অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बॅक्ट्रिया

बॅक्ट्रिया

बॅक्ट्रिया

मध्य आशियातील एक प्राचीन राज्य. राजधानी बॅक्ट्रा, विद्यमान ⇨ बाल्ख. उत्तर अफगाणिस्तानातील हिंदुकुश पर्वतरांगा (पॅरपमाइसस) आणि अमुदर्या (ऑक्सस) नदीच्या मध्यभागी ते वसले होते. इ. स. पू. ६०० ते इ.स. ६०० दरम्यान पूर्व पश्चिम व्यापार आणि राजकीय घडामोडी यांमुळे बॅक्ट्रियास ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले.

इ. स. पू. पंधराव्या शतकात येथे आर्य टोळ्यांनी वस्ती केली होती.

त्यांनी या प्रदेशाला बख्‌दी हे नाव दिले. ⇨ सायरस द ग्रेटयाने हा प्रदेश जिंकून अ‍ॅकिमेनिडी साम्राज्यात समाविष्ट केला (इ. स. पू. ५४९). त्यानंतर सु.२०० वर्षे या भूभागावर अ‍ॅकिमेनिडींचे राज्य होते व येथील प्रशासनव्यवस्था इराणी क्षत्रपांकडे असे. ⇨ अलेक्झांडर द ग्रेट (इ.स. पू. ३५६–३२३) याने इराणी सम्राट तिसरा डरायस याचा पराभव केला.

बॅक्ट्रियन क्षत्रप बेसस याने पराभूत डरायस बॅक्ट्रिया येथे आश्रयास आला असताना त्याचा खून केला व अलेक्झांडरला विरोध केला; पण अलेक्झांडरने त्याचा पराभव करून इ. स. पू. ३२८ मध्ये हा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. इ.स. पू. २५६ मध्ये पहिला डायॉडोटस याची येथे क्षपत्र म्हणून नेमणूक झाली. आपल्या उत्तर कारकीर्दीत त्याने बॅक्ट्रियाला जवळजवळ एक स्वतंत्र राज्य म्हणून प्रभावशाली बनविले.

त्यानंतरच्या यूथिडीमस आणि त्याचा मुलगा डीमीट्रिअस यांच्या कारकीर्दीत राज्यविस्तार झाला इ.स. पू. १६७ मध्ये सिल्युसिडी सम्राट चौथा अँटायओकस याने युक्रेटिडीस यास बॅक्ट्रियात पाठविले. त्याने डीमीट्रिअसचा शेवट केला; पण इ. स. पू. १५९ मध्ये त्याची हत्या करण्यात आली. त्यानंतर डीमीट्रिअसचा सेनापती मीनांदर या प्रदेशाचा त्याच्या मृत्यूपर्यंत (इ.स. पू. १४५) सर्वसत्ताधारी होता. या सर्व काळात ग्रीक संस्कृतीचा फार मोठा ठसा या प्रदेशावर उमटला.

इ. स. पू. दुसऱ्या शतकाच्या अखेरीस यू-एची टोळ्यांनी या प्रदेशावर आक्रमणे करून हा प्रदेश पादाक्रांत केला. इसवी सनाच्या पहिल्या शतकात पूर्व इराण व पश्चिम भारत यांवर इंडो-सिथियन साम्राज्य पसरले. यातील प्रमुख कुशाण घराण्यातील राजा ⇨कनिष्क याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा प्रसार केला. त्याच्या साम्राज्यात बॅक्ट्रिया होता. कुशानांच्या ऱ्हासानंतर गुप्त साम्राज्याखाली तो प्रदेश आला; पण गुप्तकाळाच्या अखेरीस हूणांची आक्रमणे होऊन त्यांनी बॅक्ट्रिया घेतला. त्यांची सॅसॅनियन वंशाच्या राजांबरोबर सु. २०० वर्षे युद्धे चालू होती. इ.स. ५६५ मध्ये तुर्कांनी हूण टोळ्यांचा बंदोबस्त केला. पुढे अरबांचे सातव्या शतकात आक्रमण होईपर्यंत हा प्रदेश तुर्कांकडे होता.

बॅक्ट्रा शहरात अनेक वास्तू व राजवाडे बांधण्यात आले. विविध काळात विविध धर्म व संस्कृती येथे नांदल्या. येथील अवशेषांत अभिजात ग्रीक तसेच कुशाणकालीन कलांचे नमुने आढळले असून येथील चांदीच्या नाण्यांवरील व्यक्तिरेखा आणि त्यांची घडण अप्रतिम आहे. यांशिवाय येथील काही स्त्री मूर्ती, हस्तिदंती शृंगाकार पेले व स्तंभरचना उल्लेखनीय आहेत.


संदर्भ : Tarn, William, The Greeks in Bactria and India, Cambridge, 1966.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate