অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सान मार्को चौक

सेंट मार्क्स स्क्वेअर

व्हेनिसमधील प्रमुख मध्यवर्ती चौक. ह्या चौकाभोवती वेगवेगळ्या शैलींतील अनेक सुंदर, इतिहासकालीन वास्तू आहेत. बायझंटिन, गॉथिक, प्रबोधनकालीन अशा विविध शैलींतील ह्या वास्तू असून व्हेनिसच्या लौकिकात भर घालणाऱ्या तसेच त्याच्या गौरवशाली इतिहासाच्या साक्षी आहेत. ऐतिहासिक महत्त्वाचे तसेच भव्य व भपकेबाज शासकीय सोहळे व समारंभ जिथे साजरे होत असत, असे हे मध्यवर्ती स्थळ असून अद्यापि त्यास नागरी जीवनाचे केंद्र या दृष्टीने महत्त्व आहे. ‘सान मार्को बॅसिलिका’ (सेंट मार्क्स बॅसिलिका) ही या चौकातील सर्वांत प्रसिद्घ व प्रेक्षणीय वास्तू आहे.

बांधकाम

सान मार्को चौकाच्या पूर्वेस असलेल्या या बॅसिलिकेचे मूळ आकारातील बांधकाम इ. स. ८२९ मध्ये सुरू झाले आणि ही वास्तू पवित्र कार्यासाठी इ. स. ८३२ मध्ये अर्पण करण्यात आली. सेंट मार्कच्या अलेक्झांड्रिया येथून आणलेल्या पवित्र अवशेषांची प्रतिष्ठापना व जपणूक करण्यासाठी ही वास्तू मुख्यत्वे उभारली गेली. ‘सान मार्को बॅसलिका’  ही ‘डोज’ (व्हेनिसचा मुख्य दंडाधिकारी) याच्या प्रासादालगत बांधण्यात आली व तिचा वापर दंडाधिकाऱ्याचे–डोजचे– खाजगी प्रार्थनादालन (चॅपेल) म्हणून होत राहिला. ही मूळची, पहिली बॅसिलिका ९७६ मध्ये प्येअत्रो कांदिआनो चौथा ह्या डोजच्या विरुद्घ झालेल्या बंडाळीत आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. तथापि त्याचा उत्तराधिकारी डोज दोमेनिको काँतारिनी (मृत्यूसु. १०७०) याने ह्या बॅसिलिकेचे पुनर्बांधकाम करण्याचा निर्णय घेतला व १०७१ मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झाले. व्हेनिसचे कॅथीड्रल चर्च म्हणून या वास्तूचा वापर १८०७ पासून होऊ लागला. ह्या चर्चवास्तूचा रचनाकल्प ग्रीक क्रॉसच्या आकारासारखा असून, वास्तूच्या शिरोभागी पाच घुमट योजिले आहेत. हा रचनाकल्प खास बायझंटिन शैलीचा अप्रतिम नमुना मानला जातो.या वास्तूचे बांधकाम व सजावट करण्यासाठी बायझंटिन आणि इटालियन वास्तुशिल्पी व कारागीर राबत होते, असे म्हटले जाते. पुढील अनेक शतकांत ह्या चर्चवास्तूची सजावट ही संगमरवरी शिल्पपट्ट, कुट्टिमचित्रे, गॉथिक शैलीची शिखरे असे विविध अलंकरणात्मक घटक उपयोजून करण्यात आली. त्यायोगे ह्या चर्चवास्तूला कलात्मक समृद्घी व ऐश्वर्य प्राप्त झाले. वास्तूच्या दर्शनी प्रवेशद्वारावर सोनेरी मुलामा दिलेल्या बाँझची चार घोड्यांची शिल्पे बसविली होती. ही शिल्पे म्हणजे मूळ एका ग्रेको-रोमन विजयशिल्पाचे (क्वाड्रिगा–चारघोड्यांच्या रथाचे शिल्प) इ. स. पू. सु. चौथ्या-तिसऱ्या शतकांतील अवशेष असून ती कॉन्स्टँटिनोपल येथून व्हेनिस येथे चौथ्या धर्मयुद्घाच्या काळात, १२०४ मध्ये आणण्यात आली. तेराव्या शतकाच्या मध्यकाळात चर्चवास्तूच्या दर्शनी प्रवेशद्वारावर ही चार घोड्यांची प्रख्यात बाँझशिल्पे बसविण्यात आली.या शिल्पांमुळे वास्तूला एक अनोखे, रमणीय सौंदर्य प्राप्त झाले.सान मार्को बॅसिलिकेच्या जवळच एक घंटा-मनोरा आहे (दहाव्या शतकातील मूळ वास्तूची १९१२ मधील प्रतिकृती). त्याला जोडून लगतच त्याच्या पायथ्याशी  ‘लॉजेट्टा दी सान मार्को (१५३७–४०; पुनर्बांधकाम–१९०२)  ही लहान, कमानपथयुक्त वास्तू असून ती इटालियन वास्तुशिल्पज्ञ याकोपो सान्सोव्हीनो (१४८६–१५७०) याने उभारली. त्याने अभिजात शैलीतील चार बाँझशिल्पे, उत्थित पाषाणशिल्पे, तसेच ढेलजेच्या (कमानी  दरवाजा) अंतर्भागातील मॅडोना विथ चाइल्ड व सेंट जॉन द बाप्तिस्ट या आकर्षक पक्वमृदाशिल्पांनी ही वास्तू सुशोभित केली. ह्या वास्तूला जोडूनच घड्याळाचा मनोरा (पंधराव्या शतकाचा उत्तरार्ध) उभारण्यात आला. चौकाच्या उर्वरित भागाभोवती ‘प्रोक्युराती’च्या (सोळावे–एकोणिसावे शतक) कमानीयुक्त वास्तू आहेत. त्याच्या समोर बाहेरच्या बाजूला उपाहारगृहे आहेत. ह्या मुख्य चौकाच्या आग्नेय कोपऱ्याला एक लहानसा चौक असून, त्याच्या भोवती पूर्वेला ड्यूकचा प्रासाद (चौदावेशतक), दक्षिणेला ‘ कॅनॉल दी सान मार्को’ हा कालवा व पश्चिमेला सान्सोव्हीनोने उभारलेली जुनी ग्रंथालयवास्तू (१५३२–५४) आहे.

लेखक : श्री. दे.इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate