অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मनुची, निकोलाव

मनुची, निकोलाव

मनुची, निकोलाव

(१६३९-१७१७). सतराव्या शतकात भारतात आलेला एक इटालियन प्रवासी. त्याच्या पूर्व आयुष्याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. तो मूळचा व्हेनिसचा रहिवासी असावा. वयाच्या चौदाव्या वर्षी घरातून परागंदा होऊन तो लॉर्ड बेलोमाँट या इंग्रज सरदाराबरोबर तुर्कस्थान, इराणमधून १६५६ साली भारतात सुरत या ठिकाणी आला. नंतर त्याने मोगल बादशाह शाहजहान याचा मोठा मुलगा दारा शुकोव्ह याच्या तोफखान्यात नोकरी धरली. औरंगजेब व शाह आलम यांच्या पदरीही त्याने काही काळ नोकरी केली. या काळात शिपाईगिरी, वैद्यकीय व्यवसाय व राजनैतिक शिष्टाई इ. विविध प्रकारची त्याने कामे केली .पुढे मोगलांच्या युध्दमोहिमांबरोबर तो दक्षिण हिंदुस्थान, राजस्थान, दक्षिण हैदराबाद इ. प्रदेशात गेला. अशा एका मोहिमेत इ.स. १६६५ मध्ये पुरंदर किल्ल्याच्या परिसरात मिर्झाराजा जयसिंहबरोबर तो असताना जयसिंहच्या छावणीत त्याची शिवाजी महाराजांशी भेट झाली होती. त्याला फार्सी व उर्दू भाषांचे तसेच मोगल दरबारातील रीतिरिवाजांचे चांगले ज्ञान होते. भारतातील पोर्तुगीजांच्या वतीने त्याने छत्रपती संभाजीमहाराज व शाह आलम यांकडे शिष्टाई केली होती.

उच्च शिक्षणाचा अभाव असूनही मर्यादित वैद्यकीय ज्ञानावर त्याने वैद्यकीय व्यवसाय सुरू करून अंगाच्या हुशारीने त्यात चांगले यश मिळविले व द्रव्यसंचयही केला. या व्यवसायामुळे त्याचा देशभर संचार झाला. औरंगजेबाच्या दक्षिणेतील स्वारीच्या वेळी मोगलांच्या कारवायांनकंटाळून तो मद्रास येथे स्थायिक झाला. या सुमारास एलिझाबेथ क्लार्क या विधवेशी त्याने विवाह केला (२८ ऑक्टोबर १६८६) त्यांना एक मुलगा झाला. पण तो अल्पायुषी ठरला. त्याची पत्नी १७०६ मध्ये वारली. तेव्हा त्याने आपले वास्तव्य पाँडिचेरीत हलविले, पण अखेरच्या दिवसांत तो पुन्हा मद्रासला आला असावा. कारण मद्रासच्या गव्हर्नरने टॉमस क्लार्कची सर्व संपत्ती त्यास देऊन त्याचा सन्मान केला (१४ जानेवारी १७१२). त्यानंतर तो अखेपर्यत तिथेच असावा.

मद्रासमधील वास्तव्यात (१६८६-१७०६) त्याने आपल्या बहुविध आठवणी फ्रेंच व पोर्तुगीज भाषांत लिहून काढल्या आणि चार विभागांत प्रसिध्द करण्यासाठी त्या पॅरिसला पाठविल्या. या आठवणीत त्याने शिवाजीसह तत्कालीन प्रसिध्द राज्यकर्ते .सेनानी यांची अस्सल प्रसंगचित्रे काढून घेतली होती. त्याला औरंगजेब, पोर्तुगीज आणि जेझुइट यांच्याबद्दल तिटकारा होता. भारतातील शहरी वैभव व ग्रामीण दारिद्र्य यांचे त्याने उत्तम चित्रण केले आहे.

धार्मिक बाबीविषयी तो पाल्हाळिक असून वास्तव व काल्पनिकांचे मिश्रण त्याच्या लेखनात आढळते. काही अपवाद वगळता त्याच्या ग्रंथातील स्थल-कालाचे तपशील आणि विधाने ऐतिहासिक दृष्ट्या सामान्यतः विश्वसनीय वाटतात. त्याच्या आठवणींचे पहिले इंग्रजी भाषांतर विल्यम आयर्विन याने स्तोरिआ दो मोगोर या नावाने १९०७ मध्ये प्रकाशित केले. त्याची दुसरी आवृत्ती १९८१ मध्ये प्रसिध्द झाली. मराठीत असे होते मोगल या शीर्षकाने ज.स. चौंबळ यांनी त्याचे भाषांतर केले आहे (१९७४) मोगल काळ आणि मराठ्यांचा इतिहास यांची माहिती देणारा एक उपयुक्त साधनग्रंथ म्हणून मनुचीच्या या आठवणीस आगळे महत्व प्राप्त झाले.


भोसले, अरूण

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate