অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

लेझीम

क्रीडाप्रकार व साधन

क्रीडाप्रकार व साधन. व्यायाम व मनोरंजन अशा दोन्ही उद्दिष्टांनी लेझीम खेळली जाते. ‘लेझम’ या मूळ फारशी शब्दावरून लेझीम शब्द प्रचारात आला असावा. त्याचा मूळ अर्थ तार लावलेले धनुष्य असा आहे. मूळ अर्थ बाजूला राहून आता लेझिमीचा आकार व वजन यांत बदल झालेला आहे. पूर्वीच्या काळी सु. २१/२ हात लांब बांबू (वेळू) घेऊन त्याला २ हात लांब लोखंडी साखळी धनुष्यासारखी लावून ही लेझीम तयार करीत. बांबूचा लवचिकपणा कमी होऊ नये, म्हणून साखळी अडकविण्यासाठी बांबूला आकडे लावीत असत आणि व्यायाम करतानाच साखळी अकडवीत असत. धनुष्यासारख्या या बांबूचा मध्यभाग जाड करीत. व्यायामासाठी वापरावयाच्या जड लेझिमीची तार जाड आणि वजनदार असे. लेझिमीचे निरनिराळे हात करून ही मेहनत केली, म्हणजे हातात चांगली ताकद येत असे. हा खेळ खास महाराष्ट्रीय असून पेशवाईच्या पूर्वकाळापासून तो रुढ आहे. गुजरातमध्येही तो खेळला जातो.

लेझीम रचना

हल्लीची लेझीम सु. ३८ ते ४५ सेंमी. (१५ ते १८ इंच) लांब लाकडी दांड्याची असून, त्या दांड्याला दोन्ही टोकांना कोयंडे बसवून लोखंडी कड्यांची साखळी जोडलेली असते. साखळी धरता येण्यासाठी मध्यभागी हाताच्या चार बोटांत बसेल एवढी, १५ सेंमी. (६ इंच) लांबीची, सरळ सळईसारखी लोखंडी मूठ असते. साखळीतील लोखंडी कड्यांमध्ये, नादध्वनी निर्माण व्हावा म्हणून पत्र्याच्या दोन दोन-तीन तीन चकत्या बसवलेल्या असतात. लेझिमीचे वजन अदमासे ०.७८ ते ०.९० किग्रॅ. (१३/४ ते २ पौंड) असते.

वीरनृत्याचाही प्रकार

लेझिमीचा खेळ हा पौरुषयुक्त वीरनृत्याचाही प्रकार आहे. त्यात विविध प्रकारचे नर्तकांचे शारीर रचनाबंध आढळून येतात. नर्तकसमूहांनी लेझीम वाजवत गोलाकार फेर धरून नाचणे, वेगवेगळी उलटसुलट वर्तुळे रचीत पुन्हा गिरकी घेऊन पूर्वपदावर येणे, दोना-चारांच्या रांगा करून संचलन करणे इत्यादी. ह्या सर्व हालचालींमध्ये एक प्रकारची सहजता व डौल प्रत्ययास येतो. या समूहनृत्यांत नर्तकांच्या हालचाली व पदन्यास यांचे खूपच वैविध्य दिसून येते. उड्या मारणे, उकिडवे बसणे, वाकणे, पावले तालासुरात मागे पुढे करीत. लयबद्ध रीतीने मागेपुढे सरकणे इ. अनेक नृत्यमय हालचालींचा त्यात समावेश होतो. लेझीम तालासुरात वाजवण्याच्या क्रियेत नर्तकाचे दोन्ही हात गुंतलेले असल्याने, हातांच्या हालचाली नियंत्रित होतात. लेझीम नृत्याची प्रत्येक हालचाल लेझिमीच्या ठेक्याशी व नादलयीशी सुसंगत रीत्या केली जाते. लेझीम नृत्य हलगी, ढोल, झांजा, ताशा या वाद्यांच्या किंवा आधुनिक काळात बॅंडच्या साथीवर केले जाते. सर्व नर्तकांच्या हालचाली तालबद्ध व एकसमयावच्छेदेकरून होत असल्याने त्यात आकर्षकता निर्माण होते. ग्रामीण देवदेवतांच्या पालख्या, गणेशोत्सवासारख्या धार्मिक व सार्वजनिक मिरवणुका, खेड्यातल्या जत्रा, उरूस यांच्यापुढे लेझीम खेळणारे ताफे पाहावयास मिळतात. एक व्यायामप्रकार म्हणून शालेय शारीरिक शिक्षणात त्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.

 

लेझिमीचे बडोदा-लेझीम (किंवा हिंदी-लेझीम), घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम असे तीन प्रमुख प्रकार आहेत. बडोदा-लेझीम हा सैनिकी द्वंद्वांचे पवित्रे, आक्रमण, बचाव इत्यादींच्या मूळ रूपांचे शिक्षण तालठेक्यावर सामान्यजनांना देण्याचा एक उत्तम प्रकार आहे. तर घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌. - लेझीम हे प्रकार अधिक तालबद्ध व सामूहिक प्रात्यक्षिकांसाठी सुयोग्य व दर्शनीय आहेत. ताल-ठेक्यासाठी, विविध रचना-आकृतींसाठी घाटी-लेझीम व एन्‌.डी.एस्‌.-लेझीम यांचे संमिश्र प्रकार करून उत्तम प्रात्यक्षिके सादर करता येतात. नवव्या एशियाडमध्ये (१९८२, दिल्ली) महाराष्ट्राने आपल्या प्रांताचे प्रतीक म्हणून ४०० खेळाडूंचे लेझिमीचे सर्वोत्तम प्रात्यक्षिक दिले होते.

लेखक: श्री. पु. गोखले

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/26/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate