অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बोस,राजचंद्र

बोस,राजचंद्र

(१९ जून १९०१ -   ). भारतीय गणितज्ञ व सांख्यिकीविज्ञ. त्यांनी ⇨प्रयोगांचा अभिकल्प व ⇨ बहुचरात्मक विश्लेषण  या विषयांत विशेष संशोधन कार्य केले आहे.

बोस यांचा जन्म मध्य प्रदेशातील होशंगाबादला झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठाची १९२४ मध्ये एम्.ए. (शुद्ध गणित) ही पदवी आणि कलकत्ता विद्यापीठाच्या एम्.ए (अनुप्रयुक्त गणित) व डी.लिट्. (सांख्यिकी) या पदव्या संपादन केल्या. ते कलकत्ता येथील आशुतोष कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक (१९३०-३४), इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये सांख्यिकीविज्ञ (१९३४-४०) व कलकत्ता विद्यापीठात अध्यापक (१९३८-४५) आणि सांख्यिकी विभागाचे प्रमुख (१९४५-४९) होते. त्यानंतर अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागात प्राध्यापक (१९४९-६६) व केनान प्राध्यापक (१९६६-७१) म्हणून काम केल्यावर १९७१ पासून कोलोरॅडो राज्य विद्यापीठात गणिताचे आणि सांख्यिकीचे गुणश्री प्राध्यापक आहेत. १९४७ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले होते.

बहुचरात्मक विश्लेषणात त्यांनी प्रशांत चंद्र महालनोबीस व एस्.एन्. रॉय यांच्याबरोबर D२ -संख्यानकासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. स्विस गणितज्ञ लेनर्ड ऑयलर यांनी ‘४ ट + ३ या क्रमाचे दोन परस्पर जात्य लॅटिन चौरस अस्तित्वात असणे शक्य नाही’ असे अनुमान १७८२ मध्ये काढले होते. अनेक गणितज्ञांनी या अनुमानाचे खंडन करण्याचा प्रयत्न केला होता. बोस यांनी श. शं. श्रीखंडे व ई. टी. पार्कर यांच्या सहाकार्याने प्रयोगांच्या अभिकल्पातील संतुलित व अशंतः संतुलित अपूर्ण खंड अभिकल्पांच्या संदर्भात विकसित केलेल्या समचयात्मक

पद्धतींच्या [⟶ समचयात्मक विश्लेषण] साहाय्याने १९५९ मध्ये ऑयलर यांच्या अनुमानाचे संपूर्णपणे खंडन केले [⟶ प्रयोगांचा अभिकल्प]. हे कार्य त्यांनी संगणकाच्या (गणक यंत्राच्या) मदतीशिवाय केले हे विशेष होय. त्यांनी संकेतन पद्धती व प-मितीय भूमिती या विषयांतही महत्त्वाचे सिद्धांत मांडले आहेत.इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट, इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (भारत), अमेरिकन ॲसोसिएशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स, नॅशनल ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेस, न्यूयॉर्क ॲकॅडेमी  ऑफ सायन्सेस, अमेरिकन स्टॅटिस्टिकल ॲसोसिएशन, अमेरिकन व कॅनेडियन मॅथेमॅटिकल सोसायटी या संस्थांचे ते सदस्य आहेत. भारतीय विज्ञान परिषदेच्या सांख्यिकी विभागाचे १९४७ साली ते अध्यक्ष होते. इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्सचे ते १९७१-७२ मध्ये अध्यक्ष होते. १९७४ साली इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटने त्यांना डी.एस्‌सी. ही सन्माननीय पदवी दिली.

लेखक : स. ज. ओक

माहिती स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate