অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फिनिशिया

फिनिशिया

फिनिशिया

भूमध्य समुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर साधारणपणे १६० किमी. लांब व ३५ किमी. रुंद असा दक्षिणोत्तर पट्टा (सध्याचा सिरिया, लेबानन आणि पॅलेस्टाइन यांचा बराचसा भाग) म्हणजे प्राचीन फिनिशिया. तो पूर्व भूमध्य सागराच्या तीरावर उत्तरेस ऊगारीट (रास शॅमरा) पासून दक्षिणेस आको (एकर) पर्यंत पसरला होता. पश्चिमेला भूमध्य समुद्र, पूर्वेस लेबाननच्या पर्वतरांगा, उत्तरेकडे आरवाड व दक्षिणेकडे माउंट कार्मेल अशा या प्रदेशाच्या चतुःसीमा होत्या. या प्रदेशात इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. दुसरे शतक या दरम्यान फिनिशियन संस्कृती विकसित झाली. फिनिशियन लोक हे सेमिटिक वंशाच्या काननाइट उपशाखेचे होते. त्यांच्या मूळ स्थानाविषयी निश्चित माहिती मिळत नाही. परंपरेनुसार ते पूर्वेकडून म्हणजे बहुधा बॅबिलन किंवा इराणी आखाताचा प्रदेश येथून त्यांच्या नव्या भूमीत इ.स.पू. ३००० च्या सुमारास आले असावेत. ते स्वतःला काननाइट म्हणवीत व स्वतःच्या भूमीला-पॅलेस्टाइनला-कानन (कॅनन) असेच संबोधीत.

आरंभीच्या ग्रीक लेखकांच्या ग्रंथांतून त्यांचे याच नावाने किंवा त्याच्या अपभ्रष्ट स्वरूपात उल्लेख आलेले आहेत. त्यांची नावे अमार्ना इष्टिका लेखांत ‘काइनी’ तर बिब्‍लसच्या पुराणात ‘काइन’अशी आढळतात. फिनिशियन हे नाव त्यांना ग्रीकांनी दिले. फीनिक्स या शब्दाचा अर्थ तांबूस-जांभळा वा एक प्रकारचे ताडाचे झाड (सीडार) असा होतो. तांबूस-जांभळ्या रंगाच्या रंगीत कापडाच्या व्यापाराची मक्तेदारी फिनिशियन लोकांकडे होती आणि या नावाचा ताड फिनिशियाच्या किनाऱ्यावर वाढत असे; यांवरून त्यांना फिनिशियन हे नाव मिळाले असावे. यांखेरीज प्राचीन वाङ्‌मयात त्यांना ‘सिडॉनियन’ असेही म्हटले आहे.

.स.पू. १५०० ते इ.स.पू. ५०० दरम्यानच्या काळात भूमध्यसमुद्राच्या पूर्व किनारपट्टीवर बिब्‍लस, टायर (सुर), सायडन (साइड), बेरूत, ऊगारीट यांसारखी अनेक लहानमोठी बंदरे व नगरे होती. फिनिशियनांना आपल्या व्यापारासाठी ती फार उपयुक्त होती. लेबाननच्या पर्वतरांगांनी फिनिशियाची भूमी पश्चिम आशियापासून अलग केल्यामुळे त्या पर्वतांच्या पूर्वेकडे फारसे लक्ष न देता फिनिशियन लोकांनी नौकानयनावर लक्ष केंद्रित करून समुद्रावर वर्चस्व मिळविले. तीनचार शतके सागरी व्यापारावर त्यांचा पूर्ण मक्ता होता. या अरुंद पण लांबट प्रदेशात अनेक बंदरे उदयास आली. त्यांपैकी बिब्‍लस, सायडन व टायर ही महत्त्वाची होती. यांशिवाय आको, ॲक्झीब, काइन, झॅरफॅथ, बेरूत, सिमिरा ही नगरे वेगवेगळ्या काळात भरभराटीस आली. फिनिशियाचे वैभव भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावरील त्यांच्या वसाहती व व्यापारी ठाणी यांवर अधिष्ठित होते.

फिनिशियन लोकांची अनेक नगरराज्ये होती; तथापि राज्यविस्ताराची वा साम्राज्यस्थापनेची त्यांना आकांक्षा नव्हती. व्यापारावरच त्यांचा भर होता. जी सत्ता प्रबळ असेल, तिच्याशी सलोख्याने राहावयाचे व प्रसंगी खंडणी द्यावयाची; पण व्यापाराला धोका पोहोचू द्यावयाचा नाही, हे त्यांचे सर्वसाधारण धोरण असे. ईजिप्तच्या वर्चस्वातून मुक्त झाल्यावर दुसऱ्या कोणाचीही प्रत्यक्ष सत्ता फिनिशियात शिरकाव करणार नाही, याची खबरदारी मात्र त्यांनी घेतली आणि यासाठी वेळप्रसंगी प्राणपणाने लढून आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण केले. ईजिप्तच्या सत्तेचा ऱ्हास व ॲसिरियाचा उदय यांच्या मधल्या कालखंडात टायर या नगरराज्याच्या नेतृत्वाखाली या लोकांचे राष्ट्र उदयास आले.

पुरातत्वीय अवशेषांवरून असे आढळले की, इ.स.पू. १८०० मध्ये किंवा त्याहून काही वर्षे आधी फिनिशिया हा ईजिप्तच्या अधिसत्तेखाली होता. या पहिल्या कालखंडात या सबंध प्रदेशावर ईजिप्तचे अधिराज्य होते. इ. स. पू. सोळाव्या शतकात पहिला आमोस (कार. इ. स. पू. १५७०-१५४५) व पंधराव्या शतकात तिसरा थटमोझ (कार. इ. स. पू. १४९०-१४३६) यांनी पॅलेस्टाइनवर स्वाऱ्या करून तेथील ईजिप्तचा अंमल पक्का केला. तत्कालीन लेखांत या देशाला दाही असे नाव आहे;  यापुढे टेल अमार्ना येथील इष्टिका लेखांतून फिनिशियाविषयी पुष्कळच माहिती मिळते. त्यात ईजिप्तचे राज्यपाल व फिनिशियन नगरराज्यांचे संबंध आणि नगरराज्यांचे आपापसांतील मतभेद यांचे उल्लेख आहेत. इ. स. पू. चौदाव्या शतकात उत्तरेकडून हिटाइट व अ‍ॅमोराइट लोकांची आक्रमणे फिनिशियाच्या किनाऱ्यावर झाली.

तिला ईजिप्तकडून फारसा प्रतिकार  झाला नाही. तेव्हा ईजिप्तची सत्ता झुगारून देण्याचा यत्न आरवाड, सायडन. सिमिरा नगरांनी केला; मात्र याला टायर व जुबेल यांनी काही काळ विरोध केला. पहिला सेती (कार. इ. स. पू. १३०३- १२९०) व धर्मवेडा आक्‍नातन (कार. इ. स. पू. १३७९-१३६२) यांच्या वेळी ईजिप्तची राजकीय सत्ता कमकुवत झाली. दुसरा रॅमसीझ (कार. इ. स. पू. १२९०-१२३३) याने चिकाटीने पुन्हा बेरूतपर्यंतचा फिनिशिया जिंकला; परंतु हे वर्चस्व फार काळ टिकले नाही. इ. स. पू. ९०० च्या पूर्वीच ईजिप्शियन फेअरोंचे फिनिशियावर वर्चस्व टिकविण्याचे प्रयत्‍न अयशस्वी झाले आणि नंतर त्यांना कधीच फिनिशियावर वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही. 

ॲसिरियन सत्तेचा विस्तार होईपर्यंतच्या मधल्या काळात म्हणजे सु. दोनशे वर्षे फिनिशियाला स्वातंत्र्य उपभोगता आले. या सबंध कालखंडात फिनिशियन नगरांनी कोणाचेही मांडलिकत्व पतकरलेले नाही. आरंभी बिब्‍लसचा महिमा विशेष होता; तरी थोड्याच अवधीत टायर या नगराचे नेतृत्व इतरांनी मान्य केल्याचे दिसते. इ. स. पू. ९७० ते ७७० या दोनशे वर्षांच्या काळात टायरचे वर्चस्व अबाधित राहिले. पहिल्या ह्यूरम (हिरॅम-कार. इ. स. पू. ९७०-९३६) राजाने भोवतालच्या राज्यांशी, विशेषतः  इझ्राएलशी खास मैत्रीचे संबंध प्रस्थापिले. त्याचा समकालीन इझ्राएली राजा सॉलोमन याच्या राजप्रासादासाठी व मंदिरासाठी इमारती लाकूड पाठविले व सॉलोमनने तेल आणि दारू यांच्या रूपाने त्याची परतफेड केली. तसेच गॅलिली हा प्रदेश सोने देऊन ह्यूरमने मिळविला, असे उल्लेख आहेत.

फिनिशियाच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे आकाबाच्या आखातातून ओफर भागात अरबस्तानचा पूर्व किनारा वसाहती करण्यासाठी  काढलेली संयुक्त मोहीम होय. इथोबाल (कार. इ. स. पू. ८८७-८५५) हा या नंतरचा उल्लेखनीय राजा. त्याने ह्यूरमच्या शेवटच्या मुलाचा खून करून सत्ता काबीज केली. याच्या वेळी टायरची सत्ता सबंध फिनिशियावर होती व त्याला ‘सायडनचा राजा’ या नावानेही उल्लेखिलेले दिसते. याने आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावर आवॅज नदीपर्यंत आपले ठाणे स्थापन केले. पुढे अंतःस्थ यादवी उद्‍भवून एका गटाने कार्थेज येथे वसाहत स्थापली (इ. स. पू. ८१४). या गटाचे नेतृत्व पिग्मेलयन राजाच्या बहिणीकडे होते, असे सांगतात.

इथोबालच्या कारकीर्दीपासूनच ॲसिरियाचा धोका वाढू लागला. दुसरा असुरनासिरपाल (कार. इ. स. पू. ८८३-८५९) याने इ. स. पू. ८६८ मध्ये टायर, सायडन, बिब्‍लस, आरवाड या शहरांकडून खंडणी वसूल करून समाधान मानले. चौथा शॅलमानीझर याने केलेला हल्ला त्यांनी परतविला. सारगॉन याने सायप्रस बेटाचा कबजा घेतला; तरी खुद्द फिनिशिया अबाधितच राहिला. सेनॅकरिब याच्याविरूद्ध सायडनने बंड केले. यातून टायर व सायडन या दोन वरिष्ठ नगरराज्यांची मैत्री संपुष्टात आली आणि दुही उत्पन्न झाली. सायडनने पुन्हा बंड पुकारले आणि यावेळी मात्र एसार-हॅडन याने या नगरीचा पूर्ण नाश केला (इ. स. पू. ६७९). थोड्याच काळात नवीन नगरे वसविण्यात आली.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate