অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

बॅबिलोनिया

बॅबिलोनिया

प्राचीन मेसोपोटोतील (आधुनिक इराक) टायग्रिस व युफ्रेटीस यांच्या दुआबाचा दक्षिण भाग बॅबिलेनिया या नावाने ओळखला जातो. दक्षिणेस इराणचे आखात, पश्चिमेस युफ्रेटिसचे विस्तीर्ण पात्र व पूर्वेस टायग्रिसचे पात्र या तीन नैसर्गिक सीमा. उत्तरेकडे मात्र अशी निश्चित नैसर्गिक सीमा नाही; परंतु सामान्यपणे दुआबाच्या मध्याला ही सीमा येते. टायग्रिस पश्चिमेला व युफ्रेटीस पूर्वेला वळून एका ठिकाणी फारच जवळ येतात आणि पुन्हा उलट दिशांना वाहू लागतात. येथे जमिनीची जी चिंचोळी पट्टी निर्माण होते, तिच्या मध्यावर उत्तरेस ॲसिरिया व दक्षिणेस बॅबिलोनिया अशी विभागणी होते. नैसर्गिक सीमारेषा असल्या, तरी त्यांमुळे बॅबिलोनिया परकीय आक्रमणांपासून बचावला नाही. बॅबिलोनियाच्या इतिहासामध्ये अनेक वेगवेगळ्या टोळ्या व जमाती येऊन स्थायिक झाल्याचा आणि आपापली सत्ता स्थापन करीत असल्याचा देखावा दिसतो. दरसाल या दोन नद्यांना येणाऱ्या पुराबरोबर वाहत आलेल्या गाळामुळे हा सर्व प्रदेश अत्यंत सुपीक झालेला होता. पुराचे पाणी सर्वत्र पोहोचविण्यासाठी प्राचीन काळी कालव्यांचे फार मोठे जाळे अस्तित्त्वात होते. या प्रदेशाचा दक्षिण भाग म्हणजे प्राचीन सुमेरियाची भूमी. ही बव्हंशी या नद्यांच्या गाळाने इराणी आखाताचा समुद्र मागे हटवून तयार झाली आहे, असा आतापर्यंत समज होता; तथापि अलीकडे काही भूस्तरशास्त्रज्ञ असे सांगतात, की टायग्रिस-युफ्रेटीस खोरे हलकेहलके खचत असल्याचे दरसाल गाळाचे थर येऊन बसले, तरी जमिनीची उंची वाढून समुद्र मागे हटण्याची शक्यता नाही.

हे कसेही असले, तरी सबंध प्रदेश सपाट व सखल असून कोठेही डोंगरदऱ्या नाहीत.

मानवी समाज

या भूप्रदेशात अश्मयुगीन माणसाचे अवशेष क्वचितच मिळतात परंतु साधारणपणे सहा ते सात हजार वर्षांपूर्वीपासूनच्या म्हणजे इ. स. पू. ४५०० च्या आसपासच्या मानवी वसाहतींचा पुरावा मिळतो. आरंभी केवळ शिकारीमागे धावणाऱ्या आणि सतत भ्रमंती करणाऱ्या टोळ्या त्या सुमारास अर्थोत्पादनाच्या नव्या विद्या शिकल्या आणि शेतकी व मेंढपाळी हे व्यवसाय पतकरून एका जागी स्थायिक झाल्या.

या स्थिरपद समाजांनी भोवतालच्या परिस्थितीचा कमीजास्त प्रमाणात उपयोग करून जीवन जास्त सुरक्षित व सुखावह केले. एरिडू, ऊकरू, अर, बॅबिलन, निप्पुर इ. मोठी नगरे वसविली. त्यांनी अर्थोत्पादनाच्या साधनांत व संघटनेत प्रगती केली. या सांस्कृतिक संक्रमणाच्या अवस्थांना एकेका गावाचे नाव देण्यात आले. हे समाज नवाश्मयुगीन होते. धातूंचा वापर अत्यंत मर्यादित प्रमाणात होता; मात्र हा समाज सुसंघटित असून त्याची राज्यसत्ताही निर्माण झाली होती.

व्यापार विस्तृत क्षेत्रात पसरला होता. या दोन्हीला आवश्यक अशी लेखनकला सिद्ध करण्यात आली होती. ही प्रचंड झेप घेणारा समाज सुमेरियन होता. इ. स. पू. ३५०० ते इ. स. पू. २००० या काळात बॅबिलोनिसाच्या नैर्ऋत्य भागात सुमेरियाची व अकेडियन संस्कृतीच्या संगमातून बॅबिलोनियन संस्कृती निर्माण झाली, असे सांगतात. इ. स. पू. २००० किंवा त्याच्या आगेमागे अरच्या तिसऱ्या राजघराण्याचा शेवट झाला व याच वेळी सुमेरियन संस्कृतीचाही निदान राजकीय क्षेत्रात तरी अस्त झाला.

कालक्रमपट

एरिडू, नवाश्मयुगीन समाज

इ. स. पू. ४००० च्या आधी

हाजी महंमद, ‘उबाइड’ काळ

’’ ४०००–३५००

‘उरूक’ काळ (लेखनकलेचा आरंभ) यालाच नवसाक्षर काळ असेही म्हणतात.

’’ ३५००–३०००

‘जमटेड नस्त्र’ किंवा ‘उत्तर साक्षर' काळ

’’ ३०००–२८००

पूर्व राजवंश आरंभ काळ

’’ २८००–२४००

पूर्व राजवंश समाप्त काळ

’’ २४००–२३७०

सारगॉन

’’ २३७१–२३१६

‘अर’ च्या तिसऱ्या राजघराण्याच्या अस्तापर्यंतचा काळ

’’ २३१६–२०२०

इसिनचे पहिले राज्य

’’ २०२०–१८००

लार्साचे राज्य

’’ १८००–१७६०

दक्षिण बॅबिलोनियातील सागरी घराण्याची सत्ता, ॲमोराइट सत्तेचा अंत आणि कॅसाइट राजसत्तेची स्थापना

’’ १७६०–१५९०

कॅसाइट राजसत्तेचा काळ

’’ १५९५–११७५

इसिनचे दुसरे राज्य

’’ ११७०–१०४०

मेरेडॉक बॅलडॅन

’’ ७२१–७१०

ॲसिरियन सत्तेची बॅबिलनमध्ये स्थापना

’’ ७११–६२६

नव-बॅबिलोनियन किंवा खाल्डियन राजसत्तेचा काळ

’’ ६२६–५३९

इतिहासाची साधने

लेखनविद्या सुमेरियाकडून आलेली असली, तरी बॅबिलोनियन भाषा निराळी असल्याने तिला अनुसरून सुमेरियन लिपीत फेरफार करण्यात आले. लेखनपद्धती पूर्वीचीच म्हणजे मृण्वटिकांवर बोरूने लिहिण्याची चालू राहिली. ओल्या मातीच्या त्रिकोणाकृती, चौकोनी व शंक्वाकार वटिकांवर बोरूने टोचून लेख उमटविण्यात येत. एरवी बारक्या पातळ तुकड्यांवर लिहीत व मग हे तुकडे वा ठोकळे भाजून काढण्यात येत. अशा तऱ्हेने इष्टिकालेख पक्के होत. पातळ तुकड्यांना येथे मृण्पत्र असे नाव दिले आहे. अशा अनेक मृण्पत्रांची वा इष्टिकालेखांची ग्रंथालये बॅबिलोनियातील जवळजवळ प्रत्येक शहरात सापडली असून त्यांपैकी अर, ऊरूक, कीश व बॅबिलन येथे व्यापारी, शासनविषयक, वाङ्मयीन व शास्त्रीय पत्रेही सापडलेली आहेत. दगड उपलब्ध नसल्याने शिलालेखांची पद्धती नव्हती, तशी ईजिप्शियन पपायरसांची भेंडोळीही इकडे आली नाहीत.

शेवटपर्यंत फक्त मृण्पत्रांचाच वापर झाला. खुद्द बॅबिलोनियाखेरीज त्याच्याशी संबंध असणाऱ्या ईजिप्त, ॲसिरिया, हिटाइट, मारी, इराण येथील प्राचीन लेखांतून बॅबिलोनियाविषयक माहिती मिळते. या परकी ठिकाणांपैकी चार शहरांचा उल्लेख करावयास पाहिजे : ईजिप्तमधील टेल-एल् अमार्ना पत्रसंग्रह, बोगाझकाई येथील मृण्पत्रसंग्रह तसेच निनेव्ह आणि पॅलेसाटाइनमधील रास शॅमरा येथील मृण्पत्रसंग्रह व दप्तरे. या सर्वांतून तत्कालीन आंतरराष्ट्रीय परिस्थितीवर चांगला प्रकाश पडतो. ही अस्सल साधने झाली. शिवाय ओल्डटेस्टामेंटबायबल या दोन ग्रंथातून बॅबिलोनियाविषयक माहिती मिळते. विशेषतः इ. स. पू. १००० नंतरच्या घटनांची व जेथे ज्यू लोकांचा संबंध आला त्या भागाविषयी ही महत्त्वाची ठरतात.

इ. स. पू. तिसऱ्या शतकामध्ये प्रथम अँटायओकस याच्या आज्ञेने बेरॉसस नावाच्या बेल देवतेच्या पुजाऱ्याने बॅबिलोनियाची एक बखर लिहून ठेवली. ग्रीक भाषेतील या इतिहासात मुख्यत्वे नव-बॅबिलोनियन म्हणजे खाल्डियन सत्तेचीच अत्यंत तपशीलवार माहिती देण्यात असली, तरी त्यापूर्वीच्या काळाविषयी त्यात बराच मजकूर आढळतो. सध्या बेरॉससचा मूळ ग्रंथ उपलब्ध नाही. मात्र त्याच्यानंतर आलेल्या काही बखरकारांनी त्याच्या ग्रंथातील उतारे आपल्या पुस्तकांतून उद्‍घृत केले आहेत व हे दुय्यम ग्रंथ उपलब्ध आहेत.

जोसेफस आणि युसीबिअस यांच्या पुस्तकांतून असे सविस्तर उतारे पहावयास सापडतात व त्यांवरून बेरॉससच्या मुख्य कल्पना समजू शकतात. इतर देशांतील म्हणजे सुमेरिया किंवा ईजिप्त येथील प्राचीन बखरींप्रमाणे येथेही कालगणना अत्यंत अवास्तव आहे; परंतु बखरीत निर्देशिलेले अनेक राजे व राजघराणी यांना स्वतंत्र पुराव्याचा आधार मिळतो. ईजिप्तच्या इतिहासरचनेत जसे मॅनेथोच्या बखरीचे, तसे बॅबिलोनियाच्या इतिहासात बेरॉससच्या बखरीचे महत्त्व आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate