অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिवणकला

शिवणकला

लवचिक व नरम दोऱ्याचे वा तंतूचे टाके घालून एकत्र जोडणे, बांधणे किंवा एकमेकांत अडकविणे म्हणजे शिवण व या क्रियेचे तंत्र म्हणजे शिवणकला असे सामान्यपणे म्हणता येईल. शिवणकला प्राचीन आहे. अतिप्राचीन काळात थंड हवामानात तग धरण्यासाठी तत्कालीन मानवाने प्राण्यांची कातडी वस्त्र म्हणून वापरण्यास सुरुवात केली. ही कातडी हाडांच्या सुयांनी भोके पाडून त्यामधून अस्थिबंधने ओवून जोडत असत. त्यावेळी वापरल्या गेलेल्या हाडांच्या सुया स्पेनमधील आदिमानवाच्या गुहेत सापडल्या आहेत. पुढे ब्राँझच्या सुयांचा उपयोग सुरू झाला. क्रिमियामधील पुराणाश्म-युगीन गुहेत हाडे, हस्तिदंत व रेनडियरच्या शिंगांपासून तयार केलेल्या सुया सापडल्या असून त्याकाळी अस्थिबंधने किंवा घोड्याच्या आयाळेतील व शेपटातील केस शिवण्यासाठी वापरले जात. मानवाच्या कवटीची हाडे एकमेकांत ज्या पध्दतीने घट्ट बसलेली असतात त्यावरून, तसेच शिंपी पक्ष्याच्या घरटे बांधण्याच्या पध्दतीवरून मानवाला शिवणकला सुचली असावी, असे मानले जाते. शिवणकलेचा उपयोग कपडे तसेच कातडी व कागद शिवणे इत्यादींसाठी मुख्यत्वे करण्यात येतो.

प्राचीन भारतीय ग्रंथांत चौसष्ट कलांचा उल्लेख आढळतो. त्यांमध्ये शिवणकलेला ‘सूचिवाय कर्म’ या नावाने संबोधिलेले आहे. रामायण काळात रेशमी, सुती वस्त्रे तसेच झाडाच्या सालीपासून बनविलेल्या वस्त्रांचा वापर होई. भारतात ही कला चार-पाच हजार वर्षांपूर्वीपासून असावी. मोहें-जो-दडो, हडप्पा, लोथल, कालिबंगा, नेवासे, पैठण, तेर, नागार्जुनकोंडा इ. ठिकाणी प्राचीन भारतीय सुयांचे अवशेष मिळाले आहेत. कौंडिण्यपूर येथील उत्खननात भोक असलेल्या सुया सापडलेल्या आहेत. पूर्वीच्या सुया दोन्ही बाजूंस टोक व मध्ये भोक अशा होत्या. पुढे त्यांत बदल होऊन एका बाजूला तीक्ष्ण टोक, तर दुसऱ्या बाजूस भोक असलेल्या सुया वापरात आल्या. संत नामदेवांच्या अभंगात सुई, दोरा, गज, कात्री इत्यादींचा उल्लेख आहे.

शिवणकलेचा जो विकास झाला, त्याला कारण म्हणजे लोकाभिरुचीतील बदल हे होय. मात्र शिवणकलेचा मोठा विकास झाला, तो हाडाच्या सुईचे धातूच्या सुईत झालेल्या रुपांतरामुळे. कापडाचे व कपड्यांचे प्रकार, सुया व शिवणाचा दोरा यांच्यात होत गेलेल्या सुधारणांबरोबर शिवणकलेचा विकास होत गेला. शिवणयंत्राच्या शोधानंतर शिवण जलद होऊ लागले. हल्ली तर शिवणयंत्राबरोबर इतरही आवश्यक यंत्रे उपलब्ध आहेत. हल्ली जास्त प्रचारात असलेल्या कृत्रिम धाग्यांच्या कपड्यांसाठी भविष्यात कदाचित उष्णतेचा व दाबाचा उपयोग करून शिवण करण्यात येईल. मात्र तेथे शिवण न होता फक्त कापड जोडण्यात येईल.

शिवण्याची क्रिया ही शिवणयंत्राचा शोध लागेपर्यंत हातानेच करीत. अशा हातशिलाईस वेळ बराच लागत असे. यंत्राच्या शोधाने शिलाई जलद होऊ लागली. पण काही ठिकाणी यंत्रशिलाईबरोबरच हातशिलाईची गरज असते. हातशिलाईत टीप व तुरपाई (हेमिंग) यांना महत्त्व आहे.

सुई व दोरा : जे कापड शिवावयाचे असते, त्याच्या प्रकारावर व जाडीवर सुई व दोरा कोणता वापरावयाचा हे अवलंबून असते. एकाच प्रकारच्या कापडासाठी हातशिलाई व यंत्रशिलाईसाठी वापरावयाच्या सुया निरनिराळ्या क्रमांकाच्या असतात. साधारणपणे पुढील तक्त्यात उल्लेख केल्याप्रमाणे सुया व दोरे वापरतात.

कापडाचे प्रकार

दोऱ्याचे क्रमांक

सुईचे क्रमांक

मशिन सुई

हात सुई

(१)

अतितलम रेशमी, तलम वायल,

२००, १००,

९–११

११-१२

 

जॉर्जेट, कृत्रिम रेशमी इ.

६०–१५०

 

 

(२)

शर्टिंग (मध्यम), चीट, क्रेप, हरक.

५०–६०

१६

६–८

 

ट्विल वगैरे मध्यम जाड कापड

 

 

 

(३)

मध्यम जाडीचे कोटींग, ड्रील इ.

४०

१८

५-६

(४)

खूप जाड खाकी, ड्रील अगर जाड

३०–४०

१८

४-५

 

कापड

 

 

 

(५)

जाड कॅनव्हास वगैरे

३०

२१

३-४

(६)

काजे करण्यास कापडाच्या जाडी

१०–३०

२४

०–२

 

प्रमाणे

 

 

 

हल्ली शिवणकलेतील निरनिराळ्या कार्यासाठी वेगवेगळी यंत्रे उपलब्ध झाली आहेत. विद्युत शिवण यंत्र, काजयंत्र, बटन स्टिच यंत्र, स्वयंचलित कर्तनयंत्र, कापडावरील कशिद्यासाठी झिगझॅग यंत्र इ. यंत्रे वापरली जातात. सामान्यतः ही यंत्रे मोठ्या प्रमाणावर कपडे शिवावयाच्या ठिकाणी व तयार कपड्यांच्या कारखान्यांत वापरली जातात. काजयंत्र मात्र सर्वत्र आढळून येते.

शिवणकलेची साधने : शिवणकलेत पुढील साधनांचा व साहित्याचा उपयोग करतात : (१) विद्युत शिवणयंत्रे; (२) वेगवेगळ्या लांबीच्या व प्रकारच्या कात्र्या, उदा., नागमोडी (पिकिंग), शिंपी, काजकात्री, रिपिंग कात्री इ.; (३) मापपट्टी (टेप); (४) मीटरपट्टी, काटकोन, काटकोन पट्टी, निरनिराळ्या आकाराचे वक्र; (५) बेतचाक (ट्रेसिंग व्हील) व कागद; (६) निरनिराळ्या आकारांतील व रंगांतील खडू (मेणखडू); (७) पिना व पिनकुशन; (८) टेबल अगर बोर्ड; (९) हातशिलाईच्या व यंत्रशिलाईच्या निरनिराळ्या क्रमांकाच्या सुया; (१०) निरनिराळ्या आकाराचे व रंगांचे दोरे; (११) अंगुस्तान; (१२) इस्त्री व पॅड; (१३) आरसा, डमी; (१४) टीपटोचा (सीम रीपर), दोरा खुणी (थ्रेड क्लीप), हेम मेकर, हेम गॉज, एमरीवॅग, काचटोचा (स्टिलेटो), द्विझरी, सीम रोल, क्लॅपर, पॉइंट प्रेसर, कशिदा प्लेट इत्यादी.

शिलाईची प्रक्रिया : हातशिलाईचे विविध प्रकार आहेत. काही वेळा यंत्रशिलाईपूर्वी हातशिलाई करावी लागते. लोकरी व रेशमी कपड्यांसाठी हातशिलाई वापरावी लागते. तसेच विशिष्ट प्रकारच्या कपड्यांसाठी आणि जिथे यंत्रशिलाई सुबक दिसत नाही, तिथे हातशिलाईचा वापर करतात. यंत्रशिलाईमुळे कपडे लवकर शिवून होतात.

शिवणकलेत मापाला फार महत्त्व आहे. मापे बरोबर घेतली असल्यास कपडे व्यवस्थित शिवता येतात. मापे दोन प्रकारची असतात. (१) साधी मापे, (२) मिश्र मापे. शरीराच्या छातीघेरावरून घेतलेल्या मापाला साधे माप म्हणतात. ज्या वेळी एखादा शिवणाकार निश्चित करण्यासाठी शरीराच्या दोन किंवा अधिक भागांवरून पट्टीने माप घेतो, त्यास मिश्र माप म्हणतात. उदा., छातीघेर, कमरघेर, शोल्डर, मुंढाखोली, गळाघेर, बाहीलांबी इत्यादी. ज्याचे माप घ्यावयाचे असते, त्याच्या उजव्या बाजूस उभे राहून सामान्यपणे मापे घेण्यात येतात. जो कपडा शिवावयाचा असेल, त्यानुसार आवश्यक ती मापे घेऊन ती वहीत अनुक्रमाने नोंदविण्यात येतात. नोंदीतील अनुक्रमावरून माप ओळखता येते. मापे घेताना व्यक्तीच्या शरीराची ठेवण तसेच कपड्याविषयीच्या तिच्या सूचना किंवा कल्पना लक्षात घेणे आवश्यक असते.

कागदी नमुने : शिवणकामात कागदी नमुन्याची आवश्यकता आहे. कमीत कमी कापडात कपडा करावयाचा असेल, तर कागदी नमुने वापरणे सोयीस्कर ठरते. कापड वाया जाऊ नये, म्हणून ते जसे कापावयाचे असेल तसे कागदी नमुने प्रथम तयार करून घेतले जातात. हे नमुने नंतर कापडावर ठेवून त्याप्रमाणे कापड कापले जाते. कापडावर कागदी नमुने ठेवून जे माप काढले जाते, त्याला ले-आउट (आखणी) म्हणतात. या कर्तनास काटकसरीचे कर्तन असेही म्हणतात. शिकाऊ उमेदवारास ह्याचा फार उपयोग होतो. प्रमाणित कागदी नमुने बाजारात विकत मिळतात.

कापडावर खुणा करणे : शिलाई करताना ती चुकू नये, यासाठी कापडावर खुणा करणे आवश्यक असते. अशा खुणा खडूने, मार्किंग व्हीलने किंवा कात्रीने करतात.

कापड बेतणे किंवा कापणे : कापड कापण्यापूर्वी ते तपासून घेणे आवश्यक आहे तसेच कापडाची दर्शनी बाजूही पाहणे आवश्यक असते. कापडाच्या लांबीमधून कपड्याच्या लांबीचा भाग कापावा. उभा कापू नये कारण कापड उभे कापल्यास धागे ताणले जाण्याची शक्यता असते. तसेच कापड कापताना कापडाचा तोलही लक्षात घ्यावा लागतो. आधारभूत मापांनुसार कापडावर मेणखडूने खुणा करून व त्या खुणा जोडून आखणी करावी लागते. वक्ररेषांसाठी ‘कर्व्हज’ वापरतात. मोठ्या प्रमाणावर कापड कापण्यासाठी व तयार कपड्यांच्या कारखान्यात कर्तनयंत्रे वापरतात.

कच्ची शिलाई : कापड कापल्यानंतर प्रथम कच्ची शिलाई करून नंतर यंत्रशिलाई करणे हितावह असते. ज्यावेळी जोड लावावयाचा असतो, त्यावेळी जोड कच्च्या शिलाईने केल्यास डावा-उजवा समजतो. चुकीचा असल्यास दुरुस्ती करणे सोपे जाते. तसेच काही वेळेला गरम, सुती व रेशमी कपड्यांसाठी गोधडी टाक्यांचा उपयोग करतात. दोन भाग जोडावयाचे असल्यास, या टाक्यांचा उपयोग करतात. नंतर यंत्रशिलाई केली जाते. शिलाई करताना कापडाला घड्या पडणे अगर ते चुरगळले जाणे इष्ट नसते. त्यासाठी कापड ताणून घ्यावे लागते. कधी कधी यासाठी कापडाला इस्त्री करावी लागते.

अंगावर मापे पक्की करणे : कच्च्या शिलाईमुळे अंगावर मापे पक्की करता येतात. ग्राहकास बोलावून कपड्यांची चाचणी घेता येते. कच्ची शिलाई असल्याने ती आवश्यकतेनुसार कमी जास्त करता येते.

अस्तर : अस्तराचे तीन फायदे आहेत. (१) कपड्याच्या मजबुतीसाठी, (२) उष्णता राखण्यासाठी व (३) कपडा सुबक होण्यासाठी. कापडाला अनुरूप असे अस्तर असावे लागते. साधारणतः सॅटिन रेशीम, कृत्रिम रेशीम कापड अस्तर म्हणून वापरतात. पातळ पडदे, कोट इ. कपड्यांना अस्तर लावले जाते. गळपट्टी, कोटाच्या खांद्यावरील उशा, हाताच्या पट्टया यांत कॅनव्हास वापरतात.

पायपिंग (काठपट्टी) : पायपिंगचा उपयोग विशेषतः स्त्रियांच्या व लहान मुलांच्या कपड्यांमध्ये जास्त प्रमाणात करतात. यामुळे कपड्यांमध्ये निरनिराळ्या फॅशन करता येतात. तिरप्या कापडांची सु. एक इंच पट्टी कापून पायपिंग करतात. तिरकस कापड रबरासारखे ताणते, त्यामुळे त्याला पाहिजे तो आकार देता येतो व कपड्यास शोभा आणता येते. पायपिंग उभ्या कापडास लावल्यास ते कपड्यापासून सुटत नाही. ज्या कापडावर पायपिंग करावयाचे, त्याच्या विरुध्द रंगाचे पायपिंग करावे. फॅशनमध्ये दोन प्रकारचे तुकडे जोडताना पायपिंगची पट्टी मध्यभागी दुमडावी. पट्टीमध्ये दोरा शिवून दोरा ठेवल्यास त्याला दोऱ्याची पायपिंग म्हणतात. ही दिसावयास सुबक़ दिसते. बाइंडिंगचा उपयोग आडव्या कापडास करतात.

टक : कापडाची दुमड धाव-दोऱ्याने किंवा मशीनच्या टिपेने पक्की केलेली असते, तिला टक असे म्हणतात. टक ठराविक मापावर घालावे लागतात. योग्य अंतरावर टक नसल्यास कपडा बरोबर बसत नाही. पँट, पोलके वगैरेंना टक घालणे आवश्यक असते.

चुण्या : कपडे व्यवस्थित शिवता यावेत, यासाठी काही वेळा चुण्या घालणे जरुरीचे असते. चुण्या घालताना त्या एकसारख्या आणि ठराविक अंतराने घालतात.

टाके : टाक्यांचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत : (१) मोठा व लहान धावदोरा, (२) हेम (तुरपाई), (३) टीप, (४) काज-टाके, (५) छेद (क्रॉस) टाके, (६) क्विल्टिंग (सजावटी टाका), (७) डुबकी टाके, (८) यंत्र टाके.

मोठा व लहान धावदोरा : कोणताही कपडा कापल्यावर यंत्रशिलाईपूर्वी हाताने कच्चे शिवण करून घ्यावे लागते. यासाठी जे टाके वापरतात, त्यांना ‘धावदोरा’ म्हणतात हे टाके दोन प्रकारचे असतात : (अ) मोठा धावदोरा, (ब) लहान धावदोरा. टाके लांब लांब घातले, तर त्यांना मोठा धावदोरा म्हणतात व जवळजवळ घातले, तर त्यांना लहान धावदोरा असे म्हणतात. गोलाकार भागास दुसरा भाग जोडावयाचा असल्यास त्या ठिकाणी हे टाके वापरतात. पोलक्याचा खांदा, हात, कोटाचा खांदा इ. ठिकाणी त्यांचा वापर करतात.

हेम (तुरपाई) : हे टाके साधारण तिरकस घालावे लागतात. जेथे यंत्रशिलाई सुबक दिसत नाही व हातशिलाई आवश्यक असते, तेथे हे टाके घालतात. हे टाके तिरकस असल्याने त्यांना ‘तुरपाई’ म्हणतात. पोलक्याच्या हाताच्या पट्टीला, गळ्याला, कोटाच्या हाताच्या मुंढ्याला, बुशकोट इत्यादींसाठी यांचा वापर करतात. साधी तुरपाई, फ्रेंच तुरपाई, रोल्ड, स्कॅलपड, क्रॉसस्टिच, फॉल्स तुरपाई इ. तुरपाईचे प्रकार आहेत.

टीप : यंत्रशिलाईचा शोध लागेपर्यंत या टाक्यांचा उपयोग कपडे शिवण्यासाठी करीत. अजूनही या टाक्यांनी काही कपडे शिवले जातात. यंत्रशिलाई जेथे नको असते, तेथे या टाक्यांचा उपयोग करतात.

काज-टाके : बटन घालण्यासाठी जे छिद्र असते, त्याच्या कडा शिवण्यासाठी या टाक्यांचा उपयोग करतात.

छेद (क्रॉस)-टाके : लोकरी कपडे शिवताना या टाक्यांचा उपयोग करतात. या कपड्यांचा काही भाग मोडून तुरपाई करताना काही भाग जास्त होतो, म्हणून तेथे तुरपाई न करता छेद-टाके घालतात. हे टाके घालताना, तुरपाईप्रमाणे भाग मोडत नाहीत.

क्विल्टिंग : या टाक्यांचा उपयोग नेहमी कोटांच्या पुढील किनारीवर केला जातो. कपडा हातात झिरविण्यासाठीही केला जातो.

डुबकी टाके : ज्या ठिकाणी यंत्रशिलाई दिसता कामा नये, अशा ठिकाणी या टाक्यांचा उपयोग करतात. हा टाका कपड्याच्या आत किंवा बाहेर दिसत नाही. तो किनारीच्या मध्यावर आतील बाजूस असतो. यामुळे कपडा सुबक दिसतो.

यंत्र-टाका : हे टाके दोन निरनिराळ्या दोऱ्यांनी बनतात. एक सुईतून येतो, तर दुसरा बॉबिनमधून येतो. सुईतून येणारा दोरा कपड्यावर असतो, तर बॉबिनमधील दोरा खालच्या बाजूस असतो. सुई कापडाला भोक पाडून खालचा दोरा वर आणते. यावेळी खालच्या दोऱ्याला आटा पडतो व त्यातून सुईचा दोरा जातो.

स्त्रियांच्या बाबतीत त्यांची अंतर्वस्त्रे (लँझरी) व्यवस्थित असल्यास त्यावरील कपडे व्यवस्थित बसवतात. यासाठी अंतर्वस्त्रे शिवताना विशेष काळजी घ्यावी लागते, पण त्यांची शिलाई सोपी असते.

शिलाई सुबक होण्यासाठी कापडाच्या प्रत्येक भागास शिलाईच्या वेळी वेळोवेळी इस्त्री करणे आवश्यक असते. इस्त्री कापडाच्या उभ्या भागावर करावी लागते. लोकरी व रेशमी कापडासाठी प्रथम इस्त्री करूनच शिलाई करावी लागते. यामुळे कपडा ताणला जाऊन शिलाई करणे सोपे जाते.

कलात्मक शिलाई : पूर्वीच्या काळी राजे, सरदार तसेच इतर धनिक इत्यादींचे कपडे कलाकुसरीचे असत. आधुनिक काळात कपड्यांच्या फॅशन सुरू झाल्यानंतरच कलात्मक शिलाईचा वापर सुरू झाला. ज्याप्रमाणे फॅशन बदलते, त्याप्रमाणे कपड्यांवर कलात्मक शिलाई करावी लागते. लेस लावणे, कपड्यांवर भरतकाम करणे, निरनिराळ्या रंगांच्या कापडांपासून एकच कपडा शिवणे, पायपिंग करणे इ. प्रकार कलात्मक शिलाईसाठी वापरतात. कपडा जास्तीत जास्त सुबक व आकर्षक दिसावा, अशा तऱ्हेने कलात्मक शिलाईचा वापर करावा लागतो. आधुनिक काळात कलात्मक शिलाईच्या क्षेत्रात अभिकल्पकांचा एक मोठा वर्ग व्यापारी हेतूने पुढे आलेला आहे. नवीन नवीन कलात्मक कपड्यांचे आकर्षक नमुने फॅशन प्रदर्शनांतून सादर करण्यात येतात.

लहान मुलांचे कपडे : लहान मुलांचे कपडे हे मोठ्या माणसाच्या कपड्यांपेक्षा सैल असावे लागतात. लहान मुलांना हालचाल जलद करता यावी, यासाठी व त्यांची वाढ वेगाने होत असल्याने त्यांचे कपडे सैल असावे लागतात. तसेच त्यांचे कपडे आकर्षक असावेत. पायपिंग लावून, मणी (काचेचे) शिवून, भरतकाम करून, निरनिराळ्या रंगांच्या कापडांपासून एकच कपडा शिवणे इत्यादींचा उपयोग करून कपडे आकर्षक बनवितात. अशा कपड्यांमुळे मुलांनाही आनंद होतो.

विशिष्ट प्रकारच्या कपड्यांची शिलाई : यात शिकारी कपडे, विविध खेळांत वापरावयाचे कपडे, समारंभासाठी वापरावयाचे कपडे इत्यादींचा अंतर्भाव होतो. शिकारी कपडे जाड कापडाचे, अंगाबरोबर बसणारे पण हालचाल जलद करता यावी असे, हवामानाचा, झाडांचा शरीराला त्रास न होऊ देणारे, तसेच विशिष्ट रंगाचे व आवश्यक वस्तू ठेवण्यासाठी खिसे वगैरे असलेले असे शिवावे लागतात. खेळांचे कपडे अंगाबरोबर शिवावे लागतात. निरनिराळ्या देशांतील, धर्मांतील व समाजातील चालीरीतीनुसार धार्मिक, तसेच विवाहादी समारंभासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे शिवले जातात. तसेच नाटक, चित्रपट आदी प्रसंगी त्यातील स्थळ, व्यक्ती व कथाप्रसंगानुसार कपडे शिवावे लागतात.

फाटलेल्या कपड्यांची शिलाई : फाटलेले कपडे तीन प्रकारे दुरुस्त करता येतात : (१) रफू करणे, (२) ठिगळ लावणे, (३) शिवणे.

रफू करणे : ज्या कपड्याला रफू करावयाची आहे, त्याचे धागे काढून घेऊन अगर त्याच रंगाचा दोरा घेऊन ज्याप्रमाणे कपड्याची वीण असेल, त्याप्रमाणे ते आडवे-उभे घालतात. प्रथम आडवे धागे व नंतर उभे धागे घालणे योग्य असते. चटई विणताना जी पध्दत वापरतात, तीच येथे वापरतात.

ठिगळ लावणे : ज्या ठिकाणी ठिगळ लावावयाचे असेल, तेथे योग्य आकाराचे कापड घेऊन प्रथम धाव-टाके घालून ते मूळ कपड्याला जोडतात व नंतर सर्व बाजूंनी ठिगळ आत दुमडून तुरपाई करतात. नंतर आतील कापडाच्या कडा दुमडून तुरपाई करतात व मग धावटाके काढून टाकतात.

शिवणे : कपडा चिरला असल्यास त्याचे दोन्ही भाग एकावर एक ठेवून टाके घालतात. तसेच चिरलेल्या भागावर दुसरे कापड ठेवून टाके घालतात व जादा कापड मोडून परत एकदा टाके घालतात.

शिवणकलेचे शिक्षण : शिवणकला ही वंशपरंपरागत चालत आलेली प्राचीन कला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात शिवणकामाच्या शिक्षणसंस्था फारशा निघाल्या नाहीत. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र शिवणकलेच्या शिक्षण-प्रशिक्षणास चालना मिळाली. शाळा, औद्योगिक शिक्षणसंस्था व खाजगी संस्था यांतून हे प्रशिक्षण देण्यात येते. गृहविज्ञानाच्या अभ्यासक्रमात तसेच धंदेशिक्षणाच्या शाळांतून शिवणकलेचे शिक्षण घेता येते. हा शिक्षणकाळ साधारणपणे एक ते अडीच वर्षांचा असतो. शालांत परीक्षेसाठी शिवण हा एक विषय आहे. त्याशिवाय राज्यशासनाच्या तंत्रशिक्षण विभागाकडून शिवणकामाच्या परीक्षा घेतल्या जातात.

संदर्भ : भिसे, पद्मावती, सोपे शिवणकाम, मुंबई, १९८४.

लेखिका : भारती भूपाल मिठारी

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate