অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्हीनस द मिलो

व्हीनस द मिलो

प्रेम व सौंदर्य यांची ग्रीक देवता अॅफ्रोडाइटी हिचे जगप्रसिद्ध मूर्तिशिल्प. तिलाच रोमन लोक व्हीनसम्हणत. हे शिल्प ‘अॅफ्रोडाइटी ऑफ मिलॉस’ म्हणूनही ओळखले जाते. ही मूर्ती मिलॉस या (फ्रेंच–‘मिलो’) ग्रीक बेटावर १८२० मध्ये सापडली. त्यामुळे ती व्हीनस द मिलो या नावाने ओळखली जाऊ लागली. ही मूर्ती ऑटोमन साम्राज्याचा फ्रेंच राजदूत मार्क्वस दी रीव्ह्येर याने विकत घेतली व फ्रान्सचा सम्राट अठरावा लूई याला भेट दिली. त्याने ती नंतर पॅरिस येथील लूव्हर कलासंग्रहालयाला दिली. सध्या ती तेथेच आहे. हे सुंदर संगमरवरी अभिजात शिल्प ग्रीकांश (हेलेनिस्टिक) कालखंडाच्या उत्तर पर्वातील आहे. सुरुवातीला या शिल्पाचा निर्मितीकाळ इ. स. पू. सु. पाचवे वा चौथे शतक मानला गेला; तथापि आता तो इ. स. पू. सु. १५० ते १०० या दरम्यान मानला जातो. ही मूर्ती मानवी शीर्ष असलेल्या चौरस दगडी स्तंभाच्या आकारातील (हर्म) असून तिच्या चौरसाच्या पायावर मूर्तिकाराची स्वाक्षरी कोरलेली होती. मीअँडर नदीकाठावरील अँटिऑक गावचा अॅलेक्‌झांड्रॉस किंवा अॅजीसँड्रॉस या शिल्पकाराने ही मूर्ती घडवली असावी, असे या स्वाक्षरीवरून सूचित होते. सुमारे २ मी.पेक्षा जास्त उंच असलेली ही मूर्ती अर्धनग्न असून तिच्या शरीराचा वरचा भाग उघडा, तर कमरेपासून खाली ती वस्त्र ल्यालेली आहे. या वस्त्राची ठेवण आणि शरीरावयवांची सापेक्ष प्रमाणबद्धता पाहता तिच्यात ग्रीकांश जाणिवा दिसून येतात. रचनावैशिष्ट्यामुळे पुतळ्याच्या शीर्षाखालील कबंधाची कमनीयता विशेष खुलून दिसते. तसेच शिल्पाकृतीला भक्कम पाया लाभतो. ह्या मूर्तीचे नितंब व स्कंध जास्त रुंद व पुष्ट आहेत. विशेषतः शांत, प्रसन्न व कातीव चेहऱ्याच्या तुलनेत हे प्रकर्षाने जाणवते. तिच्या कमेवरील वस्त्र घसरताना दाखवले आहे. प्रॅक्‌सीटेलीझ (इ. स. पू. सु. चौथे शतक) वफिडीयस (इ. स. पू. ४९०–४३०) या पूर्वकालीन ग्रीक शिल्पकारांचा काहीसा प्रभाव या मूर्तीवर जाणवतो. या मूर्तीचा  सस्मित चेहरा आणि स्वप्नाळू भाव हे प्रॅक्‌सीटेलीझच्या, तर भव्योदात्तता व रुंद प्रतिमान हे फिडीयसच्या प्रभावाचे निदर्शक आहेत.

ह्या मूर्तीचे बाहू आता तुटलेल्या, भग्न स्थितीत आहेत. मात्र ते मुळात कोणत्या अवस्थेत घडवले असावेत, ह्या विषयी अभ्यासकांना बरेच कुतूहल आहे. काहींच्या मते तिने हातात ढाल धरली असावी, तर काहींच्या मते ती सूत कातत असावी. आपले घसरणारे वस्त्र उजव्या हाताने ती सावरून धरीत असावी, असेही एक मत आहे. सफरचंद धरलेल्या एका हाताचा शिल्पावशेषही मिलॉस येथे सापडला आहे. तो बहुधा या मूर्तीचा भाग असावा. असे असल्यास अॅफ्रोडाइटी ही ‘सफरचंद द्वीपा’ची (अॅपल आयलंड; ग्रीक ‘मिलॉस’ म्हणजे इंग्रजीत ‘अॅपल’) प्रातिनिधिक देवता मानली जात असावी. इ. स. पू. चौथ्या शतकातील अॅफ्रोडाइटीच्या मूल ग्रीक शिल्पाकृतीवरून व्हीनस द मिलोचे प्रस्तुत शिल्प मूर्तिकाराला स्फुरले असावे. मूळ शिल्पातील देवतेने दोन्ही हातांमध्ये युद्धदेव अॅरिसची ढाल घेतल्याचे दाखवले आहे.

या मूर्तीच्या घडणीतले अनेक सूक्ष्म बारकावे, तिचा अभिजात साधेपणा व खानदानी डौल हे गुणविशेष तिला लोकोत्तर सौंदर्य बहाल करतात. आदर्श स्त्रीसौंदऱ्याचे एक रूप म्हणून ही मूर्ती जगभर वाखाणली जाते. अर्थात, स्त्रीसौंदऱ्याच्या भारतीय व्याख्येपेक्षा व्हीनस द मिलोच्या सौंदर्याची जात वेगळी आहे.

लेखक : श्री. दे.इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate