অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रेंच राज्यक्रांति

फ्रेंच राज्यक्रांति

इ.स. १७८९ मध्ये फ्रान्समध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे अठराव्या शतकातील जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना होय. या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या विचारप्रवाहांचा युरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून युरापची सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली; म्हणून आधुनिक यूरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात.

त्याचप्रमाणे क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्त्र यांत प्रथम अस्तित्वात आली, ती फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच! १७८९ पासून नेपोलियन बोनापार्ट (पहिला) याच्या उदयापर्यंतचा काळ (१७९९) हा सामान्यतः फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ समजण्यात येतो; पण हा काळ १७९२ पर्यंतच धरण्यात यावा व तदनंतरचा हिंसात्मक कृतींनी भरलेला अराजकाचा आणि दहशतीचा काळ हा क्रांतीपासून वेगळा समजला जावा, असे काही इतिहासकारांचे मत आहे.

ही राज्यक्रांती यूरोपच्या इतिहासातील किंबहुना मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना मानली जाते. राजकीय सांस्कृतिक आणि वैचारीक क्षेत्रात ⇨ चौदाव्या लूईपासून (कार. १६४३ - १७१५) फ्रान्सला यूरोपमध्ये अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले होते; म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सर्व यूरोप प्रभावित झाला, यात नवल नाही.

फ्रान्समधील बूँर्बा घराण्याच्या अनियंत्रित सत्तेला क्रांतीमुळे पायबंद घातला गेला. तेथे चालत आलेली परंपरागत सरदारवर्ग व धर्मगुरू यांची मिरासदारी क्रांतीने संपुष्टात आणली.शहरातील नवीन उदयास येणारा जो उत्पादकवर्ग त्याच्यावरील करांचा बोजा नाहीसा झाल्याने त्याला धंद्यात व राजकारणात पुढे येण्यास वाव मिळाला. जमीन कसणारा शेतकरी क्रांतिकाळातील कायद्यांमुळे आपल्या शेतीचा मालक बनला. या क्रांतीमुळे फ्रान्समध्ये लिखित संविधानाची प्रथा सुरू झाली.

धार्मिक पुरोहितशाहीविरुद्ध बुद्धिवादाची प्रतिष्ठापना क्रांतिकाळात झाल्यामुळे राजकारणावरील चर्चची पकड कायमची ढिली झाली.

कारण मीमांसा

या क्रांतीची कारणे सांगताना वैचारीक प्रबोधनापासून मिळालेली प्रेरणा व मार्क्सप्रणित वर्गविग्रहात्मक स्पष्टीकरण या गोष्टींवर भर दिला जात असे; पण आज हे दोन्ही दृष्टिकोण मर्यादित प्रमाणातच मान्य झाले आहेत. क्रांतिपर्व सुरू झाल्यानंतर क्रांतिकारकांनी त्या विचारांचा आपल्या प्रश्नांची मांडणी करताना उपयोग करून घेतला होता, एवढीच साक्ष इतिहास देतो. त्याहून जास्त श्रेय प्रबोधन आणि विवेकवाद यांना देता येत नाही.

मार्क्सचा वर्गविग्रहवादही फ्रेंच राज्यक्रांतीचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ऑस्ट्रियन वारसा युद्ध (१७४०-४८) व यूरोपातील सप्तवार्षिक युद्ध (१७५६- ६३) यासारख्या युद्धांमुळे सरकारी तिजोरीवर पडलेला विलक्षण ताण व त्यामुळे कोलमडण्याच्या अवस्थेत भडकलेली आर्थिक विपन्नावस्था, गंभीर स्वरूपाचा राजकीय पेच प्रसंग आणि सामान्य माणसांवर ओढवलेली उपासमारीची आपत्ती, यांचाही क्रांतीच्या कारणामध्ये अंतर्भाव करावा लागतो.

क्रांतीला पोषक असे वातावरण निर्माण झाले, त्यामध्ये श्रमजीवी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती हा प्रमुख घटक होता.शासन व्यवस्थेवरील सरदार वर्गाचे वर्चस्व कमी झाले होते; परंतु आर्थिक व सामाजिक संबंधांत ते टिकून होते.

बहुसंख्य शेतकरीवस्तुतः आपल्या जमिनीचे मालक झाले होते; तरीपण परंपरागत सरदारवर्गास अनेक प्रकारचा करभार त्यांस विनाकारण द्यावालागे. माल विकावयास नेताना रस्ताकर, नदी ओलांडतांना पूलकर, पिकांचा ठराविक हिस्सा व अंडी इ. सरदारवर्गास हक्काने मिळत.आठवड्यातील तीन दिवस सरदारवर्गाच्या शेतावर राबावे लागे अथवा त्याऐवजी पैसे द्यावे लागत. त्याचप्रमाणे तथाकथितसंरक्षणासाठी वार्षिक कर सरदारवर्गास द्यावा लागे. शिवाय शेतकऱ्यास उत्पन्नाचा बारावा किंवा पंधरावा हिस्सा दशांशकर म्हणूनद्यावा लागे.

वरील करांपेक्षा जाचक म्हणजे सरकारकडे भरावे लागणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर होत. यांमध्ये जमीनसारा, डोईकर, प्राप्तीकर,मिठावरील कर इ. मोडत यांव्यतिरिक्त शेतकऱ्यास रस्त्याच्या कामासाठी वर्षांतून कित्येक आठवडे वेठबिगार करावी लागे. वरील सर्वकरांपोटी जमीन कसणाऱ्यास उत्पन्नाचा अर्धा भाग तरी पदरात पडत होता की नाही, याची शंकाच आहे.

शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या कामगारवर्गांची स्थितीही शेतकऱ्यांप्रमाणेच हलाखीची होती. कमी मजूरी, वाढत्या किंमती,अनिश्चित बाजारभाव, बेकारी, उपासमार व रोगराई त्यांच्या नशिबी कायमची होती. समाजामध्ये एका टोकास दुर्दैवी श्रमजीवी वर्गहोता; तर दुसऱ्या टोकास चैनीत व विलासात मश्गूल झालेला सरदार-पुरोहितांचा वर्ग होता. ⇨आर्मा झां रीशल्य (१५८५-१६४२) वचौदावा लूई यांच्या धोरणामुळे सरदारवर्गास शासनव्यवस्थेमध्ये काहीच स्थान राहिले नव्हते. त्यांच्यातले मातबर लोक व्हर्सायलाटोलेजंग वाडे बांधून राजाचे अनुकरण करीत आणि चैनीचे आयुष्य घालवीत असत. यामुळे शेतकरीवर्गापासून ते संपूर्णतः दुरावलेहोते.

फ्रान्सची राज्यव्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित पद्धतीची होती. राजा मनास येईल ते कायदे करी व विरोधकांस पकडून बेमुदत तुरुंगातडांबून ठेवी. स्टेट्स जनरलचे (संसदेचे) अधिवेशन १६१४ पासून बोलावलेच गेले नव्हते. न्यायपद्धतीत कमालीचा अनागोंदीपणा होता.कायद्यामध्ये एकवाक्यता, एकसूत्रीपणा व समता यांचा पूर्णतः अभाव होता.

अन्याय, दारिद्र्य व विषमता ही फक्त फ्रान्सपुरती मर्यादित होती; असे नव्हते; तर यूरोपमधील इतर देशांमध्ये ह्या सर्व गोष्टीहोत्या; किंबहुना पोलंड व जर्मनीमधील प्रशिया, बव्हेरिया, सॅक्सनी, होल्डनबर्ग, ब्रंझविक इ. काही राज्यांमध्ये त्या जास्तच प्रमाणातहोत्या; परंतु या परिस्थितीवर मात करून आपण आपले भविष्य उज्वल करू अशी श्रद्धा फ्रेंचांमध्ये जेवढ्या प्रमाणात होती, तेवढी तीअन्यत्र कोठेही नव्हती.

ही श्रद्धा वैचारिक क्रांतीच्या पोटी निर्माण झाली होती व ती दृढमूल होण्याचे कारण म्हणजे इंग्लंडमधीलवैभवशाली राज्यक्रांतीची (१६८८-८९) स्फूर्ती व अमेरिकेचा स्वातंत्र्यलढा (१७७५-८३). या लढ्यात फ्रेंच सैन्याने सक्रिय भाग घेतलाहोता.

नवविचारांचे आंदोलन फ्रान्सप्रमाणे इंग्लड, जर्मनी व अमेरिका यांतही झाले होते; परंतु फ्रान्समधील विचारवंत जास्त प्रभावीठरून जनमानसावर त्यांचा परिणाम झालेला दिसतो. नवविचारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांमध्ये देशासंबंधी विचार केला नसूनदेशनिरपेक्ष मानवसमाजाच्या कल्याणाचा विचार केलेला आढळतो.

सामाजिक राजकीय व धार्मिक संस्थांचे मूल्यमापनमावनतावादाच्या दृष्टिकोनातून केले गेले. सामाजिक अर्थव्यवस्थेवर व विशेषतः तत्कालीन धर्मसंस्थांवर या विचारवंतांनी कडाडूनहल्ला केला होता. ⇨दनी दीद्रो (१७१३-८४), ⇨चार्ल्स माँतेस्क्यू (१६८९-१७५५), ⇨फ्रान्स्वा व्हॉल्तेअर (१६९४-१७७८), ⇨झां झाक रूसो(१७१२-१७७८) इत्यादींचे या संबंधीचे कार्य उल्लेखनीय आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate