অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मसूदी, अल्

मसूदी, अल्

मसूदीअल्

(?-? ऑक्टोबर ९५६) अरब इतिहासकार, भूगोलज्ञ व तत्त्वज्ञ. पूर्ण नाव अबू-अल्-हसन-अली-इब्न हुसेन-अल्-मसूदी. जन्म बगदाद येथे. अरबी हीरॉडोटस म्हणून त्याला संबोधण्यात येते. त्याने अनेक देशांना भेटी दिल्या आणि अनेक किलोमीटरचा प्रवास केला. पारंपारिक मुस्लिम पद्धतीने शिक्षण घेऊन तो ९१५-१६ मध्ये बसरा आणि पर्सेपलिस येथे गेला. नंतर तो भारतात आला. त्याने त्या वेळचे मुंबई बेट, खंबायतचे आखात, मुल्तान, सिंध वगैरे प्रदेशांत भ्रमंती केली आणि तो श्रीलंका, चीनपर्यंत गेला. पुढे ९१७ मध्ये तो झांझिबार व ओमान आणि नंतर ९२२ मध्ये अलेप्पो या ठिकाणी पोहोचला. याशिवाय इराण-इराक-यमेन या प्रदेशांनाही त्याने भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो तो ईजिप्त मधील अल्-फुस्टॅट या ठिकाणी आला (९४२) व अखेरपर्यंत तेथेच राहिला.

त्याच्या प्रवास-वृत्तांतात त्याने निश्चितपणे किती देशांना व शहरांना भेटी दिल्या, यांबाबत काटेकोर माहिती नाही आणि त्याविषयी इतिहासतज्ञांतही मतभेद आहेत; तथापि या प्रदीर्घ प्रवासात त्याने विविध देशांतील चालीरीती, समाजजीवन व तेथील परिस्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले आणि मिळालेल्या बहुविध अनुभवांची नोंद केली. हा दूरवरचा प्रवास करण्यामागे त्याचा नेमका काय हेतू होता आणि त्याने या प्रवासाला अर्थार्जन कसे मिळविले, हे अद्यापि ज्ञात नाही. काहींच्या मते मसूदी इस्माइली पंथाच्या प्रचारार्थ भटकत असावा; करण त्याच्या लेखनात शिया पंथाविषयाची आदर व आसक्ती स्पष्टपणे व्यक्त होते; तर काहींच्या मते इस्माइली पंथापेक्षा इमामांबद्दल त्याला अधिक आदर असावा.

त्याने संग्रहीत केलेली माहिती, निरीक्षणात्मक टिपणे आणि विविध व्यक्तींशी झालेले संवाद यांचा वृत्तांत त्याच्या लेखनात स्पष्टपणे आलेला आहे. इस्लाम धर्म चालीरीती यांविषयीचे त्याचे विचार वैशिष्ट्यपूर्ण, महत्त्वाचे व मान्यवर आहेत.

त्याने एकूण तीस ग्रंथ लिहिल्याचा उल्लेख मिळतो; पण प्रत्याक्ष दोनच ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याने किताब अखबार अल्-इमन या शीर्षकाने जगाचा तीस खंडात्मक इतिहास लिहिला होता; परंतु त्यातील फारच थोडा भाग आज उपलब्ध आहे. मेडोज ऑफ गोल्ड अँड माइन्स ऑफ जेम्स (दोन खंड, इं. भा. १८४१) हा भाषांतरित सर्वसंग्राहक बृहद्ग्रंथ प्रसिद्ध असून त्यातील पहिल्या खंडात इस्लामपूर्व काळाचा मसूदीने आढावा घेऊन जगाची उत्पत्ती, उत्क्रांतिवाद व ऐतिहासिक घडामोडी तसेच वांशिक उलथापालथ यांची चर्चा केला आहे. याशिवाय उपलब्ध व कालगणना यांचाही त्यात विचार आहे.

दुसऱ्या खंडात त्याने इस्लाम धर्माचा इतिहास सांगून मुस्लिम जगताबाहेरील धार्मिक संकेतांची मीमांसा केली आहे. त्याचा प्रसिद्धग्रंथ मरुज अल्-धहब घस-मअदिन अल् जवाहर. याचे संपादन व फ्रेंच भाषांतर सी.ए. बर्निअर, दी मेनार इत्यादींनी नऊ खंडात केले (१८६१-७८). त्याच्या अरबी आवृत्याही ईजिप्तमध्ये प्रसुत झाल्या आहेत. त्याचा दुसरा ग्रंथ किताबअल्-तनविह व अल् अश्राफ (इं. भा. बुक ऑफ नोटिफिकेशन ॲण्ड रिव्ह्यू) हा त्याने मृत्यूपूर्वी आपल्या सर्व लेखनाचा संक्षिप्त आढावा घेण्याच्या दृष्टीने लिहिला. त्यात त्याने उद्‌धृत केलेली इमामांची संख्या व अनुक्रम मात्र अनिश्चित आहे.

त्याची सर्व क्षेत्रांतील सर्वसंग्राहक बहुश्रुतता त्याच्या लेखनावरून जाणवते. त्याला इतिहास, धर्म, कला, तत्त्वज्ञान, नीतिशास्त्र,राजकारण, अर्थशास्त्र इ. विषयांत रस होता. त्याची मांडणी पूर्वसूरीपेक्षा भिन्न होती. त्याने ऐतिहासिक घटनांची जंत्री न देता त्या घटनांच्या मागील पार्श्वभूमी स्पष्ट केली असून त्यानुसार अर्थबोधन केले आहे. म्हणून त्यास इतिहासलेखन पद्धतीचे श्रेय देण्यात येते. या बाबतीत इब्न खल्दून आणि इतर थोर इतिहासकारांनी त्याचे पुढे अनुकरण केलेले आढळते.

मसूदी कैरोजवळ अल्-फुस्टॅट या ठिकाणी निधन पावला.

 

संदर्भ : 1. Hitti. P. K. History of the Arabs, London, 1961.

2. Nicholson, R. A. Literary History of the Arabs,Cambridge, 1930.

शेख, रुक्साना

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate