অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच

रस्पूट्यिन, ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच

रस्पूट्यिन ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच

(७ जुलै १८७२ ३१ डिसेंबर १९१६). रशियन लब्धप्रतिष्ठित साधू व झार राजदंपतीचा घनिष्ठ मित्र. त्याचे मूळ नाव ग्रिगॉऱ्यई यिफ्यीमव्ह्यिच न्योव्हख; पण त्याच्या भ्रष्ट जीवनामुळे रस्पूट्यिन (बदफैली) हे नाव त्यास प्राप्त झाले. त्याचा जन्म पश्चिम सायबीरिया प्रांतातील पक्राव्हस्कोई या गावी सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. बालपणी एक हूड व वात्रट मूल म्हणून त्याच लौकिक होता. चौदाव्या वर्षी एका गुन्ह्याबद्दल त्याला फटक्यांची शिक्षा झाली.

तीमुळे त्याला चमत्कारिक झटके येऊ लागले. या झटके येण्याच्या सोंगातून तो भविष्यकथन करू लागला. पुढे खोट्या साक्षीबद्दल पुन्हा त्याला सजा झाली. त्यानंतर त्याने जन्मगावी वडिलार्जित धंदा सुरू केला. या सुमारास ओल्मा गोफ नावाच्या श्रीमंत सुंदर युवतीशी त्याची मैत्री जडली. त्याची परिणती विवाहात झाली (१८९५). त्यांना तीन मुले झाली. पत्नीकडून मिळालेली बहुतेक संपत्ती त्याने दारूच्या व्यसनात घालविली.

पुढे सेंट पीटर्झबर्गच्या अकादमीमध्ये तो दाखल झाला (२९ डिसेंबर १९०३). त्याला साधू बनण्याची उपरती झाली. या बुवाबाजीसाठी लोकांकडून पैसे जमवून त्याने ख्रिस्ती मठ स्थापनेचा संकल्प सोडला. बार्नी आणि स्ट्रेपशेफ या मित्रद्वयीने त्याला प्रक्रिय सहाय्य दिले. पक्राव्हस्कोई येथे त्याने मठाची स्थापना केली. आपल्या पंथाच्या प्रचारार्थ त्याने पुढील धर्मतत्त्वे प्रसृत केली, ‘पापाशिवाय पश्चाताप नाही; पश्चात्तापाशिवाय परागती नाही, म्हणून प्रथम पाप करा, मी तुमच्या उद्धाराची हमी घेतो’. या लोकविलक्षण उपदेशाने तरुणवर्ग त्याच्या संप्रदायाकडे आकृष्ट झाला.

रात्रीच्या एकांतात स्नानगृहात तो आपल्या धर्माची दीक्षा देत असे. डोळ्यातील विलक्षण चमक आणि संदिग्ध गूढ संभाषण तसेच भविष्यकथन आणि संमोहनविद्येतील कसब यांमुळे त्याची छाप तत्काळ पडे. त्याचा लोकसंग्रह वाढला व धनप्राप्तीही बऱ्यापैकी होऊ लागली. लिडिया नावाची एक तरुण श्रीमंत विधवा त्याची पट्टशिष्या बनली. तिने मठाच्या व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी उचलली आणि वृत्तपत्रीय प्रचारमोहीमही हाती घेतली. बार्नी व स्ट्रेपशेफ जमा होणारे धन सुरक्षित ठिकाणी ठेवीत आणि सावकारी करीत.

रस्पूट्यिनची मोहिनीविद्या व उपचारपद्धती यांची कीर्ती रशियातील प्रमुख शहरांत पसरली. तो सेंट पीटर्झबर्ग (लेनिनमाड) या राजधानीत आपल्या लवाजम्यासह दाखल झाला. ॲन या झरिनाच्या दासीमार्फत रस्पूट्यिनचा राजवर्तुळात प्रवेश झाला. त्याने निकोलसच्या एकुलत्या एक वारस पुत्राचा−अलेक्सीचा−रक्तस्त्राव मूर्च्छाद्वारे थांबविला. साहजिकच आपल्या मुलाला पुनर्जन्म मिळाल्यामुळे झार व झरिना यांची मर्जी त्यावर बसली.

हळूहळू राजदरबारात त्याचा प्रभाव वाढू लागला. अमीर−उमरावांमध्ये त्याचे वजन वाढले. पुढे तर रशियाच्या राजकारणात तो ढवळाढवळ करू लागला आणि आपल्या मर्जीतील लोकांना उच्चपदावर नेमून घेऊ लागला. टबॉल्स्कच्या बिशपपदावर त्याने लोकापवादाला न जुमानता बार्नी या मित्राची वर्णी लावली. या सर्वांतून त्याला प्रचंड धनलाभ झाला. झरिना आलेक्सांद्रा आणि त्याचे घनिष्ठ संबंध होते.

झार निकोलस हा बाईलवेडा असल्यामुळे तिचे तत्कालीन राजकीय घडामोडींवर वर्चस्व होते. याविषयीची अनेक पत्रे उपलब्ध आहेत. पहिल्या महायुद्धाच्या प्रारंभीच्या काळात झार निकोलस युद्धभूमीवर असे (१९१४−१६). तेव्हा राजवाड्यातील सर्व घडामोडी रस्पूट्यिनच्या सल्ल्याने झरिना करीत असे. पुढे तर लष्करी उलाढालीच्या व अधिकाऱ्यांच्या बाबतीतही त्याचा शब्द अखेरचा ठरू लागला. त्यांवरून आलेक्सांद्रा रस्पूट्यिनच्या किती कच्छपि गेली होती, हे दिसते.

जर्मन गुप्तहेर खात्यातील सिसिलिया व्हेर्नर हिच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. तिच्या सल्ल्यामुळेच त्याने झार निकोलसला युद्धविरामाचा घातक सल्ला दिला व अनेक महत्त्वाची कागदपत्रे व संपत्ती जर्मनीत सुखरूप पोहोचविली. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणात रशियाची मानहानी झाली आणि राजघराण्याची प्रतिष्ठा जवळजवळ संपुष्टात आली. त्यातून उद्भवलेल्या बेबंदशाहीची परिणती अखेर रशियाच्या बोल्शेव्हिक क्रांतीत झाली (१९१७).

अखेरच्या दिवसांत देघुलिन (राजवाड्याचा प्रमुख), स्टलिप्यिन (मुख्यमंत्री), ल्यूक्यॅनोव्ह (धर्ममंत्री), वेलेट्स्की (पोलीस संचालक) या प्रमुख प्रभृतींनी आणि अमीर-उमरावांनी त्याच्याविषयी राजाकडे तक्रार केली; पण झरिनाच्या प्रभावामुळे निकोलसने रस्पूट्यिनविरुद्ध काहीच कृती केली नाही. अखेर अमीर उमरावांपैकी प्रिन्स फीलिक्स युसोपोव्ह व द्युमाचे सभासद यांनी रस्पूट्यिनवर प्रथम विषप्रयोग केला, पण त्यानेही तो मरत नाही, असे पाहून गोळ्या घालून त्यास ठार मारले व त्याचे प्रेत नेव्हा नदीत टाकले.

रस्पूट्यिनचे व्यक्तिमत्व गूढ आणि ढंगदार होते. त्याची वर्तणूक गलिच्छ आणि उच्छृंखल होती. अशिक्षित असूनही ज्या गूढ विद्येमुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले, त्यामुळे तो उच्चभ्रू स्त्री-पुरुषांची निंदा-नालस्ती करे. तो दारूचे अतिसेवन करी आणि अश्लिल व रांगड्या भाषेत संभाषण करी. त्याचा असा दावा होता की त्याच्या बरोबरच्या शरीरसान्निध्यात पारमार्थिक शुद्धीकरण आहे. यामुळेच अभिजन वर्गातील काही स्त्रिया त्याच्या उत्तेजनाला बळी पडल्या. अखेरीस त्याची लाचखाऊ भ्रष्टाचारी प्रवृत्ती आणि व्यभिचारी कृत्ये उघडकीस आली. एक भोंदू बदफैली साधू म्हणून क्रांत्योत्तर रशियाच्या इतिहासात त्याची प्रतिमा रेखाटली गेली. त्याच्याविषयी कथा-कादंबऱ्या-लिहिल्या गेल्या आणि चित्रपटही नंतर निघाले

 

संदर्भ : 1. Flint, F. S.; Tait, D. F. Trans. Rasputin : The Holy Devil, London, 1967.

2. Pares, Barnnrd, The Fall of the Russian Monarchy : A Study of the Evidence, New

York, 1939.

3. Wilson, Colin, Rasputin and the Fall of the Romanovs, London, 1964.

४. सार्दळ, शंकर धोंडो, रासपुतीन, कोल्हापूर, १९६१.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate