অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पेलोपनीशियन युद्ध

पेलोपनीशियन युद्ध

पेलोपनीशियन युद्ध

ग्रीसच्या स्वामित्वासाठी अथेन्स व स्पार्टा या दोन प्रबळ ग्रीक नगरराज्यांत इ. स.पू. ४३१ ४०४ या दरम्यान सतत संघर्ष चालू होता. पेलोपनीशियन युद्ध त्यातूनच उद्‌भवले. हे युद्ध प्राचीन ग्रीक इतिहासकारांच्या लेखनाचा अत्यंत आवडीचा विषय झाला. थ्यूसिडिडीझचा द हिस्टरी ऑफ द पेलोपनीशियन वॉर हा एक मौलिक ऐतिहासिक ग्रंथ यातूनच निर्माण झाला. ग्रीसच्या दक्षिण भागातील द्वीपकल्पाला पेलोपनीसस किंवा मारीया हे नाव असून यातील स्पार्टा, कॉरिंथ, थीब्झ, आर्‌गॉस इ. प्रमुख नगरराज्ये या संघर्षात सहभागी झाल्याने या संघर्षाला पेलोपनीशियन युद्ध ही संज्ञा प्राप्त झाली. अथेन्स व स्पार्टा या दोन प्रबळ शहरांच्या वर्चस्वाखाली अनेक लहानमोठी शहरे होती आणि दोघांचे दोन स्वतंत्र गट होते. यात इ. स.पू. ४४५ मध्ये तीस वर्षांचा तह होऊन शस्त्रसंधीही झाला होता.

अथेन्स हे सागरी राज्य होते आणि त्याचे आरमार प्रबळ होते. त्याच्या संघात वा साम्राज्याखाली इजीअन समुद्रकिनाऱ्याच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील आरमारी बेटे व राज्ये होती; तर स्पार्टाचे आधिपत्य जमिनीवरील मध्य ग्रीसच्या राज्यांवर होते आणि फक्त कॉरिंथ हेच आरमारी प्रबळ राज्य त्याच्या बाजूस होते. स्पार्टाचे भूसैन्य अत्यंत सुसज्‍ज होते. निरनिराळ्या ग्रीक नगरराज्यांत लोकशाही किंवा स्वल्पतंत्री शासन प्रचलित असून प्रत्येकातील अल्पमतवाला गट वेळी अवेळी अन्य राज्यांच्या साहाय्यानेप्रस्थापित शासन उखडून टाकण्याच्या प्रयत्‍नात असे पेरिक्लीझच्या काळात अथेन्स वैभवाच्या शिखरावर होते. डेलियन संघाचा खजिना तेथे असल्याने त्याच्या सामर्थ्यात भरच पडली होती.

या युद्धाची अनेक कारणे आहेत. अथेन्स व स्पार्टा या दोहोंमधील व्यापारी वर्चस्व व सत्तास्पर्धा ही महत्त्वाची होत. तथापि अथेन्स व कॉरिंथ यांच्यात कॉर्साइरा व पॉटिडीया शहरांवरून झालेल्या तत्कालीन भांडणातून पेलोपनीशियन युद्धास सुरूवात झाली. अथेन्सने तीस वर्षांचा तह मोडला, या कारणास्तव ख्रि. पू. ४३१ मध्ये कॉरिंथचा पक्ष घेऊन स्पार्टाने टिकावर स्वारी केली. तेव्हा पेरिक्लीझने ग्रामीण जनतेला अथेन्स शहरात हलविले. ह्या स्थलांतरामुळे लोकांचे हाल झाले व खुद्द अथेन्समध्ये निवासाची समस्या निर्माण झाली. मात्र अथेन्सच्या आरमाराने पॉटिडीया जिंकून घेतले व नॉपॅक्टसजवळ स्पार्टन सैन्याचा पराभव करून लेझ्‌बॉसमधील बंडाळी शमविली. दरम्यान प्लेगची साथ सुरू झाली व अथेन्सचे  २५ % नागरिक दगावले. पेरिक्लीझही मृत्यू पावला.

यानंतर क्लीऑनने अथेन्सचे नेतृत्व केले. स्पार्टाने प्लाटीया शहर काबीज केले; पण अथेन्सने स्पार्टाच्या मुलखात पीलॉस येथे आरमाराचा तळ ठेवला व स्फॅक्टीरीया बेट जिंकून घेतले. उभयतांत तहाच्या वाटाघाटी झाल्या, पण त्या फिसकटल्या. यानंतर स्पार्टन पुढारी ब्रॉसिडस याने अचानक आक्रमक पवित्रा घेतला आणि अथेनियन शहरे काबीज केली. या कालखंडात उभयपक्षी पुष्कळच हानी झाली व खुद्द ब्रॉसिडस व क्लीऑन ठार झाले. ख्रि. पू. ४२१ मध्ये अथेनियन पुढारी निशिअसच्या खटपटीने तह झाला;पण अथेन्स-स्पार्टामधील शत्रुत्व कायमच राहिले. येथून पेलोपनीशियन युद्धातील ल्सिबायाडीझ पर्वास प्रारंभ होतो. त्याने स्पार्टाचा नायनाट करण्याचा घाट घातला. परंतु स्पार्टाने मँटिनीआच्या लढाईत बंडखोरांचा पराभव करून ल्सिबायाडीझचा बेत धुळीस मिळविला. या सुमारास सिसिलीमधील सजेस्ता राज्याने सिलायनस ह्या सिरॅक्यूझच्या मित्र राज्याविरूद्ध अथेन्सची मदत मागितली. सिरॅक्युझचे राज्य सामर्थ्यवान असल्याने सिलायनविरूद्ध सजेस्ताचा पक्ष घ्यावा किंवा नाही, हा अथेन्सपुढे पेच होता. शेवटी ल्सिबायाडीझच्या सल्ल्यानुसार स्वारीचा बेत पक्का झाला व खुद्द निकियास व अँल्सिबायाडीझच्या नेतृत्वाखाली अथेन्सचे प्रचंड आरमार स्वारीवर निघाले.

युद्ध चालू असताच ल्सिबायाडीझवर काही आरोप लादण्यात येऊन त्यास चौकशीसाठी अथेन्सला बोलविले. तो ऐनवेळी स्पार्टाला फितूर होऊन मिळाल्याने अथेन्सवर मोठेच संकट कोसळले. एकट्या निशिअसचा सिलायनस-सिरॅक्यूझच्या सैन्याने सहज धुव्वा उडविला आणि इराणच्या साहाय्याने स्पार्टाने अथेन्सचा नि:पात करण्यासाठी आरमारही उभारले. खुद्द ल्सिबायाडीझ हा आरमारासह अथेन्सविरूद्ध निघाला. यावेळी अथेन्सच्या अनेक मांडलिक राज्यांनीही बंडाची धमकी दिली आणि अल्पमतवाल्यांनी बंडही केले; पण स्पार्टाचा पक्ष सोडून ल्सिबायाडीझ पुन्हा अथेन्सला मिळाला.

सिझिकसच्या लढाईत ( ख्रि. पू. ४१० ) त्याने स्पार्टाचा पूर्ण पराभव केला; परंतु स्पार्टन नौदल-प्रमुख लायसँडरने इराणच्या साहाय्याने नवे आरमार उभारले व नोशीमच्या संग्रामात अथेन्सचा पराभव केला. परिणामत: ल्सिबायाडीझवर पुन्हा किटाळ येऊन त्याला अथेन्स कायमचे सोडावे लागले. त्यानंतर अथेन्सला अर्जिन्यूसीच्या लढाईत विजय मिळाला; पण लायसँडरने इगस्पॉटमसच्या लढाईत अथेन्सच्या आरमाराचा धुव्वा उडविला व स्पार्टाच्या मांडलिकांनी अथेन्सवर आपापली सैन्ये रवाना केली. चारी बाजूंनी घेरले गेल्याने अथेन्सने शरणागती पतकरली ( ख्रि. पू. ४०४ ). अथेन्स पूर्णपणे नष्ट करण्याचा कॉरिंथ व थीब्झ यांचा सल्ला न मानता लायसँडरने तेथे अल्पतंत्री शासन स्थापन केले व ग्रीसचे नेतृत्व अथेन्सकडून स्पार्टाकडे गेले. प्राचीन ग्रीसमधील राज्याराज्यांतील हेवेदावे, आरमारी व भूसेनेचे डावपेच, लोकशाहीवादी व अल्पतंत्री राज्यांतील पक्षोपपक्ष व त्यांजमधील कारस्थाने यांची, तसेच तत्कालीन राजकीय व सामाजिक स्थितीचीसुद्धा दार्घकालीन संघर्षावरून चांगली कल्पना येते.

 

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate