অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायक्लोपियन बांधकाम

दगडांचे बांधकाम

प्राचीन काळातील मोठमोठ्या ओबडधोबड आकारांच्या दगडांचे बांधकाम. ह्यात चुन्याचा वापर केलेला नसतो. हे तंत्र मुख्यत्वे तटबंदीच्या भिंतींच्या भक्कम बांधकामासाठी वापरले जाई. ‘सायक्लोपियन’ ही संज्ञा प्राचीन अभिजातपूर्व ग्रीक काळातील बांधकामरचनेच्या संदर्भात वापरली गेली. हा उत्तराभिमुख भव्य दगडी प्रवेशद्वार, मायसीनी.उत्तराभिमुख भव्य दगडी प्रवेशद्वार, मायसीनी.काळ सामान्यतः इ. स. पू. सु. ३००० ते इ. स. पू. ७०० असा मानला जातो. प्राचीन ग्रीक पुराणकथांतून सायक्लोपीझनामक एकाक्ष, नरभक्षक राक्षसांचे निर्देश आढळतात. त्या सायक्लोपीझ वंशीय राक्षसांनी (ग्रीक- ‘Kuklop’s ) ह्या अवाढव्य दगडांच्या बांधकामरचना केल्या, असा समज त्या काळी रू ढ होता; त्यावरुन ह्या बांधकामाला ‘सायक्लोपियन’ हे नाव पडले. अनेक प्राचीन गीक नगरांतील भिंतींचे बांधकाम अवाढव्य व ओबडधोबड दगडांचा वापर करून ह्या सायक्लोपीझनी केले, असा समज त्या काळी होता. पुढील काळात या संज्ञेचा अर्थविस्तार होऊन, मोठमोठ्या आकारांच्या बहुकोनीय दगडी ठोकळ्यांचा वापर करू न केलेल्या कोणत्याही बांधकामास अनुलक्षून ही संज्ञा वापरली जाऊ लागली.

आद्यकालीन सायक्लोपियन बांधकाम

सर्वांत आद्यकालीन सायक्लोपियन बांधकामांमध्ये जे मोठमोठे ओबडधोबड दगड वापरले जात, ते घडीव नसत; वा विशिष्ट नियमित आकारांचेही नसत. बांधकाम करताना ह्या दगडांच्या राशी रचल्या जात. मोठमोठे दगड वापरल्याने सांधेजोडीचे प्रमाण कमी होत असल्याने भिंतींच्या संभाव्य कमकुवतपणाच्या शक्यताही कमी असत. ह्या दगडांच्या राशींतील फटी, भेगा व पोकळ्या यांत छोटे छोटे दगडांचे तुकडे भरू न बुजविल्या जात. ह्या सर्व दगडांवर चिकणमातीने गिलाव्याप्रमाणे लिंपण करुन बांधकाम भरभक्कम बनविले जाई. चिकणमाती हे बंधक द्रव्य वा संयोगी द्रव्य म्हणून वापरले जात असे. चुन्याचा वापर बांधकामात केला जात नव्हता. अशा भिंती प्राचीन काळी क्रीट तसेच इटली, ग्रीस येथे बांधल्या गेल्या. क्रीट बेटावरील टिऱ्यन्स येथील अंतर्दुर्ग (इ. स. पू. सु. १३००) अशा प्रचंड भिंतींच्या बांधकामाने युक्त आहे. ह्या भिंतींची जाडी सु. २४ फुटांपासून (७ मी.) ते ५७ फुटांपर्यंत (१७ मी.) अशी आढळते. ह्या भिंतींच्या अंतर्भागांत कोठ्यांची (चेंबर) योजना केली होती, असे दिसून येते. यांखेरीज अर्‌गॉस व मायसीनी येथील अवाढव्य दगडी भिंती सायक्लोपियन बांधकामाची उदाहरणे होत. ग्रीसमध्ये अन्यत्रही अशा प्रकारच्या भिंती बांधल्या गेल्या. तसेच इटली, पेरू , माचू-पिक्चू व अनेक पूर्व-कोलंबियन जागी, मध्य पूर्वेकडे व आशियातही अशा अवाढव्य दगडी भिंती आढळतात.

ही बांधकामशैली पुढे जशी विकसित होत गेली, तसे ती वापरले जाणारे शिलाखंड कापून ते परस्परांत चपखलपणे बसविले जाऊ लागले व त्यातून बहुकोनीय वास्तुरचनाशैली विकसित झाली.

उगम

सायक्लोपियन क्राँकीट ही आधुनिक वास्तुसंज्ञा ह्या प्राचीन बांधकाम-पद्घतीतून उगम पावली. घनीभूत (मास) क्राँकीटचा हा प्रकार असून, ह्या प्रकारात क्राँकीट ओतत असताना दगड मिसळले जातात. हे दगड ‘प्लम्स’ किंवा ‘पुडिंग’ दगड म्हणून ओळखले जातात व त्यांचे वजन १०० पौंड वा त्याहून अधिक असते. ते साधारण ६ इंचांच्या अंतराने बसविले जातात व कोणत्याही पृष्ठभागापासून ते ८ इंचांपेक्षा जवळ नसतात.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate