অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पिट, विल्यम थोरला

पिट, विल्यम थोरला

पिट, विल्यम थोरला

(१५ नोव्हेंबर १७०८-५ मे १७७८). इंग्‍लंडचा सुप्रसिद्ध युद्धमंत्री व अठराव्या शतकातील थोर मुत्सद्दी. त्याचा जन्म वेस्टमिन्स्टर (लंडन) येथे उच्च सरदार घराण्यात झाला. त्याचे वडील रॉबर्ट पिट हे संसद सदस्य व मुत्सद्दी होते, तर आजोबा टॉमस पिट ईस्ट इंडीया कंपनीत मद्रासचे गव्हर्नर होते. त्याचे शिक्षण ईटन व ऑक्सफर्ड यांत झाले. तथापि लहानपणापासून संधिवाताचा त्रास होत असल्यामुळे त्यास पदवी मिळवता आली नाही. वडीलांच्या मृत्युनंतर सुरुवातीस काही काळ त्याने सैन्यात नोकरी केली (१७२७-३४). तो १७३४ मध्ये ओक हॅम्प्टन व न्यू सेरन या मतदारसंघातून ब्रिटिश संसदेवर निवडून आला. त्याने वक्तृत्व कला महाप्रयासाने आत्मसात केली व पेट्रियट्‍स म्हणून प्रसिद्ध असलेल्या पक्षात तो सामील झाला.

संसदेत रॉबर्ट वॉलपोलचा एक कडक टीकाकार म्हणून त्यास लोकप्रियता लाभली. तथापि दुसर्‍या जॉर्जशी मतभेद असल्यामुळे वॉलपोलनंतरही त्यास मंत्रिमंडळात शिरकाव मिळाला नाही (१७४२). पुढे १७४६ मध्ये त्याची पे मास्टर जनरल म्हणून नियुक्ती झाली. ही भरपूर पैसे खाण्याची जागा असूनही पिटने मिळेल तो पैसा देशाच्या खजिन्यात जमा केला आणि फक्त पगारावर हे पद सांभाळले.त्यामुळे एक निस्पृह मंत्री म्हणून त्याची पार्लमेंट व इंग्‍लंडमध्ये ख्याती झाली. त्याने आपल्या भेदक प्रभावी शब्दांनी व नाट्यपूर्ण हावभावांनी पार्लमेंट गाजविले. त्याचे न्यूकॅसलचा लॉर्ड हेन्‍री पेलम ह्या पंतप्रधानाबरोबर मतभेदही झाले होते. या सुमारास सप्तवार्षिक युद्ध चालू होते.

प्रथम त्याची सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून नियुक्ती झाली (१७५६) व नंतर त्याच्याकडे युद्धमंत्र्याचे काम देण्यात आले (१७५७). सप्तवार्षिक युद्धात प्रारंभी इंग्‍लंडला माघार घ्यावी लागली. या वेळी हेन्‍री पेलम व पिट यांत तडजोड झाली आणि युद्धकाळात सर्व सत्ता पिटच्या हाती आली. इंग्‍लंडला यूरोप, अमेरिका, हिंन्दुस्थान या सर्व ठिकाणी विजय मिळत गेले. वसाहतींचे साम्राज्य स्थापण्याच्या चढाओढीत फ्रान्सचा पराभव झाला आणि अद्वितीय युद्धमंत्री म्हणून सर्व देशाने त्याची स्तुती केली; पण यानंतर तिसरा जॉर्ज इंग्‍लंडच्या गादीवर आला. तिसर्‍या जॉर्जचे अमेरिकेशी तह करण्याचे धोरण त्याला पसंत नव्हते; म्हणून त्याने राजीनामा दिला (१७६१). प्रकृती अस्वास्थामुळे तो अधूनमधून पार्लमेंटमध्ये जाई.

१७६६ मध्ये त्याला पंतप्रधान करण्यात आले व अर्ल ऑफ चॅटम हा बहुमान बहाल करण्यात आला. त्याचा रोग अधिक बळावला, म्हणून त्याने राजीनामा दिला (१७६८). उर्वरित आयुष्यात त्याची लोकप्रियता कमी झाली. त्याची ग्रेट कॉमनर ही उपाधी उमरावपद मिळाल्यामुळए साहजिकच कमी झाली आणि तो लॉर्ड्‌सच्या सभागृहात बसू लागला. शिवाय त्याचे विचार मांडणारा कोणीच साहाय्यक नेता नव्हता. अमेरिकन स्वातंत्रयुद्धाने त्याच्यातील जुना जोम पुन्हा वर आला आणि त्याने अमेरिकेची वसाहत इंग्‍लंडने सोडू नये, म्हणून प्रयत्न सुरू केले. या विषयावर पार्लमेटमध्ये भाषण करीत असताना तो कोलमडून पडला आणि नंतर एक महिन्याने वेस्टमिन्स्टर अबे (लंडन) येथे मरण पावला.

 

संदर्भ : 1.Eyck, Erich, Pitt Versus Fox, Father and Son, 1735-1806, London, 1973.

2. Plumb, J.H.Chatham, London, 1953.

3. Sherrard, O.A.Lord Chatham : Pitt and The Seven Year War, London, 1955.

राव, व.दी.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate