অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बर्निअर, फ्रान्स्वा

बर्निअर, फ्रान्स्वा

बर्निअर, फ्रान्स्वा

(२५ सप्टेंबर १६२०-२२ सप्टेंबर १६८८). मोगल काळातील भारतात आलेला एक फ्रेंच प्रवासी. पश्चिम फ्रान्समधील अँजू प्रांतातील झ्वे या गावी शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्याच्या खासगी जीवनाविषयी फारशी माहिती ज्ञात नाहीतथापि अविवाहित राहून बरेचसे एकाकी जीवन त्याने कंठले. प्येअर गासँदी (१५९२-१६५७) या फ्रेंच तत्त्ववेत्त्याच्या मार्गदर्शनाखाली शारीरक्रियाविज्ञानाची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून एम्.डी.

ही पदवी संपादन केली (१६५२) व नंतर त्याच वर्षी तो पॅरिसला गेला. त्याने १६५४ मध्ये पॅलेस्टाइन व सिरिया या देशांना भेटी दिल्या. नंतर तो ईजिप्तला गेला (१६५६-५८). तेथे त्याला प्लेगच्या आजाराने पछाडलेकैरोक एक वर्ष राहून तो भारतात सुरत येथे आला (१६५८). भारतात तो जवळजवळ बारा वर्षे होता.

तो भारतात आला त्या वेळी शाहजहानच्या मुलांत दिल्लीच्या तख्तासंबंधी संघर्ष सुरू झालेला होता. बर्निअर व दारा शुकोव्ह यांची गाठ अहमदाबादजवळ पडली आणि दाराने त्याला आपला वैद्य म्हणून येण्याचा आग्रह केला, पण औरंगजेबाच्या सैन्याचा पाठलाग चुकविण्यासाठी दाराला सिंधकडे जावे लागले.

दरम्यान औरंगजेब व दारा यांच्यात अजमेरजवळील देवराई येथे युद्ध झाले (१६५९) आणि दाराला पकडण्यात येऊन फाशी देण्यात आले. यानंतर बर्निअर औरंगजेबाच्या दरबारात सु. आठ वर्षे राजवैद्य म्हणून राहिला.  या काळात ताव्हेर्न्ये व शार्दिन या दोन फ्रेंच प्रवाशांशी त्याचा परिचय झाला. आं ताव्हेर्न्येबरोबर तर त्याने बंगालचा प्रवास केला.

राजदरबारच्या कामात व रीतिरिवाजात तो तरबेज होता. भारतातील वास्तव्यात त्याने दिल्ली, आग्रा, काश्मीर (भीग्वाड), बंगाल, अलाहाबाद, लाहोर, मच्छलीपटनम्, गोवळकोंडा इ. बहुतेक प्रसिद्ध स्थळांना भेटी दिल्या. सुरतहून तो १६६८ मध्ये मायदेशी परतण्यासाठी शीराझला (इराण) गेला व मार्सेहून पॅरिसला पोहोचला असावा.

प्रवासात त्याने आपल्या भारतातील प्रवासवृत्ताची सर्व तयारी केली आणि फ्रान्सच्या राजाकडे छपाईची परवानगी मागितली (१६७०). २५ एप्रिल १६७० रोजी त्यास परवानगी मिळाली. त्याचवर्षी त्याने १३ ऑगस्ट रोजी ते प्रकाशित केले. पुढे तो पॅरिस येथेच स्थायिक झाला. मध्यंतरी त्याने इंग्लंडची एक सफर केली होती (१६८५). तो पॅरिस येथे मस्तिष्काघाताने मरण पावला.

बर्निअरच्या प्रवासवर्णनावरून तसेच त्याने लिहिलेल्या पत्रांवरून शाहजहानची अखेरची वर्षे व औरंगजेबाची प्रारंभीची कारकीर्द यांविषयी विश्वसनीय अशी सर्वांगीण माहिती मिळते. त्यामुळे औरंगजेबाच्या प्रारंभीच्या कटू कारस्थानावर बराच प्रकाश पडतो. शिवाजी महाराजांच्या सुरत-लुटीविषयी तसेच शायिस्तेखानावरील हल्ला व आग्र्याहून सुटका यांसंबंधी बर्निअर उल्लेख करतो. बर्निअरची लेखनशैली साधी पण प्रभावी आहे.

त्याच्या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर ट्रॅव्हल्स इन द मोगल एम्पायर(१८९१) या नावाने झाले. यांशिवाय तत्कालीन विचारवंतांत तो मुक्त तत्त्ववेत्ता म्हणून प्रसिद्ध होता. त्याने तत्तवज्ञानावर दोन ग्रंथ लिहिले आहेत. मोगलकाळातील एक असाधारण ऐतिहासिक साधन म्हणून त्याच्या प्रवासवृत्ताचे महत्व वादातीत आहे.

 

संदर्भ : Bernier, Francois; Trans, Constable, Archibald, The Travels in the Mogul Empire, A. D. 1656-1668, New Delhi, 1968.

शेख, रुक्साना

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate