অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जॉर्ज, तिसरा

जॉर्ज, तिसरा

जॉर्ज, तिसरा

(४ जून १७३८–२९ जानेवारी १८२०). हॅनोव्हर घराण्यातील ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचा १७६०–१८२० या काळातील राजा. त्याचा जन्म लंडन येथे झाला. वडील फ्रेडरिक लूई (प्रिन्स ऑफ वेल्स) तो १३ वर्षांचा असताना वारले. आई ऑगस्टा हिने त्याला समयोचित शिक्षण देऊन ‘तू खरोखरीचा राजा हो’ असा उपदेश केला. कारण यापूर्वीचे पहिला व दुसरा जॉर्ज यांच्या हातात सत्ता नव्हती व ते पूर्णतः आपल्या मंत्रिमंडळावर अवलंबून असत. जॉर्ज पूर्णतः इंग्रजी वातावरणात वाढला व इंग्रजी भाषेतून शिकला. त्यामुळे साहजिकच ब्रिटनच्या जनतेला तो आपल्यातील आहे, असे वाटू लागले.

गादीवर येताच त्याने सर्व सत्ता आपल्या हाती घेण्याचे ठरविले. व्हिग पक्षाचे वर्चस्व नष्ट करण्याकरिता त्याने पैसे देऊन मते गोळा केली व टोरी पक्षाचे वर्चस्व प्रस्थापित केले. त्याकरिता त्याने किंग्ज फ्रेंड्‌स हा पक्ष तयार केला. त्यामुळे संघर्ष निर्माण झाला. सु. १० वर्षांत सात वेळा प्रधानमंडळ बदलले. अनियंत्रित सत्ताभिलाषी राजा व लोकसत्ताप्रेमी राष्ट्र यांमधील हे भांडण विकोपास गेले असते; पण जॉर्जने अमेरिकन वसाहतींवर बसविलेला कर, लोकमत आणि राजा यांच्या समंजसपणाने रद्द केला. जॉर्जने सप्तवार्षिक युद्ध यशस्वी रीत्या थांबविले. आपल्या मर्जीप्रमाणे वागणाऱ्या टोरी पक्षातील नॉर्थला त्याने पंतप्रधान केले. १७७०–८२ ह्या काळात नॉर्थने राजाच्या मर्जीप्रमाणे कारभार चालविला; तथापि अमेरिकेतील वसाहती इंग्‍लंडच्या हातातून गेल्या. तेव्हा जॉर्ज आणि नॉर्थ यांच्या हातातील सत्ताही गेली. एक वर्षाने थोरल्या पिटचा मुलगा विल्यम पिट पंतप्रधान झाला आणि जॉर्जची सत्ता बरीचशी संपुष्टात आली. तथापि पिटच्या यशस्वी कारकीर्दीचे श्रेय जॉर्जला देण्यात येते. पुढे विल्क्‌स प्रकरण उद्‌भवून कॉमन्स ही लोकहितवादी सभा नाही, हे उघडकीस आले. तथापि इंग्‍लंड आणि आयर्लंड यांचे संसदीय एकीकरण झाले. १७८८ मध्ये जॉर्जच्या मेंदूत विकार होऊन तो वेडा झाला; पण १७८९ मध्ये तो बरा झाला. फ्रेंच राज्यक्रांतीच्या सर्व राजकीय बाबी त्याने पिटवर सोपविल्या. आयर्लंडच्या संसदीय समझोत्यानंतर पिटने कॅथलिक लोकांवरील राजकीय नियंत्रणे दूर करण्याचे ठरविले. तेव्हा जॉर्जने त्यास विरोध करून त्याचा राजीनामा घेतला व अ‍ॅडिंग्‍टन यास पंतप्रधान केले. यानंतर कॅथलिकांना काहीही अधिकार द्यावयाचे नाहीत, या अटीवर पुन्हा पिटला पंतप्रधान केले. त्याच्या मृत्यूनंतर फॉक्स व त्यानंतर पोर्टलंडचा ड्यूक हे पंतप्रधान झाले. १८०४ मध्ये जॉर्जला पुन्हा वेडाचे झटके आले. तो काही काळ बराही झाला, पण १८११ नंतर त्याला पूर्णतः वेड लागले व दृष्टीही गेली. तेव्हापासून १८२० पर्यंत त्याचा पुत्र चौथा जॉर्ज रीजंट या नात्याने कारभार पहात असे.

जॉर्जने शार्लट सोफाया या मेक्लनबुर्कच्या मुलीशी लग्‍न केले. तिच्यापासून त्याला पंधरा मुले झाली.

ब्रिटिश इतिहासात स्वतःच्या हाती राज्यकारभार घेण्याचा प्रयत्‍न करणारा आणि काही काळ राज्यकारभार चालविणारा तिसरा जॉर्ज हा शेवटचा राजा होय. तो स्वतःस शेतकरी म्हणवून घेत असे. त्याची कारकीर्द ग्रेट ब्रिटनच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची व उज्‍ज्वल काळाची मानण्यात येते. या काळात ग्रेट ब्रिटनने अमेरिकेतील आपल्या वसाहती गमावल्या, तरी पण सप्तवार्षिक युद्धात (१७५६–६३) विजय मिळविला, नेपोलियनचा पराभव केला व यूरोप खंडातील एक प्रमुख राष्ट्र म्हणून जग त्याच्याकडे पाहू लागले. याच काळात औद्योगिक क्रांतीस सुरुवात झाली. त्यामुळे इंग्‍लंड आर्थिक दृष्ट्या सधन झाले.

 

संदर्भ : Brook, John, King George III., London, 1972.

राव, व. दी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate