অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिंहासन

राजासन व योगासन या दोन्ही प्रकारांचे विवेचन या नोंदीत केले आहे.

सिंहासन –१

राजाने वापरावयाचा खास वैशिष्ट्यपूर्ण असा एक आसनप्रकार. ह्याचा आकार सिंहाच्या आकृतीसारखा असल्याने ह्याला ‘सिंहासन’ हे नाव पडले.  प्राचीन काळी  राज्यभिषेकानंतर राजाला या आसनावर बसण्याचा अधिकार प्राप्त होत असे. सिंहासन हे  राजैश्वर्याचे, राजाच्या सार्वभौम अधिकाराचे, सत्तेचे आणि स्वामित्वाचे प्रतीक मानले जात असे. राजाप्रमाणेच राज्यकर्त्या राणीलाही सिंहासनावर बसण्याचा अधिकार प्राप्त होत असे. चर्चधील सर्वोच्च धर्मगुरुलाही सिंहासनाचा अधिकार मिळतो. अशा सिंहासनाधिष्ठित व्यक्तीला साहजिकच सार्वभौम अधिकार प्राप्त होतात. उंच अशा मंचावर उभारलेले सिंहासन हे राज्यातील सर्वश्रेष्ठ व सर्वोच्च आसन असून, त्यावर बहुधा छत्र असते.

प्राचीन काळतील  उच्चासन

अगदी प्राचीन काळापासून उच्चासनाचा हा प्रकार सर्वत्र रुढ आहे. प्राचीन आदिम जमातींत साधी लाकडी चारपायी बैठक (स्टूल) सत्ता व अधिकार दर्शविण्यासाठी वापरली जाई. नंतरच्या काळातील अधिक प्रगत अशा संस्कृतींमध्ये अधिकारनिदर्शक उच्चासन वा बैठक ही सुबक, आकर्षक अशा निरनिराळ्या आकृतिबंधांमध्ये, विविध निर्मितिसाधने वापरुन, तसेच वैभवदर्शक अलंकरणात्मक सजावट करुन तयार केली जाऊ लागली. ज्या विधी वा समारंभांसाठी विशिष्ट उच्चासनांचे प्रयोजन असे, ती उद्दिष्टे विचारात घेऊन अशी सिंहासने वा उच्चासने तयार केली जाऊ लागली व त्यांची अलंकरणात्मक सजावटही केली जाऊ लागली.

प्राचीन ग्रीक इतिहासाच्या प्रारंभकाळी सिंहासन म्हणजे देवाचे आसन, असे मानले जाई. नंतर ह्या संज्ञेचा अर्थविस्तार होत जाऊन लौकिक तसेच धार्मिक सर्वसत्ताधाऱ्यांच्या उच्चासनांनाही ‘थ्रोन’ (सिंहासन) असे म्हटले जाऊ लागले.

राजा सॉलोमनच्या सिंहासनाचे वर्णन बायबल मध्ये आले आहे. त्यानुसार ते शुद्घ सोन्याचा मुलामा दिलेले हस्तिदंती भव्य आसन होते. या सिंहासनाला सहा पायऱ्या होत्या व पादपीठ सोन्याचे होते. आसनाच्या दोन्ही बाजूंना बसविलेल्या हस्ताधारांच्या शेजारी दोन उभ्या सिंहमूर्ती होत्या. शिवाय प्रत्येक पायरीच्या दोन्ही बाजूंना एकेक सिंह असे एकूण बारा संरक्षक सिंह सहा पायऱ्यांच्या दुतर्फा उभे होते. अशा प्रकारचे भव्य सिंहासन त्या काळी अन्य कोणत्याही साम्राज्यात घडविले गेले नाही. सॉलोमनच्या या सिंहासनाचा आदर्श समोर ठेवूनच बायझंटिन सम्राटांनी आपले सिंहासन घडविले होते. हे सिंहासन सोनेरी सिंहप्रतिमांनी मढविले होते. फक्त त्यात एक सुधारणा म्हणजे, यांत्रिक सिंह बसविले होते. हे बैठे सिंह एका यांत्रिक क्लृप्तीच्या साहाय्याने गुरगुरतही असत. ॲसिरियन सम्राट सेनॅकरिब (इ. स. पू. ७०४— ६८१) याच्या प्रासादाच्या अवशेषांत शैलस्फटिकांपासून घडविलेल्या एका सिंहासनाचेही अवशेष आढळले. ‘ब्रिटिश म्यूझियम’ मध्ये सोने, हस्तिदंत, नीलाश्म, रक्ताश्म यांनी जडविलेल्या सिंहासनाचा एक अवशेष ठेवला आहे. हे सिंहासन बहुधा ॲसिरियाचा सम्राट दुसरा सारगॉन (इ. स. पू. ७२२– ७०५) याचे असावे. इराणचा शाह पहिला अब्बास (१५७१– १६२९) याचे सिंहासन संगमरवरी दगडात घडविले होते. प्राचीन ईजिप्तमधील  तूतांखामेन चे (इ. स. पू. सु. १३६६– १३५०) थडग्यातील सिंहासन कैरो येथील वस्तुसंग्रहालयात ठेवण्यात आले आहे. जडजवाहिरांनी मढविलेले हे सोन्याचे सिंहासन अद्वितीय व आकर्षक आहे. सर्वांत जुने उपलब्ध सिंहासन म्हणजे नॉसस च्या राजप्रासादाच्या भिंतीत बांधलेले सिंहासन (इ. स. पू. सु. १८००) होय.

प्राचीन ग्रीक व रोमन सिंहासने प्रायः संगमरवरी दगडात घडविलेली असून त्यांतील काही अद्यापही अवशिष्ट आहेत, तसेच तत्कालीन भित्तिलेपचित्रांतून व कलशचित्रांतूनही सिंहासनांच्या आकृती आढळून येतात.

ख्रिस्ती धर्माच्या उदयाबरोबरच यूरोपमध्ये राजकीय तसेच धार्मिक  उच्चपीठांच्या -सिंहासनांच्या-निर्मितीला प्रोत्साहन व चालना मिळत गेली. राज्यकर्त्यांच्या राज्यारोहणसोहळ्यात त्यांची सिंहासनावर विधिवत प्रतिष्ठापना केली जाई. चर्चमधल्या बिशप, कार्डिनल, ॲबट अशा पदाधिकाऱ्यांनाही उच्चासनावर-सिंहासनावर-बसण्याचा अधिकार होता. अशा प्रकारे यूरोपमध्ये ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर सिंहासन हे राजसत्तेप्रमाणेच धर्मसत्तेचेही प्रतीक बनले. प्रारंभीच्या काळातील काही धार्मिक सिंहासने ही चर्चच्या दगडी बांधकामामध्येच त्याचा एक भाग म्हणून त्याला जोडून तयार केली जात. उदा., व्हेनिसच्या बाहेर असलेल्या तोर्चेल्लो चर्चचे दगडी बांधकाम. तथापि सर्वांत जुने रोम येथील सेंट पीटरच्या चर्चमधील सिंहासन (चौथे शतक) हे ओक वृक्षाचे लाकूड व हस्तिदंत यांनी घडविले होते. हे सिंहासन पोपच्या सार्वभौम अधिकाराचे प्रतीक मानले जाई. आर्चबिशप मॅक्झिमियन (कार. ५४६– ५६) ह्याचे राव्हेन्ना येथील भव्य हस्तिदंती सिंहासन त्यावरील उत्थित शिल्पांकनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरले. प्रत्येक धर्मगुरुला (बिशप) आपल्या कॅथीड्रलमध्ये सिंहासन (कॅथीड्रा) असते. फ्रँक राजा पहिला दागबर्त (६०५–३९) याचे सिंहासन सोन्याचे होते, अशी पारंपरिक समजूत आहे. त्याची ब्राँझ प्रतिकृती पॅरिस येथील सँ दनी कोशागारात आहे. ब्राँझ सिंहासन म्हणजे वस्तुतः घडीची चारपायी बैठक (स्टूल) आहे. हे ब्राँझ सिंहासन आठव्या शतकात घडविण्यात आले व बाराव्या शतकात त्यात ॲबट शूगरने भर घातली. नेपोलियन बोनापार्टला ‘लीजन ऑफ ऑनर’ने सन्मानित केले (१८०४), त्या प्रसंगी तो या सिंहासनावर बसला होता. त्याचे स्वतःचे सिंहासन शार्ल पर्सिए व प्येर फाँतेन यांनी घडविले होते. हे सिंहासन ईजिप्शियन व रोमन अलंकरणापासून स्फूर्ती घेऊन विपुल अलंकरणाने सुशोभित केले होते. तेराव्या शतकातील ब्रिटिश सिंहासन हे ओक वृक्षाच्या लाकडापासून गॉथिक शैलीत बनविले होते. ते ‘हाउस ऑफ लॉर्ड्स’मधले उच्चासन होते. राज्यारोहणसोहळ्यांत वापरल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व अद्वितीय सिंहासनाचा नमुना कोपनहेगन (डेन्मार्क) येथील रोझनबर्ग राजवाड्यातील हस्तिदंती सिंहासनाच्या रुपात उपलब्ध आहे. बेंडिक्स ग्रॉट्‌शिलिंग याने सु. १६६५ मध्ये तयार केलेल्या ह्या सिंहासनाच्या घडणीत हस्तिदंताबरोबर नॉर्व्हल या जलचर प्राण्याच्या सुळ्यांचा वापर केला होता. सोनेरी मुलाम्याने व ब्राँझमधील रुपकात्मक शिल्पाकृतींनी हे सिंहासन सजविले होते. १६७१ ते १८४० या कालावधीत झालेल्या राज्यारोहणसोहळ्यांमध्ये हे सिंहासन वापरले गेले. स्टॉकहोम येथील स्वीडिश कोशागारात असलेले चांदीचे सिंहासन हे अब्राहम ड्रेंट्‌वेट याने ऑग्झबर्ग येथे १६५० च्या सुमारास राणी ख्रिस्तीनासाठी तयार केले. सोळाव्या शतकातील रशियन झार बऱ्यीस गदुनोव्ह (सु.१५५१ — १६०५) याचे सिंहासन मॉस्को येथील क्रेमलिनमध्ये आहे. ह्या लाकडी सिंहासनावर सोनेरी वर्ख दिला आहे व पिरोजासारखी रत्ने जडविली आहेत. सोळाव्या शतकातील चौथा झार इव्हान याच्यासाठी लाकूड व हस्तिदंत वापरुन तयार केलेले एखाद्या अवाढव्य आरामखुर्चीसारख्या आकाराचे सिंहासन क्रेमलिनमध्ये आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत रशियन राज्यभिषेकसोहळ्यांसाठी या सिंहासनाचा वापर प्रामुख्याने होत असे.

क्रेमलिनमधील आणखी एका भव्य सिंहासनाच्या घडणीत सोन्याचा वापर केला असून त्याच्या अलंकरणात ८,००० पिरोजा रत्ने, १,५०० माणके, ४ जमुनिया व २ पुष्कराज यांच्या जडावकामाने सजावट केली आहे. पीटर द ग्रेट याच्या आजोबांसाठी हे सिंहासन तयार केले होते.

भारतातील सिंहासनांचा वापर

भारतात प्राचीन काळापासून राजांसाठी सिंहासनांचा वापर होत असल्याचे उल्लेख आढळतात. प्राचीन काळी राज्यभिषेकप्रसंगी ‘आसंदी’ वापरत असल्याचे उल्लेख ऐतरेय , शतपथ  इ. ब्राह्मणग्रंथांत आढळतात. सिंहासनाचा पूर्वावतार म्हणजे ‘आसंदी’ (मोळाच्या दोरीने विणलेली, लाकडी चार पायांची घडवंची). ती सिंहासनसदृश असावी, असे दिसते. वाल्मिकिरामायणात सिंहासनाचा उल्लेख ‘भद्रपीठ’ असाही केला आहे. वनवासानंतरच्या पट्टाभिषेकप्रसंगी वापरलेले भद्रपीठ रत्नमय होते, असा रामायणात उल्लेख आढळतो. युधिष्ठिराचे एक सिंहासन रत्नजडित हस्तिदंताचे होते. युधिष्ठिराच्या राज्याभिषेकप्रसंगी युधिष्ठिर व कृष्ण निरनिराळ्या सोन्याच्या सिंहासनांवर आणि कुंती, नकुल व सहदेव हे हस्तिदंताच्या सुवर्णजडित सिंहासनांवर बसल्याचे उल्लेख महाभारतात आढळतात. मथुरेत कुशाण सम्राट वीम कडफिसस याचे दगडी सिंहासन मिळाले आहे. रायपसेणिय ह्या प्राचीन जैन ग्रंथात या सिंहासनासंबंधी विपुल माहिती दिली आहे. त्यात चांदीपासून बनविलेल्या सिंहासनाचाही उल्लेख आहे. मानसार या प्राचीन वास्तुविषयक ग्रंथात सिंहासन हे देव व राजा यांच्यासाठी असते, असे म्हटले आहे. राजाचे सिंहासन पूर्वाभिमुख असावे, असेही मानसार मध्ये सांगितले आहे. नित्यार्चन, विशेष, नित्योत्सव व विशेषोत्सव हे देवाच्या सिंहासनाचे; तर प्रथम, मंगल, वीर व विजय हे राजाच्या सिंहासनाचे प्रकार वर्णिले आहेत. पद्मासन, पद्मकेसर, पद्मबंध, पद्मभद्र, श्रीभद्र, श्रीविशाल, श्रीमुख, भद्रासन व पादबंध हे सिंहासनाच्या वर्णनांत येणारे काही पारिभाषिक निर्देश होत. यांतील पद्मासन हे शिव वा विष्णू यांच्यासाठी, तर पद्मभद्र हे सम्राटासाठी असते, असे म्हटले आहे. भद्रासन (भद्रपीठ) यावर रामाचा नातू कुशपुत्र अतिथी याचा राज्याभिषेक झाल्याचा उल्लेख कालिदासाने रघुवंशात केला आहे. हर्षाने भद्रपीठावर बसूनच राज्यकारभार केल्याचे उल्लेख आढळतात. सोमेश्वरकृत अभिलषितार्थचिंतामणी त आसनांचे नऊ प्रकार वर्णिले असून सिंहासन हा त्यांतीलच एक विशेष प्रकार असल्याचे म्हटले आहे. राजदरबारात राजा सिंहासनावर बसून राज्यकारभार करतो, असे त्यात म्हटले आहे. सिंहासन हे आठ हात रुंद, आठ हात लांब व एक पुरुष उंचीचे असावे; त्यास पायऱ्या असाव्यात; सिंहासनामध्ये राजाला बसण्याची जागा चार हात रुंद व चार हात लांब असावी, अशीही वर्णने आढळतात. भोजराजकृत युक्तिकल्पतरुमध्ये (अकरावे शतक) राजाच्या सिंहासनाचे पद्म, सिंह, भृंग, मृग, शंख, गज, हंस व हय हे आठ प्रकार वर्णिले आहेत. ह्या सिंहासनांवर कोरलेल्या कमळ, सिंह, भुंगा, हरिण, शंख, हत्ती, हंस व घोडे या आकृत्यांवरुन त्यांना ती नावे देण्यात आली. विक्रमादित्याचे सिंहासन इतिहासप्रसिद्घ असून सिंहासनबत्तिशी   हा ग्रंथ त्यावरच रचला आहे. कोहिनूर हिरा बसविलेले रत्नजडित सोन्याचे मयूरसिंहासन (तख्त-ए-ताऊस) हे भारताच्या ऐतिहासिक वैभवाचे द्योतक होते. शाहजहानने (१५९२— १६६६) ते तयार करुन घेतले. ते माणके, हिरे, पाचू, मोती इ. रत्नांनी लगडलेले होते. सिंहासनाच्या खांबांच्या शिखरावर दोन-दोन मोर असल्यामुळे त्यास मयूर सिंहासन हे नाव पडले. नादिरशाह ने ते १७३९ मध्येच इराणला नेले.

छ. शिवाजीराजे यांचे शाही सिंहासन

छ. शिवाजीराजे (१६३०— १६८०) यांचे शाही सिंहासन सोन्याचे होते. त्याचे सुवर्णांकित आठ स्तंभ हिरे, माणके, पाचू, मोती आदी रत्नांनी अलंकृत होते. त्यावर सोन्याचे नक्षीदार छत्र असून त्यावरुन खाली रत्नांच्या माळा सोडल्या होत्या. मूळ बैठकीवरील व्याघ्रांबरावर मखमल आच्छादली होती. बैठकीच्या दोन्ही बाजूंस राजपददर्शक चिन्हांसोबत डावीकडे दोन कीर्तिमुखांच्या प्रतिमा कोरल्या होत्या. सिंहासनाच्या रचनाबंधात पारंपरिक हिंदू धार्मिक प्रतीके आणि मोगल वैभव यांचा सुरेख संगम झाला होता. मात्र पेशव्यांचे सिंहासन (मस्नद) साधे, उंच व भरतकाम केलेल्या हिरव्या मखमलीने आच्छादिलेल्या गादीचे होते. तीवर हिरव्या मखमलीचा अभ्रा घातलेला लोड व तशाच दोन उशा होत्या.

सिंहासन –२

सिंहासन हा  योगासनांतील एक प्रकार आहे. हे कष्टसाध्य आसन असून ह्याची कृती पुढीलप्रमाणे : दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून मागे न्यावेत आणि चवड्यावर बसावे. कुल्ले टाचांवर यावेत. गुडघ्यांमध्ये थोडे अंतर असावे. उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंजा डाव्या गुडघ्यावर ठेवावा. हातांची बोटे ताठ ठेवावीत. पोट दाबलेले व छाती फुगवलेली असावी. तोंड शक्य तितके उघडे ठेवून जीभ बाहेर काढावी. डोळे उघडे ठेवावे. श्वास तोंडाने घ्यावा, श्वासाबरोबर पोट आतबाहेर करावे. या आसनामुळे शरीराचा बांधा सिंहासारखा मजबूत व डौलदार होतो. जिभेचा तोतरेपणा नाहीसा होतो. अर्धांगवायूच्या रोग्यांनाही हे आसन लाभदायक ठरते.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate