অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इजीअन संस्कृति

इजीअन संस्कृति

इजीअन संस्कृति

प्रागैतिहासिक ब्राँझ युगातील इजीअन समुद्राच्या आसपासच्या प्रदेशात इ. स. पू. सु. ३००० ते ११०० च्या दरम्यान अस्तित्वात असणाऱ्या संस्कृतीस सामान्यत: ही संज्ञा देण्यात येते. यूरोपमधील ही पहिली प्रगत संस्कृती मानतात. तिचा विस्तार इजीअन समुद्रातील लहानमोठ्या बेटांत, तसेच ग्रीसचा दक्षिण व आग्नेय भाग म्हणजे पेलोपनीससचे द्वीपकल्प व तुर्कस्तानचा पश्चिम व मुख्यत्वे वायव्य भाग यांत झाला. यूबीआ, मिटिलीनी, थेसॉस, सॅमोथ्रेस, सिक्लाडीझ, सेमॉस, कीट वगैरे बेटांत जरी ही संस्कृती पसरली असली, तरी क्रीट बेटावरील नॉसस व फायस्टॉस, ग्रीसमधील मायसीनी व टायरिन्झ आणि तुर्कस्तानातील ट्रॉय हीच तिची प्रमुख केंद्रे होत.

या संस्कृतीचा शोध हाइन्‍रिख श्लीमान या जर्मन संशोधकाने १८७० ते १८९२ च्या दरम्यान लावला. होमरच्या महाकाव्यांत आणि ग्रीक पुराणकथांत वर्णिलेल्या व्यक्ती व स्थलनामे त्यापूर्वी केव्हा तरी निश्चितच अस्तित्वात असली पाहिजेत, ह्या दृढ विश्वासाने त्याने उत्खनन केले. त्यास अनेक प्राचीन अवशेष उपलब्ध झाले. अर्थात त्याचे उत्खनन शास्त्रशुद्ध नव्हते, त्यामुळे त्याने ठरविलेली कालनिश्चिती व उपलब्ध अवशेषांवरून काढलेली अनुमाने फारशी विश्वसनीय नव्हती. त्यानंतर वरील प्रदेशात व्हिल्हेल्म डर्पफेल्ट, एव्हान्झ, जे. बी. वेस. अ‍ॅलन इ. पुरातत्त्ववेत्त्यांनी विस्तृत प्रमाणावर उत्खनने केली असून १९५६ पर्यंत तेथे उत्खनन चालू होते.

या संस्कृतीस हेलाडिक संस्कृती असेही म्हणतात. मिनोअन (क्रीटन) आणि मायसीनीअन असे जरी इजीअन संस्कृतीचे दोन प्रमुख कालखंड पडतात; तरी कालोत्क्रमाच्या सोयीसाठी पुढील तीन विभाग केलेले आहेत :

(१) मिनोअन क्रीट किंवा प्राचीन हेलाडिक (इ. स. पू. सु. २६०० ते २०००)

(२) मध्य हेलाडिक (इ. स. पू. सु. २००० ते १६००) व

(३) मायसीनीअन किंवा उत्तर हेलाडिक (इ. स. पू. सु. १६०० ते ११२५).

ग्रीक पुराणकथांत क्रीट येथील मीनो राजाचा उल्लेख येतो. त्यावरून ह्या संस्कृतीला मिनोअन असे म्हणतात. परंतु ह्या एका नावापलीकडे इजीअन संस्कृतीच्या राजकीय इतिहासाविषयी फारशी माहिती आज तरी उपलब्ध नाही. इजीअनमधील मायसीनी, टायरिन्झ व ट्रॉय या शहरांच्या तत्कालीन रचनेवरून व त्यांतील राजवाड्यांवरून असे वाटते, की सर्वकाळी येथे राजेशाही अस्तित्वात असावी; परंतु नंतर मायसीनियन किंवा उत्तर हेलाडिक काळात लहान शहरांतून स्वतंत्र राजकीय गट असावेत आणि त्या सर्वांत नॉसस हे बलवत्तर असावे. काही खेड्यांच्या सभोवतालच्या तटबंदीवरून असे अनुमान करता येते, की त्यांचे आपापसांत हेवेदावेही असण्याची शक्यता असावी.

मिनोअन व मायसीनियन जीवनपद्धतींत काही भेद निश्चितपणे आढळत असले, तरी मायसीनीत स्थायिक झालेल्या अ‍ॅकियन जमातींनी मिनोअम संस्कृतीच अधिक आत्मसात केलेली आढळते. स्थलकालसापेक्ष काही भेद आहेत. उदा., निमोअन नगरांभोवती तटबंद्या नाहीत, तर मायसीनियन नगरांभोवती त्या आढळतात. परंतु ह्यावरून फारतर स्थिर वा अस्थिर राजकीय परिस्थितीच सुचविली जाते. त्यामधून सांस्कृतिक परंपरेची माहिती ज्ञात होत नाही.

कंदर इजीअन राजकीय संघटनेसंबंधी फारच थोडी माहिती मिळालेली आहे. उत्खनित पुराव्यांवरून काही शस्त्रधारी लोकांची माहिती मिळते; परंतु अशा शस्त्रधारी लोकांची लष्करी संघटना अस्तित्वात होती किंवा नाही हे सांगता येत नाही. उत्तर ब्राँझ युगात क्रीट व ग्रीस या ठिकाणी विस्तीर्ण राजप्रासादांचे अवशेष आढळले आहेत. त्यांचे रचना (उदा., प्रशस्त सभागृहे, शयनगृहे, स्‍नानगृहे व सांडपाण्याची व्यवस्था) लक्षात घेता असे वाटते, की तत्कालीन लोक विलासी जीवन जगत असावेत. प्रासादांत भिंतींवर उत्तम प्रकारचे चित्रकाम आढळले आहे. त्या चित्रकामांत बैलांबरोबरच्या झुंजींचेतसेच शिकारीच्या चित्रांचे प्रमाण जास्त दिसते. यांवरून तत्कालीन समाज सुखवस्तू असावा व त्याचे हे करमणुकीचे खेळ असावेत असे वाटते. नॉसस आणि फायस्टॉस ह्या ठिकाणी प्रेक्षागृहांचे अवशेष सापडले असून अशा वास्तूंचा उपयोग धार्मिक उत्सव साजरे करण्यासाठी होत असावा. ह्या लोकांच्या रोजच्या खाण्यात मांस, मासळी आणि फळभाज्या असत. ते मद्यपान करीत. त्यावेळी ऑलिव्ह व द्राक्षे ह्यांचे पीक भरपूर असावे. उत्तर काळात घोड्यांच्या गाड्यांचा उपयोग व दगडी फर्निचरचा वापर ही वैशिष्ट्ये जाणवतात.

क्रीट हे भौगोलिक दृष्ट्या मध्यवर्ती स्थान असल्यामुळे यूरोप, आफ्रिका व आशिया ह्या खंडांतून तेथे पूर्वी व्यापार चालत असावा, म्हणूनच त्यास एवढे असामान्य व अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. कारण इ. स. पू. २०००च्या सुमारास क्रीटमध्ये तयार झालेली मृत्पात्रे ही मिलॉस, ईजिप्त, सायप्रस व ग्रीसच्या इतर प्रदेशांत निर्यात होत आणि काही भांडी त्यांच्या बदल्यात क्रीटमध्ये त्यावेळी आयात होत. इ. स. पू. १६०० नंतर क्रीटची बहुतेक मृत्पात्रे भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या प्रदेशात जात असावीत. अद्यापि क्रीटच्या आर्थिक चलनासंबंधी काही माहिती मिळत नाही; परंतु उत्खननात काही प्रमाणभूत वजनमापे सापडली आहेत. तत्कालीन लोक हे दर्यावर्दी असावेत, असे काही जहाजांच्या मृत्स्‍नाशिल्प नमुनाकृतींवरून वाटते.

या संस्कृतीत मृतांची विल्हेवाट कशा पद्धतीने लावीत, ह्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. बहुतेक अनुमाने उपलब्ध पुराव्यांवरून काढलेली आहेत. मृतांना जाळण्याची पद्धती अस्तित्वात नव्हती, त्यांना पुरण्यात येई. प्राचीन ब्राँझ युगात सर्व कुटुंबाकरिता किंवा जमातीसाठी नैसर्गिक गुहांचा उपयोग दफनासाठी करीत. त्यानंतरच्या काळात थडगी बांधण्याची प्रथा सुरू झाली व पुढे पुढे त्यात सुधारणा होऊन थडग्यांवर कोरीव शिल्पकाम काम करण्यात येऊ लागले. अखेरच्या काळात नक्षीदार अश्मशवपेटीकाही वापरात आलेल्या दिसतात.

जीअन समाजातील बहुतेक राजे हे पुरोहित असत; तथापि ते ईश्वरदत्त अधिकार मानीत नसत. ह्या संस्कृतीचा अध:पात होईपर्यंत इथे सर्वत्र एकाच स्वरूपाचा धर्म होता. क्रीटमधील धर्मच सर्वत्र प्रचलित झालेला दिसतो. मातृदेवतेची व तिच्या पुत्राची मूर्तिरूपाने पूजा-अर्चा करण्यात येई. या मूर्तीस बळी देण्याची पद्धत होती. अशा मूर्तीच्या हातात नाग दिसतात, तर पाठीमागे सिंह आहेत. ह्यांच्या देवालयांत स्थंडिलेही होती. ह्याशिवाय मृतांचीही पूजा होत असे. याच देवताची पूजा मायसीनीत चालू झाली व पूर्वीसारखेच विधी चालू राहिले. उत्तर काळातील इजीअन संस्कृतीच्या धर्मांचे वैशिष्ट्य म्हणजे अ‍ॅकियन लोकांनी आपल्याबरोबर आणलेली अग्निपूजा होय. त्या हाइस्टा असे नाव आहे. पुढे मातृदेवतेची नावे बदलत गेली, तरी भूमध्यसमुद्राच्या किनाऱ्याच्या प्रदेशांत, विशेषत: ग्रीसमध्ये, ही पूजा दीर्घकाळापर्यंत टिकून राहिली. राजा मुख्य पुरोहित म्हणून काम करीत असे. कितीतरी ग्रीक पुराणकथांचा उगम क्रीट व मायसीनी यांमधील दंतकथा व पुराणे ह्यांत सापडतो. ग्रीक संस्कृतीवर इजीअन संस्कृती व परंपरा यांची छाप पडलेली आहे.

वास्तुकला व मूर्तिकला या क्षेत्रांत इजीअन लोकांनी केलेली प्रगती, त्यांचे राजप्रासाद व गृहबांधणी ह्यांवरून दिसते. कुंभारकाम इजीअन संस्कृतीच्या काळात अत्यंत प्रगल्भ अवस्थेस पोहोचले होते. तत्कालीन मृत्पात्रे घोटीव, विविध आकारांची, नक्षीकामाने व चित्रकामाने सुशोभित केलेली आढळतात; त्यांपैकी काही अंड्याच्या कवचाइतकी पातळ व अत्यंत चकचकीत असत. कुंभार त्यांच्या बनावटीत चाकाचा उपयोग करीत. ह्या मृत्पात्रांची निर्यातही होत होती. इजीअन लोकांनी भित्तिचित्रांच्या बाबतीतही खूपच प्रगती केली होती. धातुकामातील त्यांची प्रगती उल्लेखनीय आहे. इजीअन लोक ब्राँझ व लोखंड ह्यांचाही सर्रास वापर करीत. त्यांत विविधता आढळते. इ. स. पू. १५००च्या सुमारास इजीअन कलेच्या अधोगतीस सुरुवात झाली.

मिनोअन संस्कृतीच्या अगदी आरंभीच्या अवस्थेत लेखनकला अस्तित्वात असल्याचा पुरावा नसला, तरी थोड्याच काळात ही विद्या इजीअन लोकांना अवगत झाली असावी. त्यांचे काही शिलालेख तसेच कोरीव लेख असलेली खापरे मिळाली आहेत. यांवरील लिपी अलीकडेच वाचता येऊ लागली. मायकेल व्हेन्ट्रिस, चॅडविक आणि स्टोलेनबर्ग या विद्वानांचे परिश्रमच ही लिपी उलगडण्यात मुख्यत्वे कारणीभूत झाले आहेत. या लेखांतून चित्रलिपी, रेखांकित अ व ब रेखांकित व अशा तीन लिप्या आढळतात. आरंभी चित्रलिपी, नंतर 'रेखांकित अ' व शेवटी 'रेखांकित ब' हा क्रम क्रीटमध्ये सापडतो. यात 'रेखांकित ब' नॉससच्या आसपासच विशेषत्वाने दिसते व पुढे मायसीनीत तिचाच वापर होऊ लागला. अगदी शेवटी शेवटी वर्णविल्हे योजलेली ग्रीक भाषा लिहावयास उपयुक्त अशी लिपी अस्तित्वात आली. या सर्व लेखांत केवळ देण्या-घेण्याचा व इतर व्यापारी मजकूर आहे. कोठेही राजकीय पत्रव्यवहार वा आज्ञापत्रे नाहीत.

त्तर यूरोपातून आलेल्या डोरियन जमातींनी या संस्कृतीच्या बाह्य वैभवाचा नाश केला; तथापि त्यांच्यावर ह्या संस्कृतीची एवढी छाप पडली, की पुढे तिचे त्यांनी जतन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर ग्रीसमध्ये उदयास येणाऱ्या विकसित संस्कृतीत तर तिचे पडसाद उमटलेले दिसतात. (चित्रपत्र ३७).

 

संदर्भ 1. Ceram, C. WA Picture History of Archaeology, London, 1958.

2. Demargne, Pierre, Trans, Gilbert, Stuart; Emmons, James, Aegean Art, London, 1964.

3. Durant, Will, The Life of Greece, New York, 1939.

4. Listener, Iver, The Living Past, London, 1957.

माटे, म. श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate