অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रोमन ग्‍लॅडिएटर

ग्‍लॅडिएटर

प्राचीन रोममध्ये द्वंद्वे खेळणाऱ्या योद्ध्यांना 'ग्‍लॅडिएटर' असे म्हणत. हे द्वंद्वांचे सामने प्रथम इ.स.पू. २६४ मध्ये रोममध्ये खेळले गेले. रोमनांनी हा खेळ इट्रुस्कनांपासून उचलला असावा. रोममधील पहिल्या सामान्यांत द्वंद्वयोद्ध्यांच्या तीनच जोड्यांनी भाग घेतला होता. हळूहळू हा खेळ सर्व रोमन साम्राज्यात लोकप्रिय झाला. माणसामाणसांची द्वंद्वे तर होतच; परंतु पुष्कळदा माणसांना क्रूर प्राण्यांबरोबर सुद्धा लढविले जाई. समाजात ह्या योद्ध्यांना आदराचे स्थान होते. राष्ट्रवीर म्हणून त्यांचा गौरव केला जात असे. मृत्युदंडाची शिक्षा झालेल्यांना, युद्धकैद्यांना, गुलाम आणि गुन्हेगार लोकांना भरती करून घेऊन त्यांना या प्रकारचे शिक्षण देण्यासाठी रोम, कॅप्युआ व पाँपेई या ठिकाणी सरकारकडून आर्थिक साहाय्य घेऊन शाळा उघडल्या गेल्या होत्या. हौसेकरिता व शरीररक्षक म्हणून श्रीमंत लोक त्यांना आपल्या पदरी ठेवीत. त्याचप्रमाणे त्यांना राजाश्रयही मोठ्या प्रमाणावर मिळत असे. कॅलिगुला राजाच्या शाळेत २०,००० योद्धे असल्याचा उल्लेख आढळतो. विजयी योद्ध्यांना सोन्याच्या साखळ्या, माणकाने मढविलेली शिरस्त्राणे इ. बक्षीस म्हणून मिळत असत. तोंड व डोके झाकणारे शिरस्त्राण व आखूड हातांचा अंगरखा घालून हातात तलवार आणि ढाल घेऊन, हे योद्धे जमिनीवरून अथवा रथांतून द्वंद्वे खेळत. साधारणपणे या द्वंद्वात एकाचा मृत्यू झाला, की दुसरा विजयी ठरत असे. गंभीर जखमी झालेला योद्धा जीवदानासाठी अंगठ्याजवळील बोट वर करी. प्रेक्षकांच्या दयेस तो पात्र ठरल्यास ते हातरुमाल हलवीत, अन्यथा हाताचे अंगठे खाली करीत.

क्रीडांगण

या खेळाकरिता स्वतंत्र क्रीडांगणाची बांधणी पहिल्यांदा इ. स. पू. ५० च्या सुमारास झाली. अंडाकृती क्रीडांगण व भोवती प्रेक्षकांकरिता लाकडी उतरंडी अशा प्रकारची ही रचना असे. काही काळाने भोवती दगडी तट असलेली क्रीडाप्रेक्षागारे बांधण्यात आली. कॉलॉसिअम या प्रसिद्ध क्रीडाप्रेक्षागारात सु. ९०,००० प्रेक्षक बसू शकत.

बैलाशी झुंज

कित्येकदा या योद्ध्यांना त्यांच्या मालकांच्या म्हणजेच सरदार, राजे, जमीनदार यांच्या विचित्र व आसुरी आनंदासाठी अनेक दिवस उपाशी ठेवलेल्या सिंहाशी किंवा माजलेल्या बैलाशी झुंज द्यावी लागे. ह्या विकृत रंजनाच्या लालसेतून जे आसुरी क्रौर्य या खेळात निर्माण झाले, त्यामुळे वा खेळासंबंधी 'गलिच्छ मने व रक्ताळलेले हात' अशा प्रकारचे उल्लेख आढळतात. खेळाद्वारे आदर्श नागरिक, सैनिक व शांतिदूत निर्माण करण्याचे ग्रीकांचे ध्येय लक्षात न घेता, उलट खेळाडूंचा धंदेवाईक वर्ग निर्माण करून पावित्र्य, शिस्त, कला व सचोटी ह्या खेळामागील उच्च उद्देशांना व मानवतेलाही रोमन लोकांनी या खेळाद्वारे मूठमाती दिली, असे म्हणावे लागेल. इ. स. ३२५ मध्ये कॉन्स्टंटीनने ही क्रूर क्रीडापद्धती बंद करण्याचा प्रयत्न केला; तथापि तिचे संपूर्ण उच्चाटन पाचव्या शतकापर्यंत होऊ शकले नाही.

लेखक : अ. बा. आपटे

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate