অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सायकल शर्यती

सायकल शर्यती

सायकल ह्या दुचाकी वाहनावरुन कमी-अधिक अंतर कापण्याच्या, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा जगभर सर्वत्र प्रचलित आहेत. विशेषतः यूरोप, इंग्लंड, राष्ट्रकुलातील देश (कॅनडा, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड), अमेरिका, जपान, वेस्ट इंडीज इ. ठिकाणी सायकल शर्यती खूपच लोकप्रिय आहेत. ह्या सायकल स्पर्धांची सुरुवात साधारणतः एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर झाली. तिसरा नेपोलियन याने ३१ मे, १८६८ रोजी पॅरिसनजीक सेंट क्लाउड पार्क येथे १,२०० मी. (१,३१२ यार्ड) अंतरासाठीची सुवर्णपदक स्पर्धा आयोजित केली. ही जगातील सर्वांत पहिली अधिकृत सायकल स्पर्धा मानता येईल. जेम्स मूर हा इंग्रज सायकलस्वार या स्पर्धेचा विजेता ठरला. इंग्लंडमधील पहिली स्पर्धा त्याच्या दुसऱ्याच दिवशी हेंडन, मिड्लसेक्स येथे घेण्यात आली. त्यानंतर १८६९ मध्ये रुआन ते पॅरिस ही एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंतच्या अंतराची (१३३·५७ किमी.) पहिली रस्त्यावरील सायकल शर्यत (रोड रेस) आयोजित करण्यात आली. ही स्पर्धाही जेम्स मूर यानेच जिंकली. रस्ता-शर्यती यूरोपमध्ये लोकप्रिय होत्या; पण इंग्लंडमध्ये खराब रस्त्यांमुळे त्या घेण्यास फारशी अनुकूल परिस्थिती नव्हती. १८७१ मध्ये व्यावसायिक सायकल स्पर्धांचा उदय झाला व त्याबरोबरच आखीव धावपट्टीवरील सायकल स्पर्धांच्या (ट्रॅक रेस) प्रकारास चालना मिळाली. ‘द नॅशनल सायक्लिस्ट्स यूनियन’ (एन्सीयू) ही राष्ट्रीय सायकलपटू संघटना इंग्लंडमध्ये १८७८ मध्ये स्थापन झाली (१९५९ पासून ‘ब्रिटिश सायक्लिंग फेडरेशन’) आणि ऑक्सफर्ड व केंबिज या विद्यापीठांनी सायकल स्पर्धा हा क्रीडाप्रकार अधिकृत रीत्या स्वीकारला. पुढे ‘इंटरनॅशनल सायक्लिस्ट असोऐसिएशन’ ( आयसीए ) ही आंतरराष्ट्रीय सायकलपटू संघटना १८९२ मध्ये स्थापन झाली. इंग्लंड, बेल्जियम, डेन्मार्क, जर्मनी, फ्रान्स, नेदर्लंड्स, अमेरिका, कॅनडा ही राष्ट्रे तिची संस्थापक-सदस्य होती. आय्‌सीएवरील ब्रिटिश वरचष्मा सहन न झाल्याने ‘द यूनियन सायक्लिस्ट इंटरनॅशनेल’ (यूसीआय्) ही संघटना जिनीव्हा येथे १९०० मध्ये स्थापन करण्यात आली. बेल्जियम, इटली, स्वित्झर्लंड, अमेरिका ही तिची संस्थापक-सदस्य राष्ट्रे होती. नंतर काही वर्षांनी ग्रेट ब्रिटन या संघटनेत सामील झाले. अमेरिकेत सायकल स्पर्धा १८७८ मध्ये सुरु झाल्या. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत सायकलची वाहन म्हणून लोकप्रियता जसजशी वाढत गेली, तसतशा स्पर्धाही वाढत गेल्या. सर्वसाधारण रस्ते खराब असल्याने खास स्पर्धांसाठी आखीव धावपट्टय बनविल्या जाऊ लागल्या. लंडनमधील हर्निहिल व पॅडिंग्टन येथे उत्तम धावपट्ट्या बनविण्यात आल्या. पुटनी येथे सिमेंट-काँक्रीटचा वापर करुन पहिले खुले सायकल-क्रीडागार (व्हेलोड्रोम) बांधण्यात आले. कालांतराने सर्वत्र सिमेंटच्या धावपट्टय तयार करण्यात आल्या. १८८८ मध्ये डनलॉप कंपनीने पोकळी रबरी धावा (न्युमॅटिक टायर्स) ची कल्पना अस्तित्वात आणली आणि दुचाकी चालवणे सुखावह झाले. अथेन्स येथील पहिल्या अर्वाचीन ऑलिंपिक क्रीडासामन्यांत (१८९६) सायकल शर्यती या प्रकाराचा अंतर्भाव करण्यात आला. त्यात २,००० मी. अंतराची सायकल स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर हा स्पर्धाप्रकार ऑलिंपिक सामन्यांत नियमितपणे समाविष्ट झाला. सध्या ऑलिंपिक सामन्यांत सायकलच्या १ किमी. स्पर्धा, कालावधी-चाचणीच्या १ किमी. स्पर्धा, ४ किमी. पाठलाग स्पर्धा व्यक्तिगत व सांघिक स्वरूपांत घेतल्या जातात. १९२८ पासून कालावधी-चाचणी (टाइम-ट्रायल) सायकल स्पर्धा घेण्यास सुरुवात झाली. त्यात एका वेळी फक्त एकच स्पर्धक धावपट्टीवर सोडून तो विशिष्ट अंतर किती वेळात पार करतो, हे मोजले जाते. सर्वांत कमी वेळात ते अंतर पार करणारा सायकलपटू विजेता ठरतो. पाठलाग (परस्यूट) स्पर्धा हाही एक वैशिष्ट्यपूर्ण स्पर्धाप्रकार आहे. त्यात दोन सायकलपटू वा सायकलस्वारांचे दोन संघ धावमार्गावर विरुद्घ दिशांनी एकाच वेळी सायकली सोडतात व जो खेळाडू वा संघ विशिष्ट अंतर प्रथमतः पार करेल, किंवा स्पर्धा संपण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला ओलांडून पलीकडे जाईल तो विजेता ठरतो.

आधुनिक काळात सायकल शर्यतीचे तीन प्रमुख प्रकार जास्त प्रचलित आहेत : धावपट्टीवरील शर्यती (ट्रॅक स्पोर्ट्स), रस्ता शर्यती (रोड रेस) आणि सायक्लो-क्रॉ स शर्यती. ह्या शर्यती व्यक्तिगत तसेच सांघिक, अंतर्गेही तसेच बहिर्गेही स्वरुपाच्या असतात.

धावपट्टीवरील सायकल शर्यती : ह्या शर्यती आखीव, लंबवर्तुळाकार सिमेंट-काँक्रीटच्या धावमार्गावर घेतल्या जातात. धावमार्गाच्या आतील बाजूंना योग्य तो उतार (बँकिंग) दिलेला असतो. हे क्रीडागार अंतर्गेही वा बहिर्गेही अशा दोन्ही प्रकारचे असतात. बऱ्याचशा स्पर्धा ह्या खुल्या जागी म्हणजे बहिर्गेही धावमार्गावर घेतल्या जातात. त्यांत २५० ते ५०० मी. अंतरापर्यंतच्या वेगवेगळ्या स्पर्धा असतात.अंतर्गेही धावपट्टीवरील स्पर्धा सामान्यतः १८५ ते २०० मी. अंतरांपर्यंतच्या असतात. अजिंक्यपदासाठीच्या स्पर्धा व्यक्तिगत तसेच सांघिक पातळीवरही घेतल्या जातात. सांघिक स्पर्धांत दोन वा चार सायकलपटूंचे संघ भाग घेतात. ह्या स्पर्धांमध्ये कमी अंतरावरच्या व अतिजलद वेगाच्या (स्प्रिंट) स्पर्धांचाही एक प्रकार असतो. त्यात व्यक्तिगत स्पर्धांसाठी ८०० मी. व सांघिक स्पर्धांसाठी १०० किमी. अंतरांच्या स्पर्धा असतात. आखीव धावमार्गावरील काही स्पर्धा कालावधी-चाचणी प्रकारच्या, तर काही पाठलाग प्रकारच्या असतात.

धावमार्गावरील व्यावसायिक सायकल स्पर्धांत सलग ६ दिवस चालणारी एक स्पर्धा आहे. ही स्पर्धा अमेरिकेत १८९१ मध्ये सुरु झाली. ह्या स्पर्धेत प्रत्येकी दोन-दोन सायकलपटूंचे संघ भाग घेतात. त्यांपैकी एक खेळाडू धावमार्गावर कायम असलाच पाहिजे, अशी अट आहे. दुसऱ्या महायुद्घापूर्वी ह्या सहा दिवसीय सायकल स्पर्धा न्यूयॉर्क, शिकागो व अन्य शहरांत लोकप्रिय होत्या. अजूनही त्यांची लोकप्रियता अबाधित आहे. ह्या स्पर्धांतर्गतच खास प्रेक्षकांसाठी कमी अंतराच्या व अतिजलद वेगाच्या स्पर्धाही योजिल्या जातात. जो संघ सहा दिवसांत जास्ती मैलांचे अंतर पार करेल, तो विजयी ठरतो. आखीव धावपट्टीवरील एका तासाची सायकल स्पर्धा स्पर्धकाच्या कौशल्याची योग्य रीतीने चाचपणी करणारी आहे. ह्यात स्पर्धक एकटाच धावमार्गावर असतो व त्याला कुठल्याही प्रकारचे साहाय्य घेता येत नाही. एका तासात पावणेसोळा मैल ( सु. २५·३४ किमी.) अंतर कापण्याचा विक्र म एफ्. एल्. डॉड्स या सायकलपटूने २५ मार्च १८७६ रोजी प्रस्थापित केला. तेव्हा सायकली भरीव टायरच्या असल्याने त्यांचा वेग कमीच असे. १८७४ मध्ये लहान चाकाची आणि साखळीने (चेन) चालणारी दुचाकी लॉसन याने निर्माण केली. लहान चाकामुळे या दुचाकीला ‘लॉसन बायसिक्लेट’ असे नाव पडले. त्यानंतर हवेचे टायर प्रचारात आल्यापासून सायकलचा वेग वाढत गेला. १८९८ मध्ये डब्ल्यू. हॅमिल्टन या अमेरिकन सायकलस्वाराने डेव्हर येथे एका तासात २५ मैल (४०·२३ किमी.) अंतर काटले. १९३९ मध्ये मॉरिस आर्शांबँद या फ्रेंच सायकलस्वाराने एका तासात २८ मैलांपेक्षा (४५·०६ किमी.) जास्त अंतर पूर्ण केले, तर १९४२ मध्ये फॉस्टो कोपी या सायकलपटूने एका तासात २८ मैल ८८५ यार्ड (४५·८५ किमी.) अंतर कापले.

शर्यतीच्या सायकलींची रचना काहीशी वेगळी असते. सायकलस्वाराला हवेच्या प्रतिरोधाचा फार मोठा अडथळा होतो. २० मैल (३२·१८ किमी.) वेगाने सायकल चालवित असताना सायकलस्वाराची सु. ९० टक्के शक्ती हवेचा प्रतिरोध करण्यात खर्च होते. हवेचा रोध कमी व्हावा म्हणून सायकलस्वाराला हँडलवर वाकावे लागते. ह्या सर्व बाबी विचारात घेऊन शर्यतीच्या सायकलींची रचना केलेली असते. धावपट्टीवरील सायकल मुख्यत्वे वेगक्षमता जास्त असलेली, वजनाने हलकी व मजबूत असते. तिचे वजन १७ ते २० पौंड (७.७१ ते ९·०७ किगॅ.) असते व दोन चाकांच्या आसामधील अंतर १·०५ मी. (३ फुट ३ इंच) असते. तिला एकच गीअर असतो व गतिरोधक ( ब्रे क ) नसतात. ती मागे पॅडल मारुन व पुढील चाकाचा टायर हाताने पकडून थांबविता येते.

रस्त्यावरील सायकल शर्यती : हा सायकल शर्यतींचा मूळ व सर्वाधिक लोकप्रिय प्रकार आहे. एकाच वेळी शेकडो सायकलपटू या स्पर्धेत उतरु शकतात. ह्या रस्ताशर्यत प्रकारात एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत एवढे शर्यतीचे अंतर असू शकते किंवा शर्यतीच्या ठरवून दिलेल्या विशिष्ट मार्गाचे अंतर काही ठराविक फेऱ्यांमध्ये पार करावे लागते.

फ्रान्समधील ‘टूर दी फ्रान्स’ ही जगातील सर्वांत लोकप्रिय सांघिक रस्ता-सायकल शर्यत असून तीत शंभरावर स्पर्धक भाग घेऊन यूरोपमधून ठरावीक अंतर पार करतात. या स्पर्धेत दरवर्षी २० ते २२ संघांचा सहभाग असतो. प्रत्येक संघात नऊ खेळाडू सहभागी असतात. ही स्पर्धा एकूण २३ दिवस चालते व त्यात किमान ३,५०० किमी. ते ४,००० किमी. अंतर स्पर्धकांना पार करावे लागते. हे अंतर सु. २१ टप्प्यांमध्ये विभागलेले असते. प्रत्येक टप्प्याचे विशिष्ट अंतर स्पर्धकाने किती वेळात कापले, त्या वेळेची नोंद ठेवली जाते. जो स्पर्धक सर्व टप्पे पूर्ण करुन स्पर्धेचे ठरलेले अंतर कमीत कमी वेळात पार करतो तो विजेता ठरतो. ही स्पर्धा जिंकणारा जगातील सर्वोत्तम सायकलपटू मानला जातो. ही स्पर्धा १९०३ पासून सुरु झाली. ती पॅरिसपासून सुरु होते व परत पुन्हा पॅरिसला येऊन संपते. त्याचप्रमाणे व्यावसायिक स्पर्धेत इटालियन ग्रांपी हीसुद्घा एक अतिशय प्रसिद्घ स्पर्धा आहे.

रस्ता-शर्यतीसाठी वापरली जाणारी विशिष्ट प्रकारची सायकल (‘क्लब’ वा ‘डिरेलर’) वजनाने हलकी असते; पण धावमार्गावरील सायकलपेक्षा थोडी मोठी, वजनदार व जास्त मजबूत असते. तिचे वजन सु. १० ते १०·८९ किगॅ. (२२ ते २४ पौंड) व दोन चाकांच्या आसामधील अंतर १·०३६ मी. (३ फुट ४ इंच) असते. ह्या सायकलला गतिरोधक असतात व अरुंद टायर असतात. त्यांना गिअर-यंत्रणा असून त्यात ‘डिरेलर’ची खास सोय असते, जेणेकरुन सायकलची साखळी एका गिअरचकातून ( स्प्रॉकेट व्हिल ) दुसऱ्या चक्रा त बदलली जाते. स्पर्धांच्या सायकलीचे हँडलबार हे खालच्या बाजूला वळविलेले असतात. जेणेकरुन सायकलस्वाराला जमिनीसमांतर ओणवे वाकून सायकल चालविता येते. वाऱ्याचा प्रतिरोध कमी करण्याच्या दृष्टीने ही सोयीस्कर व उत्तम बैठकस्थिती आहे.

सायक्लो-क्रॉस स्पर्धा : सायकलच्या स्पर्धामार्गावर अनेक नैसर्गिक व मानवनिर्मित अडथळे असलेली ही क्षेत्रपार ( क्रॉसकंट्री ) सायकल शर्यत आहे. ही स्पर्धा माती-चिखलाच्या, खाचखळगे, उंचवटे, वेडीवाकडी वळणे असलेल्या कच्च्या खडबडीत रस्त्यावरुन घेतली जाते. कित्येकदा सायकलपटूला सायकलवरुन उतरुन व सायकल खांद्यावर घेऊन अडथळे पार करावे लागतात. ह्यात स्पर्धकाच्या वाहनकौशल्याबरोबर धैर्याची व साहसाची कसोटी लागते. हा स्पर्धाप्रकार फ्रान्समध्ये विसाव्या शतकाच्या प्रारंभी उदयाला आला व पुढे तो पश्चिम यूरोपमध्ये व अमेरिकेतही लोकप्रिय ठरला. १९२५ मध्ये जागतिक अजिंक्यपद-स्पर्धा झाल्या. १९५० च्या सुमारात त्यांना ‘यूसीआय्’ ची मान्यता मिळाली. १९६७ पासून हौशी व व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जाऊ लागल्या. १६ ते २४ किमी. (१० ते १५ मैल) अंतराच्या सायक्लो-क्रॉस स्पर्धा (त्यांत काही फेऱ्या अंतर्भूत असतात) साधारण ६० ते ७५ मिनिटांत पार पडतात. स्पर्धामार्गात खंदक, चिखल, वाटेत पडलेली झाडे, पाण्याचे झरे, कृत्रिम कुंपणे, दारे, चढत्या पायऱ्या असे अनेक प्रकारचे नैसर्गिक व मुद्दाम केलेले कृत्रिम अडथळे स्पर्धकांना पार करावे लागतात. ह्या अडथळ्यांच्या आव्हानांत हिवाळी वाऱ्यांच्या प्रतिरोधाची भर पडावी, म्हणून कित्येकदा ह्या स्पर्धा साधारणपणे सप्टेंबर ते मार्च या कालावधीत घेतल्या जातात. १९७० च्या दशकात मोटोक्रॉस सायकल स्पर्धा विशेषतः तरुण वर्गामध्ये जास्त लोकप्रिय झाल्या. त्यांना ‘बीएम्एक्स’ (बायसिकल मोटोक्रॉ स) अशी संज्ञा आहे. ४०० मी. पेक्षा कमी अंतराच्या पण कच्च्या, खडबडीत चिखलमातीच्या धावमार्गावरुन व वरीलप्रमाणेच अनेक अडथळे पार करीत स्पर्धकांना सायकली पळवाव्या लागतात. सायकली लहान चाकांच्या व रुंद टायरच्या वापरतात. त्यामुळे वळणांवरुन घसरण्याचा धोका कमी होतो. ह्या स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक अपघात व इजा होऊ नये म्हणून शिरस्त्राण, जाड आवरणयुक्त कपडे इ. संरक्षक साधने वापरतात.

रंजनप्रकार : सायकल शर्यती हा जसा स्पर्धात्मक क्रीडाप्रकार आहे, तसाच तो फावला वेळ उत्तम रीत्या घालविण्याचा व व्यायामदायी असा रंजनप्रकारही आहे. केवळ मौजेखातर सायकल फिरविणे वा सायकलसहली काढणे ह्यांचाही रंजनात समावेश होतो. सुटीचा एखादा दिवस शहराबाहेर निसर्गरम्य परिसरात सायकल फेरी, रात्रभराची सायकल सहल किंवा सायकलवरुन दूरवरचा दीर्घ पल्ल्याचा प्रवास असे हौशी सायकलस्वारांना आनंद देणारे रंजनाचे अनेकविध प्रकार आहेत.

इंग्लंडमध्ये हौशी पर्यटक सायकलस्वारांचा पहिला संघ ‘बायसिकल टूरिंग क्लब’ १८७८ मध्ये स्थापन झाला. बहुधा हा जगातला सगळ्यात मोठा सायकल संघ असावा. ह्याच धर्तीवर अमेरिकेत ‘लीग ऑफ अमेरिकन व्हिलमेन’ हा संघ १८८० मध्ये स्थापन झाला. यांखेरीज ‘कॅनडियन व्हीलमन्स असोसिएशन’ (१८८२), ‘टूरिंग क्लब ऑफ फ्रान्स’ (१८९५) ह्या हौशी सायकलस्वारांच्या संघटना अद्यापही कार्यरत आहेत. ह्या राष्ट्रीय संघटना स्थानिक मंडळांच्या विविध उपक्रमांना सर्वतोपरीने साहाय्य व प्रोत्साहन देतात. अमेरिकेत रंजनात्मक क्रीडा म्हणून सायकली फिरविण्याचा प्रकार खूपच लोकप्रिय आहे. त्यासाठी खास सुरक्षित असे सायकलमार्गही (बाईकवेज ) ठिकठिकाणी आखण्यात आले आहेत. सायकलच्या रंजनप्रकारांत प्रौढांची तिचाकी सायकल स्पर्धा तसेच ‘टँडेम’ (दोन वा जास्त सायकलपटूंना चालविता येणारी जादा स्वतंत्र बैठका व पायटे असलेली सायकल ) इ. स्पर्धांचाही अंतर्भाव होतो. रंजनाबरोबरच एक आरोग्यदायी व्यायामप्रकार म्हणूनही सायकली फिरविण्याला वाढती लोकप्रियता लाभते आहे.

महाराष्ट्रात मुंबई-पुणे ही सायकल शर्यत अनेक वर्षे सातत्याने चालू आहे. दीर्घ पल्ल्याची ( सु. १५३ किमी. अंतर ) व अवघड घाट-वळणांची (सु. ७ किमी. अंतर) ही शर्यत आव्हानप्रद व लोकप्रिय ठरली आहे. घाटाचे अंतर कमीत कमी वेळात सर्वप्रथम पार करणाऱ्या स्पर्धकाला ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताब दिला जातो. मुंबई-पुणे ही सायकल स्पर्धा विनोद पुनमिया या सायकलपटूने सलग चार वेळा जिंकून ‘ घाटाचा राजा’ हा किताबही मिळविला आहे. २०१२ मध्ये झालेली पन्नासावी ‘राष्ट्रवादी करंडक’ मुंबई-पुणे सायकल शर्यत व ‘घाटाचा राजा’ हा मानाचा किताबही अतुलकुमार या सायकलपटूने जिंकला.

पर्वतराजीतील सायकल मोहिमा : सायकलवरुन हिमालयाच्या पर्वतराजीची सफर करणे, हा एक साहसी व रोमहर्षक असा क्रीडाप्रकार आहे. हिमालयातील निसर्गपरिसराचे, विशेषतः गिरिशिखरे, पाणवठे व तलाव, हिमनद्या इ. जवळून प्रत्यक्ष पाहण्याची संधी या सायकल-प्रवासात लाभते. पर्वतराजीतील सायकल-मोहिमांसाठी (माउंट बायकिंग) साधारणपणे काथगोदाम ते नैनिताल, कालका ते सिमला, चंडीगढ ते मनाली हे साहसी सायकलपटूंचे पहिल्या पसंतीचे मार्ग आहेत. सायकलीने हिमालयाच्या वाटा तुडवण्याचा अनुभव रोमहर्षक व चित्तथरारक ठरतो. तेथील जनजीवन व लोकसंस्कृती यांचे जवळून दर्शन घडते. हिमालयातील सायकलप्रवासाच्या मोहिमा आखण्यासाठी ‘इंडियन माउंटनिअरिंग इन्स्टिट्यू ट’ ही संस्था पुढाकार घेते. या संस्थेकडे मोहिमेच्या किमान एक महिना आधी नोंदणी करणे आवश्यक असते. सुरक्षेच्या कारणास्तव संस्थेची रीतसर परवानगी मिळविणे आवश्यक असल्याने ही प्रकिया पार पाडावी लागते. मार्ग व सदस्यसंख्या यांची माहिती संस्थेला द्यावी लागते. काही विशिष्ट पर्वतांवर सायकलने आरोहण करण्यापूर्वी संस्थेला स्वामित्वशुल्क (रॉयल्टी) देणे आवश्यक असते. हिमालयातील साहसी सायकल-मोहिमांसाठी विशिष्ट गीअर्स असलेल्या सायकली संस्था पुरवते. चढ-उताराच्या मार्गांवर नियंत्रण मिळविणे गीअर्सपद्घतीच्या सायकलीमुळे सहज शक्य होते. हिमालयातील तराई, नैनिताल तसेच हिमाचल प्रदेशातील सायकल -मोहिमा, लडाखमधील सायकलसवारी ह्यांचे अनुभव जास्त चित्तथरारक ठरु शकतात. हिमाचल प्रदेशातून उत्तरांचलात जाणारा मार्गही साहसी सायकलपटूंना आकृष्ट करणारा आहे. डोंगराळ प्रदेशातील खडतर प्रवासात चंपा हे सायकलपटूंसाठी एक विश्रामस्थळ ठरले आहे. सह्याद्री पर्वतरांगांमधील अलंग-मदन-कुलंग ह्या सर्वांत कठीण अशा गडमाथ्यांची सायकलवरुन साहसी मोहीम कल्याण–डोंबिवलीतील  ‘निसर्ग-गिरिभमण’ या संघटनेच्या युवक-युवतींनी अलीकडेच यशस्वी रीत्या पार पाडून एक विकम प्रस्थापित केला आहे.

लेखक: श्री. दे. इनामदार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate