অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट

ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट

ग्लॅडस्टन, विल्यम यूअर्ट

(२९ डिसेंबर १८०९ - १९ मे १८९८). प्रसिद्ध ब्रिटिश मुत्सद्दी व इंग्लंडचा इतिहासप्रसिद्ध पंतप्रधान. याचा जन्म लिव्हरपूल (इंग्लंड) येथे एका सधन कुटुबांत झाला. त्याचे वडील जॉन हे एक बडे व्यापारी, पार्लमेंटचे सभासद व कॅनिंगचे अनुयायी म्हणून प्रसिद्ध होते. ईटन आणि ऑक्सफर्ड येथे ग्लॅडस्टनने आपले शिक्षण पूर्ण केले.

विद्यार्थिदशेत एक हुशार विद्यार्थी म्हणून त्याची ख्याती विल्यम ग्लॅडस्टनहोती. तो ऑक्सफर्ड युनियनचा चिटणीस व पुढे काही दिवस अध्यक्षपदी होता. एडमंड बर्क आणि जॉर्ज कॅनिंग ह्या तत्कालीन राजधुरंधरांचा त्याच्यावर पगडा होता. शिक्षणानंतर त्याने चर्चमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले होते, परंतु त्याच्या वडिलांनी हेन्री क्लिंटन ह्या सरदाराकरवी त्यास ह्या विचारापासून परावृत करून न्यूअर्क मतदारसंघातून १८३२ मध्ये पार्लमेंटसाठी उभे केले.

तो टोरी पक्षातून बहुमताने निवडून आला : मात्र त्यानंतर पुढे सु. ६० वर्षे लिबरल पक्षाचा अध्वर्यू म्हणून तो ख्यातनाम पावला.

पार्लमेंटमधील त्याने आपल्या पहिल्याच भाषणात वडिलांच्या गियाना येथील मळ्यातील गुलामांच्या परिस्थितीचे वर्णन केले. त्यामुळे तत्काळ त्यास लोकप्रियता लाभली. १८३४-३५ च्या रॉबर्ट पीलच्या मंत्रिमंडळात त्यास दुय्यम स्थान मिळाले.

पुढे पीलच्याच १८४१ - ४६ च्या मंत्रिमंडळात त्याला पूर्ण मंत्रिपद देण्यात आले. पीलच्या धान्यावरील जकात कमी करण्याच्या विधेयकास पाठिंबा दिल्यामुळे त्यास स्वपक्षीयांचा विरोध पीलबरोबरच सहन करावा लागला. पुढे तो टोरी पक्षातून बाहेर पडून पामर्स्टनच्या व्हिग मंत्रिमंडळात १८५९ मध्ये अर्थमंत्री झाला. ह्या वेळी अर्थखात्यात त्याने अनेक सुधारणा केल्या.

व्हिग पक्षाचे लिबरल पक्षात रूपांतर करण्यात त्याचा मोठा वाटा होता. १८६५ मध्ये पामर्स्टनच्या मृत्यूनंतर कॉमन्ससभेचे नेतृत्व ग्लॅडस्टनकडे आले. ह्या सुमारास लॉर्ड डर्बीने टोरी पक्षाचे नेतृत्व सोडले आणि बेंजामिन डिझरेली त्या पक्षाचा प्रमुख झाला. पुढील सु. २० वर्षे ग्लॅडस्टन आणि डिझरेली यांची सत्तास्पर्धा इंग्लंडच्या राजकीय इतिहासाचा स्थायीभाव होता.

डिझरेली १८६८ मध्ये पंतप्रधान झाला, पण आयरिश चर्चच्या प्रश्नावर ग्लॅडस्टनने त्याच्या मंत्रिमंडळाचा पराभव केला. ह्या अगोदर पार्लमेंटने सुधारणांचा दुसरा कायदा संमत केला होता. नवीन कायद्याप्रमाणे झालेल्या निवडणुकीत ग्लॅडस्टनने प्रतिस्पर्ध्यांचा धुव्वा उडविला आणि तो १८६८ मध्ये पंतप्रधान झाला. आपल्या सहा वर्षांच्या कारकीर्दीत त्याने आयर्लडमधील प्रॉटेस्टंटांना मिळणारी सरकारी मदत बंद केली आणि आयर्लंडमधील शेतकऱ्यांसाठी कायदे केले.

१८७० मध्ये प्राथमिक शिक्षणासंबंधी कायदा करून प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले आणि ते मोफत देण्याची कायद्यान्वये तरतूद केली. तसेच १८७१ मध्ये गुप्तमतदानपद्धतीचा कायदा केला; कामगार संघटनांना कायद्याने मान्यता दिली. पुढे १८७३ च्या न्यायव्यवस्था अधिनियमाप्रमाणे त्याने न्यायखात्याची पुनर्घटना केली.

ह्या सुधारणांमुळे व्हिग पक्षात फाटाफूट झाली.१८७४ मध्ये झालेल्या निवडणुकांत डिझरेलीचा टोरी पक्ष विजयी झाला; पण पुन्हा १८८० मध्ये ग्लॅडस्टन अधिकारावर आला. ह्या वेळी त्याने तिसरे सुधारणावादी विधेयक संमत करवून मजुरांसही मताधिकार दिला. ह्या वेळी आयर्लंडमधील कॅथलिक कुळांना संरक्षण देण्याकरिता त्याने आणखी एक जमिनीचा कायदा केला. त्यामुळे पुढे १८८५ मध्ये त्याच्या मंत्रिमंडळाचा पराभव झाला, म्हणून त्याने राजीनामा दिला. परंतु १८८६ च्या निवडणुकीत लिबरल पक्षास बहुमत मिळून तो तिसऱ्यांदा पंतप्रधान झाला.

ह्या कारकीर्दीत त्याचे लक्ष आयर्लंडमधील होमरूल चळवळीकडे होते. अनेक वर्षे ही चळवळ चालूनही त्यांना स्वराज्य मिळेना. तेव्हा आयर्लंडला साम्राज्यांतर्गत स्वराज्य द्यावे, असे त्याने ठरविले.

जोसेफ चेंबरलिन, ब्राइट वगैरे त्याच्या सहकाऱ्यांनी त्यास विरोध केला आणि त्याचे आयरिश होमरूल विधेयक १८८६ मध्ये हाणून पाडले; म्हणून त्याने राजीनामा दिला. चेंबरलिन वगैरे अनुयायी टोरी पक्षास मिळाले. तथापि ग्लॅडस्टनने चिकाटी सोडली नाही.

१८९२ मध्ये तो पुन्हा चौथ्यांदा पंतप्रधान झाला. ह्या वेळी सुद्धा त्याने आयर्लंडला स्वराज्य द्यावे, असे विधेयक मांडले. पूर्वीच्याच जोमाने त्याने त्याचा पाठपुरावा केला आणि ते कॉमन्ससभेमध्ये संमत करून घेतले, परंतु हाउस ऑफ लॉर्ड्‌सने त्यास विरोध केला, तेव्हा ग्लॅडस्टनने राजीनामा दिला आणि राजकारणाचा संन्यास घेतला. उर्वरित आयुष्य त्याने लेखनवाचनात व्यतीत करावयाचे ठरविले.

ग्लॅडस्टन हा एक उत्कृष्ट वक्ता, मुरब्बी राजकारणी आणि कॅथलिक चर्चचा निष्ठावंत पुरस्कर्ता होता. त्याच्या कारकीर्दीत इंग्लंडमध्ये अनेक सामाजिक सुधारणा झाल्या; अंतर्गत कारभारात सुसूत्रता आली; परंतु त्याने परराष्ट्रीय धोरणाकडे दुर्लक्ष केले, अशी त्याच्यावर टीका होई. त्याने अनेक पुस्तके लिहिली. त्यांतील द स्टेट इन इट्‌स रिलेशन्स विथ द चर्च (१८३८), चर्च प्रिन्सिपल्स कन्सिडर्ड इन देअर रिझल्ट्स (१८४०) ही प्रमुख असून त्याची पत्रे व इतर स्फुट लेख पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाले आहेत.

त्याने १८३९ मध्ये कॅथरिन ह्या तरूणीशी विवाह केला. तिच्यापासून त्यास आठ मुले झाली. तो हॅव्हर्डेन येथे मरण पावला.

 

संदर्भ : 1. Magnus, Sir P. Gladstone, London, 1954.

2. Seton-Watson, R. W. Disraeli, Gladstone and the Eastern Question, London, 1935.

राव, व. दी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate