অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चर्चिल, सर विन्स्टन

चर्चिल, सर विन्स्टन

चर्चिल, सर विन्स्टन

(३० नोव्हेंबर १८७४ — २४ जानेवारी १९६५) ब्रिटनचा युद्धकाळातील पंतप्रधान, वृत्तपत्रकार, साहित्यिक व एक थोर राजकारणपटू. त्यांचे पूर्ण नाव विन्स्टन लेनर्ड स्पेन्सर चर्चिल. ब्रिटनच्या प्रसिद्ध मार्लबरो या उमराव घराण्यात त्यांचा ऑक्सफर्डशर येथे जन्म झाला. वडील लॉर्ड रॅन्डॉल्फ हे एक तडफदार, बंडखोर गणले जाणारे संसदेचे सदस्य होते, तर आई जेनेट ही देखणी आणि न्यूयॉर्क येथील लेनर्ड जेरोम या लक्षाधीशाची मुलगी होती. साहजिकच विन्स्टन यांचे बालपण लाडात गेले व त्यांस अनौपचारिकरीत्या घरातच प्राथमिक शिक्षण देण्यात आले.

सर विन्स्टन चर्चिल

प्राथमिक शिक्षणानंतर विन्स्टननी हॅरो या जगद्विख्यात विद्यालयात प्रवेश केला. एक अत्यंत हूड व अभ्यासात मागे, असा विद्यार्थी म्हणून विन्स्टन यांची प्रथम ख्याती होती. हॅरोमध्ये काही दिवस शिक्षण घेऊन त्यांनी सॅंढर्स्टच्या लष्करी शाळेत प्रवेश मिळविला. त्यांच्या स्वभावास जुळेल असे वातावरण व आवडता  विषय मिळाल्याबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा तेथे झपाट्याने विकास होऊ लागला. लष्करी शिक्षणानंतर १८९४ मध्ये त्यांनी चौथ्या हुस्सार पलटणीमध्ये प्रवेश मिळविला.

नुसते सैनिक म्हणून जगण्यात त्यांना समाधान नव्हते. म्हणून १८९५ मध्ये त्यांनी क्यूबा येथील बंड शमविण्यात स्पेन सरकारच्या वतीने भाग घेतला. ह्यावेळी डेली टेलिग्राफ या वृत्तपत्रातून युद्धाचे वृत्त प्रसिद्ध करून त्यांनी आपल्या वृत्तपत्रीय जीवनास प्रारंभ केला. पुढील वर्षी त्यांची नेमणूक भारतात झाली. मालकंद खोऱ्यातील एका लहानशा लढाईत त्यांनी भाग घेतला आणि अलाहाबादच्या पायोनिअर पत्रासाठी इतिवृत्ते पाठविली. ह्या लढाईवर द स्टोरी ऑफ द मालकंद फील्ड फोर्स (१८९८) हे पुस्तक लिहून त्यांनी साहित्यक्षेत्रात पदार्पण केले. सेनापती किचनरेच्या मनाविरूद्ध त्यांनी १८९८ मध्ये सूदानच्या मोहिमेत भाग घेतला, तसेच त्यावर्षी ते बोअर युद्धाच्या प्रसंगाने दक्षिण आफ्रिकेत मॉर्निंग पोस्ट या वृत्तपत्राचे बातमीदार म्हणून गेले. तिथे ते शत्रूंच्या हातात सापडले. युद्धकैदी असताना विलक्षण धाडसाने त्यांनी आपली सुटका करून घेतली आणि पुन्हा सैन्यात प्रवेश करून बोअर युद्धात ब्रिटिशांना यश मिळवून देण्यात हातभार लावला.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate