অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ

पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ

पेरी, मॅथ्यू कॅलब्रेथ

(१० एप्रिल १७९४ - ४ मार्च १८५८). एक अमेरिकन नाविक अधिकारी. त्याचा जन्म न्यूपोर्ट (र्‍होड-आयलंड) येथे मध्यमवर्गी कुटुंबात झाला. ज्या घराण्यातील अनेक व्यक्तींनी नौदलात जीवन व्यतीत केले; त्याच घराण्यातील ऑलिव्हर हॅझर्ड ह्या प्रसिद्ध नाविकाचा तो धाकटा भाऊ. स्थानिक विद्यालयात शिकून पेरी १८०९ मध्ये अमेरिकेच्या नाविकदलात मिडशिपमॅन म्हणून गेला. तेथून पुढे स्वकर्तृत्वाने कॅप्टन, कमोडर व आरमाराच्या एका तुकडीचा प्रमुख झाला. त्यानंतर त्याची ‘लिटल वेल्ट प्रेसिडेंट’ या युद्धनौकेवर नियुक्ती झाली.

‘युनायटेड स्टेट्स’ या लढाऊ जहाजावर त्याची न्यूलंड येथे बदली झाली (१८१३). ब्रिटिशांच्या नाकेबंदीमुळे त्याला विशेष काम नव्हते, म्हणून त्याने न्यूयॉर्कपर्यंत प्रावस केला. तेथे जेन स्लाइडेल या युवतीबरोबर प्रेमविवाह केला (१८१४). यानंतरची सु. सतरा वर्षे त्याने विविध युद्धनौकांवर काम केले. भूमध्य समुद्रातील चाच्यांच्या बंदोबस्ताची जबाबदारी त्याच्यावर होती. याशिवाय आफ्रिकेतील निग्रो गुलामांच्या वास्तव्याची व रहदारीची व्यवस्थाही त्याच्याकडे होती. त्याने गुलाम विक्रेते व चाचे यांचा बंदोबस्त केला. ‘काँकर्ड’ या जहाजातून जॉन रॅन्डॉल्फ या अमेरिकन मंत्र्याला रशियाला नेण्याचे काम त्याच्यावर सोपविण्यात आले (१८३०).

पुढे त्याने न्यूयॉर्कच्या नौदलात काम केले आणि त्यास कमोडरचे पद मिळाले (१८३३). याकाळात त्याने नाविक प्रशिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून नाविक अकादमी स्थापण्यात पुढाकार घेतला. १८३७ मध्ये ‘फुल्टन’ह्या वाफेवर चालणाऱ्या पहिल्या आगबोटीचा तो कमोडर झाला. १८४३-४४ मध्ये त्याने आफ्रिकन गुलामांचा व्यापार थांबविण्यास मदत केली. मेक्सिकोबरोबरच्या युद्धातही त्याने चांगली कामगिरी बजावली. तथापि त्यास जी कीर्ती इतिहासात लाभली, ती जपानबरोबरच्या तहाने मिळाली. तो नॉरफॉकडून २४ नोव्हेंबर १८५२ मध्ये मोठ्या आरमारासह निघाला आणि टोकिओच्या उपसागरात २ जुलै १८५३ मध्ये आला. त्याने आपले सर्व कागदपत्र व अध्यक्षांचे पत्र तेथील जपानी सम्राटास दिले व उत्तरासाठी एक वर्षांने येईन, असे सांगून चीनच्या किनाऱ्याकडे आगेकूच केली.

तेथे त्यास आणखी जहाजे मिळाली आणि तो जपानकडे परतला. अशा प्रकारे जपानला त्याने अमेरिकेच्या आरमारी बलाचे यथोचित सामर्थ्य व वैभव दाखविले. तेव्हा जपानने ३१ मार्च १८५४ रोजी शांततेचा तह करून अमेरिकेस दोन बंदरे व्यापारासाठी खुली केली. पुढे १८५५ मध्ये तह कायम करण्यात आला. यामुळे जपानचे सु. अडीचशे वर्षांचे अलिप्ततावादी धोरण संपुष्टात आले. पेरी १८५५ मध्ये अमेरिकेस परतला. त्याच्या ह्या कामगिरीबद्दल अमेरिकन काँग्रेसने २०,००० डॉलर्सचे बक्षीस दिले. त्याच्या सफरीचा वृत्तांत नॅरेटिव्ह ऑफ द एक्स्पिडिशन ऑफ अँन अमेरिकन स्क्वॅड्रन टू द चायना सीज अँड जपान ह्या नावाने पुढे तीन खंडात प्रसिद्ध करण्यात आला. तो टॅरीटाऊन (न्यूयॉर्क) येथे निधन पावला.

 

संदर्भ : 1.Morison, S. E.Old Bruin;Commodore Mathew C. Perry :1794-1858, Toronto,1967.

2. Walworth, A. C. Black Ships Off Japan; The Story of Commodore Perry’s Expedirion, Hamden, 1966.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate