অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वच्छंदतावाद भाग १

प्रस्तावना

( रोमँटिसिझम ). कला-साहित्यातील एक संप्रदाय. अठराव्या शतकाचा उत्तरार्ध ते एकोणिसाव्या शतकाचा पूर्वार्ध ह्या कालखंडात हा संप्रदाय यूरोपमधील अनेक देशांत विस्तारत गेला व त्याला व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. ही चळवळ केवळ कला--वाङ्मयीन क्षेत्रांपुरतीच मर्यादित न राहता मानवी जीवनव्यवहाराच्या धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण इ. अनेकविध क्षेत्रांमध्ये रुजली होती. खरे तर, ही मानवी मनाची एक मूलभूत व शाश्वत प्रवृत्ती असल्याने तिचे आविष्कार कोणत्याही देश-काल-स्थितींतल्या कोणत्याही कलावंताच्या, लेखकाच्या सर्जनशील आविष्कारांतून व्यक्त होऊ शकतात. त्यामुळे ती विशिष्ट स्थलकालाशी मर्यादित अशी चळवळ वा संप्रदाय न राहता, ‘ रोमँटिक ’ वा ‘ स्वच्छंदी ’ प्रवृत्तीचे प्रचलन सार्वत्रिक, सार्वकालीन परिमाण व व्याप्ती धारण करते, असेही म्हणता येईल. ह्या संप्रदायातून वा चळवळीतून जी तत्त्वे, ज्या धारणा व जी मूल्ये निर्माण व प्रसृत होत गेली, त्यांनी मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. उदा., व्यक्तिवादी वा आत्माविष्कारी जीवनजाणिवा, स्वातंत्र्याच्या ऊर्मी व व्यक्तिस्वातंत्र्य हेच सर्वश्रेष्ठ मूल्य असल्याची धारणा, निसर्गाची ओढ, निसर्गप्रेम आणि त्यातील नैसर्गिक साधेपणाची आसक्ती, दूरस्थ परप्रदेशातील ( इग्झॉटिक ) व काळातील कल्पनारम्य सुंदर जीवनाबद्दलचे आकर्षण, त्यातून आदिमतेविषयी ( प्रिमिटिव्हिझम ) तसेच भविष्यकालीन भावी जीवनातील स्वप्नांविषयी वाटणारी ओढ, राष्ट्रीय अस्मितेची जाणीव आणि या चळवळीच्या अखेरच्या कालखंडातील भ्रमनिरास व वैफल्यभावना. मुख्यतः विवेकवादी ( रॅशनॅलिस्ट ) विचारसरणीविरुद्ध बंडाची, विद्रोहाची भूमिका या चळवळीत प्राधान्याने घेतली गेली. हे स्वच्छंदतावादी वृत्तिविशेष कोणत्याही काळातील, कोणत्याही देशातील, कोणत्याही कलावंताच्या ठायी आढळू शकतात. त्यामुळे स्वच्छंदता ही सनातन, मूलभूत, सार्वत्रिक व शाश्वत मनोवृत्ती आहे, असे म्हणता येईल. स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे कला--वाङ्मयीन आविष्कार व्यापक, सार्वत्रिक, बहुविध असल्याने मूळच्या ‘ रोमँटिक ’ या संज्ञेचा अर्थविस्तार होत जाऊन त्याला अनेकविध आशयाची परिमाणे व अर्थच्छटा प्राप्त होत गेल्या.

संज्ञाविचार

‘रोमँटिसिझम’ ही इंग्रजी संज्ञा अनेक अर्थांनी, वेगवेगळ्या संदर्भांत वापरली गेली. त्याची एक विस्तृत यादीच झाक बारझन यांनी क्लासिक, रोमँटिक अँड मॉडर्न (१९६१) या ग्रंथात दिली आहे. ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या नेमक्या अर्थाविषयी अनेक मतमतांतरे व कित्येकदा परस्परविरोधी विधानेही केली गेली. त्यामुळे ही संज्ञा संदिग्ध, अनेकार्थसूचक व बहुव्यापक बनल्याचे या संप्रदायाच्या इतिहासात आढळून आले. १८२४ मध्ये या संज्ञेच्या संदर्भात तज्ज्ञांची मते पडताळून पाहिली असता, त्यांत परस्परविसंगत व परस्परविरोधी अशी अनेक विधाने आढळली. इंग्लिश लेखक एफ्. एल्. ल्यूकस याने १९४८ मध्ये ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या वेगवेगळ्या एकूण ११,३९६ व्याख्यांची नोंद केली. ए. ओ. लव्हजॉय या अमेरिकन तत्त्वज्ञाने ‘रोमँटिसिझम’ या संज्ञेच्या वेगवेगळ्या देशांतील, वेगवेगळ्या कालखंडांतील व्याख्या, अर्थभेद आणि त्यांतले प्रचंड वैविध्य व मतमतांतरे लक्षात घेता ही संज्ञा बहुवचनी — अनेक ‘रोमँटिसिझम्स’ — मानावी, असे सुचवले. ही बहुतत्त्ववादी ( प्लूरॅलिस्ट ) भूमिका लव्हजॉयने आपल्या ‘ऑन द डिस्क्रिमिनेशन ऑफ रोमँटिसिझम’ या शोधनिबंधात मांडली. ‘रोमँटिसिझम’चा अर्थ लावताना पाश्चात्त्य समीक्षकांनी ज्या विविध, परस्परविरोधी भूमिका मांडल्या, त्यांचा आढावा घेतल्यास या चळवळीचे अनेकजिनसी, व्यामिश्र स्वरूप स्पष्ट होऊ शकेल. उदा., (१) रोमँटिसिझम ही एक सार्वत्रिक, सार्वकालीन जीवनरीती आहे, असे म्हणणारा एक पक्ष आहे; तर रोमँटिसिझम ही एक मनोरुग्णावस्था आहे, असा आक्षेपही काही समीक्षकांनी घेतला आहे. (२) रोमँटिसिझम म्हणजे निसर्गाकडे परत जाण्याची अवस्था —आदिमता, गूढरम्यता, प्राचीन दूरस्थ व परस्थ गोष्टींविषयीचे आकर्षण अशी वैशिष्ट्ये जशी नोंदवली आहेत, तसेच ते वास्तवापासूनचे पलायन आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे. (३) रोमँटिसिझम हा जसा सौंदर्याचा आविष्कार मानला गेला आहे, तसाच तो अद्भुततेचाही आविष्कार मानला आहे. रेने वेलेक व नॉर्थ्रप फ्राय यांनी ‘ एका विशिष्ट ऐतिहासिक काळातली एक विशिष्ट संवेदनशीलता ’ असे रोमँटिसिझमचे स्वरूप विशद केले आहे.

एखादी संकल्पना विशिष्ट सांस्कृतिक वातावरणातून व विशिष्ट कालखंडात निर्माण होते, ह्या सूत्रानुसार मांडलेली ही रोमँटिसिझमची कालवाचक संकल्पना ( पीरिअड कन्सेप्ट ) आहे. सु. १७९० — १८३० ह्या कालखंडात आत्मदर्शी जाणिवेने सर्जनशील निर्मिती करणार्‍या लेखक-कलावंत गटाचा विचार या संज्ञेत प्रस्तुत आहे आणि युगचैतन्याचा ( स्पिरिट ऑफ एज ) आविष्कार त्याच्या गाभ्याशी आहे. हे युगचैतन्य केवळ दृक्कला व साहित्य यांतूनच व्यक्त झालेले नसून, ते या कालखंडातल्या धर्ममीमांसा, इतिहासमीमांसा, राजकारण, संस्कृतिकरण, सौंदर्यशास्त्र, संगीत अशा मानवी जीवनाच्या सर्व अंगोपांगांतून व सर्वच क्षेत्रांतून आविष्कृत झाले आहे, असे दिसून येते. काव्याचा विचार करताना सर्जनशील कल्पनाशक्ती, विश्वाचा विचार करताना निसर्ग आणि शैलीचा विचार करताना प्रतिमा, प्रतीके व प्राक्कथा या तीन कसोट्या स्वच्छंदतावादाच्या संदर्भात लक्षात घ्याव्यात, असे या समीक्षकांनी सुचविले आहे. लिलियन फ्यूर्स्टने आणखी एक वेगळा दृष्टिकोण मांडला आहे : तिच्या मते, यूरोप खंडातल्या विविध देशांत रोमँटिसिझममध्ये जरी साम्यस्थळे आढळत असली, तरी प्रत्येक राष्ट्राच्या विशिष्ट गरजा, प्रकृतिविशेष व परिस्थिती यांनुसार रोमँटिसिझमच्या एखाद्या विशिष्ट भागावर विशेष भर दिलेला दिसतो आणि त्यामुळे त्या त्या देशातल्या रोमँटिसिझमला विशिष्ट असे देशीयत्व लाभलेले दिसते. उदा., जर्मन रोमँटिसिझम इतिहासाच्या अतिरिक्त अभिमानामुळे अधिकाधिक राष्ट्रवादी, तर फ्रेंच रोमँटिसिझम स्वातंत्र्यप्रेमामुळे सर्वदेशीय ( कॉस्मॉपॉलिटन ) झालेला दिसतो. ही ‘ देशीयता ’ विचारात घ्यावी, असे फ्यूर्स्टने सुचविले आहे.

‘रोमँटिसिझम’ ला मराठी साहित्य-समीक्षा व्यवहारात अनेक पर्यायी संज्ञा आजवर सुचविण्यात व वापरण्यात आल्या आहेत. उदा., सौंदर्यवाद, गूढवाद, निर्भरवाद, छायावाद, रोमांचवाद, स्वच्छंदतावाद इत्यादी; पण ह्या पर्यायांतून मूळ इंग्रजी संज्ञेच्या काही अर्थच्छटाच फक्त व्यक्त होतात; संप्रदायाची काही वैशिष्ट्येच सूचित होतात. त्यामुळे कोणतीच संज्ञा पर्याप्त व परिपूर्ण ठरत नाही. काही समीक्षक मूळ इंग्रजी ‘रोमँटिक’ व तद्भव शब्दच वापरणे पसंत करतात.

ऐतिहासिक पार्श्वभूमी व जडणघडण

अठराव्या शतकाच्या अखेरीस व एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कला व साहित्य या क्षेत्रांत यूरोपमध्ये स्वच्छंदतावादाची जोरदार लाट उसळली. तत्कालीन राजकीय--सामाजिक घडामोडींचे पडसाद तीत उमटलेले दिसतात. फ्रेंच राज्यक्रांतीतून राजकीय स्वातंत्र्याचे नवे आदर्श प्रस्थापित झाले. त्यातूनही स्वच्छंदतावादाची जडणघडण झाली. ही चळवळ यूरोपभर लाटेसारखी पसरत गेली. तत्पूर्वीचे प्रबोधनकालीन कला-साहित्य हे कलांची आश्रयदाती राजघराणी, अमीर-उमरावांचे वैभवशाली जीवन ह्यांभोवतीच घुटमळत होते; तथापि ही उमरावशाही स्वच्छंदतावादाने जोरदारपणे नाकारली. अठराव्या शतकापासून राजेशाहीचा प्रभाव ओसरू लागला. माँतेस्क्यू,  व्हॉल्तेअर यांसारख्या तत्त्वज्ञांनी तत्कालीन राज्य-धर्मसंस्थांचा चिकित्सक शोध घेतला. फ्रेंच तत्त्वज्ञ रूसो ह्याचा प्रभावही या काळावर पडला. त्याने शिक्षणाची मौलिकता व निसर्गातील साधेपणा या तत्त्वांकडे लोकांचे लक्ष वेधले. जनसामान्यांत विज्ञान आणि सामाजिक शास्त्र यांविषयीचे कुतूहल व आस्था वाढीस लागली.

माणसे म्हणजे राज्यशासन व चर्चप्रणीत धर्मसत्ता यांच्या यंत्रणेतील केवळ चाके नसून, स्वतंत्रपणे विचार करू शकणार्‍या त्या व्यक्ती आहेत, अशा आशयाचा व्यक्तिवाद ह्या काळात जोपासला गेला. कलावंतांची निर्मिती राजाश्रयावर अवलंबून न राहता, तिला विशाल जनसमुदायाच्या—त्या काळी सतत वाढत्या मध्यमवर्गाच्या — अभिरुचीचे व्यापक व विस्तृत अधिष्ठान लाभले. लेखक-कलावंतांमध्ये अभिव्यक्तिस्वातंत्र्याची नवी जाणीव निर्माण झाली. माणसांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचे नवे धैर्य समाजजीवनात जोपासले गेले. माणसाच्या विवेकाला लगाम घालणारी चर्चची सत्ता दुबळी झाली. व्यक्तिव्यक्तींतील सद्गुण-दुर्गुणांपेक्षा, मानवतेच्या सर्वसामान्य समस्या लेखक-कलावंतांना भेडसावू लागल्या. ते मोठ्या धैर्याने प्रश्न उपस्थित करू लागले व त्यांची सांकेतिक उत्तरे नाकारू लागले. लेखक--कलावंत भोवतालच्या समाजजीवनाशी एकरूप झाले व आपल्या विशिष्ट वर्गाच्या वा पक्षाच्या भावभावना व आकांक्षा शब्दबद्ध करू लागले. राजकीय प्रगतीचाही अंतःस्तर स्वच्छंदतावादातून वाहताना दिसतो. इंग्रज कवी  बायरन हा ‘ स्वच्छंदी खिन्नते ’चे ( रोमँटिक मेलँकली ) परिपूर्ण उदाहरण मानला जातो. त्याने ग्रीक स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतला. अनेक स्वच्छंदतावादी लेखकांना आपल्या स्वतंत्र विचारसरणीबद्दल हद्दपारी भोगावी लागली. स्वच्छंदतावादी इंग्रज कवी  शेली हा सुधारणावादी ( रिफॉर्मर ) होता. आपल्या ‘ प्रॉमिथ्यूस अन्बाउंड ’ या भावकाव्यात त्याने मानवी स्वातंत्र्याचा विषय हाताळला. स्वच्छंदतावादी फ्रेंच चित्रकार दलाक्र्वा (१७९८—१८६३) यानेही लिबर्टी लीडिंग द पीपल (१८३०) हे स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर आधारित प्रतीकात्मक चित्र काढले. ते स्वच्छंदतावादी वर्तुळात फार गाजले. तेव्हापासून ‘ रोमँटिसिझम ’ ही संज्ञाही प्रचलित झाली व दलाक्र्वा या चळवळीचा नेता मानला जाऊ लागला. शेली परागंदा झाला व त्याने इटलीमध्ये आश्रय घेतला. काँटिनेन्टमधील अनेक शरणार्थी — त्यांत बरेच कलावंतही होते — इंग्लंडमध्ये स्थायिक झाले.

सभोवतालच्या जीवनाशी स्वच्छंदतावादी लेखकांचे जे नाते होते, त्याचा एक पैलू म्हणजे त्यांना प्रत्यक्ष लोकजीवनाविषयी वाटणारी सखोल, गाढ आस्था होय. अभिजाततावादी साहित्यात जे व्यक्तींचे सांकेतिक साचे दिसतात, त्याच्या विरोधात हे वैशिष्ट्य ठळकपणे उठून दिसते. व्यक्तिजीवनाच्या अभ्यासातून त्याच्या भोवतालच्या वातावरणाविषयीचेही कुतूहल जागृत झाले. स्वच्छंदतावादी लेखक निसर्गात ‘ निसर्ग ’ म्हणूनच रममाण झाले. उदा., विल्यम वर्ड्स्वर्थचे इंग्लिश सरोवरांबद्दलचे काव्य. मानवी भावभावनांची अभिव्यक्ती त्यांनी समांतर अशा निसर्गा-तील वेगवेगळ्या भावावस्थांमधून (मूड्स) साकार केली. निसर्गाची रौद्र-वादळी, शांत-गंभीर, प्रसन्न व रमणीय अशी वेगवेगळी रूपे स्वच्छंदतावादी चित्रकाव्यांतून दिसतात. जॉन कीट्सचे ‘टू अ नाइटिंगेल’, शेलीचे ढगांविषयीचे किंवा वर्ड्स्वर्थचे कोकिळेविषयीचे काव्य यांचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल. इंग्लिश निसर्ग-कवींप्रमाणेच निसर्गचित्रकारांचीही एक परंपरा स्वच्छंदतावादात दिसून येते. जोझेफ मॅलर्ड विल्यम टर्नर, जॉन कॉन्स्टेबल प्रभृती चित्रकारांचा या संदर्भात निर्देश करता येईल.

भोवतालच्या परिसराबरोबरच ऐतिहासिक अद्भुतरम्यतेविषयी ( रोमान्स ) लेखकांना आकर्षण वाटू लागले. सर वॉल्टर स्कॉट याने या इतिहासप्रेमाचे भरणपोषण केले. ऐतिहासिक वास्तूंविषयी, मध्ययुगीन जीवनाविषयी कलावंतांमध्ये आसक्ती वाढली. त्यातून गूढ, अतिंद्रिय प्रवृत्तींच्या लेखक कलावंतांनी चित्रण केले. गटेचे फाउस्ट व  विल्यम ब्लेकची चित्रे यांचा या संदर्भात उल्लेख करता येईल. कलावंतांनी निर्मितिप्रेरणांचा शोध जसा स्वकालाच्या पलीकडे (उदा., ऐतिहासिक, मध्ययुगीन वातावरण) जाऊन घेतला, तसाच स्वदेशाच्या पलीकडे जाऊनही घेतला. पौर्वात्य तसेच विदेशी, वैचित्र्यपूर्ण प्रदेश-परिसराचे आकर्षण व चित्रण त्यातून वाढीस लागले.

कलेतील स्वच्छंदतावाद

स्वच्छंदतावादी कलावंतांच्या प्रेरणा व उद्दिष्टे तत्कालीन लेखकांप्रमाणेच होती. अभिजाततावादी कलापरंपरा व संकेत झुगारून देण्याची बंडखोर भूमिका त्यांनी घेतली व मुक्त, चैतन्यशील वृत्तीचा आविष्कार आपल्या कलानिर्मितीतून घडवला. नव-अभिजाततावादातून कलेवर जे जाचक निर्बंध लादले गेले ( उदा., उच्च व उदात्त विषयांचीच निवड, विषयांची संयमपूर्ण हाताळणी, चित्रसंयोजनातील समतोल व प्रमाणबद्धता यांचे दंडक, रंगांपेक्षा रेखनकौशल्यावर भर देण्याची प्रवृत्ती ), त्याविरुद्ध स्वच्छंदतावादी चित्रकारांनी बंड केले. त्यांच्या विरोधात त्यांनी व्यक्तिनिष्ठ आत्मानुभूतीला प्राधान्य, नाट्यपूर्ण व भावनोत्कट प्रसंग, रंग आणि प्रकाश यांचा चित्रणात नाट्यपूर्ण वापर व मुक्त कुंचलांकन या गुणवैशिष्ट्यांवर भर दिला. भूतकालीन-ऐतिहासिक व मध्ययुगीन-पौर्वात्य, तसेच गूढ, अतींद्रिय विषयांचे त्यांनी समर्थ चित्रण केले. अपवादात्मक, अलौकिक, चमत्कृति-पूर्ण, विलक्षण व विक्षिप्त गोष्टींविषयी त्यांना आत्यंतिक ओढ व आकर्षण होते. तद्वतच निसर्गाच्या विराट व रौद्ररूप दर्शनाने मनाला भयचकित करणारा जो अनुभव येतो, त्याचे संवेदनाक्षम चित्रण त्यांनी केले. मानव जीवनातील रुग्णावस्था, यातना, मृत्यू अशी दृश्ये त्यांना आकर्षून घेत. सारांश, स्वच्छंदतावादी कलेत अलौकिक, अनन्यसाधारण, एकमेवाद्वितीय आत्मानुभूतीचे — ‘ स्व ’ त्वाचे — दर्शन घडते. काही आधुनिक कलावंतांतही हे अलौकिक आत्मप्रकटन दिसून येते.

चित्रकला

स्वच्छंदतावादी चित्रकलेत मुख्यत्वे दोन प्रवाह दिसून येतात : व्यक्तिचित्रणपर व निसर्गचित्रणपर. या संदर्भात फ्रान्स, इंग्लंड,स्पेन, जर्मनी व अमेरिका येथील अनेक चित्रकारांचे निर्देश करता येतील.

इंग्लिश कवी व चित्रकार  विल्यम ब्लेक (१७५७—१८२७) याचे द ग्रेट रेड ड्रॅगन अँड द विमेन क्लोद्ड विथ द सन हे बुक ऑफ रिव्हिलेशन या ग्रंथसजावटीसाठी केलेले जलरंगचित्र असून, त्यात अद्भुतरम्य वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीवर आरूढ झालेल्या राक्षसाचे दृश्य रंगविले आहे. स्पॅनिश चित्रकार  गोया (१७४६—१८२८) याची Los Caprichos ( इं. शी. ‘ द कॅप्रिसेस ’) ही अम्लरेखनांची ( एचिंग ) मालिकाही उल्लेखनीय आहे. तीत मानवी भावभावनांचे — त्यातील भयावह निष्ठुरता, क्षुद्र मनोवृत्ती, नैतिक मूल्यांचे अधःपतन यांचे — प्रत्ययकारी चित्रण आढळते. त्यावर एक कल्पनारम्य, पण खिन्न-उदास छाया पसरलेली आहे. त्याचे सॅटर्न डिव्हरिंग हिज सन्स हे भित्तिचित्र मनावर विलक्षण भयप्रद परिणाम घडवून आणते.

दलाक्र्वा हा स्वच्छंदतावादाचा प्रमुख प्रवर्तक मानला जातो. त्याच्या रंगांच्या उपयोजनातले अभिव्यक्तिसामर्थ्य, कुंचल्याची वैशिष्ट्यपूर्ण हाताळणी यांमुळे चित्रणात भावोत्कटता निर्माण झाली आहे. त्याच्या लिबर्टी लीडिंग द पीपलचा उल्लेख आधी आलाच आहे. डेथ ऑफ सार्डनापेलस हे त्याचे ऐतिहासिक विषयावरील आणखी एक उल्लेखनीय चित्र. एका अ‍ॅसिरियन राजाच्या पराभवाचे व आत्मनाशाचे चित्रण त्यात आहे. बायरनचे ह्याच विषयावर एक नाटकही होते. त्याचा दलाक्र्वावर प्रभाव असल्याची अन्य उदाहरणेही आहेत. स्वतःला हॅम्लेट कल्पून दलाक्र्वाने एक आत्मचित्र रंगविले. मृत्यू, कामवासना, पौर्वात्य गूढवाद यांचे वैशिष्ट्य-पूर्ण चित्रण त्याने केले. नेऑदॉर झेरीको (१७९१—१८२४) हा फ्रेंच चित्रकार स्वच्छंदतावादी म्हणून प्रसिद्ध होता. त्याची घोड्याची चित्रे गतिमानतेचा आभासात्मक प्रत्यय देणारी आहेत. त्याला रुग्णावस्थेचे, विकृतीचे व स्वच्छंदतेला साजेसे आकर्षण होते. त्याने मृतावस्थेतील व्यक्तींची अभ्यासपूर्ण रेखाटने केली.

निसर्गचित्रणपर स्वच्छंदतावादाचा प्रमुख प्रणेता म्हणून इंग्लिश चित्रकार  जे. एम्. डब्ल्यू. टर्नर (१७७५—१८५१) याचा उल्लेख करावा लागेल. त्याचे स्लेव्ह शिप (१८४०) हे या प्रकारातील उत्कृष्ट उदाहरण. रक्तवर्ण आकाशाखाली पसरलेला मलीन काळोखमय समुद्र, दूरवर उभे असलेले सैतानी गलबत, लाटांमधून डोकावणारा राक्षसी मासा आणि या सर्वांमध्ये अग्रभागी तरंगणारा, बेड्यांनी जखडलेला काळा पाय असे दृश्य त्यात आहे. निसर्गाचा विराटपणा व सामर्थ्य यांचा उपयोग टर्नरने विशेषत्वाने करून घेतला. निसर्गाला सामर्थ्य प्राप्त करून देणार्‍या विविध घटकांचा— हवा, पृथ्वी, अग्नी, जल इत्यादींचा — वापर करून त्याने भव्यतेचा साक्षात्कार घडवला. टॉमस कोलसारख्या अमेरिकन चित्रकाराचाही या संदर्भात उल्लेख करता येईल. निसर्गाच्या शक्तीपुढे जाणवणारा माणसाचा दुबळेपणा त्याच्या चित्रांतून प्रत्ययास येतो. फ्रेंच निसर्गचित्रकार कोरो याने वृक्षांची आदर्शीकृत अभ्यास-रेखाटने केली. जॉन कॉन्स्टेबल (१७७६—१८३७) हा टर्नरचा समकालीन इंग्रज निसर्गचित्रकार. त्याने भावनाविष्कारांचे सूक्ष्म व तरल रंगचित्रण केले. त्याच्या चित्रांतील उन्हात न्हालेली शेते, कालवे, इंग्लंडच्या ग्रामीण परिसरातील किनारपट्टी यांतील भावनिक आवाहन त्याचा मित्र वर्ड्स्वर्थ याच्या कवितेशी मिळतेजुळते आहे. फाँतेनब्लूनजीकच्या जंगल प्रदेशाचे चित्रण करणार्‍या ‘ बार्बिझाँ ’ या स्वच्छंदतावादी संप्रदायी चित्रकारांनी निसर्गाच्या विविध भावावस्था रंगविल्या. जर्मनीमध्ये कास्पर डेव्हिड फ्रायड्रिख यानेही भावपूर्ण निसर्गदृश्ये रंगवली. गुंतागुंतीच्या गूढ व धार्मिक भावनांचे प्रतीकात्मक चित्रण करण्यासाठी त्याने निसर्गदृश्यांचा वापर केला. क्लॉइस्टर ग्रेव्ह्यार्ड अंडर स्नो (१८१०) या त्याच्या चित्रात निष्पर्ण गाठाळ वृक्ष, थडग्यावरील दगड आणि उद्ध्वस्त प्रार्थनामंदिराकडे ( चॅपेल ) दोन-दोनच्या रांगा करून, संथपणे बर्फ तुडवत चाललेले भिक्षू असे दृश्य परिणामकारकपणे रंगवून त्याने आपल्या चित्रणात प्रतीकात्मकता दर्शविली आहे.

वास्तुकला

वास्तुकलेत स्वच्छंदतावादाचे स्वरूप हे पूर्वकालीन विविध शैलींचा कल्पकतापूर्ण वापर करून, त्यातून भावनात्मक परिणाम साधणे, हे होते. इंग्लंडमध्ये गॉथिक वास्तुशैली लोकप्रिय होती, तर फ्रान्समध्ये अधिक अभिजात कल्पना वास्तूंतून साकारण्यात आल्या. अठराव्या शतकाच्या मध्यावधीत इंग्रज साहित्यिक  हॉरिस वॉल्पोल (१७१७—९७) याने ‘ स्ट्रॉबेरी हिल ’ नामक स्वतःचे निवासस्थान उभारले. व्हिकेनहॅमने ‘ लिट्ल गॉथिक कासल ’ ( गॉथिक वास्तुशैलीच्या धर्तीची छोटेखानी गढी ) उभारले आणि तेथेच त्याने द कासल ऑफ ओट्रँटो या कादंबरीचे लेखन केले. या घटनांतून गतकालीन संवेदना जागवण्याची त्याची ऊर्मी दिसून येते. त्यात गद्यप्राय वर्तमानकाळाच्या विरोधात दूरस्थ गोष्टींत रमण्याची स्वच्छंद वृत्ती प्रकटली आहे. याच प्रवृत्तीतून विल्यम बेकफोर्डने विल्टशायर येथे ‘ फाँटहिल ’ हे गॉथिक शैलीतील वैचित्र्यपूर्ण घर बांधले. त्यात मूलभूत अशी वास्तूरचनेची तत्त्वेही पाळली न गेल्याने लवकरच ते जमीनदोस्तही झाले. विचित्र व परक्या गोष्टींविषयीच्या आकर्षणामुळे अतिपूर्वेकडील देशांतून — विशेषतः चीनमधून—कलावस्तूंची आयात होऊ लागली व त्यांच्या अनुकरणात यूरोपीय कारागीर धन्यता मानू लागले.

शिल्पकला

स्वच्छंदतावादाचा जोम व भावनिक परिणाम शिल्पांतही काही प्रमाणात जाणवतो. उदा., फ्रांस्वा रूद याचे पॅरिस येथील ‘ आर्च दी त्रिआँफ द लेत्वाल ’ ( विजयकमान ) वरील ला मार्सेयॅझ हे उत्थित शिल्प. तसेच आंत्वान ली वारी याची प्राणिविषयक शिल्पे. स्वच्छंदतावादातील प्रखर भावनाविष्कार श्रेष्ठ शिल्पकार रॉदँ (१८४०—१९१७) याच्या शिल्पांत दिसतो. त्याच्या शिल्पांतले देहसौष्ठव, सामर्थ्य व सहेतूक ठेवलेले ओबडधोबड पृष्ठ-पोत यांतून मानवी मनाच्या नाट्यपूर्ण तीव्र भावावस्थांचा प्रत्यय येतो. त्याचा द बर्गर्स ऑफ कॅले हा धीरोदात्त वीरपुरुषांचा पूर्णाकृती शिल्पसमूह प्रेक्षकांना त्या वीरपुरुषांच्या प्रचंड तणावाखाली असलेल्या अस्वस्थ मनःस्थितीचा प्रत्यय देतो.

संगीत

यूरोपीय संगीतक्षेत्रात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा प्रभाव मुख्यत्वे जर्मनी व फ्रान्स येथील संगीतात आढळतो. चित्रकला व वाङ्मय या क्षेत्रांप्रमाणेच स्वच्छंदतावादी संगीताचे गुणधर्म भावनात्मक आवाहनावर भर देणारे होते. दृश्यांचे व कथांचे वर्णन करणारे संगीत ( प्रोग्रॅम म्यूझिक ) हे प्राधान्याने स्वच्छंदतावादी होते. महान जर्मन संगीतकार बेथोव्हन याची इरॉटिका सिंफनी (१८०४) ही संगीतकृती स्वच्छंदतावादाचा वेगळाच नावीन्यपूर्ण आविष्कार घडविणारी आहे. तसेच वेबरच्या संगीतात लोकसंगीताचे नव्यानेच घडविलेले पुनरुज्जीवन दिसते. ऑस्ट्रियन संगीतरचनाकार फ्रांट्स पेटर शूबर्ट व जर्मन संगीतरचनाकार  रॉबर्ट शूमान यांनी जर्मन कवी  हाइन्रिख हाइन याची भावगीते संगीतबद्ध केली. त्यांत स्वच्छंदीवृत्तीच्या निदर्शक अशा अनेकविध भावछटा आढळतात. उदा., शूबर्टची ‘ द अर्लकिंग ’, ‘ द रेथ ’, ‘ हार्क द लार्क ’, ‘ हू इज सिल्व्हिया ’ आणि शूमानची ‘ द लव्ह्ली मंथ ऑॅफ मे ’, ‘ लेडी-बर्ड ’, ‘ फ्रॉम आउट माय टिअर्स आर स्प्रिंगिंग ’, ‘ आय विल नॉट ग्रीव्ह ’ ही गीते. यांची शीर्षकेच स्वच्छंदतावादाची सूचक आहेत.  रिखार्ट व्हाग्नर ची द रिंग ऑफ द नीबलुंग ही संगीतिका-मालिका व ट्रिस्टान अँड इसोल्ड ही रचना उत्तरेकडील लोकगीतांतून स्फुरलेल्या आहेत. व्हेर्दीने आपल्या ऑपेरांसाठी  विल्यम शेक्सपिअर च्या नाटकांतून विषय निवडले ( उदा., ‘ ऑथेल्लो ’, ‘ फॉलस्टॉफ ’).

उत्तरकालीन स्वच्छंदतावादात ( पोस्ट रोमँटिसिझम ) एक प्रकारचा साचेबंद निर्जीवपणा व कृत्रिमपणा आला. चित्रकारांचे विषय व चित्रण या दोन्हींमध्ये सांकेतिक कृत्रिमता आणि निर्जीवता जाणवते. त्याविरुद्ध एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकाळात कूर्बे या फ्रेंच वास्तववादी चित्रकाराने आपल्या चित्रनिर्मितीतून विरोधी प्रतिक्रिया प्रकट केली वत्याद्वारे फ्रेंच चित्रकलेत वास्तववादाची बीजे रोवली.

सामान्यतः असे म्हटले जाते, की अभिजाततावादी मनोवृत्ती ही स्थितिशील असते, तर स्वच्छंदतावादी मनोवृत्ती ही गतिशील असते. आधुनिक काळातही या मूलप्रवृत्तींचे वेगवेगळ्या रूपांत दर्शन घडते. पूर्वनिश्चित व सुघटित आकारांची निर्मिती अभिजाततावादी, तर भावनाविष्कारांची मुक्त अभिव्यक्ती स्वच्छंदतावादी मानता येईल. उदा., आधुनिक कलेतील भौमितिक अमूर्तीकरणाची प्रवृत्ती अभिजाततावादी, तर रंगांचे उत्कट भावप्रक्षोभक, अभिव्यक्तिवादी उपयोजन हे स्वच्छंदतावादी मनोवृत्तीचे प्रातिनिधिक मानता येईल.

साहित्यातील स्वच्छंदतावाद

वाङ्मयीन स्वच्छंदतावादी चळवळीची पहिली लाट अठराव्या शतकाच्या अखेरीस इंग्लंड व जर्मनी या देशांतील साहित्यात निर्माण झाली.

ब्रिटिश स्वच्छंदतावाद

इंग्लंडमध्ये अठराव्या शतकात स्वच्छंदता-वादाच्या उदयाला पोषक अशी वाङ्मयीन पार्श्वभूमी निर्माण झाली होती. इंग्लंडमधील स्वच्छंदतावादाच्या आद्य खाणाखुणा अठराव्या शतकातच दिसू लागल्या. अठराव्या शतकातील  जेम्स टॉमसन (१७००—४८) ह्या कवीचे निसर्गकाव्य—विशेषतः द सीझन्स (४ भाग, १७२६—३०) हे ऋतुवर्णनपर भावकाव्य — स्वच्छंदतावादाची पूर्वचिन्हे सूचित करणारे आहे. तसेच हॉरिस वॉल्पोलच्या गूढ व भयप्रद वातावरणनिर्मिती करणार्‍या कादंबर्‍या; रॉबर्ट बर्न्स, विल्यम ब्लेक व  टॉमस चॅटरटन इत्यादींचे स्वच्छंदीवृत्तीला पोषक असे काव्य; एडमंड बर्कचे (१७२९—९७) ‘ उदात्त ’ व ‘ सुंदर ’ यांची मीमांसा करणारे आणि अंत:प्रेरणांना महत्त्व देणारे तत्त्वज्ञान; तसेच शाफ्टस्बरीचे (१६७१—१७१३) वाङ्मयाभिरुचीविषयीचे मौलिक विचार — उदा., ‘ जे चांगले व सुंदर आहे त्याकडे मनाची असलेली स्वाभाविक ओढ ही मनुष्य स्वभावातल्या नैतिकतेचीच साक्ष देते; साहित्यसमीक्षकाने जाणीवपूर्वक या नैतिकतेची जोपासना केली पाहिजे ’ ही त्याची वाङ्मयीन भूमिका — यांसारखे घटक ब्रिटिश स्वच्छंदतावादाच्या उत्कर्षासाठी प्रेरणादायक व पोषक ठरले.

साधारण १७८० पासून १८३० पर्यंतचा काळ हा ब्रिटिश स्वच्छंदता-वादी वाङ्मयाच्या बहराचा काळ होता. ह्या काळात साहित्याला — विशेषतः काव्यनिर्मिती व काव्यविचार यांना — पूर्णपणे नवे वळण लाभले. हे नवे वळण विल्यम ब्लेक, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स, बायरन ह्या प्रमुख कवींच्या काव्याविष्कारांतून; तसेच सर वॉल्टर स्कॉटच्या कादं-बर्‍यांतून आणि चार्ल्स लँबच्या (१७७५—१८३४) व्यक्तिनिष्ठ निबंध वाङ्मयातून जसे जाणवते; तसेच ते तत्कालीन काव्यविचारांतूनही प्रतीत होते. विल्यम वर्ड्स्वर्थ व  एस्. टी. कोलरिज (१७७२—१८३४) या बंडखोर कवींच्या लिरिकल बॅलड्स (१७९८) ह्या भावकाव्यसंग्रहातून इंग्रजी साहित्यातले नवे स्वच्छंदतावादी वळण स्पष्टपणे व ठळकपणे दिसू लागले. पूर्वकालीन नवअभिजात परंपरा पूर्णपणे खंडित करणारी ही स्वच्छंदतावादी कविता होती. वर्ड्स्वर्थने लिरिकल बॅलड्सच्या दुसर्‍या आवृत्तीला लिहिलेली प्रस्तावना आणि कोलरिजचा बायोग्राफिआ लिटरारिआ (१८१७; इं. शी. ‘ लिटररी ऑटोबायॉग्रफी ’) हे दोन्ही मिळून इंग्रजी साहित्यातील स्वच्छंदतावादी चळवळीचा जाहीरनामा मानला जातो. कविता म्हणजे ‘ उत्कट प्रमाथी भावनांचा उत्स्फूर्त उत्सेक ’ ही वर्ड्स्वर्थने केलेली व्याख्या स्वच्छंदतावादी वाङ्मय-विचाराच्या गाभ्याशी होती.

सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील प्रसंग आणि घटना सर्वसामान्यांच्याच भाषेत व्यक्त करणे, हे वर्ड्स्वर्थने काव्यनिर्मितीचे मुख्य प्रयोजन मानले. त्यातून निसर्गाच्या मूलतत्त्वांचा, नियमांचा शोध घेण्याची त्याची आकांक्षा होती. वर्ड्स्वर्थने सामान्य माणसांची भाषा, रोजच्या जीवनातले प्रसंग व अतिसामान्य कष्टकरी, कामकरी जीवन ( उदा., ‘ द सॉलिटरी रीपर ’ व ‘ लीच गॅदरर ’ ) यांतून अप्रतिम काव्य निर्माण केले. साधेसुधे ग्रामजीवन काव्यविषय म्हणून त्याला विशेषत्वाने भावले. अशा जीवनावस्थेत मानवी भावभावना निसर्गाच्या सुंदर व चिरंतन रूपांशी एकरूप होत असल्याची अनुभूती त्याने आपल्या काव्यातून प्रकट केली. वर्ड्स्वर्थचे निसर्गप्रेम व निसर्गसान्निध्यातून त्याला येणारा परतत्त्वानुभव ही स्वच्छंदतावादी वृत्तीची खास वैशिष्ट्ये त्याच्या काव्यातून प्रकर्षाने प्रतीत झाली; तर कोलरिजने आपल्या काव्यातून अतर्क्य, विलक्षण गूढ अनुभूतींचे, तसेच अतिंद्रिय व अतिमानुष वृत्तिविशेषांचे स्वच्छंद चित्रण केले. त्याची ‘ द एन्शंट मरिनर ’ ही स्वच्छंदतावादी विशेषांनी युक्त अशी सर्वोत्कृष्ट कविता मानली जाते. कोलरिजने ‘ कल्पनाशक्ती ही सार्वभौम सर्जनशक्ती असून समग्र व्यक्तिमत्त्वाच्या विकासाची द्योतक आहे ’, ही स्वच्छंदतावादी वाङ्मयीन भूमिका ठामपणे मांडून इंग्रजी समीक्षाविचारात क्रांती घडवून आणली. विल्यम ब्लेकची साक्षात्कारी अनुभूती, त्याने निर्मिलेले पर्यायी विश्व आणि मिथक सृष्टी हे स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे समर्थ प्रभावी आविष्कार म्हणता येतील. त्याची ‘ द टायगर ’ ही कविता सृष्टीच्या, जीवनाच्या गूढ रहस्याविषयी आश्चर्याने, कुतूहलाने, अविश्वासाने जे प्रश्न उपस्थित करते, ते स्वच्छंदतावादी वृत्तीचे निदर्शक होते.

जॉन कीट्स हा स्वच्छंदतावादी पंथातील आणखी एक श्रेष्ठ इंग्रज कवी. त्याला प्राचीन ग्रीक संस्कृतीविषयी वाटत असलेले प्रेम हे स्वच्छंदीवृत्तीचे निदर्शक होते. कीट्सला सौंदर्य म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजेच सौंदर्य असा अद्वैतरूपी साक्षात्कार झाला. ‘ ओड ऑन अ ग्रेशन अर्न ’ ह्या उद्देशिकेच्या अखेरीस त्याने सत्य व सौंदर्य यांच्या एकात्मतेवरील आपली श्रद्धा व्यक्त केली आहे. ‘ ब्यूटी इज ट्रथ, ट्रथ ब्यूटी ’ किंवा ‘ अ थिंग ऑफ ब्यूटी इज अ जॉय फॉर एव्हर ’ ह्यांसारख्या त्याच्या सुभाषितवजा ओळी स्वच्छंदतावादी कला--वाङ्मयीन धारणेचा गाभा सूचित करणार्‍या आहेत. त्याची ही सौंदर्यासक्ती व उत्कट भावावस्था व्यक्त करणारी प्रतिमासृष्टी हे इंग्रजी स्वच्छंदतावादी चळवळीचे आणखी एक बलस्थान ठरले. काव्यात विचारांपेक्षा विशुद्ध संवेदनशीलतेला त्याने निर्णायक महत्त्व दिले. संपन्न प्रतिमांद्वारे घडवून आणलेली नाद, स्पर्श, गंधादी इंद्रिय-संवेदनाची उत्कट अभिव्यक्ती हा त्याच्या काव्याचा लक्षणीय विशेष स्वच्छंदतावादी वृत्तीचा निदर्शक आहे. शेलीच्या काव्यात स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचा मुक्त विकास दिसतो. आदर्शाची व मृत्यूची ओढ ही स्वच्छंदवृत्तीची लक्षणे शेलीच्या काव्यात मुख्यत्वे आढळतात. वर्ड्स्वर्थ व शेली हे दोघेही स्वच्छंदतावादी परंपरेतले प्रमुख कवी असले, तरी शेली वर्ड्स्वर्थच्या अगदी विरुद्ध म्हणजे विज्ञानप्रेमी होता. अनेक वैज्ञानिक संकल्पना त्याने आपल्या काव्यातून प्रतीकरूपात वापरल्या आहेत. गोल्डन ट्रेझरी या प्रातिनिधिक स्वच्छंदता-वादी काव्यसंग्रहात शेलीच्या पंधराच्या वर कविता समाविष्ट आहेत. त्याच्या काव्यात प्लेटोमत व क्रांतीचे तत्त्वज्ञान यांचेही तात्त्विक पडसाद दिसून येतात. लॉर्ड बायरनच्या काव्यात अभिजात व स्वच्छंद प्रवृत्तींचे अनोखे मिश्रण आढळते. ग्रीसच्या स्वातंत्र्यलढ्यातला त्याचा सहभाग म्हणजे स्वच्छंदतावादी, स्वातंत्र्यप्रेमी वृत्तीला त्याने दिलेली कृतीची जोड म्हणता येईल. निराश मनःस्थितीचा तीव्र, प्रखर आविष्कार व स्वातंत्र्याचा अविरत, प्रामाणिक ध्यास ही त्याच्या स्वच्छंदतावादाची प्रधान वैशिष्ट्ये होत. चाइल्ड हॅरल्ड्स पिलग्रिमेज ( ४ खंड, १८१२—१८ ) ह्या खंडकाव्यातील ‘ उदास यात्रिका ’ ची प्रतिमा, तसेच डॉन वॉन ही नाय-काच्या अनेक साहसांची पद्यबद्ध कादंबरी ही बायरनच्या स्वच्छंदतावादी वाङ्मयीन आविष्काराची काही ठळक उदाहरणे.

सारांश, विल्यम ब्लेक, वर्ड्स्वर्थ, कोलरिज, शेली, कीट्स, बायरन हे इंग्रजी स्वच्छंदतावादी संप्रदायातील प्रमुख कवी आपापल्या काव्या-विष्कारांतून स्वच्छंदतावादाचे वेगवेगळे गुणविशेष प्रकट करीत असले, तरी त्यांचे निर्मितिसूत्र एकच असल्याचे जाणवते; ते म्हणजे स्वतःच्या सर्जनशील कल्पनाशक्तीतून प्रतीत झालेले विश्वाचे भान ते आपल्या काव्यातून प्रकट करतात. कवीचे आत्मभान तरल व तीव्र संवेदनशील झालेले असून कल्पनेच्या, अंतःप्रेरणेच्या आधारे विश्वातील सर्व थरांवरचे अनुभव घेऊन त्याला आकार देण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे, हे स्वच्छंदतावादी इंग्रजी काव्यातून जाणवते. यंत्रतंत्राधिष्ठित वैज्ञानिक सत्यांच्या स्पष्टीकरणापलीकडे असलेले सृष्टीचे रहस्य व त्यांतली अतिंद्रिय गूढता ही केवळ कल्पनाशक्तीनेच अवगत होऊ शकते व अंतःप्रेरणेच्या साहाय्याने ती कलाकृतीतून आविष्कृत करता येते, ही दृढ धारणा स्वच्छंदतावादानेच रुजवली. काव्याची आद्यशक्ती म्हणजे सर्जनशील कल्पनाशक्ती. त्यातून काव्याने अनुकृतींकडून आविष्काराकडे नव्या दिशेने वाटचाल केली, ती स्वच्छंदतावादी काव्यात ठळकपणे दिसते. विविध काव्यप्रकार — उदा., बॅलड,  सुनीत, गीत,  ओड ( उद्देशिका ), गूढकाव्य, दीर्घकाव्य, भावगीत इ. — स्वच्छंदतावादी काव्यसंप्रदायात नव्याने उदयास आले वा विकसित झाले. तसेच स्वच्छंदतावादी काव्यात विविध भावावस्थांना — उदा., गूढानुभव, प्रणय, स्वातंत्र्यप्रेम, निसर्गप्रेम तसेच सामान्य माणसांच्या दैनंदिन जीवनातील विविध प्रकारच्या भावछटा यांना—काव्यरूपे लाभली. त्यांत सहजता व उत्स्फूर्तता, उत्कटता आणि प्रामाणिकपणा असल्याने ही स्वच्छंदतावादी कविता जनसामान्यांच्या अंतःकरणाला भिडली व अफाट लोकप्रिय ठरली. अशा प्रकारे अठराव्या--एकोणिसाव्या शतकांत इंग्रजी साहित्यात स्वच्छंदतावादी कवींचे काव्य हे एक समृद्ध वाङ्मयीन दालन निर्माण झाले आणि त्याने एकूणच विश्वसाहित्य प्रेरित व प्रभावित केले.

इंग्रजी गद्य साहित्यातही स्वच्छंदतावादी प्रवृत्तीचे प्रभावी नानाविध आविष्कार दिसून येतात. टॉमस कार्लाइल (१७९५—१८८१) याच्या सार्टोर रीसार्ट्स ( इं. शी. ‘द टेलर री-पॅच्ड’ )  या आलंकारिक व्यामिश्र गद्यशैलीतील ग्रंथावर जर्मन स्वच्छंदतावादाचा व विशेषतः  झां पाउल ह्या विख्यात जर्मन लेखकाचा प्रभाव जाणवतो. चिद्वादी तत्त्वज्ञानाच्या विचारसरणीचे पडसादही कार्लाइलच्या लिखाणात उमटलेले दिसून येतात. ऐतिहासिक वीरांची गाथा असलेल्या हीरोज अँड हीरो-वर्शिप (१८४१) या ग्रंथातही कार्लाइलच्या स्वच्छंदतावादी विचारसरणीचे प्रतिबिंब पडलेले दिसून येते. सर वॉल्टर स्कॉटच्या ऐतिहासिक कादंबर्‍यांतून प्राचीन व मध्ययुगीन जीवनातील अनुभवांचे स्वच्छंदतावादी चित्रण आढळते. वेव्हर्ली (१८१४) या त्याच्या कादंबरीत स्वच्छंदतावादाची गुणवैशिष्ट्ये प्रकर्षाने प्रकटली आहेत.

ब्रिटिश स्वच्छंदतावादी संप्रदायात गॉथिक कादंबरी हा नवा प्रकार उदयाला आला. विल्यम बेकफोर्डची वॅथेक (१७८४), अ‍ॅन रॅडक्लिफची द मिस्टरीज ऑफ यूडोल्फो (१७९४), मॅथ्यू ल्यूइसची द मंक (१७९५) या कादंबर्‍या गॉथिकची उदाहरणे होत. गॉथिक कादंबर्‍या इंग्लंडमध्ये फार लोकप्रिय ठरल्या. एमिली ब्राँटीची (१८१८—४८) वदरिंग हाइट्स (१८४७) व  शार्लट ब्राँटीची (१८१६—५५) जेन आयर (१८४७) या स्वच्छंदतावादी गॉथिक कादंबर्‍यांनी लोकप्रियतेचा कळस गाठला. गॉथिक कादंबर्‍यांतून अनेकविध स्वच्छंदतावादी गुणधर्म उत्कटत्वाने व उत्कृष्ट रीत्या आविष्कृत झाले. अतिभौतिक ( सुपरनॅचरल ) अनुभवसृष्टी, तीव्रोत्कट भावनाविष्कारांवर भर, भूतकाळाबद्दल वाटणारी ओढ, दूरस्थ परक्या वातावरणाचे, पार्श्वभूमीचे चित्रण; खिन्न, उदास, गूढ व आकर्षक व्यक्तिरेखा ( उदा., ‘ बायरनिक हिरो ’ ची श्रेष्ठ वीरनायकाची प्रतिमा ) ही ब्रिटिश गॉथिक कादंबर्‍यांची काही वैशिष्ट्ये स्वच्छंदतावादाची द्योतक आहेत.

संदर्भ : 1. Abrams, M. H. The Mirror and the Lamp : Romantic Theory of the Critical Tradition, New York, 1958.

2. Barzun, Jacques, Classic, Romantic and Modern, Boston, 1961.

3. Bowra, M. The Romantic Imagination, London, 1961.

4. Furst, Lilian R. Romanticism in Perspective : A Comparative Study of Romantic Movement in England, France and Germany, London, 1959.

5. Lovejoy, Arthuro, Essays in the History of Ideas, 1978.

6. Praz, Mario, The Romantic Agony, Oxford, 1970.

7. Wellek, Rene, A History of Modern Criticism; Vol. 2, The Romantic Age, London, 1955.

८. रायकर, सीताराम व इतर, संपा. वाङ्मयीन वाद : संकल्पना व स्वरूप, पुणे, १९९०.

९. सप्रे, अविनाश, “ ब्रिटिश रोमँटिसिझम आणि मराठी कविता : एक तौलनिक परिप्रेक्ष्य ’’; जहागिरदार, चंद्रशेखर, संपा. तौलनिक साहित्याभ्यास : तत्त्वे आणि दिशा, कोल्हापूर, १९९२.

१०. क्षीरसागर, श्री. के. वाद-संवाद, मुंबई, १९६०.

लेखक : श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate