অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मूर

मूर

मूर

भूमध्य समुद्राच्या परिसरातील एक कॉकेशियन मानवजात. वायव्य आफ्रिकेतील लोकांना रोमन लोक मॉरी व प्रांताला मॉरिटेनिया म्हणत. त्यावरून पुढे मूर हे नाव रूढ झाले. वायव्य आफ्रिकेतील अरबी भाषी मुसलमानांना आणि स्पॅनिश यहुदी किंवा उत्तर आफ्रिकेतील तुर्की लोकांना सामान्यतः मूर म्हणतात.

श्रीलंकेमधील इस्लाम धर्मीयांना व फिलिपीन्समधील मुसलमानांनाही मूर म्हणतात. विद्यमान मूर हे बर्बर व अरब लोकांचे वंशज असून आठव्या शतकात त्यांनी इस्लामचा स्वीकार केला. कालांतराने ते आफ्रिकेच्या नैर्ऋत्य भागात व वायव्येकडे स्पेनमध्ये पसरले. तारिक इब्न-झियाद याच्या नेतृत्वाखाली त्यांनी जिब्राल्टरवर हल्ला चढवून व्हिसिगॉथांचा राजा रॉदरिगोच्या सत्तेस धक्का दिला. पुढे ते फ्रान्समध्येही घुसले परंतु शार्ल मार्तेलने तूर्झच्या लढाईत (७२५) त्यांचा पराभव केला. अब्दुर रहमान याने कॉर्दोव्हा येथे उमय्यांची सत्ता स्थापन केली (७५६). तिसऱ्या अब्दुर रहमानच्या वेळी कॉर्दोव्हाची खिलाफत प्रसिद्धीस आली.

कॉर्दोव्हाने कला क्षेत्रात प्रगती केली. उमय्यांच्या विस्तारास खिस्ती लोकांनी विरोध केला. अल्-मन्सूर राजपालक असताना खिस्ती-इस्लामी संघर्षाने उग्र रूप धारण केले. या संघर्षमय वातावरणातही तोलेधो, कॉर्दोव्हा,सव्हिल ही शहरे प्रसिद्ध पावली. उमय्या खिलाफत ही खिस्ती धर्माचा प्रभाव व कर्तबगार खलीफांची उणीव यांमुळे १०३१ मध्ये संपुष्टात आली.

पुढे मूर लोकांची संस्कृती हळूहळू नष्ट झाली. लीआँ व कॅस्टीलचा राजा सहावा आफांसो याने मूरांचा पराभव केला (१०८५). त्यानंतर नाव्हासा धे टोलोसाच्या लढाईत ख्रिस्ती सेनेने मूरांची सत्ता जवळजवळ संपुष्टात आणली. कॅस्टीलच्या तिसऱ्या फर्डिनांटने कॉर्दोव्हा घेतल्यानंतरही (१२३६) मलागा-ग्रॅनाडा प्रांतांत मूरांची सत्ता काही वर्षे तग धरून होती.

परंतु अनेक मूरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. पुढे ख्रिस्ती मूरांना मॉरिस्को व इस्लाम धर्मीयांना मुदेजार्स अशी नावे मिळाली. यांची वस्ती प्रामुख्याने अल्जीरिया आणि मोरोक्को या प्रदेशांत आढळते. अखेरीस स्पेनमध्ये धर्मन्यायपीठ स्थापन झाल्यानंतर मूरांची स्थिती फारच दयनीय झाली व सतराव्या शतकाच्या अखेरीस ते स्पेनमधून पूर्णतः बाहेर पडले.

 

पहा : उमय्या खिलाफत.

संदर्भ : Poole, Stanley, The Moors in Spain, 1967.

ओक, द. ह.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate