অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

द्यूप्लेक्स, जोझेफ फ्रान्स्वा

द्यूप्लेक्स, जोझेफ फ्रान्स्वा

द्यूप्लेक्स, जोझेफ फ्रान्स्वा

(१ जानेवारी १६९७–१० नोव्हेंबर १७६३). भारतातील फ्रेंच वसाहतींचा एक महत्त्वाकांक्षी राज्यपाल. त्याचा जन्म लेंड्रसी येथे झाला. त्याचे वडील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत डायरेक्टर जनरल या हुद्यावर होते. सतराव्या वर्षीच अटलांटिक व हिंदी महासागरातून त्याने समुद्रपर्यटन केल्यावर १७२१ मध्ये त्याची नेमणूक भारतातील फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीत पाँडिचेरी येथे कौन्सिलचा सदस्य म्हणून झाली. येथे आल्यावर खाजगी व्यापार करून त्याने पुष्कळ पैसा मिळविला.

७२६ मध्ये त्याला नोकरीतून कमी केली. पुढे त्याच्यावर ठेवलेले आरोप निराधार आहेत, हे सिद्ध होताच १७३१ मध्ये त्याला चंद्रनगर येथे मुख्य अधिकारी (इंटेंडंट) म्हणून नेमले. त्याने चार वर्षात चंद्रनगर शहराची स्थिती सुधारून तेथील व्यापार भरभरभराटीस आणला. त्यामुळे १७४२ मध्ये धूप्लेक्सला पाँडिचेरी आणि पर्यायाने भारतातील फ्रेंच वसाहतींचा प्रमुख नेमले. मराठ्यांच्या स्वाऱ्यांमुळे कर्नाटकातील फ्रेंच वसाहतीचे झालेले नुकसान त्याने भरून काढण्याचा प्रयत्न केला व ऑस्ट्रियन वारसा–हक्काच्या युद्धापासून बचाव म्हणून पाँडिचेरीला संरक्षक तटबंदी बांधली. यानंतर १७४४ मध्ये युद्ध सुरू झाल्यावर द्यूप्लॅक्सने कर्नाटकातील नबाब व राजे यांना मदत

जोझेफ फ्रान्स्वा द्यूप्लेक्स

करून व त्यांच्याकडून द्रव्य आणि मुलूख पदरात पाडून द. भारतात फ्रेंच सत्तेचा पाया घातला. १७४४ पासून भारतात इंग्रज–फ्रेंच सत्तास्पर्धा सुरू झाली. यूरोपात एक्स ला–शपेलचा तह १७४८ मध्ये झाला, तेव्हा कर्नाटकात फ्रेंचांची सत्ता दृढ झाली होती. कर्नाटकातील नबाबांवर जय मिळविल्यानंतर त्याने चंदासाहेब याला कर्नाटकातील नबाबी आणि मुजफ्फरजंग याला दक्षिणेची सुभेदारी देण्याचे साहस करून इंग्रजांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. पुढे इंग्रजांनी द्यूप्लेक्सचेच धोरण अवलंबून क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांचा पराभव केला.

द्यूप्लेक्सचे धोरण फ्रेंच सरकारला पटले नाही. तेव्हा १७५४ मध्ये शार्ल्स गोदेह ह्याला फ्रेंच सरकारने सर्वाधिकार देऊन इंग्रजांशी तह करण्यासाठी पाठवले. द्यूप्लेक्स फ्रान्सला परतला. पॅरिस येथे तो अत्यंत दारिद्र्यात व मानहानीत मरण पावला. तत्पूर्वी आपल्या एकूण धोरणाचे समर्थन करणारे पुस्तक त्याने लिहिले. त्याला अखेरीस अपयश आले, तरी कवायती पलटणीचे महत्त्व ओळखून त्यांचा चांगला उपयोग करून घेणारा आणि भारतीय सत्तांच्या अंतर्गत कलहात शिरकाव करून यूरोपीय वर्चस्व स्थापण्याचा पद्धतशीर प्रयत्न करणारा म्हणून द्यूप्लेक्सचे नाव इतिहासात प्रसिद्ध आहे.

खासगी जीवनात द्यूप्लेक्सने वयाच्या पन्नसाव्या वर्षी एका सहा मुलांच्या विधवेशी विवाह केला. तिचा सल्ला तो प्रत्येक धोरणात घेत असे. द्यूप्लेक्सचा एक दुभाषी व सहकारी आनंद रंगा पिळ्‌ळै याने १७३६–६० च्या दरम्यानच्या सर्व घटनांची नोंद आपल्या दैनंदिनीमध्ये लिहिली असून त्याचे बारा खंड प्रसिद्ध झाले आहेत. त्याच्या मते द्यूप्लेक्सच्या चांगल्या धोरणांचा नाश अंतर्गत कलह व द्यूप्लेक्सची पत्नी यांमुळे झाला.


संदर्भ: 1. Dodwell, Henry, Dupleix and Clive, the Beginning of Empire, London,1920.

2. Malleson, G. B. Dupleix, Oxford, 1911.

गोखले, कमल

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate