অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्तूप

एक बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधिस्थान-पूजास्थान वास्तु- प्रकार. स्तूप ही मुख्यत्वेकरून बौद्ध धर्मीयांची वास्तुरचना आहे. जैन धर्मीयांनीही काही स्तूप बांधलेले असले, तरी बुद्धाचे परिनिर्वाण दर्शविणारी वास्तू म्हणून बौद्ध धर्मीयांत स्तूप एक आदरणीय वास्तू ठरली आहे. स्तूपाची कल्पना मृतावर रचलेल्या मातीच्या ढिगार्‍यावरून उत्स्फूर्त झाली असावी, असे मानले जाते.

सम्राट अशोक

रूवनवेली स्तूप, अनुराधपुर, श्रीलंका.रूवनवेली स्तूप, अनुराधपुर, श्रीलंका.बौद्ध धर्मीयांनी बुद्धपरिनिर्वाणाशी स्तूपवास्तूचा संबंध लावल्याने जेथे जेथे बुद्ध धर्म प्रचलित होता, त्या त्या प्रदेशात स्तूप सापडतात. भारतात, त्याचप्रमाणे श्रीलंका, नेपाळ, म्यानमार, जावा, सयाम, तिबेट, पाकिस्तान, अफगाणिस्तान इ. ठिकाणी बौद्ध स्तूप आणि बौद्ध अवशेष सापडलेले आहेत. बौद्ध धर्माची उत्पत्ती आणि प्रसार भारतात झाल्याने भारतीय स्तूप सर्वांत प्राचीन आहेत. सम्राट अशोकाने निरनिराळ्या पवित्र बौद्धस्थळी ८४,००० स्तूप बांधल्याचा उल्लेख बौद्ध वाङ्मयात मिळतो. बौद्ध धर्माच्या प्रसाराबरोबरच छोटे छोटे स्तूप धर्मकृत्याचाच एक भाग आहे, अशी भाविकांत समजूत झाल्याने अनेक ठिकाणी असे शेकडो स्तूप बांधलेले आढळून आले आहेत. भारतात मौर्य कालापासून ( इ. स. पू. तिसरे शतक ) ते इ. स. बाराव्या शतकापर्यंत स्तूपांची बांधणी होत होती. पुढे त्यात खंड पडला आणि पुन्हा विसाव्या शतकात काही ठिकाणी त्यांची नव्याने बांधणी झाली व काही जीर्णशीर्ण झालेल्या स्तूपांची पुनर्बांधणी करण्यात आली.

स्तूपाची बांधणी

स्तूपाची बांधणी वैशिष्ट्यपूर्ण असते. त्यांचे विटांत बांधलेले प्रतिवेष ( दगडबंदी ) घुमट हे पूर्णतः अर्धवर्तुळाकार असून ते वर्तुळाकार पायावर बांधलेले आहेत. चौथर्‍यावर बांधलेल्या या भरीव घुमटाला ‘अण्ड’ अशी संज्ञा दिली जाते. त्याचा अश्मास्थीवरील छत्रीवजा चबुत्रा ठेंगणा असून त्याभोवती कठडा वा वेदिका कुसू व खोबणीद्वारे एकत्र सांधलेल्या असतात. तिच्या मध्यावर एक स्तंभ असून त्यावर ‘ छत्र ’ असते. स्तूपा-भोवती ‘ प्रदक्षिणापथ ’ असतो आणि त्याभोवती कुंपण ( वेदिका ) असते. स्तूपावर पेटीसारखे आसन आणि त्यावर छत्र तयार केलेले असे. हे सम्राटाचे लक्षण होय.

स्तूपांच्या रचनेतील वैशिष्ट्यांवरून त्याचा काल सर्वसाधारणपणे ठरविता येतो. आधीच्या कालातील स्तूपाचे अण्ड बसके, तर नंतरच्या कालातील अण्ड जास्त उंच आढळून येतात. त्याचप्रमाणे उत्तरकालातील स्तूप अनेक चौथर्‍यांवर बांधलेले व अनेक छत्र असलेले आढळतात. पूर्वकालातील स्तूप साध्या बांधणीचे, तर उत्तरकालातील स्तूप नक्षीने सजविलेले असल्याने वैशिष्ट्यपूर्ण वाटतात. उत्तरकालातील भारताबाहेरील प्रदेशांतील स्तूप त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण उंच निमुळत्या छत्रावलीमुळे काहीसे वेगळे वाटतात.

बुद्धसमकालीन स्तूप

भारतातील पिप्रावा ( उत्तर प्रदेश ) व वैशाली ( बिहार ) येथे सापडलेले स्तूप बुद्धसमकालीन असावेत, असे एक मत आहे. सांची, सारनाथ आणि तक्षशिला येथील धर्मराजिका स्तूप अशोकाने प्रथम बांधले अशी परंपरा सांगते. सांचीचा स्तूप भव्य आहे; परंतु याची डागडुजी, विस्तृतीकरण व प्रवेशद्वाराची बांधणी शुंगकालात झाली. जयपूरजवळील वैराट येथेही मौर्यकालीन स्तूपाचे अवशेष मिळाले आहेत.

मध्यभारतातील भारहूत, सांची तसेच बोधगया, कुमरहार येथील अपोत्थित स्तूपांचे अवशेष उत्कृष्ट शिल्पांसाठी  प्रख्यात आहेत. दक्षिणेतही अमरावती, नागार्जुनकोंडा, जग्गय्यपेट, घण्टाशाला, गुडिवाडा, भट्टिप्रोळू येथील स्तूपावशेष अपोत्थित शिल्पासाठी प्रख्यात आहेत. यांचा काल इ. स. पू. पहिले शतक ते इ. स. तिसरे शतक असा असून वैशिष्ट्यपूर्ण बांधणी, उत्कृष्ट मूर्तिशिल्प व शुद्ध चुन्याचा वापर यांमुळे ते प्रख्यात आहेत. ते अनेक चौथर्‍यांवर बांधलेले, अनेक निमुळत्या छत्रांचे व कमी परिघाच्या अनेक अण्डांचे बांधलेले आढळतात. गांधार स्तूपावर ग्रीकांश वास्तूशैलीची छाप आढळते. बुद्ध-बोधिसत्त्वादिकांच्या अनेक मूर्ती यांच्याशी संलग्न आहेत. पेशावरजवळील शाहजीकी ढेरी येथील कनिष्काचा स्तूप प्रख्यात आहे. कुशाणकालीन जैन स्तूपाचे अवशेष मथुरेस सापडले आहेत. सारनाथ येथील धमेख ( धर्माख्य ) स्तूप त्याच्या उंच अण्डाबद्दल व उत्कृष्ट कोरीव कामाबद्दल प्रसिद्ध असून तो गुप्तकालीन आहे.

बृहद्भारतातील स्तूप अनेक चौथरे व निमुळत्या छत्रावलीमुळे प्रसिद्ध आहेत. तिबेट, नेपाळ, म्यानमार, सयाम, कंबोडिया व इंडोनेशियात असे स्तूप असून ते बहुधा गुप्तकालानंतरचे आहेत. नेपाळमधील पाटणचा स्वयंभूनाथ स्तूप, श्रीलंकेमधील ( अनुराधपुर ) थूपाराम डागोबा, रूवनवेली इ. स्तूप आणि जावामधील बोरोबूदूरचा स्तूप उल्लेखनीय आहेत.

लेखक : शां. भा. देव

महिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate