अलंकरण आहे.

उत्तरेकडील भिंतीत बहुतांशी वैष्णव शिल्पपट आहेत. पहिल्या खणात त्रिशूल घेतलेली दुर्गा आहे; तर त्यानंतरच्या खणात कमलासना गजलक्ष्मी असून तिच्या मस्तकावर चार हत्ती पाणी शिंपडीत आहेत. तिसऱ्यात भूवराहाचा पट आहे. वराहाची भव्यता व आवेश आणि पृथ्वीदेवीची प्रमाणबद्ध मूर्ती यांमुळे हा शिल्पपट देखणा झालेला आहे. त्यानंतरच्या खणात भूदेवी व श्रीदेवी यांसह श्रीविष्णू वैकुंठात बसल्याचे शिल्प आहे. त्यानंतर मकरतोरणाखाली विष्णु-लक्ष्मीची मूर्ती आहे.

मुख्य मंदिराच्या दरवाज्याजवळ स्त्री-द्वारपाल असून त्यांच्या बाजूसच मकरावर उभी गंगा, कूर्मावर उभी यमुना आणि भव्य द्वारपाल यांची शिल्पे आहेत. येथे प्रदक्षिणापथ असून त्याच्या भिंतीत शिल्पपट, शिल्पे आणि शिल्पसमूह आहेत. यांत उत्तरेकडील भिंतीत सालंकृत व बालकांसहित सप्तमातृका असून त्या वीरभद्र आणि गणेश या दोहोंच्या मधे खदलेल्या आहेत.

दक्षिणेकडील भिंतीतही शिल्पपट आहेत. प्रथम अंधकासुरवध कथेतील शिव दाखविला आहे. या शिल्पातील क्रोध-आवेश या भावांचे चित्रण अप्रतिम आहे. दुसऱ्या शिल्पपटात शिव-पार्वती विहार करीत असलेल्या होंगरावरून रावणाचे पुष्पक विमान पुढे जाण्यास प्रतिबंध निर्माण झाला, त्या प्रसंगाचे शिल्पांकन आहे. रावणाचा आवेश आणि जिद्द, शंकराची शांत मुद्रा आणि पार्वतीची भयग्रस्तता व पतीचा आधार घेण्यासाठी त्याला बिलगण्याची कृती या सर्व मुद्रा शिल्पकाराने अत्यंत वास्तव स्वरूपात दाखविल्या आहेत. याशिवाय तंडवनृत्यातील शिवाचे नृत्य पाहण्यास गणे, पार्वती, ब्रह्मा, विष्णू, इंद्र आणि अग्नी उपस्थित आहेत, असा शिल्पपट पुढे आहे. दुसऱ्या एका शिल्पात शिव-पार्वती पट खेळत असल्याचे दाखविले आहे. शिवाचे खेळण्यात लक्ष नसल्याने पार्वती रुसलेली आहे व तिने रुसून मुखकमल फिरविले आहे. शिव तिचा हात धरून आणखी एक खेळ खेळण्यासाठी अनुनय करीत आहे. पार्वतीच्या मुखावरील रुसवा आणि शंकराची अनुनयातली अजिजी शिल्पकाराने छान टिपली आहे. या शेजारच्या खणात भव्य नटराज आणि शेवटच्या खणात महिषादुरमर्दिनीचे शिल्प आहे.

क्रमांक १५ : हे लेणे `दशावतार' लेणे म्हणून प्रख्यात आहे. गतिमान शिल्पे, राष्ट्रकूट दंतिदुर्गाचा उत्कीर्ण लेख आणि पुराणातील कथा दाखविणारे शिल्पपट ही या लेण्याची वैशिष्ट्ये होत. हे लेणे दुमजली आहे. त्याच्या दर्शनी खांबाच्या माथ्यावर भूमिस्पर्शमुद्रेतील बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे.

या लेण्यासमोर प्रशस्त प्रांगण आहे आणि त्याच्या मध्यभागी एक मंडप आहे. मुख्य मंडपाच्या मागील भिंतीवर राष्ट्रकूल घराण्यातील दंतिदुर्ग राजाचा प्रदीर्घ लेख आहे. राष्ट्रकूट घराण्याची वंशावळ आणि शेवटी दंतिदुर्ग या लेण्यात सैन्यासह येऊन गेल्याचा उल्लेख यात आहे. मंडपावर सिंह, यक्ष, गर्भगृहांच्या प्रतिकृती, गंगा, यमुना इ. मूर्ती आणि जाळीदार खिडक्या आहेत.

हे लेणे दुमजली आहे. याच्या उत्तरेकडील कोपऱ्यात जिन्याच्या पायऱ्या असून, मधल्या कट्ट्याच्या भिंतीत कोनाडे आहेत. त्यांत गणेश, शिव - पार्वतीची आलिंगन-मूर्ती, सूर्य, शिव- पार्वती, गजानन-गण, महिषादुरमर्दिनी, अर्धनारीनटेश्वर, दुर्गा, तपस्वी उमा, गणेश, काली इ. मूर्ती आहेत. अंतराळाच्या आत गाभारा आहे. त्याच्या दर्शनी खांबावर आमलक, पूर्णघट, प्रणालिका, यक्ष इ. घटक आहेत.

या लेण्यात शिल्पपटांची रेलचेल आहे. उत्तरेकडे शैव आणि दक्षिण भिंतीवर वैष्णव शिल्पे आहेत. उत्तरेकडील पहिल्या खणात अंधकासुरवधमूर्ती असून ती रौद्रभीषण आहे. शिव अष्टभुज असून हातांत तलवार, डमरू, नीलासुराचे कातडे इ. आयुधे आहेत. शेजारी स्तिमित झालेली पार्वती व नरकपाल धरलेली काली असून, शिवाच्या पायाखाली अपस्मार पुरुष आहे. शिवाच्या गळ्यात रुंडमाला असून त्याने अंधकासुराला त्रिशूलाने विद्ध केलेले आहे. योगेश्वरीच्या जवळ घुबड, तर अंधकासुराच्या पायाजवळ राहूचे मस्तक दाखविलेले आहे. दुसऱ्या खणात तांडवनृत्यातील शिवप्रतिमा आहे. तिसऱ्या खणात शिवलिंग असून छतावर वेलबुट्टीच्या अलंकरणाचे अस्पष्ट अवशेष दिसून येतात. चौथ्या खणात शिव-पार्वती पट खेळतानाचे दृश्य आढळते. दुसऱ्या एका खणात `कल्याणसुंदर' मूर्ती असून शिवाचा पार्वतीशी झालेला विवाह शिल्पित केलेला आहे. यापुढील शिल्प `रावणानुग्रह' (रावण कैलास पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहे व या प्रयत्नात फसल्यावर शिवाने त्याच्यावर अनुग्रह केल्याची कथा) आहे.

पाठीमागील भिंतीवर मार्कंडेयानुग्रह आणि गंगावतरण ही शिल्पे आहेत. मार्केंडेय अल्पायुषी असतानाही त्याने शिवाराधना केली. ठरल्या वेळी यमाने आपले पाश मार्कंडेयाभोवती टाकल्यावर शिवाने आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी यमाला लाथ मारली, तेव्हा तो परत गेला आणि मार्कंडेय चिरंजीव झाला. यमाचे दुसरे नाव `काल' आहे. त्याचा नाश केल्याचे चित्रण केलेल्या या शिल्पास `कालारि' असे नाव दिले गेले आहे. क्रोधयुक्त शिव आवेशाने त्रिशुलाचा आघात यमावर करीत आहे. दुसऱ्या खणात गंगावतरणाचा प्रसंग आहे. शिवाने गंगा आपल्या जटापाशात बद्ध केल्याने या चित्रणास `गंगाधर शिव' असे नाव आहे. तप करणारा सागरही यात कोरलेला आहे; मात्र हा शिल्पपट बराचसा विच्छिन्न झालेला आहे.

अंतराळाच्या डाव्या भिंतीवर गणेश, तर उजव्या बाजूस कार्तिकेय आहेत. गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस गजलक्ष्मी, तर डाव्या बाजूस सरस्वती आहे. याशिवाय द्वारपालही आहेत. गाभाऱ्यात भग्नावस्थेतील शिवलिंग आहे. अंतराळाच्या खांबावर मिथुने कोरलेली आहेत. मागच्या भिंतीवर लिंगोद्‌भव शिव आणि त्रिपुरांतक शिव यांच्या मूर्ती आहेत. यातील लिंगोद्‌भव शिवमूर्तीच्या शिल्पात मधोमध ज्योतिर्मय शिवलिंग दिसत असून, उजव्या बाजूस वराहरूपी विष्णू व डाव्या बाजूस ब्रह्मा त्या लिंगाचा आदि-अंत शोधू पाहत आहेत. लिंगातून शिवमहादेव प्रकट झालेला आहे. त्रिपुरांतक शिव-शिल्पात रथारूढ शिव, रथाला सूर्य-चंद्राची चाके, ब्रह्मा सारखी, शिवधनुष्य म्हणून मेरू पर्वत, धनुष्याची दोरी म्हणून वासुकी नाग, विष्णुरूपी बाण आणि रथ नेणारे चार वेद अश्वरूपाने दाखविले आहेत.

उजव्या बाजूच्या भिंतीत अनुक्रमे गोवर्धनधारी कृष्ण, शेषशायी विष्णू, गजेंद्रमोक्ष करणारा विष्णू, भूवराह, त्रिविक्रम विष्णू आणि हिरण्यकशिपूचा वध करणारा नरसिंह ही शिल्पे आहेत. ही वैष्णव शिल्पे अत्यंत प्रमाणबद्ध, गतिमान आणि विविध भावमुद्रांचे यथार्थ दर्शन घडविणारी आहेत.

गर्भगृहासमोर सुटा नंदी आहे. प्रांगणाच्या उत्तरेतील भिंतीत एक लेणे असून त्याच्या गर्भगृहात शिवलिंग आणि त्याच्यामागे त्रिमूर्तीचे (अघोर, तत्पुरुष, कामदेव) शिल्प आहे.

या लेण्यातील शिल्पपटांची शैली आणि दर्जा दोन्ही अनियमित आहेत. जणू विविध कलापरंपरांमधून आलेले वेगवेगळ्या वकूबांचे शिल्पकार तेथे काम करून गेले असावेत. त्यावरून कैलास लेण्यासारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला हात घालण्याआधी भारताच्या विविध भागांतून आलेल्या शिल्पीसंघांचे कसब इथे अजमावून त्यातून त्यांची निवड झाली असावी, असा अंदाज बांधता येईल. येथे काम करणाऱ्या आंध्र प्रदेशातील एका शिल्पीसंघाने नंतर पुण्याचे पाताळेश्वर लेणे कोरले असावे, असे समजण्यास वाव आहे.

क्रमांक १६ : हे कैलास लेणे म्हणून ओळखले जाते. `माणकेश्वर' असाही त्याचा उल्लेख सापडतो. सर्वच दृष्टींनी हे लेणे भव्य असून, ते वेरूळचा मुकुटमणी मानले जाते. `आधी कळस मग पाया' हे वचन ह्या वास्तुरूपात पाहावयास मिळते. या लेण्याच्या निर्मितीस राष्ट्रकूटांचा राजा दंतिदुर्ग याच्या कारकीर्दीत प्रारंभ होऊन, पहिल्या कृष्णराजाने (कार. सु. ७५६-७७३) त्यास पूर्ण रूप दिले. पुढील राजांच्या काळात या शिवमंदिराच्या ओव्या, सरितामंदिर, लंकेश्वर लेणे, मातृकामंदिर इ. खोदण्यात आली.

कैलास लेणे हे सौंदर्यशाली शैलमंदिर आहे. या लेण्याच्या कलात्मक आविष्कारात पल्लव-चालुक्यकालीन शैलींची संमिश्र छटा जशी दिसून येते, तसेच विमान, गोपुर इ. घटकांत द्राविड शैली स्पष्ट होते.

क्रमांक १७ : हे लेणे आखणी, स्तंभ आणि शिल्पपट या दृष्टींनी प्रेक्षणीय आहे. यातील गण, शालभंजिका व त्यांच्या बाजूस असलेल्या सेविका व गंधर्व यांच्या कमनीय मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

क्रमांक १८ ते २० : ही लेणी सर्वसामान्य असून, त्यांत उल्लेखनीय अशी वैशिष्ट्ये नाहीत.

क्रमांक २१ : हे लेणे `रामेश्वर' लेणे म्हणून ओळखले जाते. याचे दर्शनी भागाचे खांब कमनीय शालभंजिकांमुळे प्रेक्षणीय झाले आहेत. बाजूच्या खांबांना जोडून असलेल्या कठड्यावर गजथर असून त्यावर एकूण चौदा मिथुने कोरलेली आहेत. कठड्यास लागून असलेल्या भिंतीवर गंगा आणि दुसऱ्या बाजूस यमुना आहे. गंगेची त्रिभंगातील मूर्ती शरीरसौष्ठव व कलात्मक केशरचना यांमुळे लक्ष वेधून घेते. सभामंडपाच्या दोन्ही बाजूंस उंच जोत्यावर दोन लहान उपवर्णक असून, त्यांत डाव्या बाजूला शिव-पार्वतीचा विवाहसोहळा दाखविलेला आहे. पंचाग्निसाधन करणारी उमा, हिमालयाकडे उमामहेश्वरांचा विवाहप्रस्ताव घेऊन गेलेला ब्रह्मा आणि शिव-पार्वती विवाह (कल्याणसुंदर) हे तिन्ही पट अप्रतिम आहेत. विशेषतः विवाहप्रसंगी पार्वतीच्या चेहऱ्यावर दर्शविलेला सलज्ज भाव अत्यंत विलोभनीय आहे. याशिवाय महिषासुरमर्दिनी आणि मोरावर बसलेला कार्तिकेय यांची शिल्पे आहेत. त्याचा अग्नीशी असलेला संबंध अजमुख सेवक सूचित करतात. अंतराळाजवळ रावणानुग्रहाचा शिवमूर्तीपट आहे. दक्षिण दालनात सप्तमातृका, नटराज आणि कंकाल-काली यांची शिल्पे आहेत. सप्तमातृका दालनाजवळ शिव-पार्वती पट खेळत असल्याचे शिल्प आहे.

लेखक :शां. भा.देव

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate