অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

संगीतातील धृवतारा...

संगीतातील धृवतारा...

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा आकाशवाणीवरील दिलखुलास हा लोकप्रिय रेडीओ कार्यक्रम आहे. दिलखुलास या कार्यक्रमात आजवर विविध क्षेत्रातील दोन हजारपेक्षा जास्त दिग्गजांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ संगीतकार, व्हायोलीन वादक उत्तम सिंग यांच्या मुलाखतीच ध्वनीमुद्रण होणार होतं, निमित्त होत शासनाने त्यांना सन 2016 या वर्षासाठीचा गानसम्राज्ञी श्रीमती लता मंगेशकर पुरस्कार प्रदान केल याचं. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाकडून त्यांच्या सोबत मुंबई आकाशवाणीत जाण्याची संधी मला मिळाली. हा सुवर्णक्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. आजवर त्यांना चित्रपटाच्या माध्यमातून अनुभवलं होतं. पण प्रत्यक्षात भेटताना त्यांच्यातला प्रामाणिक आणि कलेसाठी जगणारा माणूस खूप भावला.

पांढरा पंजाबी पोशाख केलेले सिंग सर अत्यंत विनम्र आहेत. ते बोलत होते आणि आम्ही ते कानात साठवून ठेवत होतो. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यांची व्हायोलीनशी मैत्री झाली. त्यांचे पहिले गुरु वडीलच होते. संगीताच्या वेडापायी शिक्षण मागे राहू नये म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच शिकवायला सुरू केलं. वडिलांशी असणारी त्यांची भावनिक जवळीक हेच त्यांच्या जडणघडणीच पहिलं पाऊल होतं. त्यांच्या बोलण्यातून त्यांचा भूतकाळ समोर उभा राहत होता. उत्तम सिंग यांचे वडील सतार वादक होते. श्री. सिंग यांनी सात वर्षे मटका वाद्य, सहा महिने सीतार वाद्य व दोन वर्षे गायनाचे शिक्षण घेतले. खडतर वाटचाल करत त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू झाला होता. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात त्याच्या सुरूवातीची वर्ष त्याला समृध्द करत असतात. हा तुमच्या उभारणीचा काळ असतो तेव्हा मात्र संयम कामी येतो आणि तोच तुम्हाला दीर्घकाळ पुढे जायला आणि संगीत क्षेत्रात टिकून राहायला मदत करतो, असं ते आवर्जून म्हणाले.

श्री. सिंग बोलत होते आणि त्यांचा प्रवास हळूहळू उलघडत होता. ते बारा वर्षांचे असताना त्यांचे वडील त्यांना मुंबईत घेऊन आले. तेव्हापासून त्यांचे व्हायोलिनशी कायमचे सूर जुळले. सन 1963 रोजी त्यांना मोठा बेक्र मिळाला. राजश्री प्रॉडक्शनचे गाजलेले चित्रपट 'मैने प्यार किया', 'हम आपके है कौन' तसेच विविध तामिळ चित्रपटांसाठी आणि पंजाबी चित्रपटांसाठीही त्यांनी संगीत संयोजक म्हणून काम केले. मनोज कुमार यांचे ‘पेंटरबाबू’ व ‘क्लर्क’ या चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले. 1992 साली जगदीश खन्ना यांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरू केले. जगदीश यांच्याशी त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची आठवण निघाल्यावर बोलताना त्यांचा स्वर कंपीत झाला होता. ते म्हणाले, काही माणसं हृदयात कायमची घर करून राहतात.

एक संगीतकार म्हणून चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या ‘दिल तो पागल है’, ‘दुश्मन’, ‘फर्ज’, ‘दिल दिवाना होता है’ या गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले आहे. 'दिल तो पागल है' या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअरचा सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला आणि 2002 साली 'गदर एक प्रेम कथा' या चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार (सर्वोत्कृप्ट संगीत दिग्दर्शक) जाहीर झाला. हे दोन क्षण त्यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचे क्षण आहेत. गदर चित्रपटातील ‘उड जा काले कावा तेरे मूह विच खंड पावा’ हे गीत त्यांनी व्हायोलीनवर वाजवलं. संगीत जगणारा आणि ते रोमारोमात भिनलेला हा माणूस जवळचा वाटत होता. हल्लीच्या बदलत्या संगीतावरही त्यांनी मनमोकळं भाष्य केलं. सध्याच्या ‘रियालिटी शो’ मधून दीर्घकाळ टिकणारे गायक तयार होत नाहीत ही खंत त्यांनी व्यक्त केली.

कोणतही काम करताना ते मनापासून करायला हवं आणि त्यातली तपश्चर्याच तुम्हाला मोठं करत असते. हेच यशाच गमक आहे, असं ते म्हणाले. जे संगीत हृदयाला भीडतं आणि ज्याचा रोजच्या जगण्याशी संबंध येतो तेच संगीत सदैव आठवणीत राहतं. माणसाच्या भावविश्वाशी कनेक्ट होताना कधीकधी शब्दही मुके होत असतात. ‘चिठ्ठी ना कोई संदेस , ज्याने वो कौनसा देस जहा तुम चले गए’ हे गीत त्यांनी व्हायोलीनवर वाजवलं. तेव्हा स्टुडीओत शब्द नव्हते पण त्यांचं अस्तित्व जाणवत होतं. आम्ही मंत्रमुग्ध झालो होतो. जणू काय काळच थांबलाय. व्हायोलीनची धून हृदयापर्यंत पोहचत होती. मोठी स्वप्नं पाहताना तंञज्ञानाचे गुलाम न होता, तुमचा आतला ‘स्व’ साधनेनं विकसित करा, हा त्यांचा संदेश खूप काही सांगून गेला....

लेखक - सचिन पाटील
(संहिता लेखक माहिती व जनसंपर्क महासंचालनालय)

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate