অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रांके, लीओपोल्ट फोन

रांके, लीओपोल्ट फोन

रांके, लीओपोल्ट फोन

(२१ डिसेंबर १७९५–२३ मे १८८६). प्रसिद्ध जर्मन इतिहासकार. त्याचा जन्म ल्यूथरियन पंथाच्या कुटुंबात व्हीआ (म्युरिंजिया-सॅक्सनी) येथे झाला. हाल व बर्लिन विद्यापीठांत लिओपोल्ट रांकेत्याने दैवकशास्त्र आणि प्राचीन अभिजात वाङ्‌‌मय ह्यांचा अभ्यास करून पदवी मिळविली आणि फ्रँकफुर्ट येथे अध्यापकाची नोकरी धरली; तथापि त्याचा ओढा ऐतिहासिक कागदपत्रांच्या चिकित्सक व साक्षेपी संशोधनाकडेच अधिक होता.

त्याने प्रबोधनकालातील कागदपत्रांचा अभ्यास करून हिस्टरी ऑफ द लॅटिन अँड ट्युटॉनिक नेशन्स फ्रॉम १४९४–१५१४ (इं. शी.) हा ग्रंथ १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. यात त्याने परंपरेचे चिकित्सक विश्लेषण हा इतिहासलेखनाचा मूळ पाया असला पाहिजे हे दाखविले. त्यामुळे त्याची प्रथम उपप्राध्यापक (१८२५–३४) व नंतर प्राध्यापक (१८३४–७२) म्हणून बर्लिन विद्यापीठातील इतिहास विभागात नियुक्ती झाली. अखेरपर्यंत तो या पदावर होता.

१८२७–३१ च्या दरम्यान त्यास व्हिएन्ना, व्हेनिस, रोम व फ्लॉरेन्स ह्या शहरांतील पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी पाचारण करण्यात आले. ह्यानंतर १८४१ मध्ये शासनातर्फे त्याची अधिकृत इतिहासकार म्हणून नियुक्ती झाली. वरील कामाच्या निमित्ताने त्यास यूरोपातील अनेक देशांना व तेथील पुराभिलेखगारांना भेटी देऊन अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे त्यास विपुल लेखनही करता आले. त्याने मध्ययुगीन इतिहासावर अनेक ग्रंथ लिहिले. तो बर्लिन येथे वृद्धापकाळाने निधन पावला.

शिक्षक म्हणून रांके कधीच प्रभावी झाला नाही तथापि त्याने सुरू केलेली इतिहास विषयातील चर्चासूत्रपद्धती लोकप्रिय झाली. इतिहासाच्या अभ्यासात त्याने विवेचक विश्लेषणात्मक पद्धती आचरणात आणली. त्यामुळे विवेचनात काहीसा रुक्षपणा आला; पण अचूक अर्थबोधन होऊ लागले.

त्याने बारतोल्ट गेओर्ख नीबूरच्या ऐतिहासिक अन्वेषण पद्धतीचे सविस्तरपणे व शास्त्रीय दृष्ट्या प्रत्यक्षात आचरण केले. रांकेचा हेतू प्राचीन इतिहासाचे वस्तुनिष्ठ दृष्टिकोणातून निःपक्षपाती वृत्तीने लेखन करणे हा होता. इतिहास लिहिताना इतिहासकाराने तत्कालीन अथवा तत्पूर्वीच्या ऐतिहासिक साधनांची सत्यासत्यता पडताळून विश्वसनीय अस्सल साधनांच्या आधारेच इतिहासलेखन करावे, अशी त्याची इतिहासलेखनविषयक धारणा होती.

ह्या धारणेमुळे त्याने साक्षेपी राजकीय इतिहासाची मीसांसा आपल्या ग्रंथांतून केली; पण त्यात सामान्य लोक व त्यांचे दैनंदिन जीवन यांकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा हा इतिहासाविषयीचा दृष्टिकोण पुढे इंग्लंड व अमेरिकेत अतिशय लोकप्रिय झाला. त्याच्या चर्चासूत्रांचे वार्षिक अहवाल म्हणजे मध्ययुगीन इतिहासाची विश्वसनीय साधनसामग्रीच होय. त्याने इतिहासलेखन करीत असताना तत्कालीन राजकीय घडामोडींकडे दुर्लक्ष केले वा तटस्थतेचे धोरण स्वीकारले, अशीही त्याच्यावर टीका झाली.

त्याने विपुल लेखन केले. त्याचे सर्व लेखन जर्मन भाषेत असून त्याच्या महत्त्वाच्या ग्रंथांचे इंग्रजी अनुवाद झाले आहेत. त्याची इंग्रजी शीर्षके पुढील प्रमाणे होत : हिस्टरीज ऑफ द रोमॅनिक अँड जर्मेनिक पिपल (१८२४), इक्लीझिअँस्टिकल अँड पोलिटिकल हिस्टरी ऑफ द पोप्स (३ खंड–१८४०), प्रिन्स अँड पिपल्स ऑफ सदर्न यूरोप (१८२७), सर्बिया अँड टर्की इन द नाईटिंथ सेंचुरी (१८२९),जर्मन हिस्टरी ड्युरिंग द इरा ऑफ द रिफॉर्मेशन (१८३९–४७), नाइन बुक्स् ऑफ रशियन हिस्टरी (१८४७–४८), मेम्वार्स ऑफ द हाऊस ऑफ ब्रॅन्डनबर्ग (१८४९), वर्ल्ड हिस्टरी (९ खंड –१८८३–८८). वर्ल्ड हिस्टरीचे शेवटचे दोन खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले.

रांकेने तत्कालीन राजकरणात सक्रिय भाग घेतला नाही; परंतु इटलीमधील तीन वर्षांच्या वास्तव्यानंतर Historisch-Politische Zeitschrift (१८३१) नावाचे नियतकालिक काढले. त्याचा तो संपादक झाला. यातून फ्रेंच राज्यक्रांतीचा प्रशियन शासनावरील परिणाम स्पष्टपणे व्यक्त झाला आहे तत्कालीन राजकीय विचारांचे दर्शनही त्यातून होई. ते १८३६ मध्ये बंद पडले.

आधुनिक इतिहासलेखन पद्धतीला सुसूत्र व शास्त्रशुद्ध वळण लावण्याचे काम रांकेने केले. त्याच्या लेखनात राष्ट्रवाद व प्रगतिवाद या दोहोंचा समन्वय आढळतो. रांकेच्या इतिहासलेखनाच्या संकल्पनेचे अनुकरण, पाश्चात्य इतिहासकारांनी पहिल्या महायुद्धापर्यंत व त्यानंतरही काही काळ केले. जर्मनीत अभ्यास करणाऱ्या परकीय इतिहासकारांवर त्याच्या लेखनाची छाप व प्रभाव आढळतो.

 

संदर्भ : 1. Berding, Helmut, Leopold Von Ranke, 1971.

2. Gooch, G. P. History and Historians in the Nineteenth Century, Gloucester, 1949.

3. Schevill, Ferdinand, Six Historians, Chicago, 1956.

4. Thompson, J. W. A History of Historical Writing Vol. 2, New York, 1959.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate