অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्‍यंगचि‍त्रकला

व्‍यंगचि‍त्रकला

जीवनानंद देणारी व्‍यंगचि‍त्रकला

१८९५ मध्‍ये पहि‍ले रंगीत व्‍यंगचि‍त्र 'द यलो कीड' प्रकाशि‍त झाले होते. त्‍याची आठवण आणि व्‍यंगचि‍त्रकलेचा गौरव म्‍हणून या दि‍वसाचे महत्‍त्‍व आहे. जगभरात व्‍यंगचित्र आणि व्‍यंगचि‍त्रकारांना मानाचे स्‍थान आहे. भारतीय समाजावरही व्‍यंगचि‍त्राचा फार मोठा प्रभाव पडलेला आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आर. के. लक्ष्‍मण ही दोन नावे त्‍यासाठी पुरेसी आहेत. 5 मे हा जागति‍क व्‍यंगचि‍त्रकार दि‍न म्‍हणून साजरा करण्‍यात येतो.व्‍यंगचि‍त्रकारांचा गौरव करताना कोणत्‍याही व्‍यंगचि‍त्रकाराचे एखादे व्‍यंगचि‍त्र श्रेष्‍ठ आणि इतर सुमार असे म्‍हणता येत नाही. देशात आणि महाराष्‍ट्रात अनेक व्‍यंगचि‍त्रकार होऊन गेले आहेत. नवीन पि‍ढीतही उत्‍तम व्‍यंगचि‍त्रकार आहेत. समाजाच्‍या दैनंदि‍न घडामोडीतील, जीवनातील वि‍वि‍धांगी पदर तटस्‍थपणे उलगडून दाखवि‍ण्‍याचे काम व्‍यंगचि‍त्रकार करीत असतो. कधी हास्‍य तर कधी गंभीरता धारण केलेले व्‍यंगचि‍त्र समाजजीवनाचा अवि‍भाज्‍य भाग झालेला आहे. त्‍यामुळेच व्‍यंगचि‍त्रांना 'समाजाचा आरसा' म्‍हटले जाते. शब्दबंबाळ नसलेली, वाचकांच्‍या मनातील मूर्त-अमूर्त कल्‍पनांना साकारणारी व्‍यंगचि‍त्रे रसि‍कांच्‍या लवकर पसंतीस उतरतात, असा अनुभव आहे.

आजचे जीवन धकाधकीचे असल्‍यामुळे वाचकांना फार वि‍चारात न पाडता सद्यस्‍थि‍तीवर मार्मि‍कपणे, मि‍ष्‍कीलपणे केलेले चि‍त्रमय भाष्‍य प्रसि‍द्ध करण्‍यावर संपादकीय मंडळींचा भर असतो.चार्ली हेब्‍दो या व्‍यंगचि‍त्र साप्‍ताहि‍कावरील हल्‍ला अथवा जुन्‍या व्‍यंगचि‍त्रावरुन झालेले वादवि‍वाद पाहून तशा पद्धतीची व्‍यंगचि‍त्रे रेखाटण्‍याचे व्‍यंगचि‍त्रकार धाडस करीत नाही. किंबहुना संपादकीय मंडळी तसे धाडस करीत नाहीत, ‍असे म्‍हणावयास वाव आहे. आपल्‍या देशातील राजकीय व्‍यंगचि‍त्र परंपरा शंकर यांच्‍यापासून सुरु होत असल्‍याचे मानले जाते. बाळासाहेब ठाकरे, आर.के. लक्ष्‍मण, अबू अब्राहम, सुधीर तेलंग, उन्‍नी अशी मोठी परंपरा आहे. मराठीत श्रीकांत ठाकरे, मंगेश तेंडुलकर, वि‍कास सबनीस, जगदीश कुंटे, राज ठाकरे, प्रशांत कुलकर्णी, वि‍वेक म्हेत्रे, श्रीनि‍वास प्रभुदेसाई, सुरेश क्षीरसागर, वसंत वि‍टणकर, सुरेश सावंत, वैजनाथ दुलंगे, संजय मि‍स्‍त्री, अनि‍ल डांगे, आलोक नि‍रंतर, गजानन धोंगडे, महेंद्र भावसार, यशवंत सरदेसाई, ब्रि‍जेश मोगरे, गणेश जोशी, गणेश काटकर, बाबू गंजेवार, वि‍नय चाणेकर, राहुल तुपे, भरतकुमार उदावंत, रवी भागवत, भगवान क्षीरसागर, संतोष घोंगडे आदी मंडळींनी या क्षेत्रात आपापल्‍या परीने योगदान दि‍लेले आहे, काही अजूनही देत आहेत. यातील काही मंडळी त्‍यांच्‍या भागात नि‍घणाऱ्या दैनि‍कात राजकीय परि‍स्‍थि‍तीवर उपहासपूर्ण आणि वि‍नोदी पद्धतीने व्‍यंगचि‍त्रे रेखाटतात. रवींद्र बाळापुरे, प्रभाकर दि‍घेवार, लहू काळे, गजानन धोंगडे आदी मंडळींचा तर ग्रामीण संस्‍कृतीवर व्‍यंगचि‍त्रे रेखाटण्‍यात हातखंडा आहे.

दि‍वाळी अंक हा मराठी संस्‍कृतीचा मानबिंदूच आहे. दि‍वाळी अंकाच्‍या मुखपृष्‍ठावर व्‍यंगचि‍त्र झळकावण्‍याचे श्रेय शि‍.द. फडणीस यांना जाते. त्‍यानंतर ज्ञानेश सोनार, चंद्रशेखर पत्‍की, हरि‍श्‍चंद्र लचके, प्रभाकर झळके, वसंत हळबे, श्‍याम जोशी, गवाणकर, वि‍कास सबनीस, वि‍वेक म्हेत्रे, खलील खान आदींनी एक काळ गाजवून सोडला. बापू घावरे, चिंतामण ग. मनोहर, प्रकाश वर्मा, अजय सावजी, अरविंद गाडेकर, धनंजय गाडेकर, दि‍नेश धनगव्‍हाळ, ज्ञानेश बेलेकर, गणेश काटकर, चारुहास पंडि‍त, घनश्‍याम देशमुख, जय जाधव, जयवंत काकडे, कंदीकटला, महेंद्र पंडि‍त, मनोहर सप्रे, पोरे ब्रदर्स, प्रभाकर ठोकळ, प्रभाकर वाईरकर, प्रदीप साठे, प्रकाश बनगे, प्रशांत आष्‍टीकर, राजेंद्र सरग, रामचंद्र राजे, एस. ए. मुलानी, संजय मि‍स्‍त्री, संतोष मोहि‍ते, श्रीकांत कोरान्‍ने, सुयोग चौधरी, धनंजय एकबोटे, भरत घटे, शशि‍कांत गद्रे, दि‍वाकर शेडगे, बळी लवंगारे, सुरेश सावंत, सुरेश राऊत, शि‍वाजी गावडे, शि‍राज मुजावर, सुरेश लोटलीकर, वसंत मयेकर, वि‍जय पराडकर, प्रकाश चव्‍हाण, बी. गणेश, दीपक महाले, निलेश कानकि‍रड, प्रदीप म्‍हापसेकर, सुहास पालीमकर, वि‍वेक प्रभुकेळुस्‍कर, अशोक बुलबुले, अशोक सुतार, कि‍शोर शि‍तोळे, राम मांडुरके, प्रकाश घादगि‍ने आदींनी व्यंगचि‍त्र कलेसाठी दि‍लेले योगदानही गौरवपूर्ण आहे.या क्षेत्रात महि‍लांचा वाटा अल्‍पसा असल्‍याचे दि‍सते.

डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर, कल्‍पना नान्‍नजकर, राधा गावडे आदींच्या व्‍यति‍रि‍क्‍त इतरांची नावे वाचण्‍यात आली नाहीत. व्‍यंगचि‍त्रकार असलेले बहुसंख्‍य आपापल्‍या नोकरी-व्‍यवसायात स्‍थि‍र झालेले आहेत. व्‍यंगचि‍त्र कलेच्‍या प्रेमापोटी आपला वेळ खर्च करुन दैनि‍के, नि‍यतकालि‍के आणि दि‍वाळी अंकांच्‍या माध्‍यमातून वाचकांना नि‍खळ आनंद देण्‍याचे व्रत अंगि‍कारणाऱ्या या सर्वांचे म्‍हणूनच आभार मानावेसे वाटतात.व्‍यंगचि‍त्रकार हा कलावंत असतो. चाणाक्षपणा, उपजत वि‍नोदबुद्धी, परि‍स्‍थि‍तीचे अवलोकन करुन त्‍यातील वि‍संगती आणि सुसंगती शोधण्‍याची क्षमता, त्‍यावर चपखलपणे कमीत कमी शब्‍दांत लक्षवेधी रेषांच्‍या साहाय्याने भाष्‍य करण्‍याची हातोटी हे गुण व्‍यंगचि‍त्रकारात असतात. व्‍यक्‍ति‍गत जीवनात तो मि‍तभाषी असेल अथवा बोलघेवडा असेल, पण व्‍यंगचि‍त्रकार म्‍हणून आवश्‍यक गुण असल्‍याशि‍वाय तो यशस्‍वी होऊच शकत नाही. व्‍यंगचि‍त्रकला ही चि‍त्रकलेची शेवटची पायरी आहे, असे म्‍हटले जाते. पण मराठी व्‍यंगचि‍त्रकारांकडे पाहि‍ल्‍यानंतर अनेकांना चि‍त्रकलेचे प्राथमि‍क शि‍क्षण नसतानाही त्‍यांना हे दैवी वरदान लाभलेले दि‍सते. म्‍हणूनच व्‍यंगचि‍त्रातील आशयाला समृद्ध करणारी मि‍श्‍कि‍ल शब्‍दरचना वापरणारे व्‍यंगचि‍त्रकार स्‍वत:ची एक शैली नि‍र्माण करण्‍यात यशस्‍वी झालेले दि‍सतात.

व्‍यंगचि‍त्र हा एक साहि‍त्‍यप्रकार म्‍हटले जातो. इतर साहि‍त्‍यामधून जसे जीवनदर्शन होते, तसेच व्‍यंगचि‍त्रातूनही होते. मात्र ते टि‍पण्‍यासाठी वेगळी नजर आणि रेखाटण्‍यासाठी वेगळा हात लागतो. व्‍यंगचि‍त्रातून आलेल्‍या चटकदार, चमकदार कल्‍पना केवळ हास्‍यनि‍र्मि‍तीसाठी आलेल्‍या नसतात, त्‍यामागे व्‍यंगचि‍त्रकाराचा गहन अभ्‍यास, सखोल चिंतन असते. जीवन पद्धतीवर एका वेगळ्या दृष्‍टि‍कोनातून भाष्‍य केलेले असते, वेगळ्या कोनातून प्रकाश टाकलेला असतो. व्‍यंगचि‍त्रकार हा स्‍वत:शीही संवाद साधणारा असतो. आत्‍मपरीक्षण करणारा असतो. समाजात वावरत असताना, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अन्‍वयार्थ लावत असतो. अंतर्मुख होऊन वि‍चार करतो आणि कल्‍पनाशक्‍ती, वि‍नोदबुद्धी यांची जोड देऊन व्‍यंगचि‍त्र रेखाटतो. त्‍यातील उपहास काहींना झोंबणारा असू शकतो. गरीबी, नि‍रक्षरता, भ्रष्‍टाचार, बेरोजगारी, पाणीटंचाई आणि मानवी जीवनातील दु:ख, अपमान, वि‍योग, उपेक्षा, अपेक्षाभंग, अपयश, निंदा, दुरावा, भीती, काळजी या समस्‍या जोपर्यंत आहेत, तोपर्यंत अशी व्‍यंगचि‍त्रे येतच राहणार. अशा परि‍स्‍थि‍तीत आपल्‍या जीवनात हास्‍य आणि वि‍नोद नसता तर आपले जगणे बेचव झाले असते. व्‍यंगचि‍त्रातून मि‍ळणारा आनंद हा माणसाला त्‍याचे दु:ख क्षणभर का होईना वि‍सरायला भाग पाडतो. म्‍हणूनच जीवनानंद देणाऱ्या या कलाक्षेत्रातील सर्व मुसाफि‍रांना मानाचा मुजरा.

 

 

लेखक - राजेंद्र सरग, जि‍‍ल्‍हा माहि‍ती अधि‍कारी, अहमदनगर.

स्त्रोत : महान्युज

 

 

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate