অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हिमरू विणकाम

हिमरू कापड

पर्शियन भाषेतील हाम-रू या शब्दाचा हिमरू हा अपभ्रंश आहे. या मूळ शब्दाचा अर्थ नक्कल किंवा प्रतिकृतीअसा आहे. हिमरू कारागिरीत इतर विणकामाची नक्कल आहे. म्हणून प्रचलित नाव रूढ झाले असावे. किनखाबच्या विणकामात सोन्याचा किंवा चांदीचा व रेशमी धागा वापरला जातो. हिमरू विणकाम याच प्रकारचे पण कमी दर्जाच्या धाग्यांनी विणलेले असते. रेशमाच्या धाग्यांबरोबर सुती किंवा लोकरी धाग्यांचाही उपयोग या विणकामात होतो.

हिमरू कापड

मनमोहक अनेकरंगी वेलबुट्टी, किनखाबपेक्षा कमी किंमत व लोकरी कापडाप्रमाणे असणारा मऊपणा यांमुळे हिमरू कापड अतिशय लोकप्रिय आहे. चौदाव्या शतकात मुहम्मद बिन तुघलकाने दिल्लीहून आपली राजधानी दक्षिणेत हलविताना बनारस व अहमदाबाद येथील जरतारी काम करणारे कुशल विणकर आपल्याबरोबर दौलताबाद येथे नेले. या विणकरांनी हिमरू विणकाम प्रचलित केले असे सांगितले जाते.

गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर हिमरूच्या वेलबुट्ट्या फारच आकर्षक व सुंदर दिसतात. कापडावरील आकृत्यांची रचना, त्यांतील रेषा, रंगाची विखुरणी व कौशल्यपूर्ण नक्षी पाहून ह्या कापडाच्या कलात्मकतेचीकल्पना येते. साधारण दाट विणलेल्या एक चौ.मी. कापडाचे वजन अदमासे शंभर ते दीडशे ग्रॅम असते. तसेच सामान्यतः प्रत्येक चौरसइंचात दोऱ्यांचे २८० टाके असतात. हिमरू कापडाचे विणकाम रेशमी, सुती किंवा लोकरीच्या उभ्या धाग्यांच्या पार्श्वभूमीवर (ताणा) रेशमीकिंवा जरीच्या आडव्या धाग्यांनी (बाणा) केले जाते. त्याचे वेलबुट्टीदार नक्षीकाम विणण्यासाठी किनखाबी विणकामाप्रमाणेच, हातमागाच्या वयांमागे योजिलेल्या नक्षीकामाबरहुकूम भोके पाडलेले कागद बसविले जातात. या भोकांतून जाणाऱ्या धाग्यांची, नक्षीकाम बरोबर वठण्यासाठी सारखी निवड करावी लागते व त्यासाठी खास विणकरांशिवाय दुसऱ्या साहाय्यकाची जरुरी लागते. कारण इतर हातमागांप्रमाणे या हातमागात ताणा वर-खाली पायाने करीत नाहीत. या विशिष्ट पद्धतीमुळे हिमरू कापड विणण्यास फार परिश्रम पडतात व वेळही फार लागतो. पाच रंगांच्या हिमरू कापडाचे विणकाम साधारणपणे दररोज पाच ते नऊ इंचांपर्यंतच होऊ शकते.

हिमरूचे दोन सुप्रसिद्ध प्रकार

हिमरूचे दोन सुप्रसिद्ध प्रकार गुलबदन व शहामहमद असे आहेत. या दोन्हींत ताणा नक्षीकाम राखून विशिष्ट पद्धतीने रंगविलेला असतो. पूर्वी वनस्पतिजन्य रंग वापरले जात. केशरी, हिरवा, किरमीजी व जांभळा हे रंग विशेष वापरीत असत. नक्षीचे नमुनेही पारंपरिक होते.

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात या कापडाचा उपयोग सजावटीसाठी केला आहे. हिमरू कापडाची परंपरागत कला आणि व्यवसाय औरंगाबाद (महाराष्ट्र राज्यातील) व हैदराबाद येथे चालू आहे.

लेखक : जगतानंद भटकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate