অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मल्लखांब

महाराष्ट्रीय व्यायामप्रकार

वैशिष्ट्येपूर्ण महाराष्ट्रीय व्यायामप्रकार. हा प्राचीन असून मानसोल्लासात (सु. ११२९) याचा निर्देश आढळतो. कुस्तीमध्ये प्राविण्य मिळविण्याच्या उद्देशाने मल्ल विशिष्ट लाकडी खांबावर अनेक कसरतींचे प्रकार करीत असल्याने त्यास हे नाव पडले. आधुनिक काळात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे व्यायामशिक्षक बाळंभटदादा देवधर (सु. १७८०−सु. १८५२) ह्यांनी मल्लखांबविद्येचे पुनरूज्जीवन केले, कुस्तीगिराच्या अंगी ताकद, चपळता, लवचिकपणा, डावपेचात्मक सफाई इ. गुणांच्या वाढीबरोबरच त्याचा दमही वाढावा या उद्देशाने बाळंभटदादांनी मल्लखांबावरील निरनिराळ्या मेहनतींचे व उड्यांचे प्रकार तयार केले.

मल्लखांबाचे आकार व प्रकार

मल्लखांबाचे आकार व प्रकार अनेक प्रकारचे आहेत. पण सर्वसामान्यपणे प्रचलित असलेला मल्लखांब हा २ ते २ १/२ मी. उंचीचा, शिसवी अथवा सागवानी लाकडाचा, वरच्या दिशेने निमुळता होत जाणारा खांब असतो. अंग, मान व बोंड असे त्याचे तीन भाग असतात : (१) अंग : मल्लखांबाच्या बुंध्यापासून मानेपर्यंतच्या निमुळत्या होत जाणाऱ्या भागास ‘अंग’ असे म्हणतात. या भागाचा घेर बुंध्याशी ५५ ते ६० सेंमी., मध्यास ४५ सेंमी., तर मानेजवळ २५ ते ३० सेंमी. असतो. (२) मान : मल्लखांबाच्या अंगाच्या वर, १५ ते २० सेंमी. उंचीचा जो बारीक, निमुळता नसलेला सरळ भाग असतो, त्याला ‘मान’ असे म्हणतात. त्याचा घेर १५ ते २० सेंमी. असतो. या भागाच्या खालच्या बाजूला अंग व वरच्या बाजूला बोंड असते. (३) बोंड : मल्लखांबाच्या सर्वांत वरच्या गोलाकृती भागास ‘बोंड’ असे म्हणतात. त्याची उंची ५ ते ७ सेंमी. व घेर १० ते १५ सेंमी. असतो.

मल्लखांबांची उंची जमिनीच्या वर २ ते २ १/२ मी. असते व तो जमिनीखाली १ ते १ १/२ मी. पुरावा लागतो. मल्लखांब गुळगुळीत रहावा, तसेच तो घट्ट पकडता यावा व घसरू नये म्हणून अशुद्ध एरंडेल तेलाचा तसेच राळेचा वापर करतात.

मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट

मल्लखांबावरील कसरतींचे एकूण १६ गट पडतात. या प्रत्येक गटामध्ये अनेक उपप्रकार आहेत. या मूलभूत गटांचा थोडक्यात परिचय पुढे दिला आहे :

(१) अढी : मल्लखांबाच्या कसरतींचा प्राथमिक प्रकार. मल्लखांबावर विविध प्रकारे पकड घेऊन व शरीर उलटे करून पोट मल्लखांबांच्या बाजूला येईल अशा पद्धतीने दोन्ही पायांनी मल्लखांबास विळखा घालण्याच्या क्रियेला ‘अढी घालणे’ असे म्हणतात. या अढ्यांतून पुन्हा जमिनीवर उतरण्याचे अढीनुसार भिन्नभिन्न प्रकार आहेत. अढ्यांचे एकंदर ९० च्या वर प्रकार आहेत. उदा., साधी अढी, खांदा अढी, कानपकड अढी इत्यादी. ह्याचा उपयोग कुस्तीत होतो. तसेच अश्वारोहणात पायाने घोड्यास पकडून ठेवताना होतो. या उड्यांनी मुख्यत्वे पायाचे स्नासयू बळकट होतात.

(२) तेढी :  मल्लखांब विविध प्रकारे पकडून शरीर उलटे करून मल्लखांबाकडे पाठ करून एका विशिष्ट पद्धतीने मल्लखांबास विळखा घालण्याच्या प्रक्रियेस ‘तेढी घालणे’ असे म्हणतात. तेढीनंतर अढी घालून नंतर मल्लखांबावरून खाली उतरतात. या उड्यांमुळे पोटातील स्नायू, दंड, बगल इ. ठिकाणच्या स्नायूंना व्यायाम होतो. उदा., साधी तेढी, बगलेची तेढी, एकहाती तेढी इत्यादी.

(३) बगली :  मल्लखांब बगलेत निरनिरळ्या तऱ्हांनी पकडून तेढी मारण्यास ‘बगली’ असे म्हणतात.

(४) दसरंग :   मल्लखांबावरून न उतरता अढी, तेढी, बगली  यांसारखे प्रकार दोन्ही बाजूंनी उठून सतत करत राहणे याला ‘दसरंग’ असे म्हणतात. हा ‘दस्तरंग’ (दस्त म्हणजे कोपरापुढील हात) शब्दाचा अपभ्रंश आहे. ज्या अढीचा वा तेढीचा दसरंग त्याप्रमाणे त्याचे नाव असते. उदा., साधा दसरंग, एकहाती दसरंग इत्यादी.

(५) फिरकी : मल्लखांबावर दसरंग करीत असताना हाताची व पायाची पकड कायम ठेवून वरचेवर शरीर फिरवून एका बाजूवरून दुसऱ्या बाजूवर जाण्याच्या क्रियेला ‘फिरकी’ असे म्हणतात. फिरक्यांचे अनेक प्रकार आहेत.

(६) सुईदोरा :  सुईमध्ये दोरा ज्याप्रमाणे ओवतात, त्याप्रमाणे हाताने मल्लखांब पकडून दोन हातातील जागेतून पाय पुढे घालून पलटी मारून पाय काढून घेणे याला ‘सुईदोरा फिरणे’ असे म्हणतात. ह्याचेदेखील अनेक प्रकार आहेत.

(७) वेल : हाताच्या व पायाच्या विशिष्ट पकडीच्या सहाय्याने,त्या पकडी सतत बदलत हळूहळू वर चढत जाणे, या क्रियेला ‘वेल’ असे म्हणतात. झाडावर वेल जशी नागमोडी चढत जाते, त्याचप्रकारे खेळाडू मल्लखांबावर चढत जातो. उदा., साधीचा वेल, मुरडीचा वेल, नकीकसाचा वेल इत्यादी.

(८)  उतरती : ही वेलाच्या विरूद्ध पद्धतीची हालचाल आहे. वेलाप्रमाणेच पकडी बदलत या क्रियेत मल्लखांबपटू खाली घसरत घसरत येतो. उदा., साधी उतरती, बगलीची उतरती इत्यादी.

(९) झाप : मल्लखांबाच्या बोंडावर उभे राहून अथवा बसून पतंगी, विविध फरारे अशा प्रकारांतून मल्लखांबापासून दूर फेकले जाऊन पुन्हा मल्लखांब अढीमध्ये पकडणे याला ‘झाप टाकणे’ असे म्हणतात.

(१०) फरारे : मल्लखांबावर हातांनी विविध प्रकारे धरून व पाय दूर ताठ करून तोल सांभाळण्याच्या क्रियेला ‘फरारे’ असे म्हणतात. क्वचित मल्लखांब पायाने पकडून हात मोकळे सोडले जातात. उदा., आकडी, गुरुपकड, बजरंग−पकड इत्यादी.

(११) आसने : निरनिराळ्या प्रकारची आसने मल्लखांबाच्या अंगापासून बोंडापर्यंत विविध प्रकारे करता येतात. उदा., पद्मासन, गरुडासन, धनुरासन, शीर्षासन, वृश्चिकासन इत्यादी.

(१२) आरोहण−उड्या : मल्लखांबापासून  काही अंतरावरून पळत येऊन, अथवा मल्लखांबाच्या शेजारी उभे राहून, अथवा उडी मारून हाताने पकड घेता, अगर न घेता पायाने मल्लखांब अढीत अथवा तेढीत पकडणे यांना ‘आरोहण-उड्या’ असे म्हणतात. यात घोडा अढी, घोडा तेढी, सुळकी अढी, गुलाट अढी इत्यादींचा समावेश होतो. आधुनिक स्पर्धात्मक मल्लखांबात या उड्यांना फार महत्त्व आहे.

(१३) उड्या : मल्लखांबावरून विविध प्रकारे दूर उड्या मारून जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘उड्या’ असे म्हणतात. यातच विविध कलाटींचा समावेश होतो.

(१४) ताजवे : मल्लखांबाच्या बोंडावर पोट, पाठ अथवा शरीराचा अन्य भाग टेकवून, मल्लखांब हातापायाने न पकडता शरीर तोलण्याला ‘ताजवे’ (तराजू) असे म्हणतात. ह्याचे पोटाचा ताजवा व पाठीचा ताजवा हे प्रकार विशेष प्रचलित आहेत. ताजवे म्हणजे फरारे या प्रकारातीलच पोट-उड्या म्हणाव्या लागतील.

(१५) सलाम्या : अढ्यांप्रमाणेच विविध प्रकारे मल्लखांबावर पकड घेऊन, शरीर उलटे करून अढी न मारता पुन्हा जमिनीवर उतरण्याच्या क्रियेला ‘सलामी मारणे’ असे म्हणतात. सलामीच्या पकडीनुसार त्यांना एकहाती, दुहाती, बगलीची अशी नावे आहेत.

(१६) मल्लखांबावरून विविध प्रकार केल्यानंतर उतरण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे अढीच्या स्थितीमधून कलाट, त्याचप्रमाणे विविध आसनांमधून उडी व कलाट असे प्रकार आहेत. ह्या प्रकारांमध्ये नावीन्य आणण्याच्या दृष्टीने मल्लखांबावरून पुढे अथवा मागे गुलाट मारणे यांसारखे नवीन प्रकार केले जातात.

मल्लखांबाचे बावीस प्रकार

मल्लखांबाचे एकंदर बावीस प्रकार आहेत. प्रचलित साध्या (किंवा स्थिर) मल्लखांबाखेरीज अन्य प्रमुख उपयुक्त प्रकार पुढीलप्रमाणे होत :

वेताचा मल्लखांब : शरीराची लवचिकता व संतुलन राखण्याच्या दृष्टीने वेताचा मल्लखांब फार उपयुक्त असतो. सुमारे ३ ते ४ मी. लांबीचा लवचिक वेत लोखंडी हुकाला टांगला जातो. यावर प्रामुख्याने आसने व फरारे या गटांतील प्रकार करणे शक्य असते. वेताऐवजी जाड दोर वापरूनही मल्लखांब−कसरती केल्या जातात.

टांगता मल्लखांब : १ १/२ ते २ मी. उंचीचा लहान आकाराचा हा मल्लखांब छतापासून दोरीने टांगला जातो. या मल्लखांबावर प्रामुख्याने कसाचे व शरीरसामर्थ्याचे प्रकार केले जातात. हा मल्लखांब टांगलेला असल्याने तो स्वतःभोवती तसेच वर्तुळाकृती फेऱ्यातही फिरत असल्याने खेळाडूला विशेष कोशल्य आत्मसात करावे लागते.

निराधार मल्लखांब : केवळ १ ते १ १/२ मी. उंचीचा हा मल्लखांब बुंध्यात तिरपा छाट घेतलेला असतो. तो जमिनीत न पुरता पाटावर, अथवा बाटल्यांवर ठेवलेल्या स्टुलावर (बाटलीचा मल्लखांब) ठेवला जातो. यावर आसने आणि फरारे या गटांतील प्रकार प्रामुख्याने केले जातात. मल्लखांबास कोणताही आधार नसल्याने खेळाडूस आपले कौशल्य पणास लावावे लागते. श्वासनियंत्रण, शरीर-संतुलन यांसारखी व्यायामकौशल्ये यांमुळे साध्य होतात. याबरोबरच बाटलीवरील, पलित्याचा, हत्यारी मल्लखांब इ. प्रकारही काहीसे प्रचलित आहेत.

मल्लखांबावरील मनोरे : प्रामुख्याने प्रात्यक्षिकांसाठी मल्लखांबावर मनोरे सादर केले जातात. या प्रकारात एकाच वेळी १० ते २० खेळाडू मल्लखांबावर तसेच जमिनीवरही आपापल्या जागा पटकावतात आणि कमळ, देऊळ, मत्स्याकृती, गरूड, उडत्या आकृत्या इ. प्रकारचे मनोरे सादर करतात. अत्यंत आकर्षक असे हे मनोरे व्यायामाच्या दृष्टीने दुय्यम महत्त्वाचे आहेत. प्रात्यक्षिकातच त्यांना विशेष महत्त्व आहे. अशा मनोऱ्यांच्याही स्पर्धा घेतल्या जातात.

मल्लखांबावरील कसरतींमुळे व्यक्तीमध्ये शारीरिक सुदृढता, लवचिकपणा, चपळपणा, संतुलन, साहस इ. गुण वाढीस लागतात. शरीराचे स्नायू पिळदार व बळकट होऊन विशेषतः पाठीच्या कण्याला व्यायाम मिळतो. तद्वतच यकृत, मूत्रपिंड, प्लीहा इ. अवयवांची कार्यक्षमता वाढते व रक्तभिसरण क्रिया सुधारते. कुस्तीप्रमाणेच जूदो, ॲथ्‌लेटिक्स, जिम्नॅस्टिक्स, घोडदौड इ. अनेक खेळांत हा व्यायामप्रकार उपयुक्त ठरतो.

मल्लखांबाच्या आंतरशालेय, जिल्हा आणि राज्य पातळीवर स्पर्धा घेतल्या जातात. १९८०-८१ पासूनमल्लखांबाच्या राष्ट्रीय संघटनेमार्फत राष्ट्रीय पातळीवरही स्पर्धा घेण्यात येतात. विशेष कामगिरी बजावणाऱ्या खेळाडूंचा महाराष्ट्र शासनातर्फे शिवछत्रपती पुरस्कार वा अन्य पारितोषिके देऊन गौरव करण्यात येतो. तसेच राष्ट्रीय क्रिडा विद्यापीठातर्फे शिष्यवृत्त्याही दिल्या जातात. मल्लखांबाच्या कोणत्याही पातळीवरील स्पर्धा साधारणपणे कनिष्ठ, मध्यम, व वरिष्ठ अशा तीन गटांत घेतल्या जातात. या स्पर्धांमध्ये प्रत्येक खेळाडूस मल्लखांबाच्या १६ कसरत−गटांमध्ये विविध प्रकारे, साधारणपणे ९० सेकंदांच्या कालावधीत आपले कौशल्य दाखवायचे असते.

भारतातील मलखांब

भारतात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, तामिळनाडू इ. राज्यांत मल्लखांब खेळला जातो. महाराष्ट्रामध्ये पुण्याबरोबरच मुंबई, नासिक, अहमदनगर, अमरावती, मिरज, नागपूर इ. ठिकाणी मल्लखांबाचा सराव नियमितपणे केला जातो. या सर्व ठिकाणच्या व्यायामशाळा विविध मल्लखांब स्पर्धा आयोजित करीत असतात. त्यांना निरनिराळ्या ठिकाणच्या खेळाडूंचा उत्तरोत्तर वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.

हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ

मल्लखांब परदेशात लोकप्रिय करण्याच्या दृष्टीने अमरावतीच्या ‘हनुमान व्यायाम प्रसारक मंडळा’चे कार्य उल्लेखनीय आहे. बर्लिनच्या ऑलिंपिक स्पर्धात (१९३६) त्यांनी मल्लखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले. जर्मन क्रीडारसिकांना हा प्रकार अतिशय आवडला. सध्या पश्चिम जर्मनीतील कोलोन येथील क्रीडा-विद्यापीठात मल्लखांबाचा सराव व संशोधनकार्य चालू आहे. दिल्ली येथे भरलेल्या नवव्या आशियाई क्रीडास्पर्धांमध्ये (१९८२) पुण्याच्या ‘महाराष्ट्रीय मंडळा’ने विविध प्रकारच्या मल्लखांबांचे प्रात्यक्षिक दाखविले. ते अत्यंत प्रेक्षणीय व प्रशंसनीय ठरले. सिंगापूरच्या आंतरराष्ट्रीय क्रीडाशास्त्र परिषदेत (मे १९८३) तसेच नंतरच्या आग्नेय आशियाई सामन्यांत आणि थायलंड, मलेशिया इ. राष्ट्रांत महाराष्ट्रीय मंडळातर्फे मल्लखांबाची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली. लॉस अँजेल्स येथील ऑलिंपिकपूर्व क्रीडाशास्त्र परिषदेत (१९८४) रा. द. जालनापूरकर व लीला जोशी यांनी मल्लखांबावर सादर केलेला निबंध तज्ञांच्या प्रशस्तीस पात्र ठरला.

लेखक: रा. द. जालनापूरकर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

नवीन विंडो मध्ये ओपन होणारी बाह्य साईट

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate