অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह

पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह

टपालाच्या तिकिटांच्या व्यावहारिक उपयोगाव्यतिरिक्त, तिकिटे जमविण्याचा छंदही जगभर लोकप्रिय आहे. आधुनिक काळात डाकमुद्राविद्येचे (फिलॅटेली) तंत्र खूपच प्रगत झाले आहे. त्यात तिकीटसंग्रहाबरोबरच तिकिटे व तिकीटउप्तादन, निरनिराळ्या देशांतील टपालांचा अद्ययावत इतिहास वगैरे बाबींचा अभ्यासही अंतर्भूत असतो. ‘फिलॅटेली’ ही संज्ञा १८६३ मध्ये एम्.जी. हर्पीन या फ्रेंच गृहस्थाने प्रथम वापरात आणली. ती सैल अर्थाने तिकीटसंग्रहासाठी वापरली जाते. ६ में १८४० रोजी ग्रेट ब्रिटनमध्ये पहिली तिकीटविक्री सुरू झाली; तेव्हापासूनच साधारणपणे तिकीटसंग्रहालाही चालना मिळाली असे म्हणता येईल. सर्वांत आद्य तिकीट एक पेनीचे होते व ते ‘पेनी ब्लॅक’ म्हणून ओळखले जात असे. त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुखवटा होता. सुरुवातीच्या काळात तिकीटसंग्रहाचे खासे असे काही तंत्र नव्हते. एका रंगाची, चित्राची व मूल्याची तिकिटे सारखीच समजत असत. जलचिन्हे व छिद्रे यांचाही विचार केला जात नसे. साधारणतः १८५५ पासून तिकीटसंग्रहास नीटनेटके स्वरून प्राप्त झाले.

तिकिटांचा दुर्मिळपणा, त्यांना असलेली मागणी व त्यांची स्थिती हे प्राथमिक घटक तिकिटांचे मोल ठरवताना संग्राहकाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. तिकिटे फार जुनी असल्यास ती मौल्यवान ठरतातच असे नव्हे, कारण ती बहुसंख्य असल्यास सहज व स्वस्त किंमतीत उपलब्ध होऊ शकतात. मात्र काही तिकिटांच्या कमी प्रती छापल्या जातात व त्यामुळे ती दुर्मिळ ठरतात आणि अशी तिकिटे मिळविण्यासाठी जास्त किंमत द्यावी लागते. सुरुवातीच्या काळात तिकिटांना कडांवर छिद्रे पाडलेली नसत, त्यामुळे ती कात्रीने वा सुरीने कापावी लागत. तिकिटे कापण्याऐवजी फाडून वेगळी करण्यासाठी हेन्‍री आर्चरने तिकिटांच्या कडांना भोके पाडण्याची कल्पना प्रथम सुचवली व ती अमलात येऊन ग्रेट ब्रिटनमध्ये सच्छिद्र कडा असलेली (पर्फोरेटेड) तिकिटे १८५४ मध्ये वापरात आली. इतर सर्व बाबतींत समान असलेली परंतु छिद्रांमध्ये भिन्नता असलेली तिकिटे दुर्मिळ व म्हणून मौलिक ठरतात.तिकिटाच्या २सेंमी. जागेत किती छिद्रे आहेत, ते मोजून त्याची सच्छिद्रता ठरवली जाते. तिकिटांवरील जलचिन्हेही (वॉटरमार्क्स) संग्राह्य तिकिटांचे मोल ठरवताना निर्णायक ठरतात.

काही तिकिटे सकृत्‌दर्शनी सारखी दिसली, तरी त्यांवरील जलचिन्हांचे आकृतिबंध भिन्नभिन्न असू शकतात.
काही भारतीय तिकिटे, १९७९.

तिकीट उजेडात धरल्यास त्यावरील जलचिन्ह दिसू शकते, अथवा काळ्या थाळीमध्ये तिकीट पालथे ठेवून व त्यावर जलचिन्हद्रव ओतून ते ओळखता येते. डॉ. जे. ए. लग्रां या फ्रेंच तिकीटसंकलकाने जलचिन्हांवर एक पुस्तक लिहिले आणि १८६६ साली छिद्रण-मापकाचा (पर्फोरेशन गेज) शोध लावला. तेव्हापासून तिकीटसंग्रहाला गती आली. तिकिटे वेगवेगळ्या रंगांच्या शाईमध्ये छापली जातात. मुळात एकाच रंगाच्या शाईमध्ये छापलेल्या तिकिटांमध्ये रंगभिन्नता आढळून आल्यास अशी तिकीटे संग्रहदृष्ट्या वेगवेगळी मानली जातात. अनेक तिकिटांमध्ये रंगांप्रमाणेच जलचिन्हांच्या चुका आढळतात आणि संग्राहकाच्या लेखी अशा चुकीच्या तिकिटांचे मोल फार असते. केप ऑफ गुड होपच्या त्रिकोणी तिकिटांमध्ये रंगांच्या, तर ट्रान्सव्हाल (१९०५) तिकिटांमध्ये जलचिन्हांच्या चुका आढळल्या. छपाईच्या वेगवेगळ्या पद्धतींनुसारही तिकिटांचे वेगवेगळे प्रकार मानले जातात. अनेकदा जुनी तिकिटे रद्द करून त्यांवरच नवी तिकिटे छापून ती वापरात आणली जातात, अथवा जुन्या तिकिटांवरच नवी किंमत छापली जाते. काही तिकिटे खासकरून विशिष्ट प्रसंगी छापली जातात. एखाद्या महान घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ वा एखाद्या थोर व्यक्तीचा गौरव करण्यासाठी खास गौरवपर तिकिटे काढली जातात.

 

टपालाच्या तिकिटांच्या व्यावहारिक उपयोगाव्यतिरिक्त, तिकिटे जमविण्याचा छंदही जगभर लोकप्रिय आहे. आधुनिक काळात डाकमुद्राविद्येचे (फिलॅटेली) तंत्र खूपच प्रगत झाले आहे. त्यात तिकीटसंग्रहाबरोबरच तिकिटे व तिकीटउप्तादन, निरनिराळ्या देशांतील टपालांचा अद्ययावत इतिहास वगैरे बाबींचा अभ्यासही अंतर्भूत असतो. ‘फिलॅटेली’ ही संज्ञा १८६३ मध्ये एम्.जी. हर्पीन या फ्रेंच गृहस्थाने प्रथम वापरात आणली.

काही परदेशी तिकिटे : वरची ओळ : १. आद्य हवाई टपाल वाहतुकीच्या निमित्ताने काढलेले अमेरिकन तिकीट, १९१८. २. ‘पोस्ट ऑफिस’ अशी अक्षरे असलेले मॉरिशसचे दुर्मिळ तिकीट, १८४७. ३. पॅरिसमधील ‘अर्फिला ७५’ या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनातील एक तिकीट. मधली ओळ : १. निकाराग्वाने राष्ट्राध्यक्ष रूझवेल्ट यांच्या सन्मानार्थ काढलेले तिकीट, १९४६. २. ब्रिटिश गियानाचे किरमिजी कागदावर काळ्या रंगात छापलेले दुर्मिळ तिकीट, १८५६. ३. केप ऑफ गुड होपचे त्रिकोणी तिकीट, १८५३. ४. वरछपाई असलेले पहिल्या महायुद्धातील जर्मन तिकीट. खालची ओळ : १. ‘प्रोजेक्ट मर्क्युरी’ (१९६२) या अंतराळयानाच्या मोहिमेप्रीत्यर्थ काढलेले अमेरिकन तिकीट. २. नाझी आक्रमणाविरुद्ध प्रखर झुंज देणाऱ्या फ्रान्सच्या गौरवार्थ अमेरिकेने काढलेले तिकीट, १९४३

ती सैल अर्थाने तिकीटसंग्रहासाठी वापरली जाते. ६ में १८४० रोजी ग्रेट ब्रिटनमध्ये पहिली तिकीटविक्री सुरू झाली; तेव्हापासूनच साधारणपणे तिकीटसंग्रहालाही चालना मिळाली असे म्हणता येईल.  सर्वांत आद्य तिकीट एक पेनीचे होते व ते ‘पेनी ब्लॅक’ म्हणून ओळखले जात असे. त्यावर व्हिक्टोरिया राणीचा मुखवटा होता. सुरुवातीच्या काळात तिकीटसंग्रहाचे खासे असे काही तंत्र नव्हते. एका रंगाची, चित्राची व मूल्याची तिकिटे सारखीच समजत असत. जलचिन्हे व छिद्रे यांचाही विचार केला जात नसे. साधारणतः १८५५ पासून तिकीटसंग्रहास नीटनेटके स्वरून प्राप्त झाले. 

तिकिटांचा संग्रह करताना सुरुवातीला सर्व प्रकारची मिळतील ती तिकिटे जमविण्याची संग्राहकाची प्रवृत्ती असते. हा सर्वसाधारण स्वरूपाचा संग्रह होय. तथापि तिकिटांची संख्या अक्षरशः अगणित असल्याने लवकरच संग्राहकाला तिकिटांचे वर्गीकरण व निवड करूनच संग्रह करावा लागतो.  एका देशाची वा खंडाची तिकिटे गोळा करणे, तसेच एका विशिष्ट काळातील तिकिटे गोळा करणे, अशा प्रकारे एखादे खास क्षेत्र ठरवून तिकिटांची निवड करता येते. तिकिटांच्या प्रकारांनुरूपही तिकिटांचा संग्रह करता येतो. उदा., महसूल तिकिटे इत्यादी. कित्येकदा तिकिटांवरील चित्रांच्या विषयाच्या अनुरोधानेही संग्रह केला जातो. उदा., कला, क्रीडा, धर्म वगैरे विषयांची चित्रे असलेली तिकिटे; पक्ष्यांची, प्राण्यांची, फुलांची वगैरे चित्रे असलेली तिकिटे इत्यादी. तिकिटे अनेक मार्गांनी जमविता येतात. तिकिटांचे संच बाजारात विकत मिळतात. स्नेही, नातेवाईक, कार्यालये, परदेशी कंपन्या यांच्याकडे टपालाबरोबर येणारी तिकिटे मिळवून, तसेच स्वतःजवळच्या जादा तिकिटांच्या बदल्यात हवी ती तिकिटे मिळवून संग्रह वाढवता येतो. पत्रव्यवहारावरील तिकिटे काढून घेण्यासाठी चिमटे विकत मिळतात; किंवा ती ओली करून सोडविता येतात. तिकिटांचे सूचिसाहित्यही प्रचंड प्रमाणावर उपलब्ध आहे. तसेच मासिके, नियतकालिके यांसारखे संदर्भसाहित्यही विपुल आहे. तिकिटांसाठी छापील संग्रहिकाही मिळू शकतात. संग्रहिकेमध्ये तिकिटाचा तपशील लिहिण्यासाठी, संग्रह सुबक दिसेल अशा रीतीने मोकळी जागा सोडलेली असते.

तिकीटसंग्रहाचा छंद आता जगभर पसरलेला असून, लहानांपासून थोरांपर्यंत साऱ्यांनाच त्याचे आकर्षण वाटत आले आहे. पूर्वीच्या काळातील प्रख्यात तिकीटसंग्राहकांमध्ये इंग्लंडच्या पाचव्या व सहाव्या जॉर्जचा समावेश होतो. पाचव्या जॉर्जने जमविलेल्या तिकिटांच्या ३०० संग्रहिका असून, त्या बकिंगहॅम राजवाड्यात ठेवल्या आहेत. सहाव्या जॉर्जने फक्त स्वतःच्या कारकीर्दीत प्रसिद्ध झालेली तिकिटेच जमविली होती. टॉमस के. टॅपलिंग याने त्याच्या काळापर्यंत उपलब्ध असलेल्या जवळजवळ सर्व तिकिटांचा संग्रह केला होता. तो त्याने १८९१ मध्ये ब्रिटिश वस्तुसंग्रहालयाला दिला. जगातील सर्वांत मोठा तिकीटसंग्रह फिलिप ला रेनॉतिअर फोन फेरारी या ऑस्ट्रियन गृहस्थाने जमवला होता. १९१७ मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्या संग्रहाचा लिलाव करण्यात आला व तो ४,०२,००० पौंडांस विकला गेला. अलीकडच्या काळातील फ्रॅंकलिन डी. रूझवेल्ट यांच्या तिकीटसंग्रहाचा छंद सुप्रसिद्धच आहे. जगभराच्या संग्रहातील काही तिकिटे किती दुर्मिळ व मौल्यवान आहेत, ह्याची कल्पना पुढील काही उदाहरणांवरून येईल : ब्रिटिश गियानात (सध्याचे गुयाना) फेब्रवारी १८५६ मध्ये प्रसिद्ध झालेले एक सेंटचे, किरमिजी कागदावर काळ्या रंगात छापलेले तिकीट जगातील सर्वांत दुर्मिळ तिकीट होय. हे एकच तिकीट उपलब्ध आहे. ते एका शाळकरी मुलाला आपल्या घरातील पत्रावर १८७३ मध्ये मिळाले. ते त्याने एका स्थानिक संग्राहकाला सहा शिलिंग्जना विकले. १९२२ साली हेच तिकीट पॅरिसमध्ये ७,३४३ पौंडांना विकले गेले आणि १९७० मध्ये हे तिकीट एका लिलावात १,१६,६६६ पौंडांना विकले गेले. मॉरिशसचे १८४७ मधील ‘पोस्ट ऑफिस’ अशी अक्षरे असलेले, एक पेनी किंमतीचे तिकीट एप्रिल १९७७ मध्ये पश्चिम जर्मनीच्या हँबर्ग शहरातील लिलावात ८२,५०० पौंडांना विकले गेले. केप ऑफ गुड होपची १८५३ ते १८६४ या काळतील त्रिकोणी तिकिटेही मौल्यवान आणि दुर्मिळ आहेत. केन्यामधील १९२५—२७ सालच्या लाल-काळ्या रंगाच्या तिकिटाच्या विक्रीची किंमत प्रत्येकी १०० पौंड होती. फ्रान्समधील मॉरीस बरस या व्यक्तीच्या खाजगी तिकीटसंग्रहाची लिलावांतर्गत किंमत १५,००,००० पौंड होती. लंडनच्या ‘ब्रिटिश म्यूझीयम’मधील तिकीटसंग्रह हा जगातील सर्वांत मोठा राष्ट्रीय संग्रह होय. तिकिटाच्यां आकारमानामध्येही असेच वविध्य आढळून येते. चीनमधील ‘एक्स्प्रेस डिलीव्हरी’तिकीट (१९१३) हे २४७·६ X ६९·८ मिमी.(९३/४" X २३/४") इतक्या मोठ्या आकाराचे होते, तर याउलट कोलंबियाच्या बोलिव्हार प्रांतातील तिकिटाचा (१९६३—६६) आकार ८ X ९·५ मिमी. (०·३१'' X ०·३७'') इतका लहान होता.

तिकीटसंग्राहकांची संख्या हल्ली कोट्यावधींच्या घरात गेली असून, ती सतत वाढतेच आहे. तिकीटसंग्राहकांच्या अनेक संघटना व मंडळे जागतिक व राष्ट्रीय पातळीवर कार्य करीत आहेत. त्यांत एकोणिसाव्या शतकात स्थापना झालेल्या ‘रॉयल फिलॅटेलिक सोसायटी’, लंडन, ‘कलेक्टर्स क्लब’, न्यूयॉर्क, ‘अमेरिकन फिलॅटेलिक सोसायटी’, शिकागो यांचा अंतर्भाव होतो. ‘इंटरनॅशनल फिलॅटेलिक फेडरेशन’ची स्थापना १९२६ मध्ये झाली. चाळीस राष्ट्रीय संघटना तिच्या सदस्य आहेत. तिकीटसंग्रहांची प्रदर्शने भरविणे व उत्तमोत्तम संग्रहांना पारितोषिके देणे यांसारखे उपक्रम ह्या संघटनांमार्फत केले जातात.

भारतीय डाकमुद्राविद्येला प्रदीर्घ इतिहास आहे. ईस्ट इंडिया कंपनीने १६८८ मध्ये मुंबई व मद्रास येथे टपाल कार्यालये स्थापन केली. रॉबर्ट क्लाइव्हने १७६३ मध्ये व्यवस्थित टपालसेवा सुरू केली; पण ती फक्त कार्यालयीन टपालापुरतीच मर्यादित होती. पहिले भारतीय ‘बिशप मार्क’ तिकीट १७७५ मधील असून ते भारतीय तिकीटसंग्रहातील एक अत्यंत दुर्मिळ तिकीट होय. तथापि १८३७ सालच्या भारतीय टपालखात्याच्या अधिनियमानुसार सर्व भारतभर टपालसेवेचा उगम झाला. ‘सिंधी डाक’ ही प्रसिद्ध तिकिटे १ जुलै १८५२ रोजी छापली गेली. ही फार दुर्मिळ होती व ती प्रत्येकी सु. १६,००० रुपयांस विकली गेली. ही सुरुवातीची तिकिटे अर्धा आणा किंमतीची, लाल रंगात छापलेली होती. आद्य भारतीय टपाल तिकिटे कलकत्त्याच्या एका छापखान्यात १८५४ मध्ये शिलामुद्रण प्रक्रियेने छापण्यात आली. या तिकिटांच्या बाजूंना छिद्रे नव्हती. ती ‘क्लासिक्स ऑफ इंडिया’ या नावाने ओळखली जात. १ ऑक्टोबर १८५४ रोजी अर्धा आणा किंमतीची तिकिटे सर्व भारतभर प्रचारात आली. सुरुवातीची तिकिटे पांढऱ्या कागदावर निळ्या रंगात छापलेली व व्हिक्टोरिया राणीचे चित्र असलेली होती. १९११ मध्ये जगातील पहिली हवाई टपालसेवा सुरू करणारा भारत हा पहिला देश होय आणि १९२९ मध्ये खास हवाई टपालतिकिटांचा संच प्रसिद्ध करणारा ब्रिटिश राष्ट्रकुलातीलही पहिला देश भारतच आहे. १८ फेब्रुवारी १९६१ रोजी टपाल व तार खात्याने हवाई टपालसेवेच्या गौरवार्थ खास पहिले सुवर्णमहोत्सवी (१९११—६१) तिकीट छापले. भारताबाहेर अ‍ॅबिसिनिया (सध्याचे इथिओपिया), ब्रिटिश सोमालीलँड, सूदान, झांझिबार इ. ठिकाणी भारतीत तिकिटे प्रचलित होती. १९२६ मध्ये नासिक येथे सरकारी मुद्रणालयाची स्थापना झाली आणि त्या ठिकाणी भारतीय तिकिटे छापली जाऊ लागली. ब्रिटिश अंमलात ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या प्रतिमा असलेली तिकिटेच बव्हंशी छापली जात. स्वातंत्र्यानंतर भारतीय डाकमुद्राविद्येचे नवे पर्व सुरू झाले. भारतीय संस्कृतीचे आणि कलेचे वैविध्यपूर्ण दर्शन तिकिटांद्वारा घडवले जाऊ लागले. अशोकस्तंभ हे त्यातील एक प्रमुख प्रतीक. १९४१ मधील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळांची रंगीत चित्रे असलेली पहिली तिकीटमालिका फार लोकप्रिय ठरली. तदनंतर भारतीय पक्षी, प्राणी, अभिजात नृत्ये, मुखवटे, लघुचित्रे इत्यादींच्या रंगीबेरंगी तिकीटमालिका अशाच लोकप्रिय झाल्या. भारतीय डाकमुद्राविद्या-संचालक एस्. पी. चतर्जी यांनी भारतीय डाकमुद्राविद्येच्या क्षेत्रात महनीय कामगिरी केली आहे. नवी दिल्ली येथील तिकीटसंग्रहालयास त्यांनी राष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. त्या संग्रहालयात काही फार दुर्मिळ तिकिटे आहेत. १९७० मध्ये दिल्ली येथे तिकीटसंग्रहांचे राष्ट्रीय आणि १९७३ मध्ये आंतरराष्ट्रीय प्रदर्शन भरविण्यात आले. त्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात एकूण ११२ देशांनी भाग घेतला होता व जगातील प्रसिद्ध उत्तमोत्तम तिकीटसंग्रह तिथे ठेवले होते. १९७३ मध्येच ‘रॉयल फिलॅटेलिक सोसायटी’चे फेलो म्हणून चतर्जींची निवड झाली. डॉ. डी. एन्. जतिया यांची ‘अर्फिला ७५’ या अत्यंत भव्य आंतरराष्ट्रीय तिकीटसंग्रह प्रदर्शनाच्या संयोजन- समितीवर असेच आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. हा बहुमान मिळविणारे ते पहिले भारतीय होत. डॉ. जतिया यांना त्यांच्या तिकीटसंग्रहाबद्दल पूर्वी सुवर्णपदकही मिळाले आहे. महाराष्ट्रातील नंदन नागवेकर यांनीही तिकीटसंग्रहाच्या क्षेत्रात मोठा लौकिक संपादन केला आहे.

१. प्रथम हवाई टपालसेवा-१९०६, २. सातव्या एडवर्डचे तिकीट-१९२५. ३. पाचव्या जॉर्जचे तिकीट-१९३१. ४. सहाव्या जॉर्जचे तिकीट-१९४६. ५. अशोकस्तंभाचे तिकीट-१५ ऑगस्ट १९४७. ६. पहिली जागतिक कृषि-जत्रा-१९५९. ७. हवाई टपालसेवेचे सुवर्णमहोत्सवी तिकीट : १९११-१९६१. ८. छत्रपती श्री शिवाजी महाराज-१९६१. ९. भारतीय एव्हरेस्ट शिखर मोहीम-१९६५. १०. आशियाई हॉकी विजेते-१९६६. ११. बीदरी पात्र-१९६८. १२. आझाद हिंद सरकार :२५ वा वर्धापनदिन-१९६८. १३. चंद्रावर मानव-१९६९. १४ महर्षी वाल्मीकी-१९७०. १५. संयुक्त राष्ट्रे : २५ वी जयंती-१९७०. १६. क्रिकेट विजय-१९७१. १७. इन्पेक्स-७५ : जुनी डाक गाडी. १८. भारतीय प्रजासत्ताकाचा रौप्यमहोत्सव-१९७५. १९. २१ वे ऑलिंपिक क्रीडासामने-१९७६. २०. भूकंप-अभियांत्रिकी : ६ वे विश्वसंमेलन-१९७७. २१. विश्व बाल वर्ष-१९७९. २२. एक संस्थानी तिकीट-१८५२ काही भारतीय टपाल तिकिटे : १९४७ ते १९८०

 

लेखक: श्री. पु. गोखले ; श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate