অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रशीद अद्–दीन 

रशीद अद्–दीन 

रशीद अद्–दी न

(कार. ११६०−९२). सिरियातील असॅसिन या इस्माइली गुप्तपंथाचा प्रमुख आणि धर्मयुद्धातील तिसऱ्या मोहिमेमधील एक सेनानी. त्याच्या पूर्व आयुष्याविषयी तसेच जन्ममृत्यूंच्या तारखांविषयी माहिती उपलब्ध नाही. असॅसिन चळवळ व त्यातील त्याचे कार्य यांविषयी तत्कालीन कागदपत्रांतून थोडीफार माहिती मिळते.

मध्ययुगात इस्माइली पंथाच्या निझार शाखेतील असॅसिन ही दहशतवादी राजकीय-धार्मिक संघटना. अकराव्या ते तेराव्या शतकांत इराण, इराक, सिरिया आदी देशांतून ती कार्यरत होती. हशीश या मादक द्रव्याच्या सेवनामुळे तिच्या अनुयायांना हॅशिशीन-अशिशीन-असॅसिन हे नाव मिळाले. हशीश हे मादक औषध (गर्द) आहे. बाराव्या शतकातील धर्मयुद्धांची माहिती देणाऱ्या फ्रेंच इतिवृत्तांत हशीश या अरबी शब्दाचे भाषांतर मिळते. मार्को पोलोसारखे काही लेखक-प्रवासी यांसबंधीच्या काही कथा उद्‌धृत करतात; परंतु त्यांना तत्कालीन इस्माइली पंथाच्या कागदपत्रांतून पुष्टी मिळत नाही.

अल्-मुस्तानसिर या फातिमी खलीफाच्या मृत्यूनंतर (१०९४) हसन इब्न शब्बा आणि काही इराणी शिया पंथीय मुसलमानांनी इराणमधील निजाम अल-मुल्क, सुलतान मलिकशाह इत्यादींचे खून करून दहशंत निर्माण केली आणि इराणमधील काझ्बीन जवळचा अलमूत हा डोंगरी किल्ला काबीज केला. हा किल्ला हे राजधानीचे ठिकाण करून त्यांनी इराण–इराकमधील दहा-बारा महत्त्वाचे किल्ले काबीज केले. शत्रूचे बालेकिल्ले आणि शहरे यांत ते आपले प्रतिनिधी गुप्तरीत्या पाठवीत. त्यांनी अब्बासी खिलाफतीच्या आधिपत्याखालील प्रदेशांतील सेनापती व राज्यपाल यांचे खून घडवून आणले. यांच्या राज्याचा विस्तार बाराव्या शतकात बऱ्याच मोठ्या प्रदेशावर होता. हसन शब्बा आणि त्याच्या वंशातील सहा वारसांनी १२५६ पर्यंत या विस्तृत प्रदेशावर सत्ता गाजविली. यांच्या कारकीर्दी अशा : हसन शब्बा (कार. १०९०−११२४), बुझुर्ग उम्मीद रूदबारी (कार. ११२४−३८), हसन मुहम्मद (कार. ११३८−६६), नूर अल्‌-दीन मुहम्मद (कार. ११६६−१२१०), जलाल अल्‌-दीन हसन मुहम्मद (कार. १२१०−२०), अला अल्‌-दीन मुहम्मद (कार १२२०−५५) आमि रूबन अल्‌-दीन मुहम्मद (कार १२५५−५६).

बाराव्या शतकात यांच्या सत्तेचा सिरियात विस्तार झाला. त्याचे श्रेय रशीद अद्‌-दीन याच्याकडे जाते. याला अलमूतचा सुलतान नूरअल्‌-दीन मुहम्मद याने सिरियात निवडक सैन्य व साथीदार देऊन प्रचार-प्रसारार्थ पाठविले.

यावेळी उत्तर सिरियातील अन्सरीय पर्वतश्रेणीतील मास्यॅफ या किल्ल्यावर अबू मुहम्मद हा राज्यपाल होता. रशीदने सभोवतालच्या जनसमुदायात आपले जाळे पसरविले. तेथील लोकांत तो मिळून मिसळून वागू लागला. त्याने काही धार्मिक कृत्ये आणि दानधर्मही केला. या कृत्यांमुळे थोड्याच दिवसांत एक संत म्हणून त्याचा नावलौकिक झाला. परिणामतः अबू मुहम्मदाने त्यास किल्ल्यात पाचारण केले आणि सन्मानाने वागविले. त्याने कपटाने अबूला दगा दिला. मृत्यूशय्येवर अबू मुहम्मदाला त्याचा दुष्ट हेतू लक्षात आला. अबू मुहम्मदाच्या मास्यॅफ किल्लावरच त्याने सिरियातील असॅसिनींची राजधानी केली आणि अलमूतचे असलेले संबंध तोडले व तो स्वतंत्र पणे वागू लागला. स्वतःला तो इमाम मानू लागला आणि त्याने नातिक (देववाणी) हे विरुदही धारण केले; त्याची लोकप्रियता झपाट्याने वाढली. एक थोर जादुगार म्हणूनही तो ख्यातनाम झाला. तो हातचलाखीचे खेळ करी. पुढे त्याची भोंदुगिरी उघडकीस आली; पण दहशतवादामुळे त्यास कोणीच विरोध करण्यात धजत नसे.

मंगोल नेता हुलांगू खान याने इराणमधील अनेक ठाणी काबीच करून असॅसिनांची अलमूत ही राजधानीच जिंकली (१२५६) आणि तिथे आपले रज्यपाल नेमले. त्यानंतर मामलूक सुलतानांनी १२६५ मध्ये सिरियातील असॅसिनांची स्थाने जिंकून तिथेही आपले राज्यपाल नेमले. अशा प्रकारे तेराव्या शतकात असॅसिन संघटना संपुष्टात आली. त्यांचे अनुयायी सिरिया, इराण, मध्य आशिया, पाकिस्तान आणि भारत या देशांत आढळतात. ते खोजा म्हणून ओळखले जातात. त्यांचे आगाखान हे प्रमुख आहेत.

 

पहा : इस्माइली पंथ; खोजा.

संदर्भ : Gibb, H. A. R.; Kramers, J. H. Ed. Shorter Encyclopaedia of Islam , Leiden, 1961.

देशपांडे, सु.र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate