অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सर क्रिस्टोफर रेन

सर क्रिस्टोफर रेन

(२० ऑक्टोबर १६३२–२५ फेब्रुवारी १७२३). श्रेष्ठ ब्रिटिश वास्तुशिल्पज्ञ. विल्टशर येथे जन्म. त्याचे वडील धर्मोपदेशक होते. सुरुवातीस त्याने शास्त्र आणि गणित विषयांचा व्यासंग केला व १६५७ साली ऑक्सफर्ड येथे तो खगोलशास्त्राचा प्राध्यापक झाला. मात्र त्याची विज्ञानविषयक आस्था व व्यासंग अखेरपर्यंत टिकून होता. केंब्रिज येथील पेम्ब्रोक कॉलेज वास्तुसंकुलातील एक छोटेसे चर्च बांधून रेनने वास्तुनिर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश केला (१६६३). नंतर १६६४ ते ६९ मध्ये ऑक्सफर्ड येथील ‘शेल्डोनियन थिएटर’ची त्याने रचना केली. १६६६ साली लंडनमध्ये लागलेल्या भीषण आगीत भस्मसात झालेल्या ५२ चर्चवास्तूंची पुनर्रचना त्याने केली; त्यांतील सर्वांत महत्त्वाची रचना म्हणजे ‘सेंट पॉल्स कॅथीड्रल’ (१६७५ ते १७११). रेनच्या वास्तुनिर्मितीच्या कारकीर्दीतील सर्वांत महत्त्वाची आणि प्रबोधनकालीन वास्तुवैशिष्ट्यांनी सजलेली अशी ही उल्लेखनीय वास्तुरचना होय. रेनने जुन्या वास्तूच्या तुलनेत सेंट पॉल्स कॅथीड्रलचे क्षेत्रफळ पुनर्रचनेत ६४,००० चौरस फुट (५,९४६ चौ. मी.) इतके विस्तारित केले. त्यातील प्रमुख घुमट ११२ फुट (३४·१३ मी.) आहे, यावरून त्याच्या भव्यतेची कल्पना येऊ शकते. ह्याच्या रचनेत दोन प्रकारच्या स्तंभरचना केलेल्या आहेत. तळाच्या स्तंभरचना कॉरिंथियन शैलीत आहेत आणि त्यावरील स्तंभ संमिश्र शैलीचे आहेत. घुमटरचना तीन भिन्न कवचे एकमेकांत गुंफून केलेली आहे. ह्या वास्तूची एकंदरीत प्रमाणबद्धता हा रेनच्या प्रतिभेचा उत्तुंग आविष्कार मानला जातो.

रेनने आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या लंडन शहराची पुनर्रचना एका आराखड्याद्वारे केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. १६६९ मध्ये रेनची प्रमुख वास्तुतज्ञ म्हणून राजघराण्यात नेमणूक झाली; त्यामुळे राजवाडे, किल्ले, चर्च अशा अनेक वास्तूंची नव्याने निर्मिती किंवा पुनर्रचना करण्याचे प्रचंड कार्य रेनला करावे लागले. केन्झिंग्टन प्रासाद, हॅम्प्टन कोर्ट, व्हाईट हॉल, विंचेस्टर, सेंट जेम्स राजवाडा इ. राजप्रासाद, तसेच ग्रिनिच इस्पितळ, चेल्सी इस्पितळ, अमॅन्युएल कॉलेज चर्च, केंब्रिजची ट्रिनिटी लायब्ररी, टॉम टॉवर, ऑक्सफर्ड येथील कीम्स कॉलेज, ग्रिनिच येथील रॉयल ऑब्झर्वेटरी, बकिंगहॅमशरचा विन्स्लो हॉल व असंख्य चर्चवास्तू अशी अवाढव्य वास्तुनिर्मिती रेनने आपल्या राजघराण्यातील सेवाकारकीर्दीत केली. अमेरिकेतील काही नियोजित वास्तूंसाठीही रेनने आराखडे तयार करून दिले. १६७१ ते १६७६ दरम्यान त्याने लंडन स्मारकवास्तूची (मॉन्युमेंट) निर्मिती केली. भीषण आगीच्या स्मृतीप्रीत्यर्थ ही वास्तू उभारण्यात आली. रेनने आपली प्रत्येक वास्तुनिर्मिती कौशल्यपूर्ण अवकाशरचना करून केलेली आहे. वास्तूच्या उद्देशाला पूरक अशी भूरचना करून (लँडस्केपिंग) त्याद्वारे वास्तूच्या अंतर्भागात प्रकाशयोजना व वायुवीजन साधलेले आहे. शैक्षणिक वास्तुसमुहीत अंतर्गत प्रांगणे आहेत, त्यामुळे प्रत्येक वर्गाला प्रकाश उत्तम प्रकारे मिळतो. त्याने राजप्रासादांभोवती भव्य बगीचे केले; तर चर्चच्या रचनेत उत्तुंग मनोरे उभे केले. तो ‘रॉयल सोसायटी’ चा संस्थापक व १६८०−८२ या कालावधीत अध्यक्ष होता. त्याच्या वैज्ञानिक कामगिरीची प्रशंसा न्यूटन, पास्काल या शास्त्रज्ञांनी केली. १६७३ मध्ये त्याला ‘सर’ हा सन्माननीय किताब मिळाला.

लंडन येथे त्याचे निधन झाले. रेनच्या पुण्यतिथीच्या द्विशताब्दीनिमित्त (१९२३) त्याच्या सन्मानार्थ स्थापन झालेल्या ‘रेन सोसायटी’ ने रेनच्या वास्तुसाहित्याचे वीस खंडांमध्ये (शेवटचा खंड १९४३ मध्ये)

लेखक :विजय दीक्षित

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate