অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रतिभावान खेळाडू तयार करुया...

प्रतिभावान खेळाडू तयार करुया...

जपान येथील टोकियो येथे सन 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्राला जास्तीत जास्त पदके मिळविण्याच्या संदर्भात कृती आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समिती टोकियो येथे होणाऱ्या ऑलिम्पिक 2020 मध्ये महाराष्ट्रातील चांगले खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने आवश्यक क्रीडा विषयक सुविधा उपलब्ध करणे, प्रशिक्षण देणे याबाबत काम करणार आहे. त्याबाबतचा घेतलेला वेध...

आज महाराष्ट्रात अनेक प्रतिभावंत खेळाडू तयार होताना दिसत आहे. महाराष्ट्राला क्रीडा संस्कृतीचा वारसा आहे. महाराष्ट्रात अनेक प्रतिभावंत खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक मिळवून महाराष्ट्राची पताका डौलाने फडकवली आहे. राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा आंतराष्ट्रीय स्पर्धा अशा स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातून सामील होणाऱ्या खेळाडूंची संख्या नेहमीच मोठी राहिली आहे. आज मुलं आणि मुली खेळातच करिअर करण्याला प्राधान्य देऊ लागले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांसाठी जसे ऑलिम्पिक स्पर्धा, कॉमनवेल्थ स्पर्धा, एशियन गेम्स इत्यादी स्पर्धांचे आयोजन करयात येत असते. या स्पर्धांचा कालावधी वेगवेगळा असतो. तसेच या स्पर्धांमध्ये सहभागी होणारे देश, स्पर्धांमधील क्रीडा प्रकारही वेगळे असतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या होणाऱ्या स्पर्धांपैकी ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेणारे देश, त्यामध्ये आयोजित होणाऱ्या क्रीडा स्पर्धा, भाग घेणारे खेळाडू, त्यांना देण्यात येणारी पदके याचा सगळा अभ्यास पाहता ऑलिम्पिक स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चांगले प्रावीण्य मिळविणाऱ्या राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घ्यावा, अशा स्पर्धांमध्ये यश मिळवावे, यश मिळविताना राज्याचा पर्यायाने देशाच्या नावलौकीकामध्ये भर घालावी अशी अपेक्षा असते. जागतिक पातळीवर विविध क्रीडा प्रकारामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदके दिली जातात. 

जागतिक स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूंची कारकीर्द प्रामुख्याने बालपणीच सुरु झालेली दिसते. अमेरिका, रशिया, चीन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान इत्यादी देशांमध्ये विविध स्पर्धांमध्ये सर्वोच्च पदके प्राप्त करण्याच्या दृष्टीने उत्तम बालक्रीडापटूंची निवड करण्यात येते. या बालक्रीडापटूंना खेळाच्या पायाभूत सुविधा, क्रीडा मार्गदर्शकाकडून प्रशिक्षण व प्रशिक्षणासाठी पुरेसे साहित्य, प्रशिक्षणाचा कृती आराखडा, खेळाडूंच्या सकारात्मक मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ज्ञाचे मार्गदर्शन, आहार तज्ज्ञ, मसाजिस्ट, दुखापतीवर इलाजासाठी फिजीओथेरेपिस्ट इत्यादी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. सदर सर्व बाबी विचारात घेऊन महाराष्ट्रातही उदयोन्मुख खेळाडूंना क्रीडा विषयक आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊन त्याद्वारे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये जास्तीत जास्त पदके मिळविण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेत पदके मिळविण्याचे उदि्दष्ट साध्य होण्यासाठी दीर्घकालीन पूर्वतयारीसाठी खेळाडू केंद्रबिंदू मानणे, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून चांगले खेळाडू मिळण्यासाठी खेळाडू शोध मोहिम राबविणे.
खेळाचा आणि खेळाडूंचा दर्जा सतत वाढत जाणारा असावा तसेच अधिक काळ स्पर्धेत राहता यावे यादृष्टीने लहान वयातच मुलांचा खेळांमध्ये सहभाग असणे आवश्यक आहे. शालेय जीवनाचा अविभाज्य घटक म्हणून खेळाचा अंतर्भाव करण्यात यावा. शालेय स्तरावर व कनिष्ठ स्पर्धांमध्ये कौशल्य दिसून येणाऱ्या मुलांची निवड करून त्यांना मुख्य स्पर्धांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित व प्रशिक्षित करण्यात येईल. यातून पुढे ऑलिम्पिक स्तरावर भाग घेण्यास पात्र होऊ शकतील अशा प्रतिभावान खेळाडूंचा समूह महाराष्ट्रात तयार करण्यासाइी प्रयत्न करण्यात येईल. यामागे राज्यातील क्रीडा संस्कृतीचा उत्कर्ष करणे हाच आहे.

ऑलिम्पिकमध्ये पदके मिळविण्याच्या दृष्टीकोनातून संभाव्य खेळाडूंना आवश्यक त्या मुलभूत आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करणे.
आतापर्यंत झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळांमध्ये राज्यातील खेळाडूंनी देशाचे प्रतिनिधीत्व केले आहे तसेच आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर ज्या खेळांमधील खेळाडूंनी प्रभावी कामगिरी केली आहे, अशा ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या 16 खेळांची ऑलिम्पिक अभियानाकरिता निवड करण्यात आलेली आहे. कुस्ती, हॉकी, ॲथलेक्टिस, बॉक्सिंग, शुटिंग, सेलींग, बॅटमिंटन, टेनीस, जलतरण, मॉडर्न पेन्टथलॉन, वेटलिप्टिंग, सायकलिंग, आर्चरी, जिमनॅस्टिक, फेन्सींग व टेबल टेनिस या खेळामधील क्रीडा संघटना व नामवंत खेळाडूंबरोबर चर्चा करून खेळाडूंच्या खेळानुसार दीर्घकालीन नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनामध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंना चांगल्या दर्जाचे क्रीडा साहित्य व सुविधा देणे यावर भर देण्यात येणार आहे. याबरोबरच उपलब्ध होणारी सामुग्री व सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या देण्यात याव्यात. याबरोबरच स्पोर्टस सायन्स सेंटर, फिटनेस सेंटर, फिजीओथेरपी, क्रीडा समुपदेशन व मानसिक शास्त्र, आहार शास्त्र आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञांची कार्यकारी समिती स्थापन करणे.


संभाव्य खेळाडूंच्या क्रीडा मार्गदर्शकांच्या सोबत समन्वय साधून त्यांच्या नियमित प्रशिक्षण सत्रातील नियोजन करणे, प्रशिक्षणाची ठिकाणे ठरविणे, वातावरणाचा अभ्यास करणे तसेच त्यावरून खेळाडूंना प्रशिक्षण देणे याबाबतचा अभ्यास तज्ज्ञांची कार्यकारी समिती करेल.

स्पर्धास्तर निहाय संभाव खेळाडूंच्या कामगिरीचे मुल्यमापन करणे, तसेच नवीन खेळाडूंचा समावेश करणे


वेळोवेळी होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्यातील अधिकाधिक खेळाडू सहभागी होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असे करीत असताना अशा खेळाडूंना जागतिक स्तरावरील आशियाई, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यात येईल. 

तज्ज्ञ समितीद्वारा संभाव्य खेळाडूंच्या नियमित प्रशिक्षणाचे व मार्गदर्शन कार्यक्रमाचे मूल्यमापन करणे


संभाव्य खेळाडूंचे प्रशिक्षण क्रीडा मार्गदर्शकांच्या नियंत्रणाखाली करण्यात येईल. तसेच पुण्यातील बालेवाडी येथे प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंच्या प्रशिक्षणाचे मुल्यांकन व चाचण्या घेऊन तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या सल्ल्यानुसार प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येईल.

आवश्यकतेनुसार परदेशी मार्गदर्शकांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण देण


राज्यातील खेळाडूंना त्यांच्या खेळातील सर्वोत्तम कामगिरीपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना देशांतर्गत तसेच परदेशी मार्गदर्शकांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल, यासाठी खेळनिहाय परदेशातील क्रीडा संस्थांशी व क्रीडा मार्गदर्शकांशी संपर्क साधून त्यांच्यासोबत करार करण्यात येईल.

आवश्यकतेनुसार आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव येण्यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कार्यवाही करणे


आशियाई, कॉमनवेल्थ आणि खेळनिहाय आशियाई अजिंक्य पद स्पर्धांपूर्वी खेळनिहाय परदेशात होणाऱ्या निवडक निमंत्रित स्पर्धेत संभाव्य खेळाडूंना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाईल. 

शैक्षणिक सुविधा/सवलत देणे

स्पर्धा व नियमित प्रशिक्षण सुरू असताना खेळाडूंना शाळा व महाविद्यालयात हजर राहून अभ्यासक्रम आत्मसात करणे अवघड होते. हे खेळाडू शैक्षणिक अभ्यासक्रमात मागे पडू नये याकरिता त्यांना विशेष शैक्षणिक सुविधा/शिकवणी वर्ग उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच शाळा व महाविद्यालयात नियमित उपस्थित राहण्यापासून खेळाडूनिहाय सवलत देण्यात येईल.
ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता प्रतिभावान खेळाडू तयार करणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट असलेल्या खेळातील खेळाडूंची पूर्व तयारी हा महत्त्वाचा टप्पा मानून त्या-त्या वेळेस ऑलिम्पिक पात्रतेच्या जवळपास कामगिरी करणाऱ्या तसेच कनिष्ठ गटामध्ये आंतररराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची या योजनेअंतर्गत निवड करण्यात येणार आहे. एकंदरितच महाराष्ट्रात चांगले खेळाडू घडावेत तसेच महाराष्ट्रातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करावी यासाठी हे प्रयत्न करण्यात येत आहेत.

लेखक - वर्षा फडके
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती),
विभागीय संपर्क कक्ष

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate