অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बँक्रॉफ्ट, जॉर्ज

बँक्रॉफ्ट, जॉर्ज

बँक्रॉफ्ट जॉर्ज

(३ ऑक्टोबर १८००–१७ जानेवारी १८९१). अमेरिकन इतिहासकार व मुत्सद्दी. वुस्टर (मॅसॅच्यूसेट्स) येथे जन्म. त्याचे वडील कॅथलिक पाद्री होते. हार्व्हर्ड विद्यापीठाची पदवी संपादन केल्यानंतर (१८१७) र्जार्जने जर्मनीतील गटिंगेन (बर्लिन) व हायडलबर्ग या विद्यापीठांत अध्ययन करून पीएच्.डी.

ही पदवी मिळविली आणि १८२२ साली तो अमेरिकेला परतला. हार्व्हर्ड विद्यापीठात अल्पकाळ अध्यापन करून त्याने जोझेफ ग्रीन कॉग्झवेलच्या मदतीने जर्मनीतील जिम्‍नेझिअमच्या धर्तीवर वर्गशिस्तीचा जाच नसलेली व प्रत्येक विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वास बाब देणारी एक प्रायोगिक शाळा‘राऊंड हिल स्कूल’च्या रूपाने नॉरदॅभ्प्टन येथे स्थापन केली. या शाळेत त्याने १८३० पर्यंत काम केले.

या काळातच तो इतिहासलेखनाकडे वळला व त्याच्या राजकीय जीवनास आरंभ झाला. मॅसॅच्यूसेट्ससारख्या काहींशा प्रतिगामी विचारांच्या वसाहतीत गुलामगिरीविरुद्ध भूमिका घेऊन त्याने टॉमस जेफर्सन, अँड्रू जॅक्सन व अब्राहम लिंकन यांच्या विचारप्रणालींचा पुरस्कार केला. प्रारंभी त्याने जर्मन तत्त्वज्ञान व साहित्य यांविषयी वाचन व लेखनही केले. तो नॉर्थ अमेरिकन रिव्ह्यू या नियतकालिकातून स्फुट लेखन करीत असे त्याच्या ए हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेटस फ्रॉम द डिस्कव्हरी ऑफ द कॉन्टिनेन्ट या इतिहासग्रंथाचा पहिला खंड १८३४ मध्ये प्रकाशित झाला.

अँड्रू जॅक्सन व मार्टिन व्हॅन ब्यूरेन या डेमॉक्रटिक पक्षाच्या उमेदवारांचा त्याने प्रचार केला. त्या पक्षाचा प्रभावी वक्ता व प्रवक्ता म्हणून तो ओळखला जाऊ लागला. पुढे १८३७ साली बॉस्टन बंदराचा अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती झाली. १८४५ साली नौदलाचेही सचिवपद त्याच्याकडे आले. या पदावर असताना त्याने अनॅपलिस येथे अमेरिकन नौसेनेची अकादमी स्थापन केली. त्यांनतर त्याला इंग्‍लंडला मंत्री म्हणून पाठविण्यात आले (१८४६–४९).

त्या वेळी त्याने पुराभिलेखांतील ऐतिहासिक साधनसामग्री जमविली. तत्पूर्वी मेक्सिकन युद्धाच्या वेळी काही दिवस त्याने बदली युद्धमंत्री म्हणून काम पाहिले होते (मे १८४५). नौसेनेतील कार्यामुळे यादवी युद्धाच्या पूर्वी व युद्धकाळात त्याने गुलामांच्या प्रश्नास सहानुभूती दर्शविली आणि उत्तर अमेरिकेतील वसाहतींची बाजू घेतली. पुढे अध्यक्ष अँड्रू जॉन्सन (कार. १८६५–६९) या रिपब्‍लिकन पक्षाच्या अध्यक्षास पाठिंबा दिला. तसेच त्याच्या विचारांवर विस्तृत लेखन केले. जॉन्सनने त्यास प्रशियातील मंत्रिपद दिले (१८६७). फ्रँको-प्रशियन युद्धातही त्याने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पुढे १८७४ पर्यंत तो जर्मनीत मंत्री होता. तत्त्त्वज्ञ, इतिहासकार आणि प्रिन्स बिस्मार्कसारख्या मुत्सद्यांचा जर्मनीत त्याला सहवास लाभला.

अमेरिकेत परतल्यानंतर (१८७४) वॉशिंग्टन येथे तो स्थायिक झाला व त्याने आपले उर्वरित आयुष्य इतिहास-संशोधन-लेखनात व्यतीत केले. हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स फ्रॉम द डिस्कव्हरी ऑफ द कॉन्टिनेन्ट (१० खंड– १८३४–७४) या बृहत्ग्रंथात त्याने अमेरिकेन वसाहतींच्या स्थापनेपासून १८८२ पर्यंतचा इतिहास निवेदन केला आहे. या बृहत्ग्रंथाची सुधारित आवृत्ती १८७६ साली ६ खंडांत प्रकाशित झाली. त्याचा दुसरा ग्रंथ ए हिस्टरी ऑफ द फॉर्मेशन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन (२ खंड–१८८२). या पुस्तकात त्याची लोकशाहीवरील निष्ठा व गुलमगिरीविरोधी दृष्टिकोण स्पष्ट दिसतात. लिटररी अँड हिस्टॉरिकल मिसलनीज या शीर्षकाच्या ग्रंथात त्याचे स्फुटलेख प्रसिद्ध झाले (१८५५).

मूळ साधनांचा तौलनिक अभ्यास करून यूरोपातील अभिलेखागारांतील तत्कालीन कागदपत्रांचा आवश्यक तेवढा उपयोग करून अमेरिकेचा समग्र इतिहास लिहिणारा बँक्रॉफ्ट हा पहिला अमेरिकन इतिहासकार होय. आपल्या स्वतंत्र इतिहासाबद्दलची अमेरिकन समाजाची आकांक्षा पूर्ण करणारा इतिहास बँक्रॉफ्टने साधार व विस्तृतपणे पहिल्यांदाच लिहिला. अमेरिका म्हणजे मानवी संस्कृतीचे ईश्वराला अभिप्रेत असलेले ध्येय गाठणारे राष्ट्र, अशीच बँक्रॉफ्टची धारणा होती.

त्याच्या इतिहासलेखनावर नंतरच्या इतिहासकारांनी टीका केली–विशेषतः आत्यंतिक राष्ट्रवाद, वस्तुनिष्ठतेचा अभाव आणि ऐतिहासिक प्रश्नांतील गुंतागुंतीचे अज्ञान यांसारखे दोष तसेच राजकीय आणि सैनिकी घटनांवर त्याने दिलेला अवास्तव भर इ. गोष्टी टीकापात्र ठरल्या. या मर्यादांचे मूळ बँक्रॉफ्टच्या वेळच्या ऐतिहासिक परिस्थितीतच होते, असे म्हणावे लागते. अमेरिकन इतिहासाला वसाहतींच्या इतिहासाच्या संकुचित चौकटीतून बाहेर काढून जागतिक इतिहासक्षेत्रात एका स्वतंत्र राष्ट्राचा इतिहास म्हणून स्थान प्राप्त करून देण्यास बँक्रॉफ्टचेच इतिहासलेखन कारणीभूत ठरले.

म्हणून त्यास अनेकदा ‘अमेरिकन इतिहासाचा जनक’ म्हटले जाते. मानवजातीने परिपूर्ण राज्यसंस्था निर्माण केलेली नाही; तथापि अमेरिकेन राजकीय-सामाजिक व्यवस्था व पद्धती ही श्रेष्ठ आहे, असा त्याचा दावा होता. गटिंगेन विचारप्रणालीचा विशेषतः जर्मन इतिहासकार ⇨ अर्नंल्ड हीरन (१७६०–१८४२) याच्या लेखनाचा अमेरिकेच्या आधुनिक इतिहासलेखनपद्धतीवर खोलवर ठसा उमटलेला दिसतो. याच विचारप्रणालीचा पुरस्कार बँक्रॉफ्टने केला. अमेरिकेचे संयुक्त संस्थाने या राष्ट्राच्या प्रारंभीच्या इतिहासावर दहा खंडांत लेखन करणारा खंदा लेखक या नात्याने बँक्रॉफ्टचा लौकिक अजूनही कायम आहे. हीरनच्या अनेक पुस्तकांचे त्याने इंग्रजी भाषांतरही केले आहे. तो वॉशिंग्टन येथे निधन पावला.


संदर्भ 1. Canary, R. H. George Bancroft, London, 1974.

2. De Wolfe-Howe, M. A. . Life and Letters of George Bancroft, 2 Vols., New York, 1971.

3. Nye, R. B. George Bancroft: Brahmin Rebel, New York, 1964.

शेख, रुक्साना

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate