অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गॉथ

गॉथ

गॉथ

इसवी सनाच्या पहिल्या शतकात यूरोपात धुडगूस घालणारी एक प्रबल रानटी जर्मन जमात अथवा टोळी. हे लोक बहुतेक उत्तर यूरोपमध्ये बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर राहत असावेत. त्यांच्या मूलस्थानासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि गॉथ टोळीचे पूर्वज दक्षिण स्वीडनमधील असावेत, अशी पारंपरिक माहिती मिळते; पण तत्संबंधी अद्यापि सबळ पुरावा ज्ञात झाला नाही. काळ्या समुद्राच्या उत्तरेस हे तिसऱ्या शतकात स्थायिक झाले होते. त्यावेळी त्यांच्यात दोन गट पडले आणि भौगोलिक स्थानांतरानुसार त्यांस नावे मिळाली.

पूर्वेकडे राहणाऱ्या टोळीस ऑस्ट्रोगॉथ हे नाव पडले आणि पश्चिमेकडील टोळीस व्हिसिगॉथ ही संज्ञा मिळाली. चौथ्या शतकातील हूणांच्या हल्ल्यांमुळे व्हिसिगॉथ आणखी पश्चिमेकडे सरकले, ऑस्ट्रोगॉथांनी हूणांशी मिळते घेऊन त्यांच्या लष्करात नोकऱ्याही मिळविल्या. हूण नेता अ‍ॅटिलाच्या मृत्यूनंतर ऑस्ट्रोगॉथ पनोनियात म्हणजे स्थूलमानाने हल्लीच्या हंगेरीत स्थायिक झाले. ऑस्ट्रोगॉथांनी ४७१ मध्ये थीओडोरिक द ग्रेट ह्याची राजा म्हणून निवड केली. पूर्व रोमन सम्राट झीनोच्या प्रेरणेने पश्चिम रोमन साम्राज्य नष्ट करणाऱ्या ओडोएसर ह्या दुसऱ्या जर्मन टोळीच्या प्रमुखाचा निःपात करून इटलीत त्यांनी आपले राज्य स्थापन केले.

ऑस्ट्रोगॉथांना सुसंस्कृत करण्यासाठी थीओडोरिकने केलेल्या प्रयत्नांत त्यांच्या विधिसंहितेत महत्त्वाचे स्थान दिले पाहिजे. त्याच्या निधनानंतर त्याची कन्या आपल्या अल्पवयी मुलाच्या वतीने राज्यपालक म्हणून कारभार पाही. तिने पूर्व रोमन सम्राट जस्टिनियनचे मांडलिकत्व स्वीकारून इटालियनांच्या विरोधाला तोंड देण्याचा प्रयत्न केला. पुढे तिचा खून झाल्याचे निमित्त साधून जस्टिनियनने इटलीवर स्वारी केली ( ५३५ ). त्यानंतर ऑस्ट्रोगॉथांचे राज्य सु. ६०० च्या सुमारास संपुष्टात आले. कालांतराने ऑस्ट्रोगॉथ मूळ इटालियन लोकांत मिसळून गेले.

हूणांच्या आक्रमणानंतर पश्चिमेकडे सरकलेल्या व्हिसिगॉथांना सम्राट व्हॅलेन्सने रोमन साम्राज्यात आश्रय दिला; परंतु पुढे रोमन अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून व्हिसिगॉथांनी बंड केले व ३७८ मध्ये एड्रिअ‍ॅनोपलच्या लढाईत सम्राटाचा वध केला. यानंतर सम्राट पहिला थीओडोशियस याने व्हिसिगॉथ नेता ॲलेरिकला आपल्या बाजूस वळवून त्याच्याशी सलोख्याचे संबंध जोडले. परंतु त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्यात वाईट वागणूक मिळाल्याने व्हिसिगॉथांनी पुन्हा बंड केले आणि अ‍ॅलेरिकने इटलीवर स्वारी करून रोम काबीज केले ( ४१० ).

ॲलेरिकच्या मृत्यूनंतर त्याचा मेहुणा ॲटेल्फस गादीवर बसला. आल्प्स ओलांडून त्याने गॉलवर हल्ला चढविला व ४१५ मध्ये स्पनेला धडक दिली. ॲटेल्फसच्या खुनानंतर वालिया राजा झाला. आफ्रिकेवर स्वारी करण्याचा त्याचा प्रयत्न फसला; पण रोमन सम्राटाकडून त्याला बराच प्रदेश मिळाला व तेथेच व्हिसिगॉथांच्या तूलूझ घराण्याची कारकीर्द सुरू झाली. त्यांपैकी पहिला थीओडोरिक (४१९ — ५१ ) व यूरिक ( ४६६ — ८४ ) हे राजे महत्त्वाचे होत. यूरिकने आपले राज्या पूर्वेकडे ऱ्होनपर्यंत पसरविले; परंतु एरिअन पंथी व्हिसीगॉथ व कॅथलिक फ्रँक राजा क्लोव्हिस यांच्यातील संघर्षाने व पुढे जस्टिनियनच्या स्वारीने व्हिसिगॉथ राज्य खिळखिळे झाले. आठव्या शतकाच्या प्रारंभी अरबांनी स्पेनवर स्वारी केली. अरब सेनापती तारिकने व्हिसिगॉथ राजा रॉडरिकचा रीओबार्बेतच्या लढाईत ७११ मध्ये वध केला आणि व्हिसिगॉथ सत्ता संपुष्टात आली.


संदर्भ : 1. Gibben, Edward, The Decline and Fall of the Roman Empire, 4 Vols., London,   1776 — 88.

2. Hodgkin, Thomas, Italy and Her Invanders, 3 Vols., London, 1892 — 96.

देशपांडे, अरविंद

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate