অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हेमाडपंती वास्तुशैली

मध्ययुगीन काळात प्रचलित असलेली एक वास्तुशैली

मध्ययुगीन काळात प्रचलित असलेली एक वास्तुशैली. या शैलीस अनेकदा ‘हेमाडपंती’ ही सर्वसाधारण संज्ञा देण्यात येते. हे नाव यादव काळातील  हेमाद्री ऊर्फ हेमाडपंत हा यादव राजा महादेव (कार. १२६१–७०) याचा श्रीकरणाधिप आणि नंतर यादव राजा रामदेवराव (कार. १२७१–१३११) याच्या पदरी मंत्री होता, त्यावरून रूढ झाले आहे. हेमाडपंताने अनेक मंदिरे बांधली आणि मंदिर- बांधणीस प्रोत्साहन दिले, हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारार्थ त्याने सुमारे तीनशे मंदिरे बांधली असावीत, अशी वदंता-परंपरा आहे; तथापि या काळातील अनेक मंदिरे हेमाडपंताच्या पूर्वी सुमारे शंभर-दीडशे वर्षे आधी बांधलेली आहेत. त्यामुळे यादव काळातील सर्व मंदिरांना हेमाडपंती म्हणणे कालदृष्ट्या अप्रस्तुत व चुकीचे ठरेल; कारण यादव कृष्णदेव यांच्या नांदगाव शिला-लेखाचा (१२५४-५५) उल्लेख करून वा. वि. मिराशी म्हणतात की, ‘हा लेख ज्या देवालयात मिळाला त्यावरून हे मंदिर यादवकालीन आहेव हेमाडपंती (हेमाडपंथी) बांधणीचे आहे ‘; तथापि शके ११७७ म्हणजे १२५५ मध्ये ही शिल्पपद्धती हेमाद्रीने प्रथम प्रचलित केली असे दिसत नाही, कारण हेमाद्री हा महादेवाच्या काळी उदयास आला. हेन्री कझिन्स मिडिव्हल टेम्पल्स ऑफ डेक्कन या ग्रंथातही हेच मत मांडतो, तसेचनिलंगे व नारायणपूर येथील मंदिरांचा परिचय करुन देताना जेम्स बर्जेसयाने असेच मत नोंदविले आहे. म्हणून या वास्तुशैलीस यादव वास्तुशैली म्हणणे सयुक्तिक ठरेल.

कालदृष्ट्या मंदिरांचे दोन स्वतंत्र भाग

कालदृष्ट्या या मंदिरांचे दोन स्वतंत्र भाग पडतात. एक, सुरुवातीची अकराव्या ते तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत बांधलेली मंदिरे आणि दोन, इ. स. १२५०–१३५० दरम्यान बांधलेली मंदिरे. सुरुवातीच्या मंदिरांवर विपुल प्रमाणात शिल्पांकन असून नंतरच्या मंदिरांवर ते क्रमशः तुरळक झाले आहे व अखेरीस शिल्पांकन क्वचित आढळते. त्यांना रूढार्थाने हेमाडपंती म्हणता येईल. वस्तुतः ही सर्व मंदिरे वास्तुशिल्पशैलीच्या दृष्टीने माळव्यातील भूमीज या उपवास्तुशैलीतून उत्क्रांत झालेल्या नागरशैलीत (इंडो-आर्यन) बांधलेली आहेत. ही शैली नागर आणि द्राविड यांहून काहीशी भिन्न असून प्रथम यादव व शिलाहार वंशांतील राजांनी ती विकसित केली. पुढे त्यांत हेमाडपंत या यादवांच्या मंत्र्याने काही बदल केले. त्यामुळे शिल्पकला संपुष्टात येऊन केवळ वास्तुरूप राहिले. वास्तुशास्त्रावरील समरांगणसूत्रधार (अकरावे शतक) आणि अपराजितपृच्छा (बारावेशतक) या ग्रंथांतून तसेच सिंघण यादवांच्या १२३१ च्या कोरीव लेखात याविषयी काही माहिती मिळते. या मंदिराचे दोन प्रकारचे आराखडे( विधान) – चतुरस्त्र व वृत्तसंस्थान (तारकाकृती) – असून चतुरस्त्र विधानात सर्व बाजूंचे कोपरे अशा पद्धतीने बांधलेले असतात की, एखादा दोर घेऊन तो मंदिराभोवती गुंडाळला तर चारी कोपरे मध्यबिंदूपासून समान अंतरावर आढळतात. या उलट वृत्तसंस्थान विधान स्थूलमानाने तारकाकृती (चांदणीच्या आकाराचे) असून ह्यात तारकांचे सर्व कोन एका वर्तुळात बसविलेले असतात. अम्रेश्वर (अंबरनाथ), गोंदेश्वर (सिन्नर, नासिक जिल्हा), देवी मंदिर (पाटण, चाळीसगाव तालुका), महेश्वर (कोकमठाण, नगर जिल्हा), लोणार (बुलढाणा जिल्हा) येथील सर्व मंदिरे वृत्तसंस्थान विधान-पद्धतीची आहेत. मंदिराच्या कोनाकृती भिंती पायापासून वरपर्यंत चढत गेल्यामुळे त्या ठाशीव दिसतात आणि छायाप्रकाशाच्या परिणामामुळे त्यांच्या भरीवपणाला अधिक उठाव मिळतो. त्यामुळे पायापासून कळसा-पर्यंत वर गेलेल्या भित्तिकोनांच्या रेषांमुळे दृग्गोचर होणारा उभटपणा कमी भासतो. या मंदिराच्या बांधणीत काही ठिकाणी चौथरे आहेत, पण पाया खणलेला नाही; तथापि पायाची आखणी ज्या प्रकारची असेल, त्या प्रकारची अगदी लहान आकृती शिखरावरील आमलकाची बैठक बनते. तसेच दगड सांधण्यासाठी चुना वा तत्सम द्रव्य वापरलेले आढळत नाही. कातीव दगडांना खाचा वा खोबणी पाडून एकावर एक दगड रचून भिंतींची बांधणी केलेली असते. खोबण्या अशा पद्धतीने पाडतात, की ते दगड एकमेकांत घट्ट बसतात आणि किरकोळ फटी राहू नयेत म्हणून क्वचित शिसे ओतीत. मंदिराच्या पीठावर अश्व, गज, नर, कणी, हिऱ्यादी थर क्वचित आढळतात; मात्र काही मंदिरांतून कणी, कमळ, हिऱ्यादी स्तरप्रकार आढळतात. कणीचा आकार दुधारी सुरीच्या पात्याचा आडवा छेद घेतल्यासारखा वाटतो. बहुतेक मंदिरांचे विभाजन गर्भगृह, अंतरालय, सभागृह व प्रवेश मंडप अशा स्वतंत्र भागांत केलेले आहे. क्वचित दर्शनीभागी भोगमंडप दिसतो. काही मंदिरांतून मुख्य गर्भगृहाव्यतिरिक्त आणखी दोन स्वतंत्र गर्भगृहे (त्रिकुटक) असून क्वचित अनेक उपगर्भगृहेही आढळतात. सामान्यतः एकच प्रवेशद्वार असते; पण काही मंदिरांना तीन द्वारे व प्रवेशमंडप (कोप्पेश्वर, खिद्रापूर) आढळतो. हेमाडपंती मंदिर समूहातील गोंदेश्वर हे एकमेव पंचायतनशैलीत बांधलेले मंदिर असून त्याच्या चार कोपऱ्यांत अनुक्रमे सूर्य, देवी, विष्णू व गणेश यांची उपमंदिरे आहेत. ती आकाराने लहान असून गोंदेश्वर हे सर्व मंदिरांत सर्वात आकाराने मोठे मंदिर आहे.

या मंदिरांचे स्तंभ वैशिष्ट्यपूर्ण व एकसंध पाषाणात घडविलेले आरसपानी आहेत. ते चौकोनी, षट्कोनी, अष्टकोनी असून स्तंभपाद साधारणतः चौरस आकाराचाच आढळतो. स्तंभशीर्षे कीचक, कमळ व क्वचित पर्णाची आहेत. स्तंभातील कर्णिका किंवा कणी ही मंदिरस्तंभांची एक खास देणगी होय. या स्तंभांवरील मधल्या पट्टीत मूर्ती वा भौमितिक आकृतिबंध कोरलेले आहेत. त्याखाली कधी गोलाकार पाया किंवा चौकोनी बैठक असते. नगर जिल्ह्यातील पेडगावच्या लक्ष्मीनारायण व वाघळीच्या मुथादेवी मंदिरांतील स्तंभ अनुक्रमे कुंभाकृती व पुष्पाकृतीयुक्त सोळंकी पद्धतीचे वाटतात; मात्र पाटण (महेश्वर) व किकली (सातारा जिल्हा) येथील भैरवनाथ मंदिरांचे स्तंभ पूर्णतः यादव वास्तुशैलीचे आहेत. काही ठिकाणी भित्तिस्तंभ आहेत. त्यावरही कलाकुसर आढळते.

या तथाकथित हेमाडपंती मंदिरांची शिखरे वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना आणि मंदिराच्या पायाची रचना – आखणी – यात फार मोठा समतोल साधलेला आढळतो. मंदिराच्या सर्व कोनांच्या रेषा जमिनीपासून निघूनथेट कळसापर्यंत उभ्या जाऊन भिडतात आणि शिखरांच्या छोट्याप्रतिकृती (ऊरूशृंगे) खालपासून वरपर्यंत एकीवर एक प्रमाणशीर पद्धतीने बसविल्यामुळे ही सर्व लहान शिखरे रचून मोठे शिखर बनलेले वाटते.या शिखरांच्या साहाय्यक दगडांवर नक्षीकाम असल्यामुळे शिखरालाउठाव आलेला दिसतो. ह्या शिखरातील लहान शिखरे (कूट) कूटस्तंभाच्या आधाराने हळूहळू वरच्या बाजूस चढलेली दिसतात. त्यांचा आकार वर क्रमशः लहान होत जातो आणि त्यातून एक सर्वांगीण सुरेख एकात्म शिखराचा आभास निर्माण होत जातो. यासंबंधी अपराजितपृच्छा ग्रंथात म्हटले आहे, ‘यत्र वंशोद्भवाः कूटा र्‍हस्ववृद्धिक्रमास्थिताः दलविभक्त्या त्वड्गैश्व भूमिजाः पुरभूषणाः’ (१०६; २९). अवशिष्ट शिखरांत सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराचे शिखर सुस्थितीत आहे. उर्वरित मंदिरांची शिखरे अर्धवट पडलेल्या अवस्थेत आढळतात; तर काहींची शिखरे जमीनदोस्त झाली आहेत. ही शिखरे उत्तरेकडील नागर, लतिना व भूमिज या तीन वास्तुशैलींच्या मिलाफातून निर्माण झालेली असली, तरी त्यांत भूमिज वास्तुशैलीचे घटक प्रकर्षाने दृग्गोचर होतात.

शिखरांखालोखाल या मंदिरांची छते (विताने) सुद्धा लक्षणीय आहेत; तथापि त्यांत तुलनात्मक दृष्ट्या कमी प्रकार आढळतात. यांबाबत त्यांनी गुजरात व माळवा येथील काही मंदिरांचे अनुकरण केले आहे; पणत्यात स्थानिक घटकांचे मिश्रण अधिकतर आढळते. अंबरनाथ (शिव) व सिन्नर (शिव) येथील मंदिरांतील छते ‘सवर्ण’ म्हणजे घंटाकृती गोलाकार चढत्या बांधणीच्या छताच्छादित मंडप प्रकारची आहेत; तरझोडगा (धुळे जिल्हा) येथील शिवमंदिराचा मंडप फन्साना म्हणजे त्रिकोणाकृती वरवर पिरॅमिडसारखा चढत जाणाऱ्या पायऱ्यांनी बनविलेल्या छप्पराचा केला आहे. नंतर ज्यांना रूढार्थाने हेमाडपंती म्हणता येईल अशी मंदिरांची छते साधी, निमुळत्या आकाराची फलाकृती वा घुमटाकृती असून छत जसजसे वर जाईल तसतसे त्या घुमटाचा आकार लहान होत गेल्याचे दिसते. ते वर्तुळाकृती छोट्या छोट्या पेटिकेवर आधारलेल्या अशा बांधणीचे असून मधोमध एक कमळाकृती शिळा बसविलेली असते, तर काहीत झुंबर आढळते. झोडगे, वाघळी येथील छते मूर्तिकामांनी अलंकृत केली असून वाघळीच्या छतावर कृष्णलीलांचे दृष्य असून ह्यात मुरलीधराची मूर्ती आहे. सुरुवातीच्या मंदिरांतील छतांवर भौमितिक रचनाबंधांबरोबरच मधूनमधून शिल्पपट्ट व त्यांवर उभ्या मूर्ती खोदलेल्या आहेत.

छतांप्रमाणेच या मंदिरांच्या द्वारशाखा अलंकृत केलेल्या आहेत आणि त्यांवरील गणेशपट्टी व तिच्या सोबतच्या भागात कोरलेल्या मातृकामूर्तीव इतर देवदेवता त्यांच्या लांछनासह खोदलेल्या आढळतात. उंबरठ्यावर कीर्तिमुखे, मकर व कमळ ही प्रतिमाने प्रामुख्याने कोरलेली दिसतात. या सुरुवातीच्या हेमाडपंती-यादव मंदिरांच्या मंडोवरावर (बाहेरच्या भिंतींवर) विपुल शिल्पांकन असून स्तंभ, द्वारशाखा, तोरण, छत आणि शिखर यांवरील शिल्पांकनापेक्षा हे तुलनात्मक दृष्ट्या जास्त असून बहुतेक मंदिरांतून देवादिकांच्या मूर्ती जेवढ्या सुडौल व सुंदर करता येतील, तेवढ्या करण्याचा प्रयत्न शिल्पकाराने केला आहे. या मूर्तिसंभारात प्रामुख्याने पौराणिक देवदेवतांबरोबर दशावतार, महाभारत, रामायण, कृष्णलीला यांची कथात्मक शिल्पे आणि सुरसुंदरी यांचे शिल्पांकन आहे. तद्वतच काही ठिकाणी कामशिल्पे (कोप्पेश्वर व फलटणचे जब्रेश्वर) आढळतात. तसेच वास्तुकला आणि शिल्पकला यांतील परिपूर्ण सुसंगती राखण्याचा प्रयत्न केला आहे. किंबहुना वास्तुशैली आणि शिल्पशैली यांचा सुंदर मिलाफ या मंदिराच्या बांधणीत दृग्गोचर होतो. सुरुवातीची ही मंदिरे हीच एक सुंदर शिल्पाकृती भासते. शिल्पाला वास्तुरचनेच्या विशिष्ट बांधणीमुळे एक प्रकारचा उठाव मिळाला आहे. प्रारंभीच्या काळात( अकरावे-बारावे शतक) प्रतिमा उठावदार करण्याकडे वास्तुविशारदांचा कल होता. त्यामुळे ती मंदिरे शिल्पांनी अलंकृत आढळतात; परंतु नंतरच्या काळात हेमाडपंती मंदिरांचे बांधकाम पूर्णतः वास्तुरचनेला प्राधान्य देऊन झाल्यामुळे प्रतिमानिर्मितीकडे कलाकारांचे दुर्लक्ष झाले आणि ठोकळेवजा वास्तूंची बांधणी झाली. पुढे ती सतराव्या-अठराव्या शतकांत मराठा मंदिराच्या बांधणीत विशेषत्वाने दृग्गोचर होते; कारण त्यांची वास्तुशैली हेमाडपंती आहे; पण शिल्पांकन विरहित ही मंदिरे आढळतात.

लेखक : सु. र देशपांडे

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate