অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रॅमसीझ, दुसरा

रॅमसीझ, दुसरा

रॅमसीझ, दुसरा

(इ. स. पू. सु. १३१५−१२२५). प्राचीन ईजिप्तमध्ये एकोणीस आणि वीस ह्या राजवंशांत जे अकरा रॅमसीझ राजे झाले, त्यांपैकी सर्वांत कर्तबगार, शूर व देखणा राजा. त्याने आपल्या भावांकडून गादी बळकावून इ. स. पू. १२९२ ते १२२५ दरम्यान राज्य केले. प्रथम त्याने न्यूबियातील सोन्याच्या खाणींकडे सैन्य धाडले व अमाप लूट मिळविली. ह्या पैशाचा उपयोग ईजिप्तच्या साम्राज्यवृद्धीसाठी आणि अनेक भव्य वास्तू बांधण्यात खर्ची घातला.

पश्चिम आशियातील बंडे मोडून त्याने सिरिया,पॅलेस्टाईन तसेच हिटाइट इत्यादींचा कादेशच्या युद्धात पराभव केला (इ. स. पू. १२८८). ह्या वेळी अनेक ज्यू ईजिप्तमध्ये गुलाम म्हणून आले. हिटाइटांबरोबरचे युद्ध सु. पंधरा वर्षे चालले होते. अखेर मैत्रीचा तह होऊन (इ. स. पू. १२८०) ते थांबले. पुढे त्याने हिटाइट राजकन्येशी विवाह केला (इ. स. पू. १२६७).

त्याने कार्यक्षम प्रशासन आणि राज्यविस्ताराबरोबरच वास्तुकला आणि मूर्तिकला यांना प्रोत्साहन दिले. विद्यमान अवशिष्ट इमारतींत जवळजवळ निम्म्या इमारती रॅमसीझच्या आहेत. त्याच्या कारकीर्दीत कारनॅकचे मुख्य सभागृह व लक्सॉरच्या भव्य मंदिरात आणखी भर घालण्यात आली; या शिवाय अबूसिंबेलचे मंदिर पूर्ण झाले.

स्वतःचे शवमंदिरही त्याने बांधले. ह्याशिवाय त्याचे भव्य पुतळे सर्वत्र विखुरलेले आढळतात. त्याच्या कारकीर्दीत ईजिप्तचा व्यापार वाढला व त्यास गतवैभव प्राप्त झाले. त्याने नाईलपासून तांबड्या समुद्रापर्यंत एक कालवा काढला होता. खासगी जीवनात तो बदफैली होता. त्यास अनेक राण्या होत्या. शिवाय त्याने आपल्या स्वतःच्या मुलींशी विवाह केले. अशा प्रकारे या स्त्रियांचा एक स्वतंत्र वर्ग निर्माण झाला. रॅमसीझ वयाच्या नव्वदाव्या वर्षी मरण पावला.

 

पहा : ईजिप्त संस्कृति; पिरॅमीड.

संदर्भ : Schmidt, J. D. Ramsses II, Baltimore, 1973.

देशपांडे, सु. र.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate