অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीटर द ग्रेट

पीटर द ग्रेट

पीटर द ग्रेट

(३० मे १६७२ – २८ जानेवारी १७२५). विख्यात रशियन सम्राट. मॉस्को येथे जन्म. झार अलेक्सिस आणि त्याची दुसरी पत्नी नताल्य नर्यश्‌किन यांचा पीटर हा मुलगा. फ्यॉदर झारने आपला वारस निवडला नव्हता. यामुळे त्याच्या मृत्यूनंतर वारसावाद निर्माण झाला. यातून तोडगा निघून पीटरच्या सॉफया या सावत्र बहिणीने आपल्या इव्हान या सख्ख्या भावास पहिला झार व पीटरला दुसरा झार नेमले आणि रीजंट म्हणून शासनाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली (१६८२). यानंतरची सु. १२-१३ वर्षे, काही काळ बहिणीच्या आणि काही काळ आईच्या जरबेखाली किंवा निदान त्यांच्या संमतीने कारभार पाहण्यात त्याला घालवावी लागली. ह्या काळातील ही वर्षे दिशाहीन उद्योगात गेली. तथापि याही वयात त्याने आरमार, लोहारकाम, सुतारकाम, छपाई इ. विषयांत रस घेऊन अभ्यास केला. या निमित्

ताने त्याचा परदेशी प्रवाशांशी संबंध आला. त्यांच्याकडून रशियाबाहेरील जगताची त्याला चांगली माहिती मिळाली. त्याच्या या स्वच्छंद वर्तनाला आळा घालण्यासाठी त्याच्या आईने यूदॉक्सिआ लपूख्यिन या युवतीशी त्याचे लग्न केले (१६८९). तिच्यापासून त्यास मुलगा (अलेक्सिस) झाला; तथापि त्याच्या एकूण वृत्तीत फारसा फरक पडला नाही. पुढे १६९५ मध्ये तो तुर्कस्तानबरोबरच्या अॅवझॉव्ह युद्धात सहभागी झाला. याच सुमारास इव्हानही मरण पावला. साहजिकच राज्याची सर्व जबाबदारी त्याच्यावर पडली आणि १६९५ पासून पुढे तो अगदी स्वतंत्र असा सत्ताधीश झाला. त्याच्या स्वच्छंद वर्तनाला आळा बसला. १७२५ पर्यंत त्याने अनियंत्रितपणे राज्य केले. रशियात आमूलाग्र स्थित्यंतरे घडवून आणण्याच्या ईर्षेने तो तीस वर्षे प्रयत्नशील होता. प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही फारच थोडे यश त्याच्या पदरी पडले. सेंट पीटर्झबर्ग येथे तो मरण पावला.

शियाची सर्वांगीण प्रगती घडवून आणून यूरोपात एक समर्थ, समृद्ध आणि सुसंस्कृत राष्ट्र म्हणून त्याला स्थान प्राप्त करून द्यावे, अशी त्याची इच्छा होती. त्या दृष्टीने त्याने आपल्या परराष्ट्रीय व अंतर्गत धोरणाची आखणी केली. अ‍ॅनझॉव्ह येथील युद्धात रशियाच्या सैन्यातील, विशेषतः नौदलातील दोष त्याच्या लक्षात आले. त्याने रशियाच्या नौदलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आपल्या लोकांना यूरोपीय देशांत अभ्यासासाठी पाठविले. शिवाय स्वतः त्याने यासंबंधीची सर्व माहिती जमा केली. हॉलंड, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया इ. देशांना त्याने भेटी दिल्या. या देशांतील एकूण जीवनमान व तांत्रिक प्रगती पाहून त्याला आश्चर्याचा धक्का बसला. १६९८ मध्ये रशियास नवी दृष्टी व नऊशे तंत्रज्ञ घेऊन परतल्यानंतर त्याने रशियन जीवनमानात आमूलाग्र बदल घडवून आणले आणि नौदल सुसज्जप केले. शिवाय अनेक सशस्त्र नौका बांधल्या.

प्रायः भूवेष्ठित अशा रशियाला काही मोक्याची सागरी स्थळे मिळवून त्याला जलमार्गांनी बाह्य जगाशी जोडणे आवश्यक होते. त्याच्या आयुष्यभरच्या लढायांमागे हे एक कायम सूत्र होते. तो सर्वाधिकारी झाला तेव्हा रशियाचे तुर्कस्तानशी युद्ध चालूच होते. पीटरला प्रारंभी तुर्कस्तानकडून पराभव पतकरावा लागला; परंतु अत्यंत परिश्रमाने कामगारांसमवेत स्वतः कामे करून त्याने नवे नौदल उभे केले आणि १६९६ मध्ये अॅ झॉव्हची नाकेबंदी करून ते महत्त्वाचे ठाणे तुर्कस्तानकडून काबीज केले. तुर्कस्तानशी तह झाल्यावर १७०० नंतर बाल्टिक समुद्रावर डोळा ठेवून पीटर स्वीडनविरुद्ध उठला. १७०९ मध्ये पीटरने स्वीडनच्या बाराव्या चार्ल्सचा पराभव केला; पण मध्यंतरी तुर्कस्तानशी पुन्हा युद्ध सुरू झाले. मिळविलेले सर्व गमावण्याच्या अवस्थेत पीटर होता. तथापि पुन्हा १७२१ च्या तहाने पीटर काही बाल्टिक प्रदेश पदरात पाडू शकला. एखाददुसरे बंदर आपल्याला मिळावे, म्हणून तुर्कस्तानप्रमाणे इराणशीही त्याने बखेडा मांडला आणि कॅस्पियन समुद्राकडे काही भूमी मिळविली. व्यापारी ठाणी आणि सुवर्ण ह्यांच्या शोधात आपली काही जहाजे त्याने पॅसिफिक महासागरातही सोडली. नीव्हा नदीच्या मुखाशी सेंट पीटर्झबर्ग (सध्याचे लेनिनग्राड) ही नवी राजधानी वसविण्यातला त्याचा हेतू रशियाला यूरोपशी जलमार्गांनी सांधून टाकणे हाच होता. सेंट पीटर्झबर्गला रशियाची ‘यूरोपकडे उघडणारी खिडकी’ असे सार्थपणे म्हटले गेले.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate