অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुलेखन कला भाग १

सुलेखन कला भाग १

(कॅलिग्राफी). सुंदर हस्ताक्षराची कला. मात्र सुलेखन हे माणसाचे सामान्य हस्ताक्षर असे नसून एका विशिष्ट हेतूने प्रेरित सौंदर्यपूर्ण हस्ताक्षर या दृष्टिकोणातून त्याकडे पाहावे लागते. वाचनीयता हा अक्षरसौंदर्याचा प्राथमिक घटक होय. या दृष्टीने अक्षरांच्या उंची-लांबी-रुंदीची प्रमाणे ही लेखणीच्या टोकाच्या (कटनिब) जाडीच्या पटीत मांडले ली दिसून येतात. सुवाच्य, सुस्पष्ट अक्षर-लेखनाबरोबरच अक्षरांच्या सौंदर्यावर, अलंकरण व सजावटीवर सुलेखनात जास्त भर दिला जातो. सुलेखनामागे प्रामुख्याने कलात्मक उद्दिष्टे व प्रेरणा असतात आणि दर्शकाला सौंदर्यानुभूती व उच्च प्रतीचा कलात्मक आनंद देण्याची भूमिका असते. त्यामुळे सुलेखन हा एक ललित कलाप्रकार मानला जातो. सुलेखनात वर्णाला, अक्षरे यांची आकारिक चिन्हे (सिम्बॉल्स) ही कलात्मक आविष्काराची साधने म्हणून वापरली जातात. ‘कॅलिग्राफी’ हा शब्द मूळ ग्रीक ‘Kalligraphia’ ह्या, ‘सुंदर अक्षर’ ह्या अर्थाच्या शब्दापासून व्युत्पन्न झाला. फार प्राचीन काळापासून लेखनाची दोन गटांत विभागणी होत आली आहे : (१) व्यवहारोपयोगी वा कार्यसाधक (फंक्शनल) आणि (२) अलंकरणात्मक वा सौंदर्य-साधक (डेकोरेटिव्ह). प्राचीन ग्रीक लेखक फलास्ट्रट्स याने असे लिहून ठेवले आहे, की टायनाचा अपोलोनीअस (इ. स. पहिले शतक) हा ग्रीक तत्त्वज्ञ प्रवासाला निघताना आपल्या सोबत दोन कुशल लेखनिक (स्क्राइब) बाळगत असे. त्यांपैकी एक शीघ्रलेखनात, तर दुसरा संदर हस्ताक्षरलेखनात निपुण असे.

सुलेखनाचे आद्य व प्रधान उद्दिष्ट नेत्रसुखदता हे होय. अक्षरे डोळ्यांना सुंदर दिसली पाहिजेत हे आद्य प्रयोजनतत्त्व व ते साधण्यासाठी कित्येकदा सुवाच्यता, सुस्पष्टता हे लेखनाचे मूळ गुणधर्मही दुर्लक्षिले जात. पौर्वात्य लिपी वाचू न शकणाऱ्या दर्शकालाही त्या लिपीतले अक्षरसौंदर्य मोहून टाकते. असे असले तरी, सुलेखनकलेच्या आदर्श,परिपूर्ण आविष्कारात सौंदर्य व वाचनसुलभता यांचा सुरेख मेळ साधलेला दिसून येतो. अक्षरांची नेमकी व सुबक घडण, वेगवेगळ्या सुट्या अक्षरावयवांची वा घटकांची सुसंघटित क्रमबद्घ रचना, तसेच प्रमाणबद्घ व सुसंवादी एकात्म मेळातून साधलेले कलात्मक अक्षराकृतिबंध हे सुलेखनकलेचे स्वरुपवैशिष्ट्य म्हणता येईल. सुलेखनकलेत अक्षरांच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीच्या अफाट शक्यतांचे विस्तीर्ण क्षितिज सुलेखनकाराला खुणावत असते. त्यातून सुलेखनाचे अक्षरशः अगणित वैविध्यपूर्ण नमुने देशोदेशींच्या कलाविष्कारांतून पहावयास मिळतात. इस्लामी संस्कृतीत सुलेखनकलेला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा प्राप्त झाली. चिनी अक्षरे ही मुळातच  चित्रलिपी च्या— म्हणजेच सौंदर्यवस्तूच्या (इस्थेटिक ऑब्जेक्ट) – स्वरुपाची असल्याने त्यांत कलात्मक अभिव्यक्तीला मनसोक्त वाव मिळाला. चिनी संस्कृतीत आणि चिनी सुलेखनाच्या प्रभावाखाली असलेल्या अन्य देशांतही सुलेखनाला चित्रकलेच्या बरोबरीनेच उच्च दर्जा व प्रतिष्ठा लाभत गेली.

सुलेखन हे प्राचीन काळापासून ग्रंथ, हस्तलिखिते यांच्या सजावटीसाठी जसे वापरले गेले, तसेच ते पुढील काळात इमारती, अन्य कलाकृती यांच्या सजावटीमध्येही वापरले जाऊ लागले. सुलेखन करण्यासाठी सुलेखनकारांनी प्राचीन काळापासून ते आजतागायत वेगवेगळ्या प्रकारची माध्यम-साधने हाताळली, असे दिसून येते. उदा., पपायरस, भूर्जपत्रे, ताडपत्रे, मृदू चर्मपत्रे (व्हेलम), कापड, फलक, कागद इ. माध्यमे लेखनासाठी वापरली गेली, तसेच निरनिराळ्या प्रकारच्या लेखण्या, पक्ष्यांच्या पिसांच्या लेखण्या (क्विल), बोरु, कुंचले, टाक, पेने, निबांचे टोकदार, गोलाकार, तिरपे, चपटे यांसारखे विविध प्रकार, वेगवेगळ्या रंगीत शाई व रंग वगैरे बहुविध साधने वापरली गेली आहेत. यांपैकी अनेक माध्यम-साधने आजही वापरात आहेत.

यूरोपीय सुलेखनकलेचा, अभिजात काळापासून ते प्रबोधनकाळापर्यंतच्या ऐतिहासिक विकासक्रमाचा आढावा हा मुख्यत्वे  पुराभिलेखविद्ये च्या (इतिहासकाळी लिहिल्या गेलेल्या मजकुराचा पद्घतशीर शास्त्रशुद्घ अभ्यास) शास्त्राशी निगडित आहे. वेगवेगळे लिपिप्रकार, त्यांची प्रादेशिक गुणवैशिष्ट्ये यांवर प्रभाव टाकणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक, बौद्घिक, आर्थिक इ. घटकांचा अभ्यास हा स्थूलमानाने पुराभिलेखविद्येच्या कक्षेत येतो. सुलेखन ही स्वरुपतःच एक ललित कला आहे आणि सुलेखनकलेच्या ऐतिहासिक विकासक्रमात निरनिराळ्या देशांतल्या, वेगवेगळ्या कालखंडांतल्या बदलत्या कलाभिरुचींचे प्रतिबिंब स्वाभाविकच उमटलेले दिसून येते आणि त्याचा अभ्यास हा सौंदर्य-समीक्षेच्या प्रांतात मोडतो.

ग्रीक सुलेखन : सर्वांत आद्य ग्रीक हस्ताक्षर-लेखनाचे दोन प्रमुख प्रकार इ. स. सु. आठव्या शतकापर्यंत प्रचलित होते व ते कार्यवादी उद्दिष्टांनुसार वापरले जात होते. त्यांपैकी एक प्रकार म्हणजे ग्रंथांच्या हस्तलिखित नकला तयार करण्यासाठी केले जाणारे लेखन. हा लेखनप्रकार मुख्यत्वे दस्तऐवज तयार करणे, पत्रलेखन यांसाठी वापरला जाई. दुसरा प्रकार ‘युन्सिअल’ म्हणजे वाटोळ्या मोठ्या अक्षरांच्या (कॅपिटल्स) अक्षरलिपीत केले जाणारे लेखन. चौथ्या ते आठव्या शतकांतील प्राचीन हस्तलिखितांतून हा प्रकार आढळतो. हे लेखन अलंकरणप्रधान, सुशोभित स्वरुपाचे असून त्यातील अक्षरे शैलीदार, सुस्पष्ट व मोठ्या अक्षरांच्या लिपीत लिहिली जात. ग्रीक लिपीपासून रोमन वा लॅटिन लिपीची उत्पत्ती झाली असावी, असे काही विद्वानांचे मत आहे.

रोमन सुलेखन : प्राचीन काळातील लिखित रोमन वा लॅटिन लिपींतील अक्षरे साधारणतः चौकोनी आकार घडणीची ‘कॅपिटल्स’ होती. त्यांत हळूहळू परिवर्तने होत जाऊन इ. स. सहाव्या ते आठव्या शतकांत ‘हाफ-युन्सिअल’ लिपीचा उदय झाला. प्रत्येक अक्षराची उंची व आकार यात नेमकेपणा व प्रमाणबद्घता साधण्याकडे या लिपीचा कल होता. लेखनपद्घतीतील या सुधारणेमुळे सुलेखनकलेला चालना मिळाली. ‘हाफ-युन्सिअल’ ही पश्चिमी जगातील पूर्ण विकसित अशी ‘मिनुस्कूल’ किंवा लहान (स्मॉल) अक्षरांची लेखनलिपी होती. ही लेखनपद्घती सुलेखनाच्या विकासास मुख्यत्वे तीन कारणांनी पूरक व उपयुक्त ठरली : ह्यातील अक्षरांची आकारघडण वा रचनाबंध मूलतःच सौंदर्यानुकूल असून त्यातून सुलेखनाच्या एका प्रमुख संप्रदायाला चालना मिळाली व त्याचा उत्तरकालीन लेखनकलेवर स्थायी प्रभाव पडला. साधारणतः अक्षरांच्या चौकोनी आकारघडणीपेक्षा गोलाकार घडणीची अक्षरे ही या लेखनप्रक्रियेमध्ये जास्त सहज-सुलभ ठरतात. या तत्त्वानुसार प्रवाही (कर्सिव्ह) लेखनशैली ही शीघ्रलेखनासाठी व सुलेखनासाठी जास्त उपयुक्त ठरली. दस्तऐवज-लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘कर्सिव्ह’ लेखनातून लहान अक्षरलेखनाचे घाट व वळणे उत्क्रांत होत गेली व त्यातूनच पुढे ‘हाफ-युन्सिअल’ ही परिपूर्ण विकसित शैली निर्माण होऊन ती सुलेखनकलेला उपकारक ठरली. याशिवाय लेखन-साधनांमध्ये होत गेलेले बदलही सुलेखनकलेला चालना देणारे ठरले. पूर्वीच्या काळी पपायरसांवर केले जाणारे लेखन आता मृदु चर्मपत्रांवर केले जाऊ लागले. तसेच पक्ष्यांच्या पिसांच्या (उदा., राजहंस, हंस, टर्की, मोर इ.) लेखण्या, टोकदार वा टोकाला पटाशीसारखे तिरपे तासलेले बोरु ह्यांचा वापर लेखनासाठी होऊ लागला. अक्षरांमधील कमीअधिक जाडीचे वा बारीक पातळ रेषांकन त्यामुळे शक्य झाले.

अक्षरांची उंची, जाडी, पसरटपणा तसेच गोल, वाटोळे, चौकोनी इ. आकार, घाट, वळण इ. घटकांमध्ये वैविध्य आणून सुलेखनात सौंदर्य निर्माण करता येते, ही जाणीव सुलेखनकाराच्या ठायी त्या काळी निर्माण झाली व आजही अक्षरांकनाच्या वेगवेगळ्या शैलींमध्ये हे घटक कल्पकतेने व नावीन्यपूर्ण रीतीने उपयोजून सौंदर्य-निर्मिती साधली जाते. ह्या सौंदर्यदृष्टीचा पाया त्या काळात (सातवे-आठवे शतक) घातला गेला. विसाव्या शतकातील इंग्लिश सुलेखनकार एडवर्ड जॉन्स्टन याने ही सुलेखनलिपी परिपूर्ण असल्याचा अभिप्राय नोंदवला आहे. तो बुक ऑफ केल्स  (ट्रिनिटी कॉलेज, डब्लिन ) व लिंडिसफार्न गॉस्पेल्स (ब्रिटिश म्यूझियम) ह्या हस्तलिखितांच्या संदर्भांत जास्त अन्वर्थक आहे. शार्लमेनच्या कारकीर्दीत इ. स. आठव्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते नवव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत ‘कॅरोलिंजिअन मिनुस्कूल’ ही महत्त्वाची सुलेखनलिपी विकसित झाली. तूर्स येथील ‘सेंट मार्टिन्स’चा मठाधिपती ॲबट ॲल्‌क्विन (सु. ७३२–८०४) याच्या आधिपत्याखाली कॅरोलिंजिअन लिपी विकसित झाली. सुस्पष्ट, आकलनसुलभ अशा सुलेखनशैलीत लिहिलेल्या गोल्डन गॉस्पेल्स नामक शोभिवंत उत्कृष्ट हस्तलिखितांचे श्रेय ॲल्क्विनला दिले जाते.

मध्ययुगीन कालखंडात ‘गॉथिक’ (सु. ११५०–१४००) ही महत्त्वाची अलंकरणप्रधान सुलेखनशैली उदयास आली. ती ‘ब्लॅक लेटर’ सुलेखनपद्घती म्हणूनही ओळखली जाते. ब्लॅक लेटर सुलेखनपद्घतीचे वैशिष्ट्य म्हणजे मृदू , रुंद व तिरप्या छेदाच्या निबेचा वापर करुन अक्षरणात रेखाटलेले जाड, रुंद रेषांचे तसेच केसासारख्या सूक्ष्म बारीक रेषांचे फटकारे (स्ट्रोक्स). ह्या अक्षरणात दबल्यासारखी दिसणारी अक्षरे (कंप्रेस्ड लेटर्स) काढून त्यांत वक्राकारांच्या ऐवजी आखूड, छोट्या, तिरप्या फटकाऱ्यांचा वापर केला जाई. या लेखन-पद्घतीवरुनच पुढे ‘ब्लॅक लेटर’ ह्याच नावाची इंग्रजी मुद्रण ठश्यांची मुद्राक्षरपद्घती अस्तित्वात आली. ब्लॅक लेटर वा गॉथिक ही त्या काळात सुलेखनकाराची सर्वोत्कृष्ट कलासिद्घी मानली गेली. पीत्रार्क (१३०४– ७४) ह्या तत्कालीन विख्यात इटालियन कवी - विद्वानाने ‘गॉथिक’ सुलेखनशैलीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. या ‘गॉथिक’ सुलेखनशैलीची तुलना तत्कालीन वास्तुकलेशी केली गेली. युन्सिअल व हाफ-युन्सिअल अक्षरांचे साधर्म्य रोमनेस्क चर्चवास्तूंच्या आकारांशी, तर ब्लॅक लेटर्स चे साधर्म्य गॉथिक शैलीच्या कॅथीड्रल वास्तूंशी दर्शविले गेले.

प्रबोधनकाळ : चौदाव्या ते सोळाव्या शतकांत भरभराटीस आलेल्या मानवतावादी वाङ्‌मयीन चळवळीतून दोन प्रमुख लिपी उदयास आल्या व त्यांचा प्रभाव उत्तरकालीन सर्व हस्ताक्षरलेखनशैलींवर आणि मुद्रणाच्या शोधानंतर (सु. १४५०) मुद्राक्षरांच्या वळणांवर पडला. ‘रोमन’ व ‘इटॅलिक’ ह्या त्या दोन लिपिशैली होत. यूरोपमधील पुढील काळातील सर्वच प्रकारचे हस्ताक्षरलेखन, अक्षरण व सुलेखन तसेच मुद्रणही या दोन लेखनप्रकारांनी प्रभावित केले. मुद्रणाचा शोध व प्रसारानंतर सुलेखन हे जास्तीत जास्त ठळक, ठाशीव, ठसठशीत व अलंकरणप्रचुर होत गेले. ह्याचे मुख्य कारण मुद्रित मजकुरापेक्षा सुलेखनाचे वेगळेपण व स्वतंत्र अस्तित्व ठळकपणे व प्रकर्षाने अधोरेखित करणे हेच होते. मुद्रणाच्या शोधानंतरची जवळजवळ २०० ते ३०० वर्षे यूरोपीय सुलेखन हे जाड ठळक अक्षरांकन व विपुल, समृद्घ अलंकरण या वैशिष्ट्यांनी युक्त होते.

प्रबोधनकाळात नव्यानेच हाती लागलेल्या प्राचीन अभिजात संहितांचे प्रतिलेखन करणे, हे तत्कालीन विद्वज्जनांचे प्रमुख उद्दिष्ट होते. अशा विद्वत्तापूर्ण लेखनकार्यासाठी त्यांना अलंकरणप्रधान गॉथिक लेखनशैली निरुपयोगी वाटल्याने त्यांनी नवी ‘मानवतावादी अक्षरलिपी ’ (ह्यूमॅनिस्टिक स्क्रिप्ट) निर्माण केली व त्याला त्यांनी नाव दिले : ‘लेटेरा अँटिका’ (द ओल्ड लेटर). ह्या लिपिलेखनपद्घतीवर सुरुवातीला ‘कॅरोलिंजिअन मिनुस्कूल’ पद्घतीचा प्रभाव होता. स्वच्छ, स्पष्ट, नीटनेटके व शीघ्रगतीने लेखन करणे हे मानवतावादी लिपिलेखनपद्घतीचे प्रमुख वैशिष्ट्य होते. सौंदर्यवादी दृष्टिकोण हा त्या मानाने दुय्यम मानला गेला; तथापि पुढे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीमध्ये आर्थिक सुबत्ता व सत्ता यांच्या वैभवकाळात अभिजात ग्रंथांच्या शाही (डिलक्स) आवृत्त्यांची मागणी जसजशी वाढत गेली, तसतशी सुलेखनकलेची भरभराट होत गेली. अभिजात ग्रंथांच्या शाही हस्तलिखित आवृत्त्यांमध्ये सुलेखनाचे नानाविध शोभिवंत, अलंकरणयुक्त प्रकार दिसू लागले. पंधराव्या शतकाच्या मध्यापासून पुढील साधारण १५० वर्षे हा इटालियन सुलेखनकलेचा सुवर्णकाळ होता. १४५०–१५०० या काळात इटलीमध्ये हस्तलिखितांच्या उत्तमोत्तम नकला करणारे अनेक श्रेष्ठ दर्जाचे सुलेखनकार (अमॅन्युएन्सिस) होऊन गेले. या काळात प्रबोधनकालीन लेखक-कलावंतांचे अभिजात रोमन कोरीव लेखांमधले स्वारस्य वाढीस लागले आणि ह्या कोरीव लेखांतील अक्षरांकनाचा प्रभाव सुलेखनकलेवर पडला. व्हेरोना येथील फेलिस फेलिस्यानो ह्या पुरातत्त्वविद लेखकाने १४६३ च्या सुमारास सुलेखनकलेवर एक संशोधनपूर्ण हस्तलिखित प्रबंध सिद्घ केला. त्यात रोमन वर्णमालेतील अक्षरांच्या भौमितिक आकृत्या रेखाटल्या होत्या. मुद्रणाच्या शोधानंतर सुलेखनकलेवर जशा काही स्वाभाविक मर्यादा आल्या, तसेच त्याचे विशेषीकरणाचे क्षेत्रही विस्तारत गेले. ‘लेटेरा अँटिका’ ही नियमबद्घ मानवतावादी लेखनपद्घती मागे पडली; तथापि तिच्याशी सादृश्य असलेली अनौपचारिक अशी मानवतावादी प्रवाही लेखनलिपी (कर्सिव्ह स्क्रिप्ट) मात्र पुनरुज्जीवित होऊन तिला नवचैतन्य लाभले. ही लवचीक व शीघ्रलेखनसाठी उपयुक्त अशी प्रवाही लेखनलिपी आजही तिचे महत्त्व टिकवून आहे. सुमारे १४७०–८० या दशकात या लिपीला ग्रंथाक्षरलेखनासाठी (बुक हँड) मान्यता मिळून सुलेखनकलेला दर्जा व प्रतिष्ठाही प्राप्त झाली. लूडोव्हिको आर्रीघी या इटालियन सुलेखनकार-मुद्रकाने सुलेखन-अक्षरे गिरविण्यासाठी पहिली कित्तावही (कॉपीबुक) सु. १५२२ मध्ये तयार करुन प्रसिद्घ केली. तसेच तिरप्या (इटॅलिक) वर्णाक्षरांचे आकृतिबंध व मुद्रणठसे तयार केले. सोळाव्या शतकातील उल्लेखनीय जर्मन सुलेखनकारांत यूर्बानूस व्हीस हा सर्वांत प्रभावी होता.

प्रबोधनोत्तर सतराव्या शतकात सुलेखनकलेला उतरती कळा लागली. केवळ सुशोभनासाठी, अलंकरणासाठी केले जाणारे हस्ताक्षरलेखन जवळजवळ लोप पावले. सुलेखनकाराचा व्यवसायही हळूहळू नामशेष होत चालला. अशा प्रतिकूल अवस्थेत केवळ फ्रान्समध्ये सुलेखनकला व ग्रंथसजावट काही प्रमाणात तग धरुन होती. शिक्षणक्षेत्रातील कित्तावह्यांची प्रथा यूरोप-अमेरिकेत एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भरभराटीस होती; पण एकूण सुलेखनाचा दर्जा मात्र सामान्य प्रतीचाच राहिला.

आधुनिक काळ : विसाव्या शतकात इंग्लंड, जर्मनी व अमेरिका येथे सुलेखनकलेचे घडून आलेले पुनरुज्जीवन ही कलाजगतातील एक अभूतपूर्व घटना ठरली. ह्या चळवळीचे पूर्वसूरी म्हणून एकोणिसाव्या शतकातील इंग्रज वास्तुशिल्पज्ञ ओवेन जोन्स (१८०९–७४) आणि इंग्रज कारागीर-कवी  विल्यम मॉरिस (१८३४–९६) यांचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल. हे दोघेही मध्ययुगीन हस्तलिखितांचे जाणकार संग्राहक होते. ओवेन जोन्सने मध्ययुगीन गॉथिक वा ब्लॅक लेटर पद्घतीच्या आधारे सुलेखनाचे प्रयोग केले. त्याने बारीक टोकाच्या पोलादी लेखणीने अक्षरांचे बाह्य रेषांकन आधी करुन मग आकारघडणीच्या आतल्या पोकळ जागा कुंचल्याने भरल्या. विल्यम मॉरिसला १८७० पासून शोभित हस्तलिखितांत व सुलेखनकलेत स्वारस्य निर्माण झाले आणि तेव्हापासून त्याने स्वहस्ताक्षरात पुस्तके लिहिण्यास सुरुवात केली. त्यासाठी त्याने पिसांच्या लेखणीचा वापर केला, तसेच इटालियन प्रबोधनकालीन सुलेखनशैलीच्या आदर्शांना अनुसरुन त्याने सुलेखन केले. ह्या कलेच्या जोपासनेची परिणती त्याने पुढे स्वतःचे मुद्रणालय (केल्मस्कॉट प्रेस) काढण्यात झाली. त्याने मुद्रणयोजनावरही आपल्या सुलेखनशैलीचा ठसा उमटविला. नव्य कला  (आर्ट नूव्हो ) संप्रदायाच्या ए. फिइल या सुलेखनकाराने नावीन्यपूर्ण अक्षरणशैली घडवून विसाव्या शतकात आधुनिक सुलेखनाला चालना दिली.

विसाव्या शतकात एडवर्ड जॉन्स्टन (१८७२–१९४४) या इंग्लिश सुलेखनकाराने खऱ्या अर्थाने सुलेखनकलाक्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्याने मध्ययुगीन सुलेखन-तंत्रे, लेखन-साधने, कागद, लेखण्या इ. घटकांचा कसोशीने सूक्ष्म अभ्यास करुन स्वतःची सुलेखनशैली घडविली. जॉन्स्टनच्या सुलेखनात अक्षरांकनातील जाड व बारीक रेषांचे तसेच अक्षरावयवांच्या विविध आकारिक घटकांचे समुचित कलात्मक संतुलन साधलेले दिसून येते. जॉन्स्टनच्या सर्जनशील व कल्पक सुलेखनातून अक्षराकृतिबंधांतील सौंदर्याचा व नवचैतन्याचा प्रत्यय येतो. जॉन्स्टनने आपला आधीचा वैद्यकीय पेशा १८९७ मध्ये प्रकृतिअस्वास्थ्याच्या कारणास्तव सोडून दिला व पुढील दोन वर्षे त्याने ‘ब्रिटिश म्यूझिअम’-मधील प्राचीन व मध्ययुगीन हस्तलिखितांचा कसून पद्घतशीर अभ्यास केला. त्यानंतर १८९९ ते १९१२ या काळात त्याने लंडन येथे ‘सेंट्रल स्कूल ऑफ क्राफ्ट्स’ या संस्थेत तसेच ‘रॉयल कॉलेज ऑफ आर्ट’ येथे सुलेखनकला या विषयाचे अध्यापन केले. ह्या दीर्घ अनुभवातून त्याने रायटिंग अँड इल्युमिनेटिंग अँड लेटरिंग  (१९०६) हे सुलेखनावरचे आद्य क्रमिक पाठ्यपुस्तक लिहिले. आजही या विषयावरचा हा अद्ययावत अभिजात संदर्भग्रंथ मानला जातो. जर्मनीतील कलाविद्यालयांतूनही त्याने सुलेखनकलेवर व्याख्याने दिली. त्याची शिष्या जर्मन सुलेखनकार ॲना सिमॉन्स हिने जॉन्स्टनच्या अध्यापन पद्घतीचा प्रसार जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड व नेदर्लंड्स येथे केला. जॉन्स्टनचा शिष्य, सहकारी व उत्तराधिकारी विल्यम ग्रेली हेविट हाही दर्जेदार सुलेखनकार व उत्तम शिक्षक होता. त्याने जॉन्स्टनच्या पश्चात ‘लंडन सेंट्रल स्कूल ऑफ आर्ट्स अँड क्राफ्ट्‌स’ येथे अध्यापन केले. त्याने सुरुवातीच्या काळात जॉन्स्टनच्या सुलेखनशैलीचे अनुकरण केले; पण पुढे स्वतःची अशी वेगळी स्वतंत्र सुलेखनशैली विकसित केली. त्याने इटालियन प्रबोधनकालीन मानवतावादी सुलेखनशैलीचे पुनरुज्जीवन जाणीवपूर्वक करुन त्यातून स्वतःची शैली सिद्घ केली. सुलेखनातील अक्षरसजावट, विशेषत: अक्षरांना सोनेरी मुलामा वा सोनेरी छटा देण्याची अवघड तांत्रिक किमया त्याने प्रयत्नपूर्वक आत्मसात केली व त्या तंत्रावर विलक्षण प्रभुत्व मिळविले. त्याने काही ग्रीक व लॅटिन संहितांचे पूर्णपणे सुवर्णाक्षरांत प्रतिलेखन केले. ही त्याची सर्वोत्कृष्ट कलासिद्घी मानली जाते.

यूरोपमध्ये अलिकडच्या काळात सुलेखनाला एक ललित कलाप्रकार म्हणून विशेषत्वाने मान्यता व प्रतिष्ठा लाभली आहे. बहुसंख्य हौशी व व्यावसायिक कलावंत सुलेखनकलेकडे आकृष्ट होत आहेत व या कलेची निष्ठेने व्यासंगपूर्वक जोपासना करीत आहेत. लंडनमधील ‘सोसायटी ऑफ स्क्राइब्ज अँड इल्युमिनेटर्स’ ही सुलेखनकलेच्या क्षेत्रात कार्य करणारी अग्रेसर मान्यवर संस्था आहे, तसेच ‘व्हिक्टोरिया अँड ॲल्बर्ट म्यूझिअम’ मध्ये सुलेखनाची नित्यनेमाने प्रदर्शने भरत असतात. न्यूयॉर्क सिटी व शिकागो येथे सुलेखनाची नामवंत कलाविद्यालये आहेत.

पौर्वात्य सुलेखन : चीन, जपान व काही प्रमाणात कोरिया येथेही सुलेखनकलेला प्राचीन काळापासूनच एक उच्च दर्जाचा कलाप्रकार म्हणून मान्यता व प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. पौर्वात्य सुलेखनाच्या अगदी प्रारंभकाळापासूनच (इ. स. पू. सु. १७००) ते आजतागायत सुलेखन हा कलात्मक अभिव्यक्तीचा एक समृद्घ व वैविध्यपूर्ण प्रकार म्हणून विकसित होत गेल्याचे दिसून येते.

संदर्भ : 1. Begley, W. E. Monumental Islamic Calligraphy from India, 1985.

2. Jessen, Peter, Masterpieces of Calligraphy; 261 Examples, 1500 –1800, 1981.

3. Lancaster, John, Calligraphy Techniuques, 1987.

4. Long, Jean, The Art of Chinese Calligraphy. 1987.

5. Nakata, Yujiro, The Art of Japanese Calligraphy, 1973.

६. नाईक, बापूराव, देवनागरी मुद्राक्षर लेखनकला : खंड पहिला  मुंबई, १९८२.

७. पालव, अच्युत, अक्षरानुभव, मुंबई, १९९९.

८. शेडगे, कमल, कमलाक्षरं, मुंबई, २००९.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate